श्री गणेश पुराण

उपासना खंड आणि क्रीडा खंड

श्री गणेश पुराण
उपासना खंड आणि क्रीडा खंड

भगवान श्री गणेशांच्या निर्गुण निराकार स्वरूपाला समजून घेण्यासाठी जसे श्रीमुद्गल पुराण हा अंतिम मार्ग आहे तशाच स्वरूपात श्री गणेशा यांच्या सगुण-साकार स्वरूपाचे आकलन, आस्वाद आणि गुणगान करण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग आहे श्री गणेश पुराण.
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्याद्वारे साकार झालेल्या २१ ग्रंथात्मक श्री गणेश उपासना या ग्रंथ मालिकेतील बारावा आणि तेरावा दूर्वांकुर स्वरूपात श्री गणेश पुराणाच्या उपासना खंड आणि क्रीडा खंड या दोन भागांचा वैशिष्ट्यपूर्ण परिचय करून देण्यात आलेला आहे.
पुराणकथा कशा आहेत यापेक्षा त्या तशा का आहेत? आज आपल्या चिंतनाचा कायम आधार ठेवणाऱ्या श्री पुंड सरांनी पुराण वाङ्मयाकडे पाहण्याची एक कालोचित दृष्टी त्यांच्या सर्वच ग्रंथांमध्ये जोपासली आहे. या दोन्ही ग्रंथातदेखील पानोपानी आपल्याला त्याची प्रचिती येत राहते.
उपासना खंड हा पहिला भाग म्हणजे नावाप्रमाणे भगवान श्रीगणेशांना उपासनेचे विविध मार्ग सांगणारा विभाग.
सोमकांत नावाच्या राजाला महर्षी भृगूंनी केलेला हा दिव्य उपदेश.
यामध्ये सर्वप्रथम विष्णुशंकरादिक महेश्वरांनीदेखील आपापल्या संकटसमयी श्री गणेश उपासना करून निर्माण केलेल्या श्री सिद्धटेक श्री रांजणगाव इत्यादी अनेक क्षेत्रांचे वर्णन आलेले आहे. या सर्व कथांच्या माध्यमातून भगवान गणेशांचे सर्वपूज्य, सर्वादिपूज्य स्वरूप आपल्यासमोर स्पष्ट होते.
उपासना खंडातील अत्यंत महत्त्वाचे चार विषय म्हणजे श्री वरद गणेश व्रत, श्री चतुर्थी माहात्म्य, श्री दूर्वा माहात्म्य आणि श्री गणेश नाम माहात्म्य. या चारही विषयावरील अनेक कथा पुराणांमध्ये आलेल्या आहेत. त्या प्रत्येक कथेचे निरूपण करताना या कथेचा आजच्या जीवनात मला काय उपयोग आहे? ही श्री पुंड सरांची भूमिका या दोन्ही पुस्तकांना वेगळेपण प्रदान करते.
यानिमित्ताने त्रिपुरासुर कथा, अहिल्या उद्धार कथा, कार्तिकेय जन्म कथा, बल्लाळ विनायक कथा अशा विविध कथांचे लेखकाने केलेले निरूपण हा मुळातूनच वाचून आपला आपण आस्वाद घेण्याचा विषय आहे.
श्रीगणेश पुराणाचा दुसरा भाग आहे क्रीडा खंड. त्यात नावाप्रमाणे श्री गणेशाच्या विविध क्रीडांचे वर्णन आलेले आहे.
कृतयुगात मध्ये झालेला विनायक अवतार, त्रेतायुगात झालेला मयुरेश्वर अवतार आणि द्वापार युगात झालेला श्री गजानन अवतार यांचे विस्तृत निरूपण हा या भागाचा वर्ण्यविषय.
यात शेकडो कथा आलेल्या आहेत. त्यापैकी अनेक कथां संक्षेपाने उल्लेख करीत ज्या कथांच्या द्वारे वाचकाची, उपासकाची, साधकाची अंतर्गत प्रगती होऊ शकेल अशा कथांचे लेखकाने विस्तृत विवेचन केली आहे.
श्री विनायकांच्या चरित्रातील गंधर्व कथेतून स्पष्ट होणारे श्री गणेशांचे सर्वोच्च स्वरूप, श्री भृशुंडी कथेतून प्रकट होणारी भक्तीची महती, श्री शुक्ल कथेतून प्रकट होणारे समर्पण इत्यादी गोष्टींचे श्री पुंड सरांनी केलेली निरूपण अतीव चिंतनीय आहे.
श्री मयुरेश्वर अवताराच्या बाललीला म्हणजे तर, ‘गोष्ट सांगा’ म्हणत आजी-आजोबांच्या मागे लागणाऱ्या नातवासाठी पुराणकारांनी करून दिलेली भली मोठी सोय आहे. तशा अनेक कथा या ग्रंथात आल्या आहेत.
तर गजानन अवतारात परिपक्व साधकांच्या साठी उपयुक्त होईल असे असंख्य विषय प्रगट झाले आहेत.
श्री गणेशपुराणात आलेल्या श्रीगणेश सहस्त्रनाम आणि श्री गणेश गीता या दोन उप विभागांवर पुढे जाऊन या ग्रंथ मालिकेतील दोन वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित झाले. यावरून आपल्याला या पुराणाच्या अर्थगर्भतेचा अंदाज येईल.
पुराणे नेमकी वाचावी कशी? या प्रश्नाचे निसंदिग्ध उत्तर म्हणजे विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड निरुपित श्री गणेश पुराण उपासना खंड आणि क्रीडा खंड.

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (1)
Add Comment
  • Graig

    Very good watch