श्रीगणेश सहस्रनाम.
आपल्या उपास्य देवतेशी सातत्याने अनुसंधान ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. कोणत्याही देवतेचा कोणताही पंथ असो नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहेच.
भगवंताच्या नामा इतके मधुर जगात काहीही नाही ही सर्व भक्तांची अनुभूती आहे.
भगवंताचे नाव नुसते गुणगुणले तरी परमानंद प्राप्त होतो. मग त्या नामाचा त्यामागे असणाऱ्या तत्त्वाचा शास्त्रीय अर्थ समजून नामस्मरण घडले तर तो आनंद शब्दात कसा वर्णन करणार?
भगवान गणेशांच्या नामस्मरणाला असे ‘अर्थ ‘पूर्ण अधिष्ठान उपलब्ध करून देणारा ग्रंथ म्हणजे विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड लिखित श्रीगणेश सहस्रनाम.
श्री गणेशा पुराणांमध्ये आलेल्या या दिव्य स्तोत्राचे निरूपण म्हणजे महागाणपत्य परमपूज्य गजानन महाराज पुंडशास्त्री यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना सादर केलेली ही महान श्रद्धांजली.
यामध्ये आलेली भगवान गणेशाची अनेक नावे आपण कधी ऐकलेली ही नसतात.
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जी नावे आपण नेहमी ऐकतो त्यांचे येथे जे अर्थ दिलेले आहेत ते अक्षरशहा थक्क करणारे आहेत.
उदाहरण घेऊन सांगायचे तर, वक्रतुंड शब्दाचा अर्थ काय? वाकड्यातिकड्या तोंडाचा हा अर्थ कसा लागेल? मग कोणी म्हणतात त्यांनी सोंड वाकडी केली? पण सोंड हे तर हत्तीचे नाक आहे. शब्द वक्रतुंड आहे वक्र नासिका नाही. असे निरूपण करीत या गोष्टींकडे वेगळ्या अर्थाने पाहायला पाहिजे ही दृष्टी आरंभी लेखक करतात. त्यानंतर वक्रा हा शब्द मायेसाठी असतो. ती वेडीवाकडी आहे. तिला जो आपल्या तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतो त्या परमात्म्याला वक्रतुण्ड म्हणतात. हा अर्थ आपल्याला विस्मयचकित करून टाकतो.
असे अनुभव या ग्रंथात पानोपानी विद्यमान आहेत म्हटल्यावर या ग्रंथाच्या अपूर्वतेची आपल्याला सहज प्रचीती येऊ शकते.
या ग्रंथाचे दुसरे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे संदर्भ ग्रंथत्व. यामध्ये संख्येच्या आधारावर तयार केलेल्या अनेक नावांचा उल्लेख आहे.
उदाहरणार्थ द्विवदन, त्रिवर्गफलदाता,चतुर्मखमयोपाय,पंचभक्षप्रिय, षडुर्मिभंजन इत्यादी अनेक नावे येथे आहेत. या प्रत्येक नावाचे निरूपण करताना लेखकाने त्या संख्येचे अर्थ आपल्यासमोर उलगडून दाखविले आहे. यात पाच भक्ष कोणते? सहा ऊर्मी कोणत्या? यांचे वर्णन केले असल्याने हा ग्रंथ एखाद्या संकेत कोशाप्रमाणे संदर्भग्रंथ तयार झालेला आहे.
श्री गणेशाच्या विविध सेविका देवता, त्यांची विविध वाहने, सेवक भक्त इत्यादींच्या आधारावर तयार झालेली विविध नावे एका वेगळ्याच आनंदाचा विषय आहेत. त्यांचे निरुपण करताना लेखकाने त्यामागील कथा थोडक्यात सादर केल्या आहेत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृतीत सर्वच देवतांची अशी सहस्रनामे उपलब्ध आहेत. तुलनात्मक अध्ययन केले तर यापैकी अनेक नावे सर्वत्र समान आहेत. अशावेळी केवळ भगवान श्री गणेशच नव्हे तर कोणत्याही देवतेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे.
या अर्थांसोबतच आरंभी मूळ संस्कृत स्तोत्र आणि शेवटी दूर्वा शमी इत्यादींनी सहस्रार्चन करण्यासाठी आवश्यक अशी ‘श्री गणंजयाय नमः ‘ अशा स्वरूपातील नामावली दिली असल्याने हा ग्रंथ अर्चनेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.
समजून-उमजून केलेल्या नामस्मरणाचा शतगुणित आनंद देणारा ग्रंथ म्हणून श्री गणेश सहस्रनाम या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे.
great addition