श्रीगुरुचरित्र – भगवान दत्तात्रयांची वांडमय मूर्ती !!

श्रीगुरुचरित्र – भगवान दत्तात्रयांची वांडमय मूर्ती !!

मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीगुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथाचे पारायण दत्तभक्त करीत असतात. श्रीगुरुचरित्राला दत्त सांप्रदायात पाचवा वेद मानतात. गुरुचरित्र ही भगवान दत्ताची वांग्मय मूर्ती असल्याची श्रद्धा सर्व दत्त भक्तांची आहे. या ग्रंथाचे एकूण ५१ अध्याय असून ५२ वा अध्याय अवतरणिका रूपाने आहे.एकूण ७४९१ श्लोकसंख्या असलेला हा ग्रंथ सात दिवसपर्यंत व्रतस्थ राहून पारायण केल्यास “निःसंदेह सात दिनी ,ऐकता बंधन तुटे जाणा “ । हा विश्वास आहे. या ग्रंथात ज्ञानकांड,भक्तिकांड आणि कर्मकांडाचा समावेश आहे. भगवान दत्तात्रय योगशास्त्र आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक असल्यामुळे या ग्रंथात त्याचेही महत्व दिसते. या ग्रंथात व्रतवैकल्ये,विविध स्थानमहात्म्य,रुद्राक्ष,औदुंबर,भस्म यांचेही महत्व आहे.
आचार धर्म,व्यष्टीधर्म,समष्टी धर्म,सृष्टीधर्म आणि परमेष्टी धर्म यांचेही महत्व विशद आहे. भगवान दत्तांची ही वांडमय मूर्ती असल्यामुळे हा उपासना ग्रंथ आणि उपास्य ग्रंथ आहे. श्रीगुरुचरित्र हा संवादग्रंथ असून यात सिध्द आणि नामधारकाचा संवाद आहे. या ग्रंथात मुळपिठ भगवान दत्तात्रयांची जन्मकथा आहे.
त्यानंतर दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवतार लिला आहेत.इ.स.१३२० ते १३५० हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवघा तीस वर्षाचा कालावधी आहे. श्रीक्षेत्र पीठापुरम ही श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मभूमी तर कृष्णातिरी असलेले श्रीक्षेत्र कुरवपूर त्यांची कर्मभूमी. पीठापुरम येथे घंडीकोटा आपलराज शर्मा आणि अखंड सौभाग्यलक्ष्मी सुमता महाराणी आईसाहेब यांच्या पोटी भगवान दत्तकृपेने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला.
तर कुरवपूर श्रीपाद श्रीवल्लभांचे लिलास्थान असल्यामुळे कुरवपूर त्यांचे अक्षय निवास स्थान आहे. येथेच श्री वासुदेवानंद सरस्वती यांना “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा “ या सिध्दमंत्राचा साक्षात्कार झाला होता. पीठापुरम येथे इ.स.१३२० ते १३३६ असे एकूण सोळा वर्ष तर १३३७ ते १३४० तीर्थाटन ४ वर्ष आणि कुरवपुरात १० वर्ष असे एकूण ३० वर्ष श्रीपादश्रीवल्लभांचे अवतार कार्य आहे. पुढे हेच श्रीपादश्रीवल्लभ कारंजा क्षेत्री पुढील अवतार धारण करुन श्रीनृसिंह सरस्वती रुपात जन्माला आले. नृसिंह सरस्वती यांचा कार्यकाळ इ.स.१३७८ ते १४५८ एकूण ८० वर्षाचा हा अवतार. या अवतारात कारंजा जन्मभूमी, नृसिंहवाडी राजधानी तर श्रीक्षेत्र गाणगापुर कर्मस्थान आहे.याशिवाय श्रीक्षेत्र औदुंबर,परळी,त्र्यंबक,बासर अशा स्थानांवरही भगवान नृसिंह सरस्वती यांच्या लिला आहेत.साधारतः इ.स.१३७८ ला कारंजा क्षेत्री जन्म,तिथेच १३८५ ला उपनयन,१३८६ ला तीर्थाटन प्रारंभ,१३८८ ला संन्यास आणि पुढे १४२० पर्यंत भ्रमंती ,१४२१ श्रीक्षेत्र औदुंबर ,१४२२ ते १४३४ एक तपपर्यंत श्रीक्षेत्र नर्सोबा वाडी पुढे १४३५ ते१४५८ पर्यंत श्रीक्षेत्र गाणगापुर आणि १४ जानेवारी १४५८ श्री.शैलगमन असा त्यांचा कालक्रम. श्रीगुरुचरित्रात इसवी सन नसले तरी अवतार कार्यांचे गोड वर्णन आहे. यातील काही ठिकाणी भगवंतांच्या पादुका आहेत. जसे जन्मस्थान श्रीक्षेत्र कारंजा येथे निर्गुण पादुका आहेत. श्रीक्षेत्र औदुंबर येथे विमल पादुका आहेत. श्रीक्षेत्र नृसिंह वाडी येथे मनोहर पादुका आहेत. श्री क्षेत्र गाणगापुर येथे निर्गुण पादुका आहेत. गुरुचरित्रात या स्थानांचे महत्व आणि सद्गुरूंच्या तेथील लिला जीवंत वर्णित केल्या आहेत. श्रीगुरुचरित्राचे लेखक लौकिकार्थाने सरस्वती गंगाधर आहे.पण श्रीगुरुचरित्र अपौरुषेय आहे.म्हणून तर त्याला पाचवा वेद म्हणतात.गुरुचरित्रात तिसऱ्या अध्यायात हा ग्रंथ आधिच म्हणजे सरस्वती गंगाधरांकडून गुरुचरित्र प्रकट होण्यापुर्वी ११० वर्ष आधीच अस्तित्वात असल्याचे प्रमाण आहे.तिथे सिध्द आपल्या झोळीतून एक पुस्तक काढतात आणि नामधारकाला ते दाखवून हे गुरुचरित्र आहे असे सांगतात. हाच ग्रंथ लेखक सरस्वती गंगाधर पुढे प्रकट करतात म्हणून गुरुचरित्र वेदासम अपौरुषेय.
बर जे लौकिक लेखक सरस्वती गंगाधर आहेत ते त्यांचे स्वतःचे नाव नाही.ते आपले स्वतःचे मुळ नाव कुठेच घेत नाहीत.यातील सरस्वती हे नाव आपले परमगुरु नृसिंह सरस्वती यांच्या नावातील तर गंगाधर हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. म्हणून सरस्वती गंगाधर .सद्गुरू प्रति असा समर्पण भाव दुर्मिळ.त्यासाठी त्यांनी स्वत्व विरघळवून टाकले.स्वतःच्या नावाचा साधाही उल्लेख कुठे नाही.संपूर्ण ग्रंथात प्रत्येक ठिकाणी सरस्वती गंगाधर असाच उल्लेख आहे. विशेष म्हणजे ह्या ग्रंथाचे प्रकट कर्ते कर्नाटकातील कडगंजी नामक गावाचे .इथेच हा ग्रंथ अवतरला.त्यांची भाषा कानडी.”भाषा न ये महाराष्ट्र “ असा उल्लेख गुरुचरित्रात आहे.असे असूनही गुरुकृपा अशी की ग्रंथातील “शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.”ग्रंथाचे वाचन करतांनाच शब्दातील नाद,माधुर्य आणि ओज ह्या तिन्ही शब्दशक्तींची वारंवार प्रचिती येते. हा ग्रंथ सिध्दमंत्ररुप आहे.हा ग्रंथ महाप्रासादिक आणि वरदग्रंथ आहे. सिध्द आणि नामधारक यांचा हा संवाद ग्रंथ असून नामधारक,नामांकित ,नामकरणी अशा तीन नावांचा उल्लेख आढळतो.हे तिन्ही एकाच व्यक्तीचे नाव असून त्या शिष्यानेही स्वतःचा मुळ नामोल्लेख केलेला नाही.नामधारक म्हणजे सद्गुरूंचेच नाव धारण केलेला.हाच तर समर्पण भाव गुरुचरित्रात प्रत्येकात ठाई ठाई भरला आहे. थोडक्यात श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ कामधेनु आहे.हा ग्रंथ कल्पतरू आहे.अनन्य भावाने या ग्रंथाच्या सहवासात राहिल पाहिजे.या ग्रंथाचे श्रवण अथवा पठण ऐहिक सुखासोबत पारलौकिक सुखाचीही सोय करुन देतो. भगवान दत्तात्रयांची वांग्मय मूर्ती असलेला ग्रंथ तूर्त फलदायी आहे. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती पर्वकाळात दत्त लहरींचा सर्वत्र संचार असतो .भगवद्गीतेत भगवंत स्वतःच सांगतात “ मासानां मार्गशीर्षो अहं “ मार्गशीर्ष महिना म्हणजे मीच आहे.याकाळात अनेक भक्तांना अनुभूती येते ती अशी की आपल्याला सहज सुगंध येतो, स्वप्नात दृष्टांत होतो,कधी भगवान दत्तात्रय विशिष्ट रुपात दर्शन देतात आणि काही कळायच्या आत गुप्त होतात. म्हणून अवधानपुर्वक पठण अथवा श्रवण केल्यास श्रीगुरुचरित्र निश्चित फलदायी ठरते. श्रीगुरुचरित्र पठणाने चित्ताची विरागता,हृदयात विशालता आणि वाणीमध्ये विनयता प्राप्त होते. यावर्षी रविवार दिनांक ८/१२/२०२४ ते शनिवार दिनांक  १४/१२/२०२४  या कालावधीत दत्तलहरिंचा सर्वत्र संचार आहे .या काळात श्रीगुरुचरित्र पठण केल्यास फलदायी ठरेल.

विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
९८२२२६२७३५

प्रा.दिलीप जोशी, वाशिम.

लेखक सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक विषयांचे अभ्यासक आहेत. मोबा. नं. - ९८२२२६२७३५

दत्त अवतारदत्तजयंतीदत्तपरंपरादत्तभक्तश्रीगुरूचरित्र
Comments (0)
Add Comment