सितानवमी वर्तमान संदर्भाती..

सितानवमी वर्तमान संदर्भाती..!

राम सियाराम, सियाराम जय जय राम ” श्रीप्रभुरामचंद्रांची पत्नी सीता. आज सितानवमी सीतेचा जन्मदिवस यानिमित्ताने सीतेच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास पुन्हा एकदा आठवण्याचा दिवस….पराक्रमी राजा जनक शेतामध्ये नांगर चालवत असताना एका पेटीत कन्या दिसली तीच म्हणजे जानकी,वैदेही,सीता ही स्वाभिमानी, पतिव्रता, सुसंस्कारित, सात्विक, शांतीप्रिय, धैर्यशील, दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली, कमालीचा आत्मविश्वास बाळगणारी, त्यागी अशी होती. म्हंटलं जातं कि 14 वर्षांच्या वनवासासाठी प्रभु रामचंद्र निघत असताना महर्षी वसिष्ठ ऋषींनी राणी सीतेला राज्य चालवायला द्यावे असे दशरथाला सांगितले होते इतके सामर्थ्यशाली व्यक्तिमत्व सीतेचे होते,विद्याविभूषित असलेली सीता रामाने उचललेले धनुष्य ही सहज उचलू शकत होती इतकी शक्तिशाली सुद्धा होती याची अनेक उदाहरणे आपल्याला रामायणात बघायला मिळतात.
आजचा हा खास दिवस साजरी करताना खुप आनंद होतोय पण ही सीता प्रत्यक्षात अनाथ होती हे माहीत असूनसुद्धा आपण संपूर्ण रामायणात सीतेचे अनाथपण अनुभवलेले नाही कारण त्याकाळात कुणी अनाथ नव्हतेच त्यांना सहजपणे राजा महाराजा,ऋषीमुनी,समाजातही सहजपणे स्वीकारले जायचे.आजच्यासारखी वाईट परिस्थिती तेव्हा नव्हती म्हणजे महर्षी वेदव्यास, सत्यकाम जाबाल,महर्षी वैशंपायन,
अष्टवक्र,महर्षी पिंपलाद ( हे तर स्वतः ला स्वनाथ म्हणायचे)कर्ण,अगदी भगवान श्रीकृष्ण जे जन्मल्यानंतर स्वतःच्या मातापित्यांकडे न राहता तारुण्यावस्थेपर्यंत यशोदा नंदकडे सुखरूप राहिले आणि त्यांचे बालपणही सुरक्षित होते.सुजाण पालकत्व म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण यशोदेच्या नंदाच्या संगोपन कौशल्यातुन दिसून पडते जो विश्वाचा जगतगुरु म्हणून ख्यातनाम झाले.स्वतः कैदेत असलेल्या देवकी वसुदेवाने आपले अपत्य आपल्याबरोबर सुरक्षित नाही हे समजून घेऊन आपली कुटुंबाची वैयक्तिक अडचण समजून घेण्याऱ्या कुटूंबाकडे सोपवले त्यात आपले अपत्य सुरक्षित राहणार ही खात्री होती म्हणूनच.अशाच सीतेपासून ते कृष्णापर्यंत अनेकानेक qualities असणाऱ्या अनाथांचा विषय आजच्या काळात इतका दुर्लक्षित का??जी स्वीकारार्हता प्राचीन काळात समाजात रूढ होती ती आता कुठे गेली आणि अनाथांबद्दल अनास्था, असहिष्णुता आणि अस्वीकारार्हता कशी आणि कुठून आली?
आज आपल्या देशात अनाथांचे पुनर्वसन ही मोठी समस्या बनली आहे आणि ती दिवसेंदिवस अधिकाधिक जटिल होत चालली आहे.अनाथ शब्द वापरला जाऊ नये असे काही तज्ज्ञांना वाटते पण अनाथ मुलांच्या संस्थेतील कोंडवाऱ्याबद्दल काय म्हणायचे??त्यांच्या जीवनमानात कुठलाही फरक नाव बदलल्याने झाला नाही तीच लाचारी,दया,दौर्बल्यता, असहायता तेच करूण जगणे…त्यांना अन्न मिळते पण त्यांच्या मायेच्या भुकेचं काय??राहायला छत आहे पण सुखद झोपेचे काय?? अनेक प्रश्न भविष्यातही त्यांची पाठ सोडत नाहीत.जगात दररोज 10000 मुले अनाथ होतात तर जुन्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 160 मुले जन्म घेऊन अनाथ होतात.125 करोड लोकसंख्येच्या देशात 39% एकूण मुलांची संख्या त्यात अनाथांची संख्या 2 करोड पेक्षा जास्त.त्यात संस्थांची संख्या प्रचंड पण अनाथ मुलांच्या पुनर्वसनाचे कुटुंब आधारित पर्याय (बाल न्याय अधिनियम 2015 म्हणजे Juvenile Justice Act 2015 )दोनच ज्यामध्ये मुलांना कुटुंबात राहण्याचा उत्तम पर्याय लिहिला गेला आहे 1.दत्तक पालकत्व 2.प्रति पालकत्व.दत्तक पालकव हे पर्मनंट सोल्युशन आणि प्रतिपालकत्व हे टेम्पररी सोल्युशन पण याबद्दल कायदा तर उत्तम आहे पण त्याच्या इम्प्लिमेंटेशनची अनेक आव्हाने आहेत.सगळ्यात पहिला पर्याय जन्मदात्या कुटुंबाचा जेव्हा तो पर्याय शक्य नसेल तर दुसरा पर्याय जवळच्या नातेवाईकांचा आणि तो ही नसेल तर मग सीतेसारखे, श्रीकृष्णासारखे आत्ताच्या terms मध्ये प्रतिपालकत्व सारख्या कुटुंब आधारित सेवा राबवल्या जाव्या ही एकच आकांक्षा आहे “स्वनाथ फौंडेशन” च्या माध्यमातून “हर बच्चे को परिवार” हे मिशन पूर्ण व्हावे आणि सीता घरोघरी जावी आणि तिच्यातल्या गुणांना वाव मिळावा आणि एक सक्षम अनाथ नाही स्वनाथ निर्माण व्हावा जो संपूर्ण समाजाला दिशा देईल आणि अनाथत्व नाही तर स्वनाथत्व प्रस्थापित करेल त्या समाजात लाचारी नसेल, अवहेलना नसेल एक सकस,निकोप,निखळ समाज असेल जिथे भारताचा आत्मा असलेली,अस्मिता असलेली प्राचीन संस्कृतीची नाळ पक्की असेल आणि ते वैभव आपल्या देशाला पुन्हा मिळवून देता येईल आणि प्रत्येक कुटुंब सुखी असेल आणि अनाथ नाही स्वनाथ मुलांचे बालपण हे त्यांना कायद्यानुसार नेमून दिलेल्या कुटुंबात आनंदी असेल हीच “स्वनाथ फौंडेशन” ची मनोकामना !!

सितानवमीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा…..

(फोटो गुगुल साभार.)

सौ.श्रेया श्रीकांत भारतीय

लेखिका ह्या अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या स्वनाथ फौंडेशन च्या अध्यक्षा आहेत.

Comments (1)
Add Comment
  • hedau.mm@gmail.com

    छान लेख