“The Idol Thief “

सत्यघटनांवर आधारित एक रहस्यमय, थरारक पुस्तक !!!

“The Idol Thief” …सत्यघटनांवर आधारित एक रहस्यमय, थरारक पुस्तक !!!

टिव्ही वर जेव्हा जेव्हा ती जाहिरात लागते.. माझं मन अस्वस्थ होतं. एक चोर मूर्ती चोरून पळून जात असतो. आणि आपला (चित्रपटांत गाजलेला) हिरो त्याचा प्रचंड स्टंटबाजी करत पाठलाग करतो, त्याला गाठतो. पण हा हिरो त्या चोराकडील मूर्ती न घेता त्याच्याकडील कोल्डड्रिंक घेतो आणि त्या चोराला हातानेच खुणावतो..जणू..’हे किरकोळ आहे…हे तू घेऊन जा’ आमच्यासाठी ती मूर्ती नाही तर ते कोल्डड्रिंक महत्त्वाचं ! ‘इरादे स्ट्रॉंग होने चाहिए’!!!!
आपल्या भारतीयांचे इरादे जर खरंच ‘नेक’ आणि स्टॉंग असते तर आपल्याच अतिप्राचीन मंदिरांमधील पवित्र देव-देवता परदेशांमधील श्रीमंत म्युझियममधील वा पंचतारांकित हॉटेल्समधील शोभेच्या वस्तू झाल्या नसत्या !
वर उल्लेखिलेली जाहिरात मला नेहमी खटकायची आणि अगदी योगायोगाने, माझ्या भावनांचं प्रतिबिंब असलेलं या विषयावरचं एक पुस्तक माझ्यासमोर आलं.
त्या पुस्तकाविषयी –

पुस्तकाचे नाव -‘The Idol Thief (English)
मूळ लेखक – एस विजयकुमार
मूळ प्रकाशक – जगरनॉट बुक्स (२०१८)
मराठी अनुवाद- ‘मूर्तिचोर’
अनुवादक – डॉ.शुचिता नांदापूरकर-फडके.
मंजुल पब्लिशिंग हाऊस, पुणे.(२०२०)

हे पुस्तक सत्य घटनांवर आधारित, मानवी मनाची पकड घेणारं, गुन्हेगारी उघडकीला आणणारं आहे. आपल्या भारतातील अतिप्राचीन मूर्ती हातोहात चोरल्या गेल्या, त्यांची करोडोंच्या किंमतीत विक्री झाली, त्यावर काही अक्षरश: अब्जाधीश झाले, काही कोट्याधीश, तर काही लक्षाधीश. याप्रक्रियेत किती हात ओले झाले याची तर गणतीच नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त जाळं विणलं गेलं. या तस्करीचा मागोवा, आपल्या प्राचीन संस्कृतीवर मनस्वी प्रेम करणाऱ्या काही विलक्षण व झपाटलेल्या लोकांनी घेतला. या लोकांमध्ये, या पुस्तकाचे लेखक एस विजयकुमार यांनी स्वत: अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लेखक मूळचे भारतीय असून सध्या सिंगापूरस्थित आहेत. सिंगापूरमधील एका आघाडीच्या महासागर वाहतूक कंपनीचे ते सरव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) आहेत.

भारतीयांच्या दृष्टीने मूर्ती ही केवळ शोभेची वस्तू नसते तर ती पूजनीय, वंदनीय देवता असते. आणि जेव्हा एखादा कलाकार, शिल्पकार ती मूर्ती घडवतो तेव्हा तो ती संपूर्ण श्रद्धेने, आस्थेने आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावून ती घडवत असतो. एक प्रकारे तो आपला आत्माच त्यात ओततो. यातून निर्माण झालेल्या, अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून निर्माण होत आलेल्या आपल्या देवदेवतांच्या मूर्ती आपल्या पूर्वजांनी प्राणपणाने जपल्या. आपल्या देशावर वेळोवेळी जी आक्रमणं झाली त्यात त्यांची विटंबना होऊ नये म्हणून अनेकांनी वेळप्रसंगी स्वत:चे प्राण अर्पण केले. त्या मूर्ती त्या आक्रमकांपासून दूर, जमिनीत वा खंदक खणून त्यात जास्तीत जास्त योग्य रित्या दडवून ठेवल्या जात. मग वादळ शांत झाल्यावर त्या देवतांना पुनर्स्थापित केलं जाई.
मग अशा या मूर्ती भारताबाहेर कशा गेल्या? या अवैध व्यापारामागे प्रदीर्घ इतिहास आहे. अगदी ब्रिटिश व इतर वसाहत मालकांनी पद्धतशीररित्या भारताच्या समृद्ध व ऐतिहासिक वारशांची लूट करायला सुरुवात केली. नगण्य वस्तूंच्या बदल्यात, मग ते साधं तांदळाचं पोतं असो वा मूठभर सुपाऱ्या, एकदा तर चष्म्याच्या मोबदल्यात या अमूल्य कलाकृती ताब्यात घेतल्या गेल्या. स्वातंत्र्योत्तर काळात डिप्लोमॅटसच्या माध्यमातून अनेक शिल्पं आणि पेंटिंग्जची तस्करी करण्यात आली. सध्या चाललेल्या लुटींमध्ये तर अनेक स्तरांवरील लोक, पद्वती आणि तंत्रज्ञान समाविष्ट आहे.
अशा मूर्ती तस्करांपैकी ‘सुभाष कपूर’ हा सगळ्यांत मोठा तस्कर !!! यांचे वडील फाळणीच्या सुमारास भारतातील संपत्तीवर डोळा ठेवून, कुटुंबकबिल्यासह लाहोरहून दिल्लीत येऊन स्थायिक झाले. पुढची पिढी काही निमित्ताने अमेरिकेत जाऊन वसली. ग्रीन कार्ड मिळवलं. आणि भारताच्या अमूल्य प्राचीन संपत्तीची चोरी करून तिकडे ‘प्रतिथयश मूर्तिविक्रेते’ बनून राजरोसपणे विकत, अब्जाधीश होत, ऐशोरामात लोळले. सध्या हे कपूर चेन्नई जेलमध्ये कोर्ट खटल्याच्या प्रतिक्षेत दिवस काढत आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांची कोठारं आणि अनेक गॅलरीजमधून अमेरिकी अधिकाऱ्यांनी १०० दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या भारतीय मूर्ती व शिल्पं जप्त केली. अशी अनेक वर्षे ते ही तस्करी करत आलेत…त्या सगळ्या संपदेची किंमत किती असावी? तुम्हीच विचार करून पहा ! ‘जगातील सर्वांत कुप्रसिद्ध तस्करांपैकी एक’ अशी त्यांची यू.एस.ने संभावना केली आहे. त्यांचे भारतातील व भारताबाहेरील अनेक साथिदार पकडले गेले आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांसकट ! चेन्नईबाहेर रहाणारे संजीवी असोकेन हे मूर्तीव्यापारातील सर्वात प्रमुख साथिदार, त्याचप्रमाणे, दीनदयाल, शन्तू, आयडॉल विंगचे भ्रष्ट पोलीस कादेर बाचा असे अनेकजण आज गजाआड आहेत.

ही कहाणी आहे या सर्व चोरांचा सुगावा कसा लागला, त्यानंतर अत्यंत हुशारीने, अभ्यासपूर्ण, नियोजन करून, धाडसीपणानं रंगेहाथ पकडून त्यांना गजाआड करणाऱ्या हितचिंतकांची, कर्तव्यनिष्ठ भावनेने, प्रामाणिकपणे ड्युटी बजावणाऱ्या आयडॉल विंगमधल्या शूर पोलीस अधिकारी ‘सेल्व्हरराज’ व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणाऱ्या काही अधिकाऱ्यांची. ही कहाणी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर धरपकडीचं जाळं विणणाऱ्या ‘इण्डी’ ची. त्यांना या नेक कामात साथ देणारे अनेक चांगले इतिहास तञ्ज्ञ , संग्राहक, पत्रकार, व सामान्य नागरिकांचा उल्लेख व आभारही लेखकाने वेळोवेळी व्यक्त केले आहेत.
या सगळ्याचा उत्तम परिपाक म्हणून आपली ही अमूल्य संपदा काही प्रमाणात परत मिळवण्यात या टीमला यश प्राप्त झाले.
उदा. –
१) सप्टेंबर, २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाहून आपले श्रीपुरन्थन नटराज व चोलकालीन अर्धनारिश्वर स्वगृही परतले.
२) जून, २०१६. -श्रीपुरन्थन गणेशमूर्ती यू.एस.ए.ने अधिकृतरित्या आपले माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ताब्यात दिली.

अजूनही अशी गायब झालेली संपदा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न चालूच आहेत. आपल्या या सांस्कृतिक वारशाचं रक्षण, जतन व संवर्धन करणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे अशी जाणीव या पुस्तकातून आपल्या मनात निर्माण होते. या पुस्तकाची कहाणी अगदी एखादा सुरेख रहस्यमय चित्रपट निर्माण व्हावा अशी आहे. आणि याची शैलीही वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. चित्तथरारक… एखाद्या रोमांचक रहस्यमय कादंबरी प्रमाणे थरारून टाकणारी आहे. त्यादृष्टीने, प्रत्येक भारतीयाने वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक – ‘मूर्तिचोर’ ! ‘The Idol Thief’ !

गौरी शेटे

लेखिका ह्या समीक्षक म्हणून सुपरिचित असून १९९९ पासून इतिहास प्रेमी मंडळाच्या संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था आपला दैदिप्यमान इतिहास विविध माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. कॉलेजच्या दिवसांत Earn and Learn करत शिक्षण पूर्ण करून गेली १५ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी (HR, ISO-MR) केली आहे. सध्या उद्योजिका आहेत. २०१६ पासून स्वत:चे पूर्ण वेळ 'रुचिरांगण' हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट चालवतात. ईमेल - sairama.shete@gmail.com

Comments (1)
Add Comment
  • Omkar Gosavi

    The Idol Thief हा लेख खूप चांगला वाटला. पुस्तक नक्की वाचणार