वंचितांची ‘माय’ जेंव्हा चळवळीची ‘प्रकाशवाट’ होते : प्रा. अंजलीताई आंबेडकर.

वंचितांची ‘माय’ जेंव्हा चळवळीची ‘प्रकाशवाट’ होते : प्रा. अंजलीताई आंबेडकर

काही व्यक्तीमत्व, त्यांचा वारसा आणि इतिहास हा सर्वार्थाने शब्द आणि कोणत्याही गोष्टींच्या पार पलीकडचा असतो. ‘आंबेडकर’ या नावानं प्रत्येक संघर्षाचं अवघं अवकाशच व्यापलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या वर्तमानातील संघर्षानंतर त्यांचा भविष्यकाळ ‘समृद्ध’ झाला आहे. मात्र, काही व्यक्तींच्या संघर्षातून समाजाचं भविष्य समृद्ध झालंय. देशातील तमाम दलित, शोषित आणि वंचितांच्या आयुष्यात असाच समृद्धीचा सुर्य उगवला तो ‘प्रज्ञा आणि संघर्षसुर्य’ बाबासाहेब आंबेडकरांमूळे… बाबासाहेबांनी शोषितांच्या सामाजिक ‘आबादानी’च्या स्वप्नांसाठी आयुष्यभर स्वत:ला संघर्षाच्या मातीत अक्षरश: गाडून घेतलं. त्यामुळेच आज वंचितांच्या आयुष्यात विकास आणि प्रगतीच्या ‘सुगी’चे दिवस आलेत.

समाजाला कायम भरभरून देण्याचा वारसा लाभलेलं ‘आंबेडकर’ होणं खरंच सोपं आहे का?… तर ‘आंबेडकर’ होणं निश्चितच सोपं नाही. कारण, ‘आंबेडकर’ होण्याची ‘पायवाट’ ही कायम संघर्ष, दगदग, मेहनत अन अपमानांच्या नागमोडी वळणांनी भरलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू झालेला ‘आंबेडकर’ या नावाचा संघर्षाचा प्रवास आजही संपलेला नाही. जो संघर्ष अन त्रास बाबासाहेबांच्या आयुष्यात आला तोच त्रास पुढे मुलगा भैय्यासाहेब आणि नातू बाळासाहेबांच्या आयुष्यात आला. बाळासाहेबांनी बाबासाहेबांनंतर त्यांच्या वडिलांच्या आयुष्यात आलेला संघर्ष ‘राजगृह जेंव्हा विकत घ्यावे लागले’ या आपल्या लेखात मांडला आहे. डॉ. बाबासाहेब, भैय्यासाहेब आणि बाळासाहेब या ‘आंबेडकरां’चा संघर्ष अनेक माध्यमांतून समाजासमोर आला आहे, मांडला गेला आहे.

मात्र, ‘आंबेडकर’ या नावातील एका संघर्षाचा पट कायम पडद्याआड राहीला किंवा तो काहीसा उपेक्षित राहिला, असं म्हणावं लागेल. हा संघर्ष आहे ‘आंबेडकर घराण्यातील स्त्रीयांचा… हा संघर्ष सुरू होतो बाबासाहेबांची आई ‘भीमाबाई’ यांच्यापासून. बाबासाहेबांच्या संघर्षाची बीजं, संस्कार हे ‘भिमाई’च्या संस्कारातूनच आले आहेत. ‘भिमाई’च्या याच संघर्षाचा वारसा पुढे बाबासाहेबांच्या पत्नी ‘रमाईं’ना पुढे न्यावा लागला. बाबासाहेबांचा अभ्यास, वंचितांच्या चळवळीत काम करतांना त्यांचं कुटू़बाकडे कायम झालेलं दुर्लक्ष, यात रमाईनं कधीच कोणती तक्रार केली नाही. रमाईने कायम बाबासाहेबांना बळ दिलं. ती बाबासाहेबांची प्रेरणा बनत त्यांना ताकद आणि ऊर्जा देत राहिली. पुढे असाच संघर्ष भैय्यायाहेबांच्या पत्नी आणि प्रकाश आंबेडकरांच्या आई मिराताई यांच्या आयुष्यात आला. भैय्यासाहेब असतांना अन त्यांच्या जाण्यानंतर या ‘माऊली’ने चार मुलांसह समाजही सांभाळला. आजही ‘मिराई’ आपल्या कामातून समाजबांधणीचं व्रत मुलांसह समाजाला पटवून देत आहेत. ‘भिमाई-रमाई-मिराई’ या ‘आंबेडकर’ घराण्यातल्या चौथ्या पिढीतील संघर्षाचं वारसा सांगणारं नाव आहे प्रा. अंजलीताई आंबेडकरांचं.

‘बाबासाहेबांचा नातू’, ‘आंबेडकर’ हा वारसा आणि ‘सोशल ड’ सोबत असलेल्या बाळासाहेबांना येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेनं काहीच सहजा-सहजी मिळू दिलं नाही अन आजही ते मिळू दिलं जात नाही असं बोललं जातं. आजही ते ‘वंचित’ अन ‘बहुजनां’ना राजकारणात ‘आघाडी’चं स्थान मिळावं यासाठी संघर्ष करतायेत. बाळासाहेबांच्या याच संघर्षात खुप महत्वाचं स्थान आहे ते अंजलीताई आंबेडकरांचं. मात्र, बहुजनांना ‘किंग’ बनविण्याच्या चळवळीत कायम पडद्याच्या मागे रहात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावतांना ताईंनी समोर न येत कायम ‘थँक्सलेस’ काम केलंय. राष्ट्र सेवादलाच्या संस्कारात झालेली जडणघडण, विद्यार्थीदशेत स्त्री आणि युवक चळवळीतील सहभागानं अंजलीताईंचा “मायदेव’ ते ‘आंबेडकर’ हा प्रवास अगदी सहज अन लिलया झाला. ‘आंबेडकर’ नावानं आयुष्यभर जपलेली संवेदना अन संघर्षाचे संस्कार जन्मत:च झिरपल्यानं त्यांच्यात लग्नानंतर नावानं आलेलं ‘आंबेडकरपण’ जपण्यात त्यांना वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत.

१९९३ मध्ये बाळासाहेबांसोबत लग्न झाल्यानंतर अंजलीताईंचा संघर्ष आणखी ठळक आणि गडद झाला. बाळासाहेबांची चळवळ, त्यामूळे त्यांचं कायम घराबाहेर असणं, दिवसरात्र अकोला, पुणे आणि मूंबईतील घरी कार्यकर्त्यांचा असलेला राबता, कौटूंबिक जबाबदार्या, पुण्यातील प्राध्यापिकेची नोकरी, छोट्या सुजातचा सांभाळ या सर्व आघाड्यांवर अंजलीताईंची प्रचंड धावपळ आणि कसरत व्हायची. मात्र, अंजलीताईंनी हे सारं-सारं अगदी सहज अन लिलया सांभाळलं. कारण!, बाबासाहेबांनी स्वप्नं पाहिलेल्या वंचितांच्या कल्याणाच्या मंत्राची ‘प्रकाश’किरणं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी बाळासाहेबांची वणवण-पायपीट सुरू होती आणि आजही सुरूच आहे. बाळासाहेबांचं ध्येय हेच आपलं जीवितकार्य मानत अंजलीताईंनी आयुष्यात बाळासाहेबांकडून ना कोणत्या वस्तुची अपेक्षा केली नाही, ना कधी कुठला हट्ट धरला.

समाजासाठी काम करणारा नेता त्याच्या कुटूंबाच्या वाट्याला फारसा कधी येतच नाही. मात्र, आपल्या पतीच्या सर्वव्यापी कुटूंबाची व्याख्या अंजलीताईंना कदाचित राष्ट्रसेवादलाच्या विचारातून मिळाली असावी. त्यातूनच त्यांचं कुटूंबही बाळासाहेबांच्या कुटूंबाच्या व्याख्येत कायमचं विलीन होऊन गेलं. बाळासाहेबांच्या आयुष्यातील संघर्षात, अनेक कठोर आणि ऐतिहासिक निर्णयात ताई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. मग, १९९८-९९ मध्ये तो काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय असो की, त्यांच्यापासून वेगळे होण्याचा. भारिप- बहूजन महासंघ विसर्जित करीत त्याला ‘वंचित बहुजन आघाडी’ ही नवी ओळख देण्याचा. त्या फक्त या सर्व कठीण कालखंडात बाळासाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत, तर स्वत: मैदानात उतरत त्यांच्या विचार अन चळवळीला ताकद दिली.

खरं तर निवृत्तीनंतरच्या जीवनाचे अनेकांचे स्वत:चे ‘प्लॅन्स’ आणि ‘स्वप्नं’ असतात. मात्र, अंजलीताईंची सारी स्वप्नच बाळासाहेबांच्या समाजकारण आणि राजकारणात विलीन झालेली. त्यामूळे निवृत्तीनंतर त्यांचं काम आणखी वाढलं. अन त्यांनी वंचितच्या कामात पुर्णवेळ आपल्याला झोकून दिलं. उत्कृष्ठ संघटीका, ध्येय्यावर आधारीत काम करण्याची पद्धत, शिस्त आणि नेमकेपणानं काम करण्याच्या हातोटीनं त्यांनी आज वंचितच्या कामाला एक नवीन दिशा दिली. प्रत्येकाच्या कामाचं मुल्यमापन होऊ लागल्यानं कार्यकर्तेही आता ‘गोल बेसिस’वर काम करू लागलेत. आज त्यांच्या पुढाकारानंच पक्षाची महिला आघाडी ताकदीनं उभी राहिलीय. ‘सम्यक’च्या माध्यमातून पक्षाचं नवं अन सळसळत्या उत्साहाचं ‘कॅडर’ उभं राहतंय. ताई तेव्हढ्या उत्तम वक्त्या आहेत तेव्हढ्याच चांगल्या श्रोत्याही. त्यामूळेच त्या लहानातल्या लहान कार्यकर्त्यांचं म्हणनं पुर्णपणे आणि शांततेने ऐकून घेत त्यातून सहज मार्ग काढतात.

अंजलीताईंची अनेक रूप आपण अनेकदा अनुभवत असतो. चळवळीतील कार्यकर्ती म्हणून सामाजिक प्रश्नांवर त्वेषाने उभं राहणारी अन बोलणारी ‘रणरागिणी’, पक्षाचं काम करतांना कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी म्हणून करारी वाटणारी ‘प्रिंसीपल-हेडमास्तर’, कार्यकर्त्यांना जिवापाड जपणारी ‘प्रेमळ आई’, अगदी छोट्या अडचणीतही प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहणारी खंबीर ‘पाठीराखी’, कुणाचंही दु:ख पाहून डोळ्यात टचकण पाणी येणारी ‘संवेदनशील स्त्री’, सुजात यांची आई नव्हे तर मैत्रीण म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीवर हक्कानं व्यक्त होणारी ‘भाष्यकार आणि साक्षेपी टिकाकार’…. एखाद्या कसोटीच्या क्षणाला आपल्या सहजता आणि निरागसतेने उत्तर शोधणारी ‘उत्तरदात्री’. या सर्वांच्या पलिकडे जात वेळ मिळाला तेंव्हा कुटूंबासोबत हक्काचे क्षण व्यतित करणारी ‘कुटुंबवत्सल गृहिणी’….

ताई!, प्रत्येक भूमिकेशी एकरूप होणं तुम्हाला अगदी सहज कसं जमतं बरं!!!… प्रत्येकाला एक प्रश्न वारंवार पडतो… हा प्रश्न म्हणजे आभाळाची उंची असलेलं हे कू़टूंब एव्हढं जमिनीवर कसं?. बाळासाहेब, अ़ंजलीताई आणि सुजात यांना भेटल्यानंतर ही माणसं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ‘सेलिब्रिटीज’ आहेत असं कधीच वाटत अन भासत नाही. त्यांच्यातली सहजता आणि साधेपण अलिकडच्या ‘नेतेपद’ मिरवणाऱ्या नेत्यांच्या ‘भाऊगर्दीत’ पार पलीकडचं वाटतं. ‘आसमाँ” असून ‘सर झुकाके’ चालणाऱ्या या परिवाराच्या निष्ठा म्हणूनच सर्वार्थाने तगड्या वाटतात.

अंजलीताई म्हणजे ‘बाळासाहेब’ आंबेडकर नावाच्या वादळाची ‘सावली’… वंचितांच्या चळवळीची ‘माय’… विचार, दिशा आणि कृती अतिशय निखळ असलेल्या ‘विदुषी’ आणि ‘विचारवंत’… बाळासाहेब नावाच्या वटवृक्षाला मोठं करीत स्वत: चळवळीचं ‘मूळ’ बनत त्याला निरपेक्षपणे मोठं करणारी ‘त्यागमूर्ती’…. आदरणीय अंजलीताई!, तुमच्या मार्गदर्शनात परिवर्तनाचा हा ‘कारवाँ’ निरंतर असाच चालू देत. ताई!, वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!!…

 

उमेश अलोणे,
अकोला.

उमेश अलोणे

लेखक ABP माझा चे रिपोर्टर आहेत.

अंजलीताई आंबेडकरप्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी
Comments (0)
Add Comment