वसुबारस : गोसंपदेचा गौरवोत्सव.
भारत देश उत्सवप्रिय असून निसर्गचक्राचे संतुलन राहावे म्हणून प्रत्येक सण उत्सवाला काहीना काही रूढी परंपरेचे कोंदण भारतीय संस्कृतीत दिल्याचे आपल्याला दिसून येते. भारतीय लोकजीवन कृषीक्षेत्राच्या कुशीत विकसित पावलेले आहे. अनादी काळापासून कृषी आणि पशुपालन यांच्या संयुक्त अनुबंधातून समाज जीवन बदलत गेले आहे. बदलत्या ऋतुचक्रानुसार मानवी आरोग्य आणि समाजजीवनासाठी अनुरूप आणि उपयुक्त प्रथापरंपरा रूढ झाल्या आहेत. शेतीतील पशुधनाचे एकूणच सांस्कृतिक, लोकजीवन, अर्थकारण आणि समाजकारणातील अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता भारतातील बहुतांश उत्सव परंपरांच्या माध्यमातून पशुधनाच्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक दाखल घेतली जाते.वैविध्यपूर्ण गुणधर्म असलेले भारतीय गोधन हा आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. म्हणून वसुबारस हा दिवाळीतील महत्वाचा दिवस खर्या अर्थाने संपन्न भारतीय गोसंपदेचा गौरवोत्सव म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पशुगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार (2019) गोधनाच्या बाबतीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर असूनमागील पशुगणनेच्या (2012) तुलनेत गोवंशात 9.63 टक्क्यांनी घट दिसून आली आहे. राज्य पातळीवर देशीगायींच्या एकूण संख्येत 8.17 टक्क्यांनी घट झाली आहे तर बैलांच्या संख्येत 29.63 टक्क्यांनी घट झालीचिंताजनक ठरते. पशुसंवर्धनात पैदासक्षम नर आणि माद्या यांच्या संख्येतील समतोल हा नैसर्गिक संवर्धनकरण्याहेतू महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर देशी गोवंशाचे संवर्धन हा कळीचा मुद्दा ठरतो.
शेतकरी बांधवांचा सखाअसलेल्या बैलांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी जसा श्रावण महिन्यात पोळा साजरा केला जातो, तसाच गायीचे पावित्र्य आणि महत्व उत्सवपूर्वक व्यक्त करण्यासाठी “गोवत्स द्वादशी” म्हणजेच “वसु बारस” हा उत्सव साजरा करण्यात येतो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झालेला असतो, शेतातील नवे धान्य तयार झालेले असते, म्हणून समृद्धतेचे प्रतीक म्ह्णून दीपावली / दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण साजरा करण्यात येतो. शेतकऱ्याच्या आणि पर्यायाने सर्वांच्या जीवन समृद्धीचे प्रतीक गोपालनात जाणून कृषिवलांसाठी हा आंनदोत्सव ठरतो. म्हणून धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी, गोधनाचा सन्मान म्हणून गोवत्सद्वादशी किंवा वसुबारस या सणाला सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात.
भारतीय अर्थकारणामध्ये प्राचीन काळापासून गोधनाची दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती,पंचगव्य, शेणखत इत्यादी माध्यमातून भरीव योगदानाद्वारे महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. म्हणूनच गायीचे ‘चलन’ म्हणून वापर झाला आहे आणि पशूंना ‘पशु-धन’ ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. उंचपुर्या, भारदस्त शरीरकाठी, बाकदार शिंगे, रुबाबदार वशिंड आणि लोंबती मानेची पोळी अशा अंगवैशिष्ट्याच्या खुणा प्राचीन काळातील भित्तिचित्रे, नाणी वगैरे ऐतिहासिक पुराव्यातून सहज पाहण्यास मिळेल. मात्र काळाच्या ओघात, विविध परकीय राजवटीच्या माध्यमातून भारतात विदेशी गोवंशाने शिरकाव झाल्याचे आपणास ठाऊक आहे.साधारणतः पाच सहा दशकांपूर्वी झालेल्या श्वेत क्रांती म्हणजेच विक्रमी दूध उत्पादनात भारताने स्वातंत्र्योत्तर काळात मारलेली मजल नक्कीच कौतुकास्पद ठरते परंतु संकरीकरणास शास्त्रीय बाजूने नीटसे समजून न घेतल्याने गल्लत झाली. अधिकाअधिक दूध उत्पादनाच्या हव्यासापोटी विदेशी गोवंशाच्या दुधाळ गुणधर्मावर पशुपालक भाळून गेला, मात्र गोठ्यातील देशी वंशाच्या गोधनाची अंगभूत रोगप्रतिकारक्षमता, किमान परिस्थितीत कमाल व माफक उत्पादनक्षमता, पर्यावरण अनुकूलता अशा महत्वपूर्ण बाबींचा सोयीस्कर विसर पडला.आपल्या भागातील पशुधनाचे उत्पादक आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मे माहिती नसल्याने किंवा न उलगडल्याने पुढील पिढीस हा वारसा सुपूर्द करताना आपण बहुमोल गोधनास “गावरान किंवा गावठी” म्हणत दुर्लक्ष झाले. तथापि, आताच्या सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य जबाबदारीपूर्वक समजून घेतल्यास पुढील पिढ्यांना विविध अनाकलनीय समस्यांना सामोरे जात असताना प्राचीन समृद्ध गोवंश उलगडून देणे आवश्यक ठरते.
गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. वसु बारस या सणाला सवत्स गायीची पूजा करण्यात येते. पाडसासह धेनु ही समृद्धतेचे, संपन्नतेचे आणि सुफलतेचे प्रतीक समजल्या जाते. पारंपरिक पद्धतीने आपण सवत्स गायीची पूजा करून आपला आदरभाव व्यक्त करतो मात्र गोसंवर्धनासाठी तेवढे पुरेसे नाही.म्हणूनच आपल्या भागातील देशी गोधनाची ओळख व गुणवैशिष्ट्ये आपणास माहिती असावीत.
देशातील एकूण ५३ गायींच्या जातींपैकी महाराष्ट्रात ७जाती आढळतात. मराठवाड्यात डोंगरपट्टी, डोंगरी, अशा नावाने लोकप्रियअसलेल्या देवणी गायी रंगाने पांढऱ्या असून काळ्या रंगांच्या ठिपक्यांवरून देवणीच्या वान्नेरा, बालंक्या आणि शेवरा अशाउपजाती सुद्धा आढळतात.कानडा, कोकणी, घाटी या नावाने परिचित डांगी गायी नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातआढळतात.आर्वी, गौळणी अशा नावानी परिचित गवळाऊ गाय ही विदर्भातील प्रमुख गायीची जात आहे.लाखलबुंदा नावाने स्थानिक भागात परिचित असलेली लाल कंधारीलातूर, हिंगोली, परभणी, बीड या भागातही आढळते.खिल्लार, माणदेशी, शिकारी अशा नावांनी सुपरिचित असलेली खिल्लारी चपळ व उत्तम भारवाहू गायींची जात म्हणून प्रसिद्ध आहे.महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यालगतच्या दमट हवामानास अनुकूल असलेली कोंकण कपिला गाय ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते.पूर्व विदर्भातील चंद्रपुर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळणारी मध्यम आकाराची कठाणी गाय दूध आणि शेतीकामासाठी लोकप्रिय आहे. याव्यतिरिक्त लगतच्या राज्यातील जसे गुजरात मधील गीर, मध्य प्रदेशातील निमारी व माळवी, कर्नाटकातील कृष्णाखोरी सारख्या देशी गायी महाराष्ट्रात आढळतात.
तथापि, महाराष्ट्रातील अनेक जातिवंत उमदे गोधन केवळ पुरेसे लक्ष न दिले गेल्याने अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभे आहे. उत्तर महाराष्ट्रातील सोनखेडी गायी असोत किंवा विदर्भातीलवर्हाडी,उमरडा, खामगांवी नावाने लोकपरीचीत असलेले स्थानिक गोधन आता शास्त्रशुद्ध ओळख व अभ्यासाच्या वाटेवर आहेत. याव्यतिरिक्त ऐतिहासिक दस्तावेजमध्ये उल्लेखित किंवा पशुपालकांच्या माहितीत असलेलं अनेक भागात वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांध्याचे, गुणधर्माचे, स्थानिक अपरिचित गोधन मोठ्या संख्येने आहे, त्यांचा परिचय पशुविज्ञान क्षेत्रालाच नव्हे सर्वांना होणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांचे उपयोजन कसे करता येईल.प्रत्येक भागात स्थानिक गोधन संवर्धनासाठी सक्षम ब्रीड सोसायटी लोकसहभागातून उभी राहणे ही काळाची गरज आहे.केंद्र शासनाने तर अवर्णीत (अज्ञानापोटी गावठी म्हणून गणल्या जाणारे किंवा ज्यांचे गुणधर्मे दुर्लक्षित राहिले आहेत) अशा पशुधनाच्या अभ्यासाचा देशव्यापी प्रकल्पच हाती घेतलेला आहे. “मिशन शून्य अवर्णीत पशुधन (Mission Zero Non-Descript AnGR) या प्रकल्पांतर्गत सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील दुर्लक्षित पशुधंनाचा शोध घेत शास्त्रोक्त पद्धतीने सर्व्हेक्षण अभ्यास सुरू आहे. याअंतर्गत विविध देशी गोधनाची नोंद होत आहे मसिलम (मेघालय), संचोरी (राजस्थान), पूर्णिया (बिहार), श्वेत कपिला (गोवा),डगरी (गुजरात) ही काही अलीकडच्या काळात नोंदणी झालेली गोसंपदा आहे.
वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि उत्पादनक्षमता असलेली जातिवंत जनावरे मात्र आजमितीला अनेक कारणांनीदुर्मिळ झाल्याचे दिसतात. पशुपालक समाजाची भटकी जीवनशैली, व्यावसायिक मानसिकतेतून आणि स्थानिक देशीगोवंशाच्या कमी उत्पादन मर्यादेमुळे अधिक दूध उत्पादनाच्या हव्यासातून केलेले संकरीकरण, यांत्रिकीकरणामुळेबैलांची घटती मागणी, चराई क्षेत्राची घसरण, लागणार्या मनुष्यबळ व उत्पादनाचा खर्च अशा अनेक कारणांनी दिवसेदिवस शुद्ध गुणधर्म असलेल्या जातिवंत गोधनाची संख्या रोडवत गेली असल्याचे आपण आज पाहतो आहे.आजही बाजारपेठेत जातिवंत गायी किंवा बैलजोड्या मिळत नसल्याची पशुपालक सार्वत्रिक तक्रार करताना दिसतात.म्हणूनच जातिवंत देशी गोधनाचे संवर्धन करणे आव्हान आहे.
राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्यूरो, कर्नाल या पशुधनाच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर शास्त्रोक्त अभ्यास करणार्या शिखर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर अंतर्गत महाराष्ट्रातील दुर्लक्षित देशी पशुधनाचा सर्व्हेक्षण प्रकल्प सुरू आहे. दुधाळ जाती म्हणून राष्ट्रीय मान्यता असलेल्या गीर (गुजरात), साहिवाल व लाल सिंधी (पंजाब) आणि थारपार्कर (राजस्थान) सारख्या गायीचे व्यावसायिक आणि हौशी गोपालकाद्वारा महाराष्ट्रातदेखील संवर्धन केल्या जात आहेत.मात्र,खर्या अर्थाने, आपल्या प्रदेशातील देशी गोसंपदा संवर्धन आगामी काळासाठी उपयुक्त आहे.
पारंपरिक पद्धतीत स्त्रिया वसु बारस “नंदिनी व्रत” पाळून साजरा करीत असल्याचे समजते. आज मात्र नव्या युगातील बंधू भगिनींनी देशी गोधन संकल्पना व्रत पाळण्याची गरज आहे. आपल्या परिसरातील देशी पशुधनाचे गुणविशेष जाणून घ्या. त्यांचे संवर्धन, संशोधन करण्यास यथाशक्ती प्रोत्साहन देऊया. संवर्धनाचा हे संकल्पदीप पेटवून गोधनाप्रती आपले ऋण अंशतः फेडूया. वसुबारस हा उत्सव आता भारतीय गोसंपदा गौरव उत्सवम्हणून आपण सारे साजरा करूया. (फोटो – लोकमत साभार.)
- डॉ. प्रवीण बनकर, सहयोगी प्राध्यापक, स्ना.प.प.संस्था, अकोला.
- डॉ.स्नेहल पाटील, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंस, अकोला.