⚜️ विज्ञानवादिनी – नंदिनी हरिनाथ !
नंदिनी हरिनाथ हे नाव मिशन मंगळ मोहीम यशस्वी झाली त्यानंतर घराघरात पोहोचले. आपल्या कर्तृत्ववाने इसरोबरोबर देशाचे नाव उंचावर घेऊन जाणाऱ्या आणि मिशन मंगळ मोहीम यशस्वी करणाऱ्या आजच्या दुसऱ्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ.
यशस्वी अशा मंगळ मोहिमेसाठी काम केलेल्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांनी, आपण कधी इस्रोमध्ये काम करू, असा विचारही केला नव्हता. लहानपणी बघितलेला ‘स्टार ट्रेक’ या टीव्हीवरील कार्यक्रमामुळे त्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. मंगळयान यशस्वीपणे अवकाशात पाठवल्यानंतर त्यांना स्वतःबद्दल अभिमान वाटतो. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी त्यांच्या स्वभावात सहज जाणवते आणि अंतराळ क्षेत्रांत महिलांनी आवर्जून यावे यासाठी तत्पर असणाऱ्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आजही जगात कुठेही मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून जातात.
नंदिनी हरिनाथ यांचा जन्म तामिळनाडू येथे झाला. कुटुंबात सर्वजण बहुतांश शिक्षक आणि इंजिनिअर असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी स्वाभाविक लहानपणापासून त्यांना आवड निर्माण झाली. आई गणिताची शिक्षिका आणि वडील इंजिनिअर असल्याने घरातील वातावरण शिक्षित होते. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तामिळनाडू येथेच पूर्ण केले.
कालांतराने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इसरोमध्ये प्रवेश केला. पहिल्याच नोकरीची संधी त्यांना इसरो येथे मिळाली. वीस वर्षे झाली त्या इसरो येथे कार्यरत आहे. जवळपास १४ मिशन मध्ये त्यांनी काम केले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांचा अभ्यास घेऊन काही काळ १२-१४ तास त्यांनी अथक काम केलं आहे. त्यांच्या एका मुलाखतीत त्या म्हणतात, “आज जेव्हा वैज्ञानिक म्हणून आम्हाला ओळखलं जातं, तेव्हा त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता इसरोमध्ये २० वर्षे झाली आहेत आणि आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही.” मंगळ मोहिमेचा भाग होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता.” खरंतर मिशन मंगळ मोहीम ही फक्त इस्रोसाठीच नाही तर भारतासाठी खूप महत्वाची मोहीम होती. ही मोहीम यशस्वी झाल्यावर जगाने भारताच्या वैज्ञानिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि आज आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या वैज्ञानिकांच्या मदतीची अपेक्षा करत आहे.
खरंतर मिशन मंगळवेळी इस्रोने पहिल्यांदाच लोकांना आत काय घडत आहे ते पाहण्याची परवानगी दिली होती. आज अनेक शास्त्रज्ञ सोशल मीडियावर आहेत. अशा कामगिरीमुळे आज तरुणांचे रोल मॉडेल म्हणून यांच्याकडे बघितल्या जाते आणि वैज्ञानिक असलेल्या नंदिनी हरिनाथ यांना याबद्दल अभिमान वाटतो आणि त्याचा त्या आनंदही घेतात. परिश्रम आणि प्रयत्नाने इथवर आल्याचे त्या आवर्जून सांगतात. वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ ज्यावेळी मिशन मंगळसाठी कार्य करत होत्या त्यावेळी नंदिनी यांची आई आंध्रप्रदेश येथून बंगलोरला येत असत. कारण त्यावेळी नंदिनी हरिनाथ यांची मुलगी बारावीत शिकत होती. मुलींना वेळ देता यावा म्हणून त्या पहाटे ४ वाजता उठत असत आणि दोघीजणी एकत्रित अभ्यास करत असत.
२००० रुपयांच्या नोटेवर झळकणारे मंगळयान मोहिमेचे चित्र पाहून नंदिनी हरिनाथ यांना खूप समाधान वाटले या मोहिमेच्या वेळी सुरुवातीला, शास्त्रज्ञांनी दिवसाचे सुमारे १० तास काम केले, परंतु प्रक्षेपणाची तारीख जवळ येत असताना काम १२ ते १४ तासांपर्यंत गेले आणि प्रत्यक्ष प्रक्षेपणाच्या वेळी ते जेमतेम कार्यालयातून बाहेर पडत असत. अत्यंत परिश्रमाने वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आणि त्यांच्या संपूर्ण टीम ने मंगळयान मोहीम यशस्वी करून दाखवली. मंगळयान प्रक्षेपणाच्या काही दिवस आधी वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ घरीदेखील जात नव्हत्या. कामाप्रती समर्पित भाव कसा असू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आहेत. मंगळयान अभियानाचं यश हा भूतकाळ झाला, आता भविष्याचा विचार करायचा आहे, असा निर्धार त्या व्यक्त करतात. वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांच्या कामाच्या कटिबद्धतेला नमन आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
सर्वेश फडणवीस.