वैशाली व्यवहारे देशपांडे च्या कर्तृत्वा साठी.
काही व्यक्तिमत्व बघितले की त्यांच्यातील आखीव रेखीव पणा, नेमकेपणा, मुद्देसूदपणा, विश्वासहार्यता, प्रामाणिकपणा, अशा सुंदर गुणांचा मिलाफ आपल्याला बघायला मिळतो. तेंव्हा असे वाटते की, कुठले तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून अशी व्यक्तिमत्वे जीवन जगतात. परमेश्वराने एक आयुष्य दिलेली आहे .त्याचे महत्त्व समजून आणि जीवनाचे निश्चित ध्येय आखून त्यासाठी प्रयत्न करत करत जगणारी मुठभर लोक समाजात आहेत .त्यापैकी एक म्हणजे वैशाली व्यवहारे देशपांडे. मूळ नागपूरची पण सध्या पुण्यात स्थायिक असलेली. आजचा शब्द जागर वैशालीच्या कर्तुत्वासाठी.
वैशालीला लहानपणापासूनच साहित्याची आवड होती .वडिलांचा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय, त्यामुळे घरी भरपूर पुस्तके, दिवाळी अंक, प्रकाशित व्हायचे .त्यामुळे वाचनाचा संस्कार वैशालीला घरातूनच मिळाला. शिवाय आई महाविद्यालयात प्राध्यापिका होती .तसेच लेखीकाही होती .त्यामुळे लेखनाचे बाळकडू तिला आईकडूनच मिळाले आहे. घरातील सौरभ प्रकाशन व्यवसायामुळे मोठ्या लेखकांची येणे जाणे होते, वर्दळ होती .त्यामुळे या लेखकांचे घरी येणे झाले की, आपसूकच चर्चा व्हायच्या. मात्र त्या चर्चेत वैशालीचे आई-वडील मुलींना सहभागी करून घ्यायचे .त्यांनी चर्चेच्या वेळी मुलींना बोलू दिले. घरात जा असे कधीही म्हटले नाही. त्यामुळे या निकोप वातावरणात वैशालीचे व्यक्तिमत्व घडत गेले. चर्चा करताना सहभाग, विचारांचा आदर ,वैचारिक देवाणघेवाण, या सर्व गोष्टी वैशालीला आवडायच्या. त्या तिच्यामध्ये नकळतपणे झिरपत गेल्या. वास्तविक वडिलांचा स्वभाव अतिशय रागीट होता .त्यामुळे धाक तर होताच, मात्र चर्चेसाठी स्वतंत्रता देखील होती .वैशालीच्या घरात लायब्ररी होती. त्यामुळे देखील वाचनाची आणि साहित्याची आवड तिच्यात लहानपणा पासूनच निर्माण झाली. शालेय जीवनात आईने तयार करून दिलेली भाषणे शाळेत दिली. मात्र आपण काही वेगळं आहोत असे अजिबात वाटत नव्हते. अकरावीत तीने लिहिलेला निबंध, मांडणी सुबक असल्याकारणाने शिक्षकांनी वर्गात वाचून दाखविला .बारावीपासून वैशालीने तरुण भारतात लिखाणाला सुरुवात केले.
महाविद्यालयात असताना त्या काळात एक घटना घडली की, जनरल अरुण कुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी हत्या केली. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी परिषदेने त्याच्या निषेधार्थ महाविद्यालयात रक्त स्वाक्षरी अभियान आयोजित केले. त्यावेळी वैशालीने रक्त स्वाक्षरी केली. व परिषदेच्या कार्यकर्त्यांना सांगितले की ,मला विद्यार्थी परिषदेत सहभागी व्हायचे आहे. इथून तिच्या जीवनाचा नवीन आयाम सुरू झाला. तो म्हणजे विद्यार्थी परिषद. वैशाली सांगते की, नागपूर विद्यापीठावर तीन हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा घेऊन आम्ही गेलो होतो. आणि अचानक कोणीतरी वैशालीच्या हातात माईक दिला. तिने देखील आवेश पूर्ण आणि मुद्देसूद भाषण केले. त्यामुळे तिच्यात असलेला असलेल्या नेतृत्व गुणास वाव मिळाला .सर्वच गोष्टी ती मनापासून सहभाग घेते. कारण मूळतः तिचा स्वभाव अतिशय संवेदनाशील आहे. परिषदेत चार-पाच वर्षे सक्रिय राहून तिने काम केले. त्यामध्ये मुख्यतः कश्मीर आंदोलन ,मुंबई मोर्चा ,सील प्रोजेक्ट अंतर्गत अरुणाचल प्रदेशात देखील ती जाऊन आली.
वैशाली सांगते केवळ विद्यार्थी परिषदेमुळे जवळपास 30 वर्षांपूर्वी कश्मीर प्रश्नाची दाहकता समजली. तसेच आंदोलनात सहभाग घेतला .मात्र कश्मीर फाईल हा सिनेमा बघितल्यावर कुठेतरी मन मोकळं झालं की, हा प्रश्न अखेर लोकांपर्यंत पोहोचला. 370 कलम रद्द झाल्यावर तर मनाला अतिशय समाधान मिळाले. ही एक सुखद भावना आहे. अनेक विषयांच्या कंगोऱ्यांचे आकलन विद्यार्थी परिषदेने दिले. त्यामुळे समाजावर आपलेपणाने प्रेम करता आले. आजही पुण्यात फिरताना पूर्वांचलातील विद्यार्थी दिसले तर वैशाली पुढाकार घेऊन त्यांच्याशी संवाद साधते. परिषदेने अनुभवातून हा दृष्टिकोन दिला असे तिचे मत आहे.
परिषदेमुळे अजून एक सवय विकसित झाली ती म्हणजे ,”संगच्छत्वम” .
सामाजिक जाणीवा विस्तारल्या. त्यामुळे कोणतीही गोष्ट एकटीने न करता समूहाने करायची .उदाहरणार्थ एखाद्या नाटकाला मुलांना घेऊन जायचे असल्यास ,वैशाली त्यांच्यासोबत कॉलनीतील आठ दहा मित्रांना घेऊन जायची. पुणे येथील गिरीश प्रभुणे यांच्या गुरुकुलम मध्ये वैशालीने 14 मैत्रिणींच्या समूहासह सातत्याने दीड वर्षे संपर्क केला आहे .समूहाने जगण्याची तिच्यामध्ये सहजता आलेली आहे .आपण काही वेगळे करतो असे वाटत नाही. मला असे वाटते की, परिषद म्हणून असेच जीवन अपेक्षित आहे. वैशाली खऱ्या अर्थाने विद्यार्थी परिषद जगत आहे .
वैशालीने बॅचलर इन मास कम्युनिकेशन केले. तसेच तरुण भारतात सब एडिटर म्हणून नोकरी देखील केलेली आहे. ती आठवण सांगते की, पहिल्याच इंटर्नशिप मध्ये त्यावेळीच्या पंतप्रधानांची सभा कव्हर करायची संधी मिळाली .ती बातमी देखील पहिल्या पानावर छापून आली .त्याचा आनंद वेगळाच होता. त्यावेळी असलेले संपादक माननीय ल.त्र्य. जोशी यांनी परमपूज्य बाळासाहेब देवरस यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या संदर्भात स्टोरीज करण्याचे काम वैशालीला दिले .दरम्यानच्या काळात तिने आकाशवाणीतील युगवाणी मध्ये तीन ते चार वर्ष निवेदन केले. त्यानंतर वैशालीचे लग्न झाले.
वैशाली स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हती .त्यामुळे लग्नानंतर सुरुवातीला ठाण्याला राहायला गेल्यावर तिने डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला .त्यांच्या वेध या कार्यक्रमात शाळांमधून सहभाग घेतला. डॉक्टर आनंद नाडकर्णी स्वतः “अँगर मॅनेजमेंट” वर वर्कशॉप घ्यायचे. त्याच्या संदर्भात लेखनाची जबाबदारी त्यांनी वैशालीकडे दिली.
दरम्यानच्या काळात वैशाली पुण्याला शिफ्ट झाली होती .मुलं मोठी होताना वैशालीने पुण्यात संस्कार वर्ग चालविणे सुरू केले. त्यामध्ये मंत्र, श्लोक, प्रार्थना देशभक्तीपर गीते, जीवनमूल्ये, मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने लग्ना आधीच वैशालीने पौरोहित्याचा वर्ग केला होता.
तसेच समवयस्कर तरुण महिलांसाठी संवादिता हा वाचक मंच वैशालीने सुरू केला. गेल्या 18 वर्षापासून आज पर्यंत तो यशस्वीपणे सुरू आहे .
या सर्व प्रयत्नां मागे उद्देश हाच होता की, लोकांना सामाजिक कार्यासाठी प्रवृत्त करणे. त्यासाठी ती संस्कार वर्ग , समर कॅम्प घेत होती .समर कॅपमध्ये वैशालीने वेगवेगळे प्रयोग केले. मुलांची नॅशनल डिफेन्स अकॅडमी ला भेट घडवून आणली. मुलांसाठी पपेट शो, नाट्य शिबिर आयोजित केले .परंतु हे करत असताना थोडा तोच तो पणा तिला जाणवायला लागला .तेंव्हा तिच्या मनात प्रश्न आला की, मला नेमके काय करायचे आहे .मग विचारांती वैशालीने ज्ञान प्रबोधिनीचा स्कूल सायकॉलॉजी या विषयाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला .
त्यानंतर वैशालीने विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स केले. दरम्यानच्या काळात वैशालीची एका शाळेत शालेय मानस तज्ञ म्हणून नियुक्ती झाली. नंतर तिने स्वतःची प्रॅक्टिस समुपदेशक म्हणून सुरू केली. यासंदर्भात अगदी मुळापर्यंत जाऊन काम व्हावे म्हणून, वैशाली क्लिनिकल हिप्नोथेरपीच्या पाच लेव्हल शिकली .त्यामुळे नंतर विचारांची क्लॅरिटी येत गेली असे ते सांगते.
2004 मध्ये वैशालीच्या आईला पॅनक्रियाटेटस हा दुर्धर आजार झाला .वैशाली सांगते की या रोगाची तुलना केवळ कॅन्सरशीच होऊ शकते .इतक्या भयंकर स्वरूपाचा रोग आहे .आईचे आजारपण साधारणपणे नऊ वर्षे चालले. त्यावेळी वैशाली पुण्यात व तिचे आई-बाबा नागपुरात होते .वैशालीची नऊ वर्षाच्या काळात पुणे नागपूर अशी प्रमाणाबाहेर धावपळ झाली. अनेक वेळेला वीस पंचवीस दिवसांसाठी फोन आल्यावर लगेच दोन तीन तासात तिला नागपूरला यावे लागायचे .ती सांगते की नऊ वर्षात तिचा एक पाय पुण्यात तर एक पाय नागपुरात होता. वैशालीने आईची अंतकरणापासून सुश्रुषा केली. यावेळी वैशाली ची मुलगी दोन वर्षांची होती .तिला सोडून वैशालीला आईचे आजारपण सांभाळावे लागले .कारण परिस्थितीच तशी होती. या काळात वैशालीच्या यजमानांनी तिला भक्कम साथ दिली. कधी मुलांचे गॅदरिंग ,परीक्षा या सर्वच बाबतीत तिला ऍडजेस्ट करावे लागले आणि तिच्यासोबत मुलांनाही. वैशाली तिच्या आई विषयी अतिशय संवेदनाशील आहे .कदाचित वडिलांचा स्वभाव अतिशय रागीट होता म्हणूनही असेल. ती म्हणते की माझी आई म्हणजे एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका होती. आणि फायटर होती ती साक्षात झाशीची राणी होती.
वैशालीची आई फायटर असण्यासोबत रायटर पण होती .त्यामुळे दरम्यानच्या आजारपणाच्या काळात वैशालीने आईचा लेख संग्रह “संवाद सेतू “व कवितासंग्रह “अंतस्रोत “ही दोन पुस्तके पुढाकार घेऊन प्रकाशित केली .दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नागपूरला आयोजित केला होता .आईच्या आजारपणाच्या काळातच वैशालीने पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा व शाळेतील नोकरी केली.वैशाली च्या आईने शारीरिक दृष्ट्या सहन केले आणि वैशालीचा त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सहभाग होता .मला तर वैशाली साक्षात अष्टभुजाच वाटते .नऊ वर्षांच्या जीवघेण्या आजारानंतर वैशालीच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी आईचे तेरा दिवसांचे अंत्यविधी देखील वैशालीनेच केले. ती म्हणते माझी आई अतिशय कर्तबगार होती .वैशालीच्या व्यक्तीमत्त्वावर तिच्या आईचा खूप प्रभाव आहे .तिला समाधान हेच आहे की ,आईच्या आजारपणापासून नउवर्षाच्या संघर्षात आणि नंतर अंत्यविधी पर्यंत म्हणजेच शेवटपर्यंत, ती तिच्या आईची सोबत करू शकली. आईच्या शेवटच्या दिवसात आई पुण्याला असताना, तिने तिच्या आईचे आध्यात्मिक गुरु, गोविंद देवगिरी महाराज यांच्याशी तिच्या आईची भेट घडवून आणली . आईच्या एका पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले .
आईच्या स्मरणार्थ काहीतरी करायचे म्हणून ,डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन ही संस्था तिने सुरू केली .संस्थेच्या वतीने संस्कार भारती तर्फे स्मृती पुरस्कार व वैचारिक लिखाणाला पुरस्कार असे दोन पुरस्कार सुरू केले .
दरम्यानच्या काळात वैशालीने सखा आत्मसंवाद हे पुस्तक लिहिले. त्याचे प्रकाशन देखील झाले. त्यामध्ये आयुष्यातील चढउतारांचा उल्लेख आहे. त्यामध्ये अविनाश धर्माधिकारी ,अच्युत गोडबोले, अनिल अवचट ,यासारख्या दिग्गज मान्यवरांचा सहभाग आहे. तसेच वैशालीचे अजून एक पुस्तक प्रकाशित झाले ते म्हणजे, आपुलाची संवाद आपणाशी.
आईच्या निधनानंतर वैशालीच्या वडिलांचा तीन वर्षांनी मृत्यू झाला .त्यांच्याही आजारपणा वैशालीने त्यांची मनोभावे सेवा केली. त्यानंतर सासूबाईंचे नऊ वर्षे मानसिक आजारपण म्हणजे. एकंदरीत 21 वर्षे वैशालीने आई-वडिलांची व सासूबाईंची सेवा केली. मात्र सेवा करताना देखील सामाजिक आयाम जोपासत नवनवीन शिक्षण घेऊन स्वतःला ती अपग्रेड करत होती. समाज हिताचे नवनवीन प्रयोग करत राहणे ही गोष्ट खूप उल्लेखनीय आहे .
या काळात वैशालीच्या मनात विचार आला की ,मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी लॉंग टर्म काम असावे .केवळ संस्कार वर्ग किंवा शिबिरांमुळे तिला समाधान मिळत नव्हते .याच तिच्या चिंतनातून निर्माण झालेले अमृत म्हणजे ,”प्रोजेक्ट अस्मि” गेल्या पाच वर्षांपासून वैशालीचे या प्रकल्पावर काम सुरू आहे. कोविडच्या काळात अस्मि प्रोजेक्टसाठी वैशालीने युट्युब चॅनेलवर कार्यक्रम सुरू केले. सलग दहा वर्षांपासून वैशालीचे मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी काम सुरू आहे. मुलांची मानसिक दृष्ट्या सक्षम पिढी घडविणे हा तिचा उद्देश आहे. तिचे म्हणणे आहे की भावनिक स्थिती संतुलित राहिली तरच मानसिक दृष्ट्या मूल स्थिर राहतात. ती म्हणते माझ्या देशाचे भविष्य चांगले राहावे यासाठी मला काम करायचे आहे.
सध्या पुण्यात प्रोजेक्ट अस्मि साठी 50 स्वयंसेवक काम करतात. जवळपास 50 महाविद्यालयीन विद्यार्थी प्रेरणा घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करतात .पुण्यातील पंधरा शाळा प्रोजेक्ट अस्मिच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये आतापर्यंत जवळपास 4000 मुलांचा सहभाग राहिलेला आहे .मुलांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. युट्युब चॅनेल वरील गोष्टींचे लिखाण स्वतः वैशाली करते. उद्देश एकच मुलांचा मानसिक व भावनिक विकास व्हावा .यासंदर्भात मुलांकडून ती कृती करून घेते .त्याच्या काही ऍक्टिव्हिटीज असतात व अंमलबजावणी देखील असते.
प्रोजेक्ट अस्मिचे तीन भाग झाल्यावर आकाशवाणी पुणेने वैशालीची मुलाखत घेतली. त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” या कार्यक्रमात त्यांनी वैशालीच्या प्रोजेक्टचा तिच्या नावासकट गौरवपूर्ण उल्लेख केला .ही तिच्या धडपडीची खूप मोठी पावती आहे .वैशाली म्हणते त्याचा आनंद तर आहेच ,परंतु जबाबदारी वाढलेली आहे .
वैशाली आयुष्यात दोन व्यक्तींमुळे प्रभावित आहे. एक म्हणजे आपले लाडके पंतप्रधान मोदीजी, आणि परमपूजनीय सरसंगचालक मोहनजी भागवत. वैशालीचे पुस्तक आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकाला माननीय मोहनजींची प्रस्तावना आहे .अतिशय संघर्षात वैशालीने मुलांच्या मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी प्रोजेक्ट अस्मिच्या रूपाने एका संस्थेचे बीज रोवले आहे .त्याकरिता तिचे मनःपूर्वक अभिनंदन. येणाऱ्या काळात “प्रोजेक्ट अस्मि ” चा बहारदार वृक्ष व्हावा यासाठी तिला मनापासून शुभेच्छा…..
ऍड. मनिषा कुलकर्णी
नागपूर.
9823510335