अनलज्वाला

0

अनलज्वाला

वाटा अवघड आयुष्याच्या तुडवत गेलो
अनुभवातून रोज स्वतःला शिकवत गेलो

अनेक होते मित्र गुरू अन सखे सोबती
नेक चांगले वेचत जीवन फुलवत गेलो

तसे ठरवुनी कधीच मीही लिहिले नाही
सहवासाने शब्दांच्या मी प्रसवत गेलो

तसा दगड मी होतो तेव्हा शाळेमध्ये
अभ्यासाचे घाव सोसुनी घडवत गेलो

संकट येता झुकलो ना वा हार मानली
खंबिरतेने परिस्थितीला झुकवत गेलो

अनेक तुकडे नात्यांचे मी जोडत होतो
स्वार्थ पाहता एकेकाचा, उसवत गेलो

पैशाने श्रीमंत जरी मी नाही मोठा
कवितेमधल्या शब्दफुलांनी मिरवत गेलो

■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण – सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२

फोटो साभार – unsplash.com

लेखक हे कवी, गझलकार, समिक्षक आहेत. शिक्षण : बी.कॉम, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर,  एम.बी.ए. (मार्केटिंग मॅनेजमेंट).झाले असून, हायमिडीया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई येथे निर्यात व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. तसेच काव्यप्रेमी गझल मंच राज्यस्तरीय अध्यक्ष आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, डोंबिवली (कोषाध्यक्ष - वर्ष २०१९ ते २०२१). # महाराष्ट साहित्य परिषद, पुणे (डोंबिवली शाखा) # ओंजळीतील शब्दफुले साहित्यिक समुह - महाराष्ट्र # नक्षत्राचं देणं काव्यमंच - महाराष्ट्र # मराठी कविता समुह – महाराष्ट्र आशा विविध संस्था समूहावर कार्यरत आहेत. पुरस्कार : प्रितगंध फौंडेशन - मुंबई कडून साहित्यिक पुरस्कार (२०१५) कै.सौ.कुमूदिनी गडकरी पुरस्कार (२०१६) कै.वैजयंती काळे पुरस्कार (२०१६) हृदयांतर ब्लॉग आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा पुरस्कार (२०१६) कवयित्री शेवंताबाई सरकाटे स्मृती राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार (कविता संग्रह - ओंजळ) (२०१७) अस्मिता ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा लक्षवेधी पुरस्कार (२०१७) काव्यांगण प्रतिष्ठान, यवतमाळ राज्यस्तरीय कवी सम्मेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मानीत (२०१७) अमृतादित्य साहित्य पुरस्कार (कविता संग्रह - मनतरंग) (२०१८) राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार - २०१८ (पारस काव्य, कला, जनजागृती संस्था - नवी मुंबई) कै.म.पां.भावे स्मृती उल्लेखनीय पुरस्कार - २०१८ "अक्षय-रजनी" राज्यस्तरीय काव्य पुरस्कार - २०१९ दापोली येथील शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०२०). आशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. कवितासंग्रह प्रकाशित - ओंजळ (२०१६) मनतरंग (प्रातिनिधीक (२०१८) (निर्मिती-संकल्पना, संपादन आणि प्रकाशन) अंत:स्थ मनात (२०२०).तसेच अनेक कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. भ्रमणध्वनी : ९८९२७५२२४२ / ७५८८४१४२३९, इ.मेल :  vijayjoshi20@hotmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.