मल्टिफेज रिॲक्टर, सौर ऊर्जा, पाणी, ऊर्जा बचत अशा अनेक विषयांवरचा गाढा अभ्यास असलेले प्रा.अनिरुद्ध भालचंद्र पंडित यांचा जन्म ७ डिसेंबर, १९५७ रोजी मुंबईत झाला. शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन शाळेत आणि महाविद्यालयाचे एक वर्षाचे शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झाल्यावर पुढील शिक्षणासाठी पंडित बनारस हिंदू विश्वविद्यालयात गेले आणि तिथून त्यांनी बी.टेक ही रसायन अभियांत्रिकी शास्त्रातील पदवी मिळवली. त्यानंतर मात्र ते मुंबईला इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये आले आणि प्रा.जे.बी.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९८४ साली पीएचडी प्राप्त केली. प्रा.जे.बी.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर पीएचडी प्राप्त केलेल्या ११६ विद्यार्थ्यांपैकी ते पहिले विद्यार्थी होत. १९८४ ते १९९० या काळात पंडित इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात संशोधन साहाय्यक म्हणून गेले आणि तेथे त्यांनी जॉन फ्रॅंक डेविड्सन यांच्याबरोबर बबल आणि मल्टिफेज रिॲक्टरच्या संरचनेवर (डिझाईन) काम केले. तेथून परतल्यावर पंडित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये रीडर या पदावर अध्यापन आणि संशोधन करू लागले. १९९६ मध्ये ते प्राध्यापक झाले. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये शिकवत असताना त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ केपटाऊन, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सांता बार्बरा आणि बिटस-पिलानी येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. प्रा.पंडितांनी आजवर पर्यावरण अभियांत्रिकी आणि रासायनिक प्रक्रियेमधील सुरक्षितता, रासायनिक प्रकल्पांचे अर्थकारण, मल्टिफेज रिॲक्टरच्या संरचना (डिझाईन), प्रकल्प अभियांत्रिकी आणि अर्थकारण, विघटन प्रक्रिया हे विषय शिकवले. डॉ.पंडितांनी त्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आपापल्या गावी राहूनच मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून काही संशोधन, व्यवसाय करण्यास उद्युक्त केले आहे. त्यांच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी आयआयटी, एनआयटी यासारख्या प्रख्यात संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन करीत आहेत. त्यांचे अध्यापन हे फक्त फळ्यावर नसते तर प्रत्यक्ष त्याचे प्रयोग प्रयोगशाळेत दाखवत होत असल्याने विद्यार्थ्यांना ते लवकर समजते, म्हणूनच त्यांना एकापेक्षा अधिकवेळा उत्तम शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. डॉ.पंडितांचे संशोधन हे त्यांचे गुरु प्रा.एम.एम.शर्मा आणि प्रा.जे.बी.जोशी यांच्यासारखे समाजपयोगी प्रश्न सोडवण्यात असते.
पंडितांनी आजवर केलेल्या संशोधनात कॅव्हिटेशन आणि तत्संबंधित रासायनिक प्रक्रिया करणारी उपकरणे, सोनो केमिस्ट्री, कारखान्याच्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, हायड्रोडायनॅमिक प्रक्रियेमध्ये लागणा-या नॉझल्सची संरचना, पॉलिमर डिग्रेडेशन, अब्जांश (नॅनो मटेरियल) पदार्थ आहेत. कारखान्यातील सांडपाणी एका ठिकाणी जमून राहिले तर होणा-या उपद्रवापासूनची सुटका त्यांनी हायड्रोडायनॅमिक कॅव्हिटेशनचा वापर करून त्यांच्या विद्यार्थ्यांसह शोधून काढली. हीच पद्धत वापरून त्यांनी कोल्हापुरातील रंकाळा तलाव आणि ओडिसाच्या भुवनेश्वर येथील बिंदूसागर तलाव साफ करून दिले. त्यांच्याबरोबर काम करणा-या संशोधन गटाने ग्रामीण भागात वापरल्या जाणा-या चुलीतील लाकडासारख्या घन सरपणाचा उपयोग धूररहीत आणि अधिक कार्यक्षम कसा करता येईल यावर यशस्वीपणे काम केले. त्यामुळे पर्यावरण रक्षणाला हातभार लागला. केशकर्तनालयातून जमा होणारे मानवी केस, मेंढ्यांचे केस, कुक्कुटपालन करत असताना जमा होणारी कोंबड्यांची पिसे यांच्यावर स्वस्त प्रक्रिया करून खत आणि कुत्री अथवा अन्य जनावरांना उपयोगी पडणारे खाद्य पदार्थ बनवले. परदेशाहून काही माल घेऊन जहाजे भारतात येतात. तो माल भारतात उतरवल्यानंतर ती जहाजे सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने रिकामी परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वजन म्हणून येथील पाणी त्यात भरले जाते आणि ते परदेशातील समुद्रात सोडले जाते. त्याला बॅलॅस्ट वॉटर म्हणतात. परंतू भारतातील पाणी आणि परदेशातील पाणी यात जैविकदृष्ट्या फरक पडतो आणि तो तेथील सामुद्री जीवांना धोक्याचा ठरू शकत असल्याने जागतिकस्तरावरील पर्यावरणवाद्यांचा त्याला विरोध असतो. त्या दृष्टीने त्यावर डॉ.पंडित यांनी सुयोग्य अशी प्रक्रिया शोधून काढली आहे. टाकाऊ मालातून नाविन्यपूर्ण सिरॅमिक्सचा विकास, बायोमासचे पायरोलिसिस, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतातील वाया जाणा-या काडीकच-यापासून बायोचार नावाचे खत बनवले, रासायनिक उपकरणे किती काळ टिकतील याचे अंदाज बांधले, अवजड धातुंसाठी सुलभ उपकरण बनवले, प्रथिन सुधारणा, वस्त्रोद्योगात वापरली जाणारी खळ काढणारे वितंचक (एन्झाइम) बनवले. सध्या ते आदिवासी लोकांबरोबर काम करीत असून शेतातील पिके उन्हात लवकर कशी वाळवायची यावर मार्ग शोधून काढत आहेत. रोग निदान आणि शैक्षणिक कामासाठी उपयोगी पडणा-या छोट्या आणि सहज इकडून तिकडे नेता येणा-या सूक्ष्मदर्शकांचा विकास त्यांनी केला आहे. रसायन अभियांत्रिकीतील सोनोकेमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरींग अँड प्रोसेस इन्टेन्सिफिकेशन, इंडस्ट्रीयल अँड इंजिनिअरींग केमिस्ट्री रिसर्च यासारख्या अनेक संशोधन पत्रिकांच्या संपादक मंडळावर पंडित काम करीत असतात. आजवर त्यांचे ४६५ संशोधन निबंध विविध संशोधन पत्रिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी सहा पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांनी विविध पुस्तकात २३ प्रकरणे लिहिली आहेत. त्यांच्या संशोधनावर आधारीत ३५ पेटंटस त्यांना आजवर मिळाली आहेत. त्यांच्या संशोधनपर निबंधांचा संदर्भ ३९,९१३ शास्त्रज्ञांनी घेतला असल्याने त्यांना त्यातील एच इंडेक्स मिळाला आहे. आजवर त्यांनी ६६ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आणि आणखी चारजण शिकत आहेत, तर १०६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधनासाठी मार्गदशन केले असून आणखी सहाजण शिकत आहेत. आजवर त्यांनी १६० परिषदात आणि १९० परिसंवादात भाग घेतला. सरकारी आणि उद्योगधंद्यांनी दिलेल्या निधीतून त्यांनी आजवर ३० प्रकल्प पुरे केले असून आणखी चारांचे काम चालू आहे. युनायटेड स्टेटस् ऑफ नॅशनल ॲकेडेमी ऑफ इंजिनिअरींग, इंडियन नॅशनल ॲकेडेमी ऑफ इंजिनिअरींग, इंडियन नॅशनल सायन्स ॲकेडेमी (इन्सा), द वर्ल्ड ॲकेडेमी ऑफ सायन्सेस, नॅशनल ॲकेडेमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र ॲकेडेमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन ॲकेडेमी ऑफ सायन्सेस आदी संस्थांनी त्यांना फेलोशिप दिली आहे. डॉ.पंडित आयआयटी मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सभासद आहेत. अणुशक्ती मंडळाच्या हेवी वॉटर बोर्डाचेही ते सभासद आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे ते सभासद आहेत. ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या तीन समित्यांचे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीचे सभासद असून कोकणातील लोणारे येथील बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे मार्च, २०२१ ते जानेवारी, २०२२ या काळात हंगामी कुलगुरू होते. ते काउन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेचे सभासद असून एशिया ओशनिक सोनोकेमिकल सोसायटीच्या बोर्डाचे सप्टेंबर, २०२० ते सप्टेंबर, २०२३ या काळात अध्यक्ष होते. पर्यावरण, वन आणि हवामान बदल या मंत्रालयाने नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ.पंडितांनी आयुर्मानाचे विश्लेषण, जमिनीचे आरोग्य, जैवविविधतेत येणारे अडथळे वगैरेचा विचार एखाद्या उद्योगाला अथवा मानववंश प्रकल्पाला परवानगी देण्यापूर्वी करावा असा सल्ला दिला आहे. याचे सुपरिणाम प्रत्यक्ष अम्मलबजावणी करताना दिसू लागले आहेत.
त्यांना इंडियन नॅशनल ॲकेडेमी ऑफ इंजिनिअरींगने २०२० साली आपले उपाध्यक्ष म्हणून निवडले आहे. २०२३ साली गोव्याला भरलेल्या ५७व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषद आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संयुक्तपणे विज्ञान प्रसाराचे अनेक कार्यक्रम करीत असते, त्यात डॉ.पंडितांचा पुढाकार असतो, कारण विज्ञान संशोधन आणि अध्यापनाइतकाच त्यांना विज्ञान प्रसारातही रस आहे. २०२० साली डॉ.पंडितांना आयसीसीच्या यू.एम.त्रिवेदी जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याशिवाय त्यांना विश्वकर्मा पदक, जे.सी.बोस फेलोशिप, इंडिया इनोव्हेशन ग्रोथ पुरस्कार, उल्लेखनीय युवा रसायन अभियंता पुरस्कार, मोकाशी पुरस्कार, प्रा.आर.ए.राजाध्यक्ष उत्तम शिक्षक पुरस्कार, झी २४ तास यांचा युवा संशोधक पुरस्कार, थ्री एम-सीआयआय पुरस्कार, एबल बेस्ट पुरस्कार, सी-झिरो पुरस्कार, उत्तम संशोधक गटाचा डीएसटी-मार्टिन लॉकहिड-टाटा पुरस्कार, गांधी युवा संशोधक पुरस्कार, संशोधन आणि विकास या क्षेत्रातील केमटेक लीडरशिप पुरस्कार, जी.एम.मार्वे पुरस्कार, आरोहण सामाजिक संशोधन पुरस्कार, हर्डेलिया पुरस्कार मिळाले असून अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगातल्या पहिल्या २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ.पंडितांचे नाव घेतले आहे. डॉ. पंडित २०१९ सालापासून इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू म्हणून काम करीत आहेत.