परंतु अन्न वाया दवडणे, हा धर्म नव्हे !!

0

आपल्या भारतीय संस्कृतीत अन्न हे पुर्णब्रह्म म्हणून ओळखल्या जाते.अन्नग्रहणाला “ उदरभरण नोहे ,जाणिजे यज्ञकर्म “ म्हटले आहे.श्रीमद्भगवद्गीतेत “ पचाम्यअन्नम् चतुर्विधम् “ भक्ष्य,लेय्य,पेय्य,चोश्य “ हे अन्नाचे प्रकार मीच पचवतो हे भगवंतांनी सांगितले आहेत. थोडक्यात भारतीय जीवन पध्दतीत अन्न हे देव स्वरुप आहे. पंचतत्वाची महत्वपुर्ण कडी आणि न्यूनं परिपूर्णता  अन्न आहे. सर्वात प्रथम आकाश तत्व आहे.आकाश तत्वातून वायू तत्व निर्मिती आहे.वायू तत्वातून अग्नीतत्व निर्माण झाले.अग्नीतून जल तत्व आणि जलतत्वातून पृथ्वी तत्व निर्माण झाले.पृथ्वी तत्वातून अन्न तयार झाले.थोडक्यात अन्न हे पंचतत्वाचा अर्क आहे.या अर्काचे मुर्तस्वरुप म्हणजे आपला देह आहे. आपला देह पंचतत्वाचा बनलेला आहे म्हणजे पंचतत्वाचे स्थुलस्वरुप देह आहे. जर अन्नाचे इतके महत्व आहे तर अन्नाकडे आपण पुर्णब्रह्म म्हणून गांभीर्याने पाहतो का ? तर याचे उत्तर नाहीच येईल. जगात अजूनही अब्जावधी लोक दररोज उपाशी झोपतात.आपण रोज जे खरकटे टाकतो त्यात किंवा शिळे अन्न म्हणून फेकून देतो त्यात करोडो लोक जेवू शकतात. पण त्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही.आपली कुटुंब संख्या जितकी तितक्या प्रमाणात आपण अन्न शिजवतो का ? याचेही उत्तर नकारार्थीच येईल.एखादया दिवशी अंदाज चुकला तर आपण समजू शकतो.पण रोजच्या रोज पातेलेभरुन भाज्या ,पोळ्यांची थप्पी आणि भाताचे कुप्पे वाया जात असतील तर आपल्याला चिंतनाची गरज आहे.
घरातील शितकपाट (फ्रिज ) एकदा ईमानदारीने उघडा आणि मनातून तपासा.खराब झालेले दहीदूध,सडलेला पालक,पिचलेले टमाटे,घट्ट वरण असे अनेक अन्नपदार्थ आठवडा आठवडा तसेच पडून असलेले दिसतील.म्हणजे अन्न खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये अनेक दिवस ठेवतात आणि मग खराब झाले म्हणून फेकून दिले जातात. फ्रिजच्या फ्रीजर बद्दल न बोललेले बरे.बर्फाने ओतप्रोत भरलेला फ्रीजर, बर्फात अडकलेले हिमक्रीम,पेय आणि बरेच काही.काही लक्षात येते का आपल्या ?
दरवर्षी लोणचे घालण्याचा मिथ्याग्रह ,शेजारिण घालते म्हणून मी घातलेच पाहिजे म्हणून उगाच दिसता घाट करायचा.आणि दोनचार महिन्यांनी खराब झाले म्हणून रात्री चोरून कचराकुंडीत टाकून आमचे लोणचे चविष्ट झाले म्हणून संपले सर्व ची दवंडी पिटायची. आग्रहपूर्वक फळफळावळ आणायची आणि दोनचार दिवस न खाताच तसेच पडून राहतात.आणि खराब झाले म्हणून फेकून द्यायची.विशेषतः डाळिंब,सफरचंद,शेवटची दोनचार केळी हमखास फेकून दिली जातात.चिरायचा , सोलायचा कंटाळा हे त्याचे कारण. घरात अन्न तयार असून उगाच पिज्झा, मंच्युरियन किंवा हॉटेलातील पदार्थ आणायचे.ते पण पुर्ण न खाता सकाळी फेकून द्यायचे रात्रीच्या उरलेल्या शिळ्या अन्नासोबत.अन्न आणि पैशाचा अपव्यय उगाच.
धान्यसाठा हवा घरात म्हणून पोत्याने धान्य विकत घ्यायचे .त्याची काळजी न घेता तशीच साठवण करायची.दोन तीन महिन्यातच किड लागली म्हणून त्यातले अर्ध्याधिक धान्य फेकून द्यायचे. कुरुड्या,खारोड्या,शेवया बनवायच्या किंवा हल्ली विकत आणतात.त्या डब्ब्यात घालून ठेवायच्या.त्या आहेत याचा विसर पडतो.काही दिवसांनी कुठल्यातरी कारणांनी डब्यापर्यंत आपण पोचतो.लक्षात येते की अरे ! याचा तर वास येतोय.मग काय ! द्या फेकून . सातूचे पिठ,लाह्याचे पिठ,मेतकूट यांच्याबाबतीतही हेच होते.
वर्षभरातील अन्नाचा विचार केला तर आपण जवळजवळ तीस प्रतिशत अन्न वरील प्रकारे वाया दवडतो आपण.याला समर्थांनी अधर्म म्हटले आहे. पुर्वी आपल्या कडे म्हणायचे की “ खाऊन माजा ,टाकून माजू नका! पूर्वीच्या काळी स्वयंपाकापुर्वी अंदाज घेतला जायचा.त्यानुसार स्वयंपाक केल्या जायचा.एकत्रित भोजन घेतल्या जायचे.अन्नपूर्णा असायची. एक माणूस जेवू शकेल इतके अन्न घरात असायचे पण वायाजाईल इतके शिजत नसे.आणि चुकलाच अंदाज एखादवेळी तर दुसरे दिवशी “ शिळीसप्तमी “ असायची.म्हणजे भात उरला तर त्याला फोडणी देवून चमचमीत फोडणीचा भात बनायचा.पोळ्या उरल्या तर तुकडे बनवले जायचे.त्या पदार्थातील शिळेपणा मारुन टाकल्या जायचा.ते खाण्यातही किती उल्हास असायचा.उल्हास बनविणाऱ्या गृहिणीमध्येही आणि खाणाऱ्या कुटुंबियामध्येही असायचा.दुर्दैवाने हा उल्हास घराबाहेर कुठेतरी हरवला. “गाडीवाला आया , घरसे कचरा निकाल “ हा भोंगा कानावर पडताच शिळे पदार्थ वापरात आणण्यापेक्षा फेकून देण्याचीच घाई. लक्षात ठेवा ! लग्नसमारंभ, विबिध कार्यक्रमात होणारी अन्नाची नासाडी न बघवता येणारी आहे. रेल्वे किंवा इतर प्रवासात खाणे कमी आणि फेकून अधिक देतात माणसे. अन्न पुर्णब्रह्म आहे.त्याचा आदर करा.अजूनही दुर्गम भागात मागून आणलेल्या पोळ्या भाकरी उन्हात सुकविल्या जातात.वर्षभर त्याच भाकरी शिजवून खाल्ल्या जातात.इतकी बिकट स्थिती अन्नाची आहे.अनेक जण अन्नांन्न जीवन जगत आहेत जगात. अन्नसुरक्षा निर्देशांकात भारत ११३ प्रमुख राष्ट्रातून ६८ व्या क्रमांकावर आहे.वैश्विक उपासमारित भारत १२५ प्रमुख देशापैकी १११ व्या क्रमांकावर आहे.भारतात १९५ दशलक्ष कुपोषित बालके आहेत.बिकट स्थिती त्यांच्यावर आहे. आपल्यावर जर ही स्थिती नसेल तर देवाची कृपा समजा. आपल्या घरातील अन्नाचा कणही वाया जाणार नाही याची काळजी घ्या. स्वयंपाक करतांना घरातील सर्व यथेच्छ जेवले पाहिजेत याची काळजी घ्या पण जेव्हढे आवश्यक तितकेच शिजवा. फळफळावळ जरूर आणा पण ती फळे केवळ चिरण्याचा कंटाळा म्हणून वाया जातात.कुणीतरी पुढाकार घेऊन चिरली पाहिजेत विशेषतः डाळिंब फोडून दाणे काढून , त्यावर चव म्हणून मीठ साखर घालून सर्वांना खायला दिली पाहिजेत. लोणची दररोजच्या जेवणात आवर्जून ठेवा म्हणजे ती वापरात येतील. कुरुड्या,खारोड्या,सातू हे पदार्थ एकत्रित बसून त्याचा आस्वाद घ्या. हे पदार्थ वाया जातात कारण त्याची प्रक्रिया कंटाळवाणी आहे.गप्पाटप्पांनी ती आनंददायी होते.
धान्य साठवण योग्य प्रक्रिया करुन ठेवा नाहीतर महिन्याला एकेक कट्टा आणा.आजकाल साठवणुकीची गरज नाही. पदार्थ बनवितांना “ तुम करते म्हणून हम करते “ असा भाव नको. घरातील सदस्यांना काय आवडते ते बनवा.उगाचा शेजारिणीशी मिथ्या शर्यत नको. लग्न समारंभात तर सर्वांनी खूप काळजी घेतली पाहिजे.एका हॉटेल नी तर नियमच केला की ताटात टाकाल तर दंड आणि टाकलेले अन्न घरी घेऊन जा !  
जगात अनेकांना खायला मिळत नाही आणि आपला अन्न टाकून माज असतो. वाया घालविल्याचे जराही दुःख,लाजशरम,चुकल्याची भावना आपल्या चेहऱ्यावर नसते.उलट त्याचा गर्व आणि अभिमान वाटतो कित्येकांना.हे पशुवत् वागणे आहे. आपण जर महिन्यातून एक दिवस उपवास धरला तर जगातील अब्जावधी माणसे पोट भरुन जेवू शकतात. पण उपवास जाऊ द्या पण काटकसर तर करा.म्हणूनच समर्थ रामदासांनी आपल्याला खडसावले की आपण यथेच्छ जेवणे । (फोटो गुगल साभार )
उरले ते वाटणे ॥
परंतु वाया दवडणे ।
हा धर्म नव्हे ॥

विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
९८२२२६२७३५

लेखक सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक विषयांचे अभ्यासक आहेत. मोबा. नं. - ९८२२२६२७३५

Leave A Reply

Your email address will not be published.