अष्टलक्ष्मी स्तोत्रम्.

0

अष्टलक्ष्मी स्तोत्रम्

दिवाळी अगदीं जवळ आली आहे. दिवाळीची आवरा-सावर, फराळाची तयारी,सगळं कसं रीतसर लागतं. त्यात पाच दिवस अगदी आनंद आणि उत्साहाने भारलेले असतात. लक्ष्मीपूजन हा त्यातल्या त्यात मुख्य दिवस असं म्हणतात. लक्ष्मीच्या विविध रूपातून भारताच्या सर्वदूर भागात ती पूजल्या जाते. तिचा उत्साहाने केलेला उत्सव संपूर्ण जगाला कौतुकाने बघण्यास भाग पाडते. अशाच लक्ष्मीच्या अष्टलक्ष्मी स्तोत्रम् याविषयी आज काही चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय..

अष्टलक्ष्मी स्तोत्रम् स्तोत्राने कानाभोवताली गुंजारव करत कधी मनाला रुंजी घातली कळलेच नाही.स्तोत्र फलदायी व्हायला ते आधी मनात रुजायला हवे. स्तुती करायला रचलेले काव्य म्हणजे स्तोत्र. त्या इष्ट देवतेच्या परिपूर्ण गुणांचे वर्णन म्हणजे स्तोत्र. अशाच अष्टलक्ष्मी स्तोत्राबद्दल ऐकतांना अर्थ जाणून घेण्याची इच्छा झाली आणि त्यातून एका एका श्लोकाचे चिंतन सुरू झाले आणि या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. अष्टलक्ष्मी अर्थात आदि लक्ष्मी,धन लक्ष्मी,विद्या लक्ष्मी,धान्य लक्ष्मी,धैर्य लक्ष्मी,संतान लक्ष्मी,विजय लक्ष्मी,राज लक्ष्मी या आहेत. या सर्व प्रसन्न व्हाव्या यासाठी या स्तोत्राचे पठण अधिक लाभदायक आहे. 

आदिलक्ष्मी –  

सुमनसवन्दित सुन्दरी माधवी चन्द्र सहोदरी हेममये ।

मुनिगणमण्डित मोक्षप्रदायिनी मन्जुळभाषिणी वेदनुते ।

पञ्कजवासिनी देवपूजित सद्गुणवर्षिणी शान्तियुते ।

जयजय हे मदुसूदन कामिनी आदिलक्ष्मी सदा पालय ते ॥ १ ॥

आपल्या मूळ स्त्रोताचे ज्ञान होणे, हीच ‘आदि लक्ष्मी’ होय. मग नारायण आपल्या नजीक असतात. ज्याला आपल्या स्त्रोताचे ज्ञान होते तो सर्व भयापासून,भीतीपासून मुक्त होतो आणि संतोष,आनंद प्राप्त करतो. हीच आदि लक्ष्मी होय. आदि लक्ष्मी निव्वळ ज्ञानी व्यक्तींजवळ असते आणि ज्याच्याजवळ आदि लक्ष्मी असते समजा कि त्याला ज्ञान प्राप्त झालेय.

धान्यलक्ष्मी – 

अयि कलिकल्मषनाशिनी कामिनी वैदिकरुपिणी वेदमये ।

क्षीरसमुद्भव मंगलरुपिणी मन्त्रनिवासिनी मन्त्रनुते ।

मन्गलदायिनी अम्बुजवासिनी देवगणाश्रित पादयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी धान्यलक्ष्मी सदा पालय ते ॥ २ ॥

धन लक्ष्मी जवळ असली तरी धान्य लक्ष्मी ‘आहे’ असे म्हणू शकत नाही. धन आहे परंतु काही खाऊ शकत नाही. भाकरी, भात, साखर, मीठ खाऊ शकत नाही. याचाच अर्थ धन लक्ष्मी आहे पण धान्य लक्ष्मीचा अभाव आहे. ग्रामीण भागात मुबलक धान्य असते. तेथील लोक दोन चार दिवस कोणालाही खायला-प्यायला घालायला हयगय करत नाहीत.कारण धन नसले तरी धान्य आहे. तेथील लोक छानपैकी खातात. शहरी लोकांच्या तुलनेत तेथील लोकांच्या आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण देखील जास्त असते. त्यांची पचन क्षमता देखील चांगली असते. धान्याचा वापर आणि सन्मान करणे म्हणजेच धान्य लक्ष्मी. जगात सर्वांना भोजन गरजेचे आहे. अन्न खराब करू नका, वाया घालवू नका. बहुतेकवेळा जेवढे अन्न बनते तेवढेच वाया जात असते, फेकून दिले जाते. इतरांना देत पण नाहीत. असे कदापि करू नका. अन्नाचा सन्मान करणे हीच धान्य लक्ष्मी होय.

धैर्यलक्ष्मी – 

जयवरवर्णिनी वैष्णवी भार्गवी मन्त्रस्वरुपिणि मन्त्रमये ।

सुरगणपूजित शीघ्रफलप्रद ज्ञानविकासिनी शास्त्रनुते ।

भवभयहारिणि पापविमोचनी साधुजनाश्रित पादयुते ।

जयजय हे मदुसूदन कामिनी धैर्यलक्ष्मी सदा पालय ते ॥ ३ ॥ 

घरी सर्व काही आहे-धन आहे, धान्य आहे, सारी संपन्नता आहे पण आपण भित्रे आहोत. श्रीमंत कुटुंबातील मुले बहुतेकवेळा भित्री असतात. हिम्मत म्हणजे धैर्य एक संपत्ती आहे. नोकरीतील लोक नेहमी आपल्या वरिष्ठांना घाबरून असतात. व्यापारी निरीक्षकांना घाबरून असतात. आम्ही नेहमी अधिकाऱ्यांना विचारतो कि तुम्हाला कसा सहाय्यक आवडेल – तुमच्या समोर नेहमी घाबरलेला कि धैर्याने जो तुमच्याशी संपर्क करेल? जो सतत तुमच्या समोर घाबरलेला असेल तो नेहमी खोटे बोलत राहील, खोट्या गोष्टी, सांगत राहील. अशा व्यक्तीसोबत तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही असा सहाय्यक पसंत कराल जो धैर्याने काम करेल आणि इमानदारीने तुमच्याशी बोलेल. हे आपल्या आंतमध्ये अशी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे जी सतत आपल्या सोबत असते. हि धैर्य लक्ष्मी होय. धैर्य लक्ष्मी असली तरच जीवनात प्रगती होते. ज्या प्रमाणात धैर्य लक्ष्मी असेल त्या प्रमाणातच प्रगती होईल. व्यापार असो किंवा नोकरी, धैर्य लक्ष्मीची आवश्यकता असतेच.

गजलक्ष्मी – 

जयजय दुर्गतिनाशिनी कामिनी सर्वफलप्रदा शास्त्रमये ।

रथगज तुरगपदादि समावृत परिजनमण्डित लोकनुते ।

हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित तापनिवारिणी पादयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी गजलक्ष्मी सदा पालय ते ॥ ४ ॥

राज लक्ष्मी म्हणा किंवा भाग्य लक्ष्मी म्हणा दोन्ही एकच आहेत – सत्ता. एखादी व्यक्ती मंत्रिपद प्राप्त करून काहीही सांगायला, बोलायला लागला तरी त्याचे कोणीही ऐकत नाही. त्याची सत्ता कोणीही मान्य करत नाही. बऱ्याच कार्यालयात देखील असे दिसते. मालकाचे कोणीही ऐकत नाही पण क्लार्कचे ऐकतात. त्याचा हुकुम चालतो. एका ट्रेड युनियनच्या प्रमुखाजवळ जितकी राज अर्थात गजांत लक्ष्मी असते तेवढी शहरातील मिल मालकाकडे नसेल. शासन करण्याची क्षमता म्हणजे राज लक्ष्मी अर्थात गजांत लक्ष्मी आहे.

सन्तानलक्ष्मी – 

अयि खगवाहिनी मोहिनी चक्रिणी रागविवर्धिनी ज्ञानमये ।

गुणगणवारिधी लोकहितैषिणी स्वरसप्त भूषित गाननुते ।

सकल सुरासुर देवमुनीश्र्वर मानववन्दित पादयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी सन्तानलक्ष्मी सदा पालय ते ॥ ५ ॥

अशी मुले जे प्रेम देणारे असतील, प्रेमाचे नाते  टिकवणारी असतील तर ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमुळे ताण तणाव येत नाही किंवा ताण कमी होतो ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमुळे सुख, समृद्धी, शांती मिळेल ती संतान लक्ष्मी होय. आणि ज्या मुलांमुळे भांडण, तणाव, त्रास, दुःख, पिडा होईल ती संतान लक्ष्मी नव्हे.

विजयलक्ष्मी –  

जय कमलासनी सद्गतिदायिनी ज्ञानविकासिनी गानमये ।

अनुदिनमर्चित कुंकुमधूसर भूषित वासित वाद्यनुते ।

कनकधरास्तुति वैभव वन्दित शन्कर देशिक मान्य पदे ।

जयजय हे मधुसूदन कामिनी विजयलक्ष्मी सदा पालय ते ॥ ६ ॥

काही व्यक्तींच्या कडे सर्व साधन सुविधा असतात तरीदेखील ते जे काही करतील त्यात त्यांना यश मिळत नाही. जे काम हातात घेतील ते काम बिघडले म्हणून समजा, काम होणारच नाही. म्हणजे विजय लक्ष्मीची कमी आहे. बाजारातून काहीतरी आणायला गेले तर ते मिळणार नाही, रिक्षात बसतील तर रिक्षा बिघडेल, टॅक्सीने बाजारात पोहोचले तर दुकाने बंद झाली असतील. तुम्हाला असे वाटेल कि मी स्वतः जाऊन काम केले असते तर बरे झाले असते. अगदी छोटे काम देखील करू शकणार नाहीत. येथे विजय लक्ष्मी कमी असते. परिस्थिती तरी विपरीत असेल किंवा काही कारणे तरी सांगतील. कोणत्याही कामात सफलता न मिळणे म्हणजे विजय लक्ष्मीची कमतरता असं म्हणता येईल.

 

विद्यालक्ष्मी – 

प्रणत सुरेश्र्वरी भारती भार्गवी शोकविनाशिनी रत्नमये ।

मणिमयभूषित कर्णविभूषण शान्तिसमावृत हास्यमुखे ।

नवनिधिदायिनी कलिमलहारिणी कामित फलप्रद हस्तयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी सदा पालय ते ॥ ७ ॥

देवी लक्ष्मी आणि सरस्वतीचे चित्र पाहिले कि लक्षात येईल कि लक्ष्मी पाण्याच्या वर कमळामध्ये स्थित असते. पाणी अस्थिर असते म्हणून लक्ष्मी देखील पाण्याप्रमाणे चंचल आहे. मात्र विद्या लक्ष्मी सरस्वती पाषाणावर स्थिर आहे. विद्या, ज्ञान येते तेंव्हा जीवनात स्थिरता येते. आपल्या हातून विद्येचा देखील दुरुपयोग होऊ शकतो. शिकणे हा एकमेव उद्देश्य असेल तर ती विद्या लक्ष्मी होऊ शकत नाही. शिकणे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाचा वापर कराल तेंव्हा ती विद्या लक्ष्मी होईल.

 

धनलक्ष्मी – 

धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि धिन्धिमि दुन्दुभि नाद सुपूर्णमये ।

घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम शन्खनिनाद सुवाद्यनुते ।

वेदपुराणेतिहास सुपूजित वैदिककमार्ग प्रदर्शयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी धनलक्ष्मी सदा पालय ते ॥ ८ ॥

धन लक्ष्मी सर्वाना माहिती आहेच, धनाच्या इच्छेपोटी आणि अभावामुळे माणूस अधर्म करतो. हिंसा, चोरी, फसवणूक यासारखी चुकीची कामे करतो. परंतु डोळे उघडून पहात नाहीत कि आपल्याजवळ काय आहे. जोर जबरदस्तीने धन लक्ष्मी येत नाही, आली तरी सुख, आनंद देत नाही तर निव्वळ दुःखच देते. काही व्यक्ती धन म्हणजेच लक्ष्मी मानतात आणि तिला प्राप्त करणे हेच लक्ष्य बनवतात. मरेपर्यंत पैसे गोळा करतात, बँकेत ठेवतात आणि मरून जातात. ज्यांनी धन हेच लक्ष्य बनवले आहे ते दुःखीच होतात. काही व्यक्ती धनाला दोष देतात. पैसे नाहीत तेच ठीक आहे, पैसा चांगला नाही, पैशामुळे हे घडते-ते घडते, हा सर्व गैरसमज आहे. धनाचा सन्मान करा, सदुपयोग करा, मग धनलक्ष्मी स्थिर होईल. लक्ष्मीची पूजा करा. लक्ष्मी चंचल असते, म्हणजे ती सतत चालत राहते. चालत राहिली तरच तिचे मुल्य आहे नां. बंद राहिली तर तिचे काहीही मुल्य नाही. म्हणून धनाचा सन्मान आणि सदुपयोग करा.

खरंतर या आठ प्रकारची लक्ष्मी एक दुसऱ्याशी संलग्नित आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे आठही धन कमी अधिक प्रमाणात असतात. आपण त्यांचा किती सन्मान करतो,वापर करतो ते आपल्यावर अवलंबून आहे. या आठ लक्ष्मींचे नसणे याला अष्ट दारिद्र्य म्हणतात. लक्ष्मी असो किंवा नसो – नारायण नक्की प्राप्त होतील. कारण नारायण दोन्हीत आहेत. लक्ष्मी नारायण आणि दरिद्री नारायण. दरिद्री नारायणाला भोजन दिले जाते तर लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते. साऱ्या जीवनाचा प्रवाह हा दरिद्र नारायणाकडून लक्ष्मी नारायणाकडे, दुःखाकडून समृद्धीकडे आणि जीवनातील रुक्षपणाकडून अमृताकडे जात असतो आणि त्यामुळेच या अष्टलक्ष्मीची नियमित उपासना करणे इष्ट ठरेल असे वाटते. येणारी दिवाळी सुख,शांती,समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच अष्टलक्ष्मीचरणी प्रार्थना आहे. 

शुभ दीपावली..

 

  • सर्वेश फडणवीस, नागपुर.

         लेखक हे इतिहास, आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक आहेत.

लेखक सामाजिक कार्यकर्ते असून सामाजिक व धार्मिक विषयाचे अभ्यासक आहेत. sarveshfadnavis.blogspot.com

Leave A Reply

Your email address will not be published.