बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो..!
“बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” हे साने गुरुजींचे गीत वर्षभरात घडणाऱ्या घटनांचा आढावा घेतल्यास, सार्थ होताना दिसते आहे. आत्मनिर्भर भारताचा शंखनाद , ही त्याची सुरवात.
‘वन्दे मातरम् ।’ हे हिंदुस्थानचे ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून प्रसिद्ध आहे. वन्दे मातरम्’ या दोन शब्दांना, तर फारच महत्त्व लाभले आहे. कित्येक राष्ट्रभक्तांना न्यायालयात मोठमोठ्या शिक्षा ऐकतांना, कित्येक क्रांतीकारकांना, हसत हसत फासाचा दोर गळ्यात अडकवून घेतांना, या दोन शब्दांचीच आठवण झाली आहे.
वेदमंत्रांहून आम्हा वंद्य ‘वन्दे मातरम्’ ! माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती| आहुतींनी सिद्ध केला मंत्र ‘वन्दे मातरम्’ ! ग.दि. माडगूळकर यांचे हे स्फूर्तीगीत.
तब्बल १५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.
“वंदे मातरम” चा जयघोष करीत २०१४ च्या निवडणुकीत भरघोस यश मिळवून भाजपा प्रणीत रालोआ सरकार स्थापन झालं. होय| २०१३-२०१४ या दरम्यान प्रत्येक सभा मधून नारे लागायचे ते, “वंदे मातरम” चे. “भारत माता की जय यांचे”. मोदिजी स्वत: “वंदे मातरम्” म्हणायचे आणि उपस्थित जनसमुदाया कडून ते म्हणवून घ्यायचे. पुढे त्याचे मोदी लाटेत रुपांतर झाले. आजही आपल्या भाषणात या “वंदे मातरम्” चा घोष ते करताच. नुकताच गलवान खोऱ्यात सैन्य तळाला भेट दिली असतांना सुद्धा “वंदे मातरम आणि भारत माता की जय” चे नारे भारत-चीन च्या सीमेवर निनादले.
आपल्या मातृभूमीला, परम वैभवाप्रत नेण्यासाठी कटीबद्ध असलेल्या पंतप्रधानांच्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या मागील सहा भाषणांची ही झलक.
2014 ला पहिल्यांदा आपल्या देशामध्ये गैर काँग्रेसी सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासून या भारत देशाला एक नवीन दिशा प्राप्त झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
15 ऑगस्ट 2014 ला पहिल्यांदा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून, देशाला संबोधित केलं. दहा वर्षानंतर लाल किल्ल्यावरून गैर काँग्रेसी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राष्ट्रीय राजकारणात नवखा असल्याची प्रांजळ कबुली देत, देशाला संबोधताना ते म्हणाले की, आज मी इथे एक पंतप्रधान म्हणून आलेलो नाही तर एक सेवक म्हणून आलो आहे. मी देशाचा पंतप्रधान नसून “प्रथम सेवक” आहे.
आज गेली सात वर्ष आपण ते बघतो आहोत, अनुभवत आहोत. आपल्या पासष्ट मिनिटांच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी, नियोजन आयोगाचे रूप पालटणार, खासदार आदर्श गाव योजना, स्वच्छ भारत अभियान, शाळांमधून शौचालय बांधणे, महिलांना सन्मान, डिजिटल इंडिया, इ-गव्हर्नन्स, मेड इन इंडिया, प्रत्येक गरीब कुटुंबाला एक लाखाचा विमा, जनधन योजना, “मातेच्या गर्भात वाढणाऱ्या मुलीला मारू नका” असा संदेश, या मुद्द्यांचा समावेश आणि संकल्प हे पहिल्या भाषणाचे वैशिष्ट्य. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना स्वच्छता आणि शौचालय यावर बोलणारे मोदीजी हे पहिले पंतप्रधान ठरले. एक मन, एक दिशा, एक लक्ष, एक गती आणि एक मती, हा संकल्प या पहिल्या भाषणांमधून मोदीजींनी जगापुढे मांडला. 2014 च्या पहिल्या संबोधनाचे वेळी मोदिजीनी लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचा जोधपुरी बांधणीचा फेटा घातला होता.
पंतप्रधानांचे, लाल किल्ल्यावरील वरील दुसरं भाषण झालं ते 15 ऑगस्ट 2015 ला. 69 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून, आपल्या 86 मिनिटांच्या या संबोधनात, भ्रष्टाचार संपवून येणाऱ्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्याच्या दिनी, भारत एक विकसित राष्ट्र व्हावे यादृष्टीने “टीम इंडिया” ही संकल्पना मांडली. साधेपणा, एकता आणि बंधुभाव ही भारताच्या संस्कृतीची खुबी आहे. जातिवाद किंवा संप्रदाय वाद याला स्थान नाही. भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उदयास येत आहे, ग्रामीण आवास योजना आणि वीज अशा सर्व प्राथमिक गरजा 2022 पर्यंत भागवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा संकल्प यावेळी त्यांनी केला. येत्या 1000 दिवसात 1805 गावे विजेने जोडले जातील असा निश्चय यावेळी त्यांनी व्यक्त केला. किसान कल्याण योजना, कृषी सिंचन योजना, वन रैंक वन पेंशन, घोषणा यावेळी करण्यात आली. वर्षभराच्या कामाचा, संकल्पनांचा आढावा घेताना, शाळेतील पूर्ण झालेले शौचालये, जनधन योजने अंतर्गत 17 करोड बँक खाते याचाही उहापोह, पंतप्रधानांनी आपल्या या संबोधनात केला. विकास हाच महत्त्वाचा मुद्दा, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन ही प्राथमिकता, सांप्रदायिक सदभाव, यावर भर. देशाच्या विकासात 125 करोड भारतीयांच्या टीम इंडियाचे योगदान आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. एलपीजी सबसिडी सोडणाऱ्या भारतीयांबद्दल गौरवोद्गार काढलेत. २०१५ मध्ये मोदी यांच्या पेहरावाची खूप चर्चा झाली. मोदी यांनी सोनेरी रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता. या कुर्तीला साजेसा, मस्टड रंगाचा फेटा त्यांनी घातला होता.
15 ऑगस्ट 2016. स्वातंत्र्याचे सत्तरावे वर्ष. लाल किल्ल्या वरून केलेलं हे मोदिजींचे तिसरे भाषण. हे तिसरे भाषण शहाण्णव मिनिटाचे होते. आजपर्यंत केलेल्या सगळ्यात अधिक काळ केलेले हे संबोधन. भारत वर्षाला नव्या उंचीवर नेण्याचा “संकल्प पर्व” असा त्याचा उल्लेख केला. आपण सारे आज मोकळा श्वास घेतो, त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, त्याग, तपस्या आहे, ह्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. तरुणवयात हसत हसत वीर मरण स्वीकारणाऱ्या, वीरांचे स्मरण करण्याचा दिवस. प्रत्येक भारतीय एक शिपाई आहे. “एक भारत, श्रेष्ठ भारताचा” नारा याच वर्षी मोदीजींनी लाल किल्ल्यावरून दिला. जिथे आशा असते तिथे विश्वास असतो. स्वराज्य म्हणजे सर्वसामान्य माणसांविषयी संवेदनशीलता जबाबदारीची जाणीव, सर्वसामान्या प्रति समर्पित असल्याची भावना. सर्वसमावेशक आणि एकात्मिक दृष्टीने प्रयत्न होत आहे. टपाल कार्यांलयांना पुनरुज्जीवीत करून, टपाल कार्यालय “पेमेंट बँक” मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला. १५ ऑगस्टच्या दिवशी मोदिजीनी एका नवीनच पेहरावात देशावासियान्सी संवाद साधला. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांवर रंगीबेरंगी फेटा बांधला होता. यावर्षी त्यांच्या भाषणाचा मुख्य मुद्दा हा परदेश राजनिती आणि पाकिस्तानसोबतचे मुद्दा होता.
15 ऑगस्ट 2017. ला चौथ्यांदा मोदींजीनी भाषण दिलं. सगळ्यात कमी वेळाचे भाषण म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. यावेळी त्यांनी 57 मिनिटे भाषण केलं. तो लोकांच्या भावनांचा सन्मान आहे असं मानलं जातं. 71 स्वातंत्र्यदिनी काश्मिर संबंधी वक्तव्य करतांना, “ना गोली से, ना गालीसे, काश्मीर का हल गले लगाने से”, हा मंत्र दिला. काश्मीरला त्याचे पुनर्वैभव मिळवून देण्याचा संकल्प. आस्थेच्या नावावर हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. या वर्षी मोदींनी पुन्हा एकदा लाल आणि पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. या फेट्याला साजेसा असा फिकट पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढर पायजमा घातला होता.
15 ऑगस्ट 2018, 72वा स्वातंत्र्यदिन. राष्ट्राला उद्देशून केलेले, हे मोदींच्या “पहिल्या टर्म” मधील शेवटचे भाषण. हे भाषण 82 मिनिटांचे होते. चार वर्षातील सरकारच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. भारत वेगाने प्रगती करीत असून विकासाचा वेग, 2013 च्या तुलनेत प्रचंड वाढला आहे. जन आरोग्य अभियान, देशाची अर्थव्यवस्थेतील सुधारणा, मुद्रा योजना, स्वच्छ भारत अभियान, यावर त्यांनी भर दिला, आणि भारत अंतरिक्षात 2022 मध्ये, तिरंगा घेऊन जाईल, असा विश्वाास यावेळी व्यक्त केला. यावर्षी त्यांच्या भाषणाचा मुद्दा हा “देशाचा विकास होता”. भविष्यातील भारत हा गरिबांचा आणि शेतकऱ्यांचा भारत असेल असे त्यांनी म्हटले. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट होण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावर्षी मोदी यांनी पांढरा कुर्ता पायजमा आणि त्यावर केशरी लाल रंगाचा बांधणीचा फेटा घातला होता.
15 ऑगस्ट 2019. ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभपर्वावर पंतप्रधान मोदी यांनी सहाव्यांदा भाषण दिलं. “दुसऱ्या टर्म” च्या, पहिल्या भाषणाचे वेळी मोदींजीनी, पांढरा कुर्ता आणि चुडीदार पैजामा असा पेहराव केला होता. यावेळी सुद्धा हिरवा आणि लाला रंगाचे बंद असलेला पिवळ्या रंगाचा फेटा मोदिजीनी बांधला होता. त्याच दिवशी रक्षाबंधन असल्याने देशवासीयांना त्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात. पुरामुळे झालेल्या जीवितहानी बद्दल संवेदना आणि शोक यावेळी त्यांनी व्यक्त केला. नवीन सरकारच्या दहा महिन्यांच्या काळात घेतलेले धाडसी निर्णय म्हणजे “संपूर्ण समर्पणाने, देशसेवा”, याचं उदाहरण असेही ते म्हणाले. देशवासीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा कालखंड येणारा काळ आहे. शेतकरी शेतमजूर छोटे व्यापारी यांना पेन्शन, जलशक्ती मंत्रालयाची स्थापना, लोकसंख्या नियंत्रण, “सबका साथ, सबका विकास” सोबतच “सबका विश्वास” हा मंत्र यावेळी पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत असताना दिला. “देश बदलू शकतो” असा विश्वास भारतीयांच्या मनात निर्माण झालाय असं ते म्हणाले. “चीफ ऑफ डिफेन्स स्टॉप” या सैन्यातील नवीन पदांची घोषणा यावेळी लाल किल्ल्यावरून करण्यात आली. “पाच ट्रीलीयन डॉलर” अर्थव्यवस्थेचे सूतोवाच सुद्धा या भाषणाचा एक महत्त्वाचा मुद्दा. “एक देश आणि एक निवडणूक” या मुद्याचे सुतोवाच मोदींनी आपल्या भाषणात केले.
15 ऑगस्ट 2020 ला 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर होणार मोदींचे हे सलग सातवे भाषण. त्याला एक वेगळीच किनार आहे. ती किनार आहे, कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयग्रस्त अशा वातावरणाची. मोदींच्या या संबोधनाला किनार असणार आहे ती, ५०० वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त, रामजन्मभूमी शिलान्यासाच्या, पाच ऑगस्टला झालेल्या, भव्य दिव्य सोहळ्याची. खरं तर सांस्कृतिक स्वातंत्र्य लाभलेल्या, स्वतंत्र भारताच्या परिपेक्षात होणारे हे लाल किल्यावरील संबोधन. “येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे”, असा भाव व्यक्त करणार्याप गदिमांच्या “हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे” या गीताच्या पार्श्वभूमीवर आजचं भाषण होणार आहे.
गेल्या काही वर्षात घडणाऱ्या घटनांचा आढावा घेतल्यास “बलसागर भारत होवो” ही साने गुरुजींची कविता सार्थ होताना दिसते. आत्मनिर्भरतेची नांदी आणि बलसागर भारत होवो असा साने गुरुजींनी व्यक्त केलेला भाव हे दोन्ही सारखेच आहेत असं वाटतं. “वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन” या साने गुरुजींच्या गीतांच्या ओळी साकारताना जाणवताहेत. “मी माय थोर होईल, वैभव दिव्य शोभेल, जगतास शान्ति देईल
तो सोन्याचा दिस येवो।, असं साने गुरुजींचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. अशा वेळी उच्च रवात म्हणू या “बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.