बांगला देशाचा तिढा.
बांगला देशाचा तिढा.
सहा महिने चाललेल्या आंदोलनानंतर ०५ ऑगस्ट,२४ला; भारतविरोधी जिहादी दृष्टीकोन असलेल्या बांगलादेशीय कट्टरपंथियांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून सत्तापालट केला आणि कट्टर भारत विरोधी पण नोबल प्राईझ अलंकृत, मोहम्मद युनूस यांना नामधारी सरकार प्रमुख बनवल.त्यांनी सत्तेची धूरा हाती घेतल्याच्या काही दिवसानंतर तेथे हिंदूंवर अत्याचार होऊ लागले.आता तेथे कट्टरपंथियांचा हैदोस सुरू असून हिंदूंची घर व दुकान जाळल्या जाताहेत.त्यांच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव वाढत असल्याचा आणि विद्यार्थ्यांच्या आडून,कट्टरपंथी आता सत्तेत शिरकाव करताहेत अशा बातम्या येताहेत.
याच बरोबर तेथे होत असलेल्या काही इतर घटना व हालचाली देखील चिंताजनक आहेत. १९७१ नंतर नोव्हेंबर २४ मधे पहिल्यांदा एक पाकिस्तानी मालवाहू जहाज चितागोंग बंदरात दाखल झाल.डिसेंबर, २४च्या सुरवातीला पाकिस्तान उच्चायुक्तांनी,पाकिस्तान धार्जिणी बांगला देश नॅशनल पार्टी प्रमुख,बेगम खालिदा झिया यांची भेट घेतली. ही अचानक होऊ लागलेली पाक सलगी,भारतासाठी धोक्याची घंटी आहे. तेथे पाकिस्तान आणि चीनच्या मदतीनी मोठया भारतविरोधी कारवाईचा कट रचल्या जात असल्याची शंका येते कारण बांगला देशाच्या उत्तर सीमेवर तेथील लष्कराच्या हालचाली संशयास्पद रित्या वाढल्या आहेत. भारत बांगला देश सीमे जवळील लष्करी पायाभूत सुविधा वृद्धिंगत केल्या जात असल्यामुळे ही शंका, खात्रीत बदलत चालली आहे.बिहार व पूर्वोत्तर राज्यांना जोडणारा सीलिगुरी कॉरिडॉर किंवा चिकन नेक परिसराच्यासमोर, दोन ठिकाणी एअरस्ट्रिपची डागडुजी होते आहे.ठाकूरगाम आणि मनीर हाट येथील या एअरस्ट्रीप दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या असून, बांगलादेश लष्कर तेथील पायाभूत सुविधा वाढवतआहे.
भूतानच्या अधिपत्याखालील क्षेत्रात,चीननी केलेल्या घूसखोरीच्या संदर्भात,चीन व भारत यांच्यात, ७२ दिवसांचा डोकलाम तिढा निर्माण झाला होता.आपण चीनच्या घूसखोरीवर आक्षेप घेतला कारण त्या मार्गांनी चीन काही तासांतच सिलीगुरी कॉरिडॉरमधे दाखल होऊ शकतो.त्या वेळी तेथे बेगम शेख हसीना यांच्या अवामी लीगच सरकार असल्यामुळे,बांगला देश आपल्यासाठी “बफर झोन” होता.पण सांप्रत बांगला देश सरकार व तेथील परिस्थिती पाहता, सिलिगुरी कॉरिडॉर,उत्तरेकडून चीन व दक्षिणेकडून बांगला देश आणि आतून उल्फा आणि बोडो आर्मी यांच्या चौफेरी कचाट्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा वेळी पूर्वोत्तर राज्यांची व आपली नाळ तुटण्याच्या संभावना वृद्धिंगत होतात.
दुसरीकडे; बांगला देशनी नुकतच तुर्कीस्तानकडून मोठ्या संख्येत बार्याक्तार टीबी २ हे किलर ड्रोन विकत घेतले ज्यांची डिलिव्हरी चीतागोंग बंदरात होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाती आलेल्या बातम्यांनुसार;पंतप्रधान शेख हसीना पदउतार झाल्यानंतर,अनेक कट्टरपंथी दहशतवाद्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आल असून ते पाकिस्तानसाठी भारतविरोधी कारवाया करण्याची योजना आखताहेत. त्यासाठी पाकिस्तान त्यांना संसाधन व अन्य मदत देत असल्याचा दावा करण्यात येतो आहे. आजमितीला जरी भारताला कोणताही धोरणात्मक धोका दिसत नसला तरी लवकरच युनूस सरकार खालील बांगला देश,जमात आणि जिहादी दहशतवाद्यांच्या हाती जाऊन कट्टरतावादी गढ बनेल आणि भारतासाठी ही धोक्याची मोठी घंटा असेल.
बंगाली मुसलमानांची ही जुनी इच्छा आहे.१९७१च्या युध्दात मी; मुक्ती वाहिनी संघटने सोबत तत्कालीन ईस्ट पाकिस्तानमधे कार्यरत असतांना,मुक्ती वाहिनी संघटनेचे फाऊंडर मेंबर,ईस्ट पाकिस्तान रायफलचे मेजर टायगर सिद्दीकी यांच्या बरोबर काम करत होतो.त्यावेळी त्यांनी बोलता बोलता सांगितल होत;”योग्य वेळ आली की आम्ही ईस्ट बंगाल,वेस्ट बंगाल,आसामचा सीलीगुरी आणि बिहारचा कटिहार जिल्हा असा सोनार बांगला बनवू”.१९७५ मधे शेख मुजिबची हत्या करण्याचा कारस्थानात,लष्कर प्रमुख जनरल झिया बरोबर सिद्दीकींचाही हात होता.पुढे, शेख हसीनाची अवामी लीग सत्तेत आल्यावर सिद्दिकींना मृत्युदंड मिळाला. बांगला देशात चाललेल्या हिंदू व भारत विरोधी कारवाया आणि आपल्या पश्चिम बंगाल राज्याची सध्याची अवस्था बघता, चीनच्या मदतीनी सिद्दिकींनी वर्तवलेल भविष्य प्रत्यक्षात उतरविण्याचा खेळा सुरू झाला आहे अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.
या धोक्या विरूध्द जनजागृती करून,त्याद्वारे अशा कारवाया थांबवण्यासाठी तुमच्या येथील कट्टर इस्लामी संघटना आणि प्रशासनातील काही गुटांना वेसण घालण्यासाठी बांगला देश सरकारला बाध्य करण्याची जबाबदारी जबाबदारी आपली आहे. भारत सरकार,अतिशय सबळ व खोडता येणार नाही असे पुरावे (ईर्रेफ्युटेबल एव्हीडन्स) असल्या शिवाय हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरूध्द कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई करू शकणार नाही.कुठल्याही समाजाची स्थिती हा त्या देशाचा अंतर्गत मामला असतो.दुसरा देश त्यात प्रत्यक्ष कारवाई करून (डायरेक्ट मिलिटरी ॲक्शन) ढवळाढवळ करू शकत नाही कारण तस केल्यास, जागतिक पातळीवर ते आक्रमण ठरवल्या जात.पण आपली जनता बांगला देशावर मनोवैज्ञानिक दबाव आणू शकते.बांगला देश सीमेवर मोठा जमावडा करून असा दबाव निर्माण केल्या जाऊ शकतो.
१९७६मधे इंदिरा गांधींनी काश्मिरच्या शेख अब्दुल्ला यांना राष्ट्र विरोधी कारवायांसाठी अटक केल्यावर आपल्या तंगधार डिफेन्सच्या समोर असणाऱ्या, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मिरच्या मुझफ्फराबाद क्षेत्रात,५०,००० वर जास्त पाकिस्तानी जमावडा, जवळपास वीस दिवसांसाठी ठाण मांडून बसले होते आणि तेवढा वेळ आम्ही “टेंडर हुक्स” वर होतो. त्यानंतर शेख अब्दुल्लांना तामीलनाडूमधील उटी येथे नेण्यात आल. या पार्श्वभूमीवर,बांगला देशच्या तीनही बाजूंना मोठा नागरी जमावडा करून अशाच प्रकारचा दबाव आपल्या येथील नागरी संघटनांनीही आणण जरुरी आहे.१० डिसेंबरला भारतातील हिंदू संघटना प्रत्येक शहरात बांगला देशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध भव्य मोर्चे काढणार आहेत.या मोर्च्यांची परिणीती वर उल्लेखित मनोवैज्ञानिक दबावात होण अपेक्षित आहे. (फोटो – Agrowon साभार )
०९/१२/२४:१६, भगवाघर कॉलनी, धरमपेठ, नागपूर,१०:९४२२१३४९८७६/abmup54@gmail.com