बांगला देश युद्ध व जनरल सॅम माणेकशॉ.
बांगला देश युद्ध व जनरल सॅम माणेकशॉ.
१६ डिसेंबर २४ ला, तिसर भारत पाक युद्ध किंवा बांगला देश स्वातंत्र्य लढ्याची ५४ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अस वाटत की ही कालचीच तर गोष्ट आहे. भारतीय लष्करानी पूर्व पाकिस्तानला (सांप्रत बांगलादेश) पाक जोखडा सोडवण्यासाठी बुलडोझ केल त्यामागे, जनरल सॅम माणेकशॉ,मिलिटरी क्रॉस,यांचा मोठा हात होता. पूर्व पाकिस्तानमधील बंगाली हिंदू/ मुसलमानांवर अन्वनित अत्याचार करणाऱ्या, पूर्व पाकिस्तान सैनिकी प्रशासनाचा विध्वंस आणि त्यांच्या ९३,००० सैनिकांच आत्मसमर्पण हा भारताचा सर्वात मोठा विजय होता. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध कैदी झालेल्यांची ही सर्वात मोठी संख्या होती. पाकिस्तान सरकारनी, युद्धाच्या आधीपासूनच पूर्व पाकिस्तानमधे स्वत:ची कबर खोदण सुरू केल होत.त्याला माणेकशॉ यांनी योग्य तो “पुश” दिला अस म्हटल्यास ते वावग ठरणार नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, सॅम बहादुरच्या या शानदार विजयातील उल्लेखनीय योगदानाला,ना पाश्चिमात्य माध्यमांनी नावाजल,ना पाश्चिमात्य देश/लष्करांनी कधी त्याची “केस स्टडी” केली याच कारण अमेरिका आणि ब्रिटनचा कट्टर भारत विरोध होय.
पार्श्वभूमी
पाक राष्ट्रापती जनरल याह्या खान यांच्या “पंजाबी डॉमिनेशन” प्रवृत्तीमुळे,पूर्व पाकिस्तानात बंगाली राष्ट्रवादाचा अंकुर वाढत/ फोफावत होता.डिसेंबर,१९७०मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमधे मुजीब उर रहमान यांच्या अवामी लीगनी ३१३ पैकी १६७ जागा जिंकून निर्णायक बहुमत मिळवल्यामुळे गांगरलेल्या जनरल याह्या खाननी,परराष्ट्र मंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांच्या सल्ला/आग्रहाला बळी पडून ते निकाल खारीज केलेत. संतापलेल्या मुजिबनी आत्मनिर्णय चळवळ सुरू केली. उत्तरात, राष्ट्रपतींनी मार्च,१९७१ मधे होऊ घातलेली नॅशनल सीनेटची बैठक पुढे ढकलली. मुजिबनी ०७ मार्चला भव्य रॅली काढून असहकार चळवळ सुरू केली.२५ मार्चला मुजिबनी ढाका रेस कोर्सवर झालेल्या प्रचंड विराट सभेत पाकिस्तानपासून वेगळ, स्वतंत्र होण्याची घोषणा केल्यामुळे सरकारनी त्यांना तिथेच अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेल.त्याच रात्री, गव्हर्नर व पूर्व पाकिस्तान सेना प्रमुख,लेफ्टनंट जनरल टिक्का खाननी; मार्शल लॉ लागू करत, पूर्व पाकिस्तानच्या लोकांविरुद्ध “ऑपरेशन सर्चलाइट” सुरू केल आणि; तीन लाखांवर राष्ट्रवादी बंगाली विद्यार्थी, विद्वान/ बुद्धिजीवी, नागरिक,लष्करी दडपशाहीचा प्रतिकार करणारे पोलिस/सैनिक आणि धार्मिक अल्पसंख्यक यांचा नृशंस संहार (जीनोसाईड) केला व हजारोंना बंदी बनवल.
पाकिस्तानी सेनेच्या नरसंहारामुळे,एक कोटींवर निर्वासीत भारतात आलेत तर तीन कोटींहून जास्त लोक अंतर्गत विस्थापित झाले.२१ सप्टेंबर, २०१७ला, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेला संबोधन करणाऱ्या, बांगलादेश पंतप्रधान बेगम शेख हसीनानुसार; “१९७१च्या स्वातंत्र्ययुद्धात आम्ही अत्यंत नृशंस नरसंहाराचा सामना केला.पाकिस्तानविरुद्ध नऊ महिने चाललेल्या स्वातंत्र्ययुद्धात आमचे तीस लाखांवर निष्पाप लोक मारल्या गेले आणि दोन लाखांवर महिलांना जघन्य बलात्कार झेलावा लागला. नरसंहारात;धर्म, वंश आणि राजकीय विश्वास केंद्रित व्यक्ती व विचारवंतांच निर्मूलन करण्यात आल.या सर्व पीडितांना सहसंवेदना आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही २५ मार्चला हा “नरसंहार दिन” घोषित केला आहे”.
पाक सेनेला देण्यात आलेल्या आदेशांमधे खालील गोष्टींवर भर देण्यात आला;पाशवी नरसंहार, संपूर्ण पूर्व पाकिस्तानात समन्वयी कारवाई,अवामी लीगचे कार्यकर्ते/विद्यार्थी/ सांस्कृतिक संघटना प्रमुख/ शिक्षकांना अटक, जरूर पडल्यास आगजनी,देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दूरध्वनी/ दूरदर्शन/रेडिओ/टेलिग्राफ संप्रेषणांच स्थगन, बंगाली लष्कर/ पोलिसांकडील शस्त्र/दारूगोळा जप्ती; यांचा समावेश होता. पुढील पंधरा दिवसांत पूर्व पाकिस्तानमधे; ९ व १८ इन्फन्ट्री डिव्हिजन्स दाखल होऊन त्यांनी; ढाका, रंगपूर,सैदपूर, कोमिल्ला,चितगाव आणि खुलनावर ताबा केला.पण;राजशाही,सिल्हेट, पबना, दिनाजपूर, कुष्टिया आणि मैमनसिंगमधे सेना तैनात होऊ शकली नाही. ११ एप्रिलला, लेफ्टनंट जनरल एएके नियाझी यांनी पूर्व पाकिस्तानची कमांड हाती घेऊन;.बंगाली बंडखोरांपासून सर्व मोठी शहर सुरक्षित (सॅनेटाइझ) करण,त्यांच सैनिकी किल्ल्यांत परिवर्तीन,चितगोंग बंदरांवर ताबा, जमीनीवरील दळणवळणाचे सर्व मार्ग सुरक्षित करण,ढाक्या भोवतालच क्षेत्र सुरक्षित करण, बंडखोर नेटवर्क नष्ट करण्यासाठी संपूर्ण बांगलादेशात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण; या भावी रणनीतीचा ओनामा केला.
२५ मार्चच्या सभेत शेख मुजीबुर रहमान यांनी जनतेला सर्वतोपरी संघर्षाची तयारी करण्याच आवाहन केल. “ऑपरेशन सर्चलाइट” सुरू झाल्यावर, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशानंतर ०४ एप्रिलला, कलकत्त्यात बांगलादेश हंगामी सरकारची स्थापना होऊन, पाक प्रतिकारासाठी औपचारिक लष्करी नेतृत्व व बांगलादेश सशस्त्र दलाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यांना मदत करण्यासाठी रॉ प्रमुख के एन कावनी; मुक्ती वाहिनी उभी केली आणि अस्मादिक कार्यरत असलेल्या स्पेशल फ्रंटियर फोर्सला (एसएफएफ) आसामच्या सिलिगुरी येथे,त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली.
युद्ध पूर्व प्रसव पीडा
मार्च ७१ अखेरपासून, भारतात निर्वासितांचा ओघ येण सुरू झाल. त्या सर्वांच्या पुनर्वसनाची जबाबदारी, सुश्री इंदिरा गांधी सरकारनी उचलली. त्यासाठी,शिबिर उभारणी व त्यांच प्रशासन व देखभाल हा “हर्क्युलियन टास्क” होता. यामुळे;पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा राज्यांवर लोकसंख्यात्मक ताण आला.या निर्वासितांना,नियाझींच्या सेनेचा प्रतिकार करणासाठी सीमा ओलांडण्याची परवानगी देण्यात आली.बांगलादेशी नेतृत्व आणि एसएफएफ/भारतीय सेनेचे कमांडो यांच्या संयुक्त देखरेखीत त्यांच प्रशिक्षण सुरू झाल.निर्वासितांचा ओघ वाढल्यामुळे, पंतप्रधान इंदिरा गांधींवर सत्वर कारवाई करण्याचा दबाव वृद्धिंगत होत होता.त्यांनी;२८ एप्रिल, ७१ला, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि लष्करप्रमुख जनरल (नंतर फील्ड मार्शल) माणेकशॉ यांना,लगेच पाकिस्तानात प्रवेश करण्याचे आदेश देण्यात आले.दुसऱ्या महायुद्धातील वीरता पुरस्कार अलंकृत सेनाधिकारी असलेले जनरल सॅम माणेकशॉ धुरंधर खेळाडू होते.विजयाची खात्री असल्या शिवाय,पाऊल उचलू नये हे त्यांना पूर्णपणे ठाऊक होत.सदैव,साधक बाधक विचार शक्तीनुसार वर्तन करणाऱ्या सॅमनी स्पष्टपणे सांगितल,” ही हल्ला करण्याची योग्य वेळ नाही”.
मी पंतप्रधानांना कसा प्रतिसाद दिला याचा उलगडा करतांना जनरल माणेकशॉ म्हणतात; “नोकरीतून बरखास्त होण आणि फील्ड मार्शल बनण यात फारसा फरक नाही. ७१मधे पूर्व पाकिस्तानमधे टिक्का खानच दमनचक्र सुरू झाल्यानंतर,तेथील निर्वासित,लाखांच्या संख्येत पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरात येऊ लागलेत.या बद्दल,पंतप्रधानांच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत मला बोलावल्या गेल. बहुतेक;बैठक वादळी झाली असणार कारण मी विनंती करून आत गेल्यावर, संतापामुळे लालबुंद झालेल्या पंतप्रधानांनी मला बसू ही न देता,पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराच्या मुख्य मंत्र्यांकडून आलेले विस्तृत *डिस्ट्रेस सिग्नल्स* बैठकीत उपस्थित असलेल्यांना वाचून दाखवले.बैठकीत *पिन ड्रॉप सायलेन्स* होता. इतर कोणालाही,काहीही न विचारता त्यांनी मला विचारल, *तुम्ही व तुमची आर्मी यासाठी काय करताहात?*.मी उत्तर दिल, *काही नाही, या सिग्नल्सचा आणि आर्मीचा काहीही संबंध नाही. सरकारनी मला वा आर्मीला अंधारात ठेऊन (विदाऊट टेकिंग इन टू कॉन्फिडन्स), रॉच्या माध्यमातून, बीएसएफ/सीआरपीएफच्या मदतीनी पूर्व पाकिस्तान्यांना बंड करायला प्रोत्साहन दिल. आता गोष्टी हाता बाहेर गेल्यावर तुम्ही मला विचारताहात तर मी काय सांगणार? मॅडम,तेंव्हा तुम्ही माझा सल्ला घेतला नाही, आता संकटात आहात म्हणून माझ्याकडे आलात. अर्थात माझ्या पारसी नाकामुळे,काय होत आहे याचा वास मला नक्कीच घेता येतो (आय कॅन स्मेल ड्यू टू माय लाँग नोझ) .मला माहित आहे काय चालल/होत आहे”.
जनरल माणेकशॉ पुढे म्हणतात; इंदिराजी म्हणाल्या,“आर्मीनी पाकिस्तानात प्रवेश करावा अशी माझी व सरकारची इच्छा आहे” आणि यावर मी विचारल,”म्हणजे युद्ध?”.पंतप्रधान उत्तरल्यात, “युद्ध झाले तर माझी हरकत नाही”. त्यावर जनरल,त्या मीटिंगमधील सदस्यांना संबोधत म्हणाले;”सरकारची तयारी असेल पण आर्मी नक्कीच तयार नाही. एप्रिल संपत आलाय.हिमालयातील खिंडींतला बर्फ उष्णतेनी वितळू लागला असून एका मागोमाग एक,सर्व खिंडी,ट्रूप/मटेरियल मुव्हमेंटसाठी उघडताहेत. अशा वेळी चीन, पाकिस्तानच्या मदतीला येऊन आपल्यावर सहज हल्ले करू शकतो”.
नंतर माणेकशॉ पंतप्रधानांना म्हणाले; ”मॅडम,लवकरच पूर्व पाकिस्तानमधे पाऊस सुरू होणार आहे आणि जेंव्हा केंव्हा बंगालमधे पाऊस पडतो तो अतिशय जबरदस्त असतो. तेथील सर्व नद्या नाले व तलाव दुथुडी भरून वाहतात आणि सर्व ग्रामिण भाग जलमय होतो. नद्या महासागरां एवढ्या मोठ्या झाल्यामुळे आर्मीची सर्व हालचाल (मुव्हमेन्ट) रस्त्यांपुरतीच मर्यादित राहील. मॅडम प्राईम मिनिस्टर नाऊ गिव्ह मी युवर ऑर्डर”. इंदिराजी भयंकर नाराज झाल्या होत्या. त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. ”कॅबिनेट विल अगेन मीट ॲट फोर “ त्या म्हणाल्या. सर्व कॅबिनेट सदस्य आपल्या वरिष्ठयतेनुसार (ॲझ पर सिनीऑरिटी) बाहेर जाऊ लागले.प्रोटोकॉलप्रमाणे जनरल माणेकशॉ सर्वात ज्युनियर असल्यामुळे तेथून निघण्यात त्यांचा नंबर सगळ्यात शेवटचा होता. जनरल बाहेर जात असतांना इंदिराजी थंड आवाजात म्हणाल्या, ”चीफ, तुम्ही जरा थांबा”. माणेकशॉ मागे वळून म्हणाले,” मॅडम प्राईम मिनिस्टर, बिफोर यू टेल मी,शुड आय सबमिट माय रेसिगनेशन? आय कॅन गिव्ह इट ऑन मेंटल,फिजिकल ऑर हेल्थ ग्राउंड!”त्यावर, पंतप्रधानांनी शांत आवाजात विचारल,”तुम्ही मला सांगितलेले सर्व खर आहे?”. जनरल माणेकशॉ देखील तेवढ्याच थंडपणे म्हणालेत; ” ऑफ कोर्स, मॅडम प्राईम मिनिस्टर! टू टेल यू द ट्रूथ अँड अँड फाईट द वॉर इज माय ड्युटी अँड फाईट टू विन ओनली इज माय एम. आय ॲम टेलिंग यू द ट्रूथ”. हे ऐकल्यावर इंदिराजी गोड स्मित हास्य करत म्हणाल्या,” ऑल राईट सॅम, यू नो व्हॉट आय वॉन्ट”! जनरल माणेकशॉ म्हणतात, ”आय नो व्हॉट यू वॉन्ट अँड आय विल सर्टनली डिलिव्हर”.
जनरल सॅम माणेकशॉ एक अजब रसायन होत. एप्रिल,७१ मधे एसएसएफ पूर्व पाकिस्तानमधे जायच्या आधी त्यांनी आम्हाला “इन पर्सन” शुभेच्छा देतांना सांगितल होत, “तुमच्यावरच आम्ही विसंबून आहोत.आगामी युद्धाचा पाया तुम्ही घालणार आहात”. जनरल माणेकशॉ असे सेनाधिकारी नव्हते जे राज्यकर्त्यांना सांगतील,” सरकारला पाहिजे तेंव्हा आर्मी,पाक व्याप्त काश्मीर,अक्साई चीन किंवा बांगला देशमधे जाऊ शकते.तुम्ही फक्त सांगा/हुकूम द्या”. त्यांच्या साठी/मते; राजकीय नेत्यांच्या तुष्टीकरणापेक्षा, राज्यघटना आणि लष्करी तयारी जास्त महत्त्वाची होती. त्यांना माहीत होत;सेनेच्या तीन डिव्हीजन्स पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात शांतता राखण्यासाठी छोटछोट्या दलांमधे ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या आणि रणगाडे, विमान,युद्ध नौकांना आवश्यक असणारे सुटे भाग (स्पेअर्स) खरेदीसाठी,प्रशासनातील शुक्राचार्यांनी निधी अजिबात न दिल्यामुळे, लष्करातील बहुतांश लढाऊ संसाधन अकार्यक्षम होती. अशा अपुऱ्या,अकार्यक्षम लढाऊ संसाधनांनी युद्ध जिंकण अशक्य होत. त्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीच गांभीर्य पटवून दिल,पुरेसा/आवश्यक निधी मिळवला,सर्व कमीपेशी/कमतरता पूर्ण केल्या आणि सात महिन्यांनंतर, नोव्हेंबर १९७१मधे, ”ऑपरेशन कॅक्टस लिली“ सुरू केल. दरम्यानचे सात महिने;तपशीलवार त्रीदलीय सेवा नियोजन (डिटेल्ड ट्राय सर्व्हिस मॅनेजमेंट), त्रीदलीय सामजिक एकत्रीकरण (ट्राय सर्व्हिस सिनर्जी युनिफिकेशन),समन्वयी प्रशिक्षण (जॉइंट ट्रेनिंग) आणि लष्कराला सुसज्ज करण्यासाठी (टोटल बॅटल वर्दीनेस) उपयोगात आणल्या गेला.
रॉ, एसएफएफ आणि भारतीय लष्कराच्या कमांडोंनी मुक्ती वाहिनीला, सॅमला हव होत तस प्रशिक्षण व मार्गदर्शन दिल. जोडीला; पूर्व बंगालमधून आलेल्या, आर्मी/ नेव्ही/ एयरफोर्स डेझर्टर्समधून तीन ब्रिगेड गट (३०००सैनिक प्रती गट) निर्माण करण्यात आले.एसएफएफ आणि लष्करी कमांडोंनी,७०,००० पेक्षा जास्त मुक्ती वाहिनी गनिमी सैनिकांना, स्वतंत्र कारवाया करण्याजोग,संघटित,प्रशिक्षित आणि सुसज्ज केल आणि भारतीय लष्करानी त्यांना हत्यार, गोळा बारूद व संसाधन दिलीत.
युद्धाची घोषणा
०३ डिसेंबर,१९७१च्या संध्याकाळी, पाकिस्तान वायु सेनेनी,भारतीय पश्चिम सीमेच्या ४८० किलोमीटर आत असलेल्या आग्रासमेत उत्तर पश्चिम भारतातील अकरा लष्करी विमानतळांवर अचानक हवाई हल्ला (प्री एम्टिव्ह स्ट्राईक) केला. त्याच दिवशी संध्याकाळी, ऑल इंडिया रेडिओवरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, “या हवाई हल्ल्यांद्वारे पाकिस्ताननी भारताविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे व आम्ही त्याला योग्य उत्तर देण्यास सक्षम आहोत”. त्यानुसार, भारतानी त्याच रात्री,पश्चिम पाकिस्तानमधे हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिल. मुक्ती वाहिनी व तीचे आमच्या सारखे भारतीय प्रशिक्षक, एप्रिलपासूनच पूर्व पाकिस्तानमधे कार्यरत होतो.युद्ध सुरू झाल खर पण पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जनरल सॅम माणेकशॉ यांना कोणताही परकीय हस्तक्षेप होण्यापूर्वी संपणारी, जलद व निर्णायक मोहीम हवी होती. त्यासाठी दिल्लीत; जनरल सॅम माणेकशॉ, ऍडमिरल एस एम नंदा आणि एयर चीफ मार्शल पी सी दिवान,पूर्व व पश्चिम भागातील ऑपरेशन कॅक्टस लिलीवर लक्ष ठेवत होते. पूर्वेकडील ऑपरेशनच तपशीलवार नियोजन/ तयारी तसच मुक्ती वाहिनीची तयारी करण्याची जबाबदारी,जनरल सॅम माणेकशॉ यांनी; पूर्व कमांड प्रमुख (जनरल ऑफिसर कमांडर इन चीफ), लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा यांना दिली.त्यांच्या मदतीला;पूर्वी नेव्हल कमांडचे व्हॉईस ऍडमिरल एन कृष्णन आणि एयर हेडक्वार्टरमधील एयर मार्शल पी सी लाल होते.
पूर्व पाकिस्तानमधे; आर्मी पूर्वी कमांडनी (ईस्टर्न कमांड); पूर्व, उत्तर आणि पश्चिमेकडून बहु आयामी स्थलसेना मुसंडी (मल्टिपल ग्राउंड थ्रस्टस्) मारली; नौसेनेच्या पूर्वी कमांडनी नाकाबंदी करून बंदर उध्वस्त केली आणि वायु सेनेनी पाक एयर फोर्सची जमीन किंवा हवेतील मालमत्ता नष्ट केली. पूर्वी कमांडला युद्धासाठी आवश्यक; रणगाडे, तोफखाना, ब्रिजिंग आणि रिव्हर क्रॉसिंग उपकरण,मुबलक प्रमाणात देण्यात आली होती. हल्ला करणाऱ्या सेना गटांना (फॉर्मेशन्स) लाँच करण्यासाठी,पूर्व पाकिस्तानच्या तीनही बाजूंकडून,भारतीय हद्दीत, सीमेपर्यंत रस्ते तयार करण्यात आले होते.गंगा (बांगला देशमधे पद्मा), ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन बलाढ्य नद्या आणि त्यांच्या असंख्य उपनद्यांमुळे पूर्व पाकिस्तानात,जल अडथळे आणि त्यावरच्या पुलांच जाळ (नेट वर्क ऑफ वॉटर ऑब्स्टकल्स अँड ब्रिजेस) निर्माण झाल होत. या तीनही नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना,त्यांची खोली आणि काठावरच्या दलदलींमुळे केवळ पूलांवरूनच पार कराव लागत असे. आक्रमणकर्त्या भारतीय सेनेच्या प्रगतीला अडथळा आणण्यासाठी पाकिस्तानला ते पूल नष्ट करण तर भारतीय सेनेला ते नष्ट न होऊ देण आवश्यक होत.
मुक्ती वाहिनीचे तीन ब्रिगेड आणि बंगाली गनिमी सैनिकांच्या पाठिंबा घेत, भारतीय सेनेनी आपली मोहीम सुरू केली. मार्गदर्शक मुक्ती वाहिनी आम्हाला सतत,नियाझीच्या सैनिकी हालचालींची अमूल्य माहिती दिली.भारतीय सेना व मुक्ती वाहिनीनी;तीन पाक डिव्हिजन्सना (१०,००० सैनिक प्रती डिव्हिजन) सिल्हेट, गरीबपूर, बोयरा, हिली आणि कुशीता येथील लढायांमधे धूळ चाटायला लावली. जनरल माणेकशॉ यांनी अखून दिलेल्या धोरणांनुसार चालत,जनरल अरोरांच्या सेनेनी; संरक्षित किल्ले बनलेल्या शहरांना वगळत (बाय पास मिलिटरी फोर्ट्रेसेस),आजूबाजूचा भाग झपाट्यानी काबीज करण्याच्या (सिक्युअर कंट्री साईड),जलद कौल देणाऱ्या रणनीतीचा अवलंब केला आणि; जेसोर, मैमनसिंग, सिल्हेट, कुशीता, नोआखली आणि मौलवी बाजार ही शहरे पटकन ताब्यात घेतलीत.भारतानी; पूर्व,उत्तर व पश्चिमेकडून, प्रत्येकी एक कोअरनी (३०,००० सैनिक प्रती कोअर);पूर्व पाकिस्तानमधे आक्रमण केल. तीनही कोअर्सचे ऑपरेशन्स, एकमेकांना पूरक आणि समन्वयी होते.भारतीय सैनिकांनी, लहान मोठ्या हेलिकॉप्टर्सचा वापर करून नद्या पार केल्या आणि सेनेत “हेलीबॉर्न ऑपरेशन्स” या नवीन धोरणाचा ओनामा झाला.
१३ डिसेंबरला,बंगाली बुद्धीमंतांना संपवण्याच्या अंतिम प्रयत्नात, पाकिस्तान सेनेनी,ढाका येथील बंगाली विचारवंतांची हत्या सुरू केली. त्याच्या प्रत्युत्तरात भारताच्या २ पॅराशूट बटालियननी; ब्रिगेडियर इंदर गिलच्या नेतृत्वात, टँगेलमधे भारतीय हवाई लढाऊ गटाचा पहिला पॅराड्रॉप करून हा नरसंहार थांबवण्यासाठी ढाक्याकडे कूच केल.या ऑपरेशनसाठी, एसएफएफ आणि मुक्ती वाहिनी सोबत अस्मादिकांनी ड्रॉप झोन सिक्युअर केला होता.टँगेलमधे झालेल्या यशस्वी पॅराड्रॉपमुळे पाकिस्तानी सेनेच मानसिक खच्चीकरण होऊन हत्यार टाकण्याची मानसिक भूमिका तयार होऊ लागली. २ पॅरा बटालियनचे सैनिक, ढाकामधे दाखल होणारे पहिले भारतीय सैनिक होते. पाक सेनेच्या उच्च अधिकाऱ्यांच उर्वरित मानसिक खच्चीकरण; १४ डिसेंबरला ढाका येथील उच्चस्तरीय बैठकी दरम्यान, भारतीय वायुसेनेच्या चार मिग विमानांनी गव्हर्नर हाऊसवर केलेल्या हल्ल्यांमुळे झाल.त्या नंतर लगेच जनरल नियाझींनी युद्धविराम प्रयत्न सुरू केले.
पाकिस्तान सेनेची शरणागती
१६ डिसेंबर, ७१च्या सकाळी, मेजर जनरल (नंतर लेफ्टनंट जनरल) जेएफआर जेकब, चीफ ऑफ स्टाफ ईस्टर्न कमांड हे; जनरल सॅम माणेकशॉ यांच्या आदेशानुसार,पाकिस्तानी सेनेला आत्मसमर्पण करण्याची ताकीद देऊन शरणागतीच्या अटी व कार्यक्रम (प्रोसिजर) समजाऊन सांगण्यासाठी, ढाका येथे आलेत. जनरल नियाझी, जनरल जेकब यांना स्वतःच्या कार्यालयात भेटले. जनरल जेकबनी नियाझींना आत्मसमर्पण कागदपत्र दाखवून सांगितल, “आमच्या चीफच्या आदेशानुसार; यावर विचार करायला मी तुम्हाला तीस मिनिट देतो आहे आणि जर तुम्ही सहमत नसाल तर जनरल सॅम माणेकशॉ,पुन्हा युद्ध सुरू करण्याचा आणि ढाकावर हवाई व जमीनी हल्ले करण्याचा आदेश देतील. तुम्ही शरण आल्यास तुम्हाला सुखरूप राखण्याची जबाबदारी भारतीय सेना व सरकारची असेल.तुम्हाला आदरानी वागवल जाईल आणि जिनिव्हा अधिवेशनांतर्गत आम्ही; सर्व शरणागत, वांशिक अल्पसंख्याक आणि प्रत्येक पाकिस्तान्याच खात्रीपूर्वक रक्षण करू. जर तुम्ही शरण आला नाहीस, तर यानंतर जे काही घडेल त्यापासून आम्ही अनभिज्ञ असू (वॉश अवर हँड्स ऑफ द काँसिक्वेंसेस)”. त्याच संध्याकाळी ;भारताकडून लेफ्टनंट जनरल जेएस अरोरा आणि पाकिस्तानकडून लेफ्टनंट जनरल एएके नियाझी यांनी आत्मसमर्पण सोहळ्यावर स्वाक्षरी केली त्यानंतर नियाझींनी थरथरत्या हाताने आपल रिव्हॉल्व्हर अरोरांना सुपूर्द केल.९३,००० वर पाकिस्तानी सैनिक आणि त्यांना समर्थन देणारे नागरिक यांच्या पूर्ण शरणागतीने पूर्व पाकिस्तानच अस्तित्व संपुष्टात आल. मनस्वी इंदिरा गांधी आणि धुरंधर जनरल सॅम माणेकशॉ यांनी मग्रूर पाकिस्तानची दोन छकल केली.दुसऱ्या महायुध्दातही एवढी मोठी सैनिकी शरणागती झाली नव्हती.
पूर्व पाकिस्तानमधे भारतीय वायुसेनेनी स्थलसेनेच्या ग्राउंड ऑपरेशन्सला पूर्ण सामरिक समर्थन दिल. शिवाय; पाकिस्तानी वायुसेनेची विमान, एयरफिल्डस आणि संसाधनांना नष्ट करून संपूर्ण हवाई वर्चस्व मिळवल. एप्रिल ७१ सोडता,स्थलसेनेला आकाशातून कुठलाच वार सहन करावा लागला नाही. भारतीय वैमानिकांनी “डॉग फाईट” या वायु युद्ध प्रकारात पाक वैमानिकांना सपशेल मात दिली.भारतीय वायुसेनेनी मुक्ती वाहिनीला एक पाकिस्तानी किलो फ्लाइट विमान दुरुस्त करून दिल जे,आक्रमणकर्त्या भारतीय विमानांसाठी टेहाळणी करत असे. ०७ डिसेंबरपर्यंत तेजगाव एअरफील्ड बरबाद करण्यात आल.कॅनबेरा, नॅटस् आणि सुखोई ७ विमानांच्या भारतीय वैमानिकांनी, युद्धादरम्यान आपल्या अचूक माऱ्यानी;विमानतळ,तोफांची ठिकाण,दारूगोळा भंडार आणि इतर स्थिर प्रतिष्ठान नष्ट करून,भारतीय सेनेच्या समर्थनार्थ, अनेक प्रतिबंधक मोहिमा केल्यात.
भारतीय नौसेनेच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजानी बांगलादेशात बॉम्ब वर्षाव मोहीम आणि इतर लढाऊ जहाजांनी,पूर्व पाकिस्तानातील बंदरांची नाकेबंदी केली. पश्चिम बंगालमधील प्लासीत,सीटूपी या,रॉच्या गुप्त प्रशिक्षण शिबिरात,५०० हून अधिक बांगला देशी नागरिकांना तोडफोडीच प्रशिक्षण देण्यात आले. यांच्यातील काहींनी,१५ ऑगस्ट,७१ला “ऑपरेशन जॅकपॉट” अंतर्गत, चीतागोंग बंदरातील नऊ जहाज लिम्पेट माइन्सचा वापर करून उडवलीत. नोव्हेंबरपर्यंत, भारतीय नौ सेनेनी,एकूण एक लाख टनेज वजन झालेली असंख्य जहाज बुडवली. त्यानंतर नौ सेनेनी मुक्ती वाहिनीला दोन गनबोटस् आणि दोन गस्ती नौकाही दिल्या होत्या.या लघू नौकांच्या बेड्यानी (फ्लोटिला) पाकिस्तान आणि त्याच्या मित्र जहाजांना धडक देण सुरू केल आणि काही दिवसांतच,पूर्व पाकिस्तान मधील बंदर, नद्या आणि जलमार्ग; नादुरुस्त, डुबत्या जहाजांनी भरून गेले आणि जल वाहतूक जवळपास ठप्प झाली.
बांगलादेशी निर्वासितांची दुर्दशा आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम जगाला सांगून त्यांच्या मध्यस्थीनी युद्ध टाळण्याचे सर्व राजनैतिक प्रयत्न पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी केले. यासाठी त्यांनी; अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, कॅनडा आणि युरोपियन युनियनचे काही देश सामील २१ देशांना भेट दिली होती. प्रत्युत्तरात भारताला बऱ्याच देशांकडून केवळ सहानुभूती मिळाली. उलटपक्षी; भारताला घाबरवण्यासाठी अमेरिकेने बंगालच्या उपसागरात विमानवाहू नौका पाठवली. ब्रिटिशांनी अरबी समुद्रात त्यांच्या नौदलाची तुकडी पाठवली.केवळ रशिया भारताच्या बाजूनी उभा ठाकला आणि जुलै,७१मधे “भारत रशिया ट्वेंटी इयर लाँग फ्रेंडशिप ट्रीटी” अस्तित्वात आली आणि १९९२ पर्यंत रशियानी भारताची साथ सोडली नाही. या वेळीही त्यांनी;रशियन पाणबुड्या बंगालच्या उपसागरात पाठवून अमेरिकन आरमाराची शेपूट पिरगाळली/मुरडली.
युद्धोत्तर घटना क्रम
पाकिस्ताननी पूर्व पाकिस्तानमधे आत्मसमर्पण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावाखाली तुरुंगातून सुटलेले शेख मुजीब उर रहमान लंडनला गेले. तिथून ते भारतमार्गे बांगलादेशात आले आणि पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ०२ जुलै, १९७२ला; पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शिमला करारावर हस्ताक्षर केलेत.९३,००० युद्ध कैद्यांच्या बदल्यात भुट्टो यांनी काश्मिर प्रश्न सोडवण्याच केवळ तोंडी आश्वासन दिल कारण,ही बाब लिखित स्वरूपात आल्यास त्यांच सरकार पडेल याची त्यांना भीती वाटत होती जी रास्तही होती. परंतु; इंदिरा गांधी त्यांच्या तोंडी आश्वासनाला का बळी पडल्या हे आजही अनाकलनीयच आहे. युद्ध कैदी पाकिस्तानमधे परतताच भुट्टो आपल्या वचनावरून फिरलेत. त्यांच्या या आश्वासनाला भुलून इंदिरा गांधींनी;पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या ५४ भारतीय युद्धकैद्यांच्या सुटकेच्या प्रश्नाला नजरअंदाज केल.भारत सरकार/भारतीय सेनेमुळे पूर्व पाकिस्तान हातातून गेला याचा बदला घेण्यासाठी पाकिस्ताननी १९९२मधे भारतावर जिहादी दहशतवादाचा भस्मासूर सोडला जो आजही भारताला पिडतो आहे. आपल्या कुकर्मांनी पाकिस्तान आर्थिक गर्तेच्या खाईत गेला आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी त्याला आपले प्रादेशिक सार्वभौमत्व चीनला विकाव लागल.
जनरल सॅम माणेकशॉना त्यांना पाहिजे ते सर्व मिळाल. इज्जत मिळाली, शोहरत मिळाली,प्रशासनाच्या विरोधानंतरही हवी असलेली संसाधन/हत्यार मिळाली कारण त्यांना इंदिरा गांधींचा पाठिंबा होता. पंतप्रधानांना काय हव आहे, त्यांचा काय उद्देश आहे हे सॅमला माहित होत आणि इंदिरा गांधींना सॅम तो पूर्ण करतील याची खात्री होती. संरक्षणतज्ञांनुसार त्यानंतर दुर्दैवानी, पंतप्रधान आणि सेना प्रमुख यांच्यात असा बाँड निर्माण होऊ शकला नाही कारण त्या नंतर हळूहळू,आर्मी चीफस् वर प्रशासकीय पगडा कसल्या जाऊ लागला. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासकीय हस्तक्षेपाशिवाय सेना प्रमुखांना भेटून त्यांच मत जाणून घेण्याची प्रथा सुरू केली. पण ती नंतर का बंद झाली हे अनाकलनीय आहे.२०१६मधे मोदींनी पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त केले. पण त्यांनाही संरक्षण सचिवांच्या खालचा दर्जा दिल्या गेला पंतप्रधानांच्या सल्लागाराचा नाही.
१९७१ नंतर भारत व पाकिस्तानमधे १९९९मधे कारगिल युद्ध झाल व त्यातही पाकिस्तानचा पराभव झाला. २०१६मधे भूतानच्या डोकलाम आणि २०२०मधे लदाखच्या गलवान व्हॅलीमधे भारत चीन झडपा झाल्या. या तीनही वेळा;भारतीय सेनेनी आपल पाणी दाखवून दिल.पण ज्या प्रकारचा दणदणीत विजय १९७१ मधे मिळाला तसा परत मिळाला नाही. कारण; इंदिरा गांधींसारखा पंतप्रधान आणि सॅम माणेकशॉ सारखा सेना प्रमुख होणे नाही हे माझ्या सारख्या निवृत्त सॅम भक्तांच ठाम मत आहे. (फोटो -lallantop)
१६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ, नागपूर,१०:९४२२१४९८७६/ abmup54@gmail.com.