बौद्धिक भ्रष्टाचार
बौद्धिक भ्रष्टाचार
बौद्धिक भ्रष्टाचार भारताचीच नव्हेतर जागतिक समस्या आहे. बौद्धिक भ्रष्टाचार हे सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहे. भ्रष्टाचार (भ्रष्ट + आचरण) म्हणजे अयोग्य, अनैतिक आणि अयोग्य आचरण. बौद्धिक भ्रष्टाचार मानवीय मेंदूची अशी एक अवस्था आहे जी मानवाला स्वीकारलेल्या मूल्यांच्या विरोधात आचरण करण्यासाठी प्रवृत्त करते. बौद्धिक भ्रष्टाचारामुळे भारतीयांच्या बौद्धिक, वैचारिक आणि मानसिक स्थिती खालवल्याने भारताचे आतोनात नुकसान होत आहे. जर आज भारतीयांमधील अत्याधिक प्रमाणात वाढलेल्या बौद्धिक भ्रष्टाचारावर योग्य उपाय केले नाही तर भविष्यात भारताचे अस्तित्वच संपुष्टात येईल. भारतीय फक्त आर्थिक भ्रष्टाचारावरच चर्चा करतात पण त्यांना बौद्धिक भ्रष्टाचारा बद्दल काहीच माहिती नाही. भ्रष्टाचार स्थळ, काळ आणि परिस्थिती निरपेक्ष आहे. म्हणजे भ्रष्टाचार जगातील प्रत्येक भागात, अनादी काळापासून आणि प्रत्येक परिस्थितीत कायम असतो. आज भ्रष्टाचार भारताच्या प्रत्येक भागात इतका पसरला आहे की त्याला संपविणे कठीण झाले आहे. जगातील 180 भ्रष्ट देशांच्या यादीत भारत आज 80 व्या क्रमांकावर आहे. भारतात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकारने बरीच पावले उचलली आहेत पण भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जो पर्यंत बौद्धिक भ्रष्टाचार नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आर्थिक भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे अशक्य आहे. आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा बौद्धिक भ्रष्टाचारामुळेच भारतात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारताच्या वर्ग, वंश, वर्ण, प्रांत, भाषा, पंथ, संप्रदाय, धर्म, जाती, संस्कृती आणि अनेक समस्यांचे मूळ कारण बौद्धिक भ्रष्टाचारच आहे. प्राचीन आणि मध्य युगात ऋषी मुनींनी या समस्यांच्या निराकरणासाठी अध्यात्म, जीवन पद्धती आणि तत्त्वज्ञानाचा उपयोग करून भारताची एकात्मता आणि अखंडता अबाधित राखली. पण आधुनिक युगात बौद्धिक भ्रष्टाचारामुळे वाद इतके विकोपाला गेले आहे की भारताचे विघटन थांबविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. भारताच्या मूलभूत समस्यांच्या समाधानासाठी बौद्धिक भ्रष्टाचाराचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
बौद्धिक भ्रष्टाचाराचे विश्लेषण करण्यासाठी प्रथम त्याच्या स्वरूपा बद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. भारतीय तत्त्वज्ञाना प्रमाणे मनुष्य प्राण्यामध्ये शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा हे चार घटक असतात. बौद्धिक भ्रष्टाचाराचे बौद्धिक, वैचारिक आणि मानसिक असे तीन स्तर आहे. बौद्धिक भ्रष्टाचाराचा पहिला स्तर बौद्धिक स्ताराचा भ्रष्टाचार. बुद्धी निसर्गाने मानवाला दिलेली अशी एक शक्ती आहे ज्याने मानव ज्ञान मिळविण्याचे काम करतो. शिक्षणाने मनवाच्या बुध्दीचा विकास होत असला तरी तो सुसंस्कृत होतो असे नाही. सुसंस्कृत समाजात बौद्धिक स्तरावरील भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यल्प असते. आज भारतासारख्या 130 करोड असंस्कृत, अशिक्षित आणि अविकसित लोकसंख्या असलेल्या लोकशाही देशात बौद्धिक स्तारच्या भ्रष्टाचारासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मैकालेच्या शिक्षण पध्दतीने भारताच्या बौद्धिक स्तरावरील भ्रष्टाचारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बौद्धिक भ्रष्टाचाराचा दुसरा स्तर वैचारिक स्तरावरील भ्रष्टाचार आहे. मानवाला बुद्धीमुळे मिळालेले ज्ञान विचार करायला प्रवृत्त करतो. मानवाच्या विचारशीलतेमुळे जगात विविध विचारधारा, तत्त्वज्ञान आणि संस्कृती निर्माण झाल्या. प्राचीन काळापासूनच जगात आपल्या संस्कृतीच्या श्रेष्ठत्वासाठीच मानवामध्ये युद्धे होत आली आहेत. प्रचीन युगातील ऋषी मनींनी भारतातील विविधतेला एकतेच्या सूत्रात गुंफून भारताच्या सर्व समस्यांचे समाधान केले. पण आधुनिक युगातील नवीन विचारधारा मानणाऱ्यांना असे वाटते की भारतातील सर्व समस्यांचे समाधान त्यांच्याच विचारधारेनी शक्य आहे. विविध विचारांच्या संघर्षामुळे भारतात वैचारिक भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली आहे. बौद्धिक भ्रष्टाचाराचा तिसरा स्तर मानसिक स्तरावरील भ्रष्टाचार आहे. मानसिक स्तरावरील भ्रष्टाचाराला आजकाल माइंडसेट म्हणून संबोधिले जाते. माइंडसेट म्हणजे मेंदूत खोलवर ठसा उमटलेली मनोवृत्ती. आधुनिक युगातील विविध विचारधारेचे अनुयायी आपल्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी संघटन, साहित्य, सभा, विविध कार्यक्रम, आंदोलन, सत्ता आणि शिक्षण यासारख्या अनेक मार्गाचा अवलंब करतात. भारतात एकांगी विचारामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये मानसिक स्तरावरील भ्रष्टाचाराने सामाजिक स्वास्थ बिघडवून टाकले आहे.
बौद्धिक भ्रष्टाचाराच्या समस्येच्या समाधानासाठी बौद्धिक, वैचारिक आणि मानसिक स्तावर उपाययोजना करावी लागेल. भारत विविधतेत एकतेमुळेच एकसंध आहे पण आज बौद्धिक भ्रष्टाचारामुळे भारतातील विविधताच भारताची समस्या झाली आहे. बौद्धिक स्तरावरील भ्रष्टाचाराची वाढ थांबविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत भारतातील विविधतेत एकता प्रस्थापित करणाऱ्या इतिहासाचा समावेश करावा लागेल. वैचारिक स्तरावरील भ्रष्टाचाराचा प्रसार रोखण्यासाठी विचारांच्या दशा आणि दिशे मध्ये सुधारणा करावी लागेल. मानवांच्या विचारांमध्ये मतभिन्नता असणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आपलीच विचारधारा सर्वश्रेष्ठ आहे असा दुराग्रह ही विकृती आहे. भारतातील सर्वच विचारधारा भारतावर आपल्याच विचाराचे राज्य स्थापित करणासाठी अनैतिक, असामाजिक आणि अराष्ट्रीय मार्गाचा अवलंब करायला मागेपुढे पाहत नाही. त्यांच्यात संवाद, सामंजस्य आणि समन्वय साधण्यासाठी भारतातील विविधतेतील एकतेला पूरक नविन तत्त्वज्ञान निर्माण करावे लागेल. मानसिक स्तरावरील भ्रष्टाचाराची स्थिती मूळ स्वरूपात आणण्यासाठी भारतीयांच्या मानसिकतेवर उपचार करावा लागेल. भारतातील विविध विचारसरणींच्या प्रचार प्रसार तंत्रामुळे सर्व सामान्य भारतीयांचे माइंड सेट तयार झाले आहे. बुद्धी प्रामाण्यवादी विचारसरणी असणाऱ्या भारतीयांचे माइंड सेट पण एकांगी असते. भारतीयांचे माइंड सेट बदलण्यासाठी जर विविध विचारसरणींमध्ये व्याखाने, चर्चा आणि सुसंवाद घडवून आणण्याची संस्कृती विकसित केली तर त्यांच्या विचार करण्याच्या पध्दतीत बदल होईल. ज्यावेळी भारतीयांची विचार करण्याची पध्दती चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य आणि सत्य किंवा असत्य हे समजून घेण्या इतकी प्रग्लभ होईल त्यनंतरच बौद्धिक स्तरावरील भ्रष्टाचाराची स्थिती मूळ स्वरूपात येऊ शकेल. जर भारतातील बुद्धीवाद्यांनी भारतातील समस्यांच्या समाधानाशी निगडित विविध विचारसरणीच्या विवादित मुद्दांवर सम्रगतेने, साधक बाधक आणि सखोल चिंतन करून सर्वसामान्य भारतीयांना शिक्षित केले तरच भारतातील बौद्धिक भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
image – freepik.com