राहुल गांधी – जोडो यात्रा.
शेवटी मजल दरमजल करत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे साधे खासदार राहुल गांधी यांची विवादित आणि पुरोगामी वर्तुळाने चर्चेत आणलेली कथित “भारत जोडो” यात्रा काश्मीर मधील श्रीनगर येथे पोहचत संपली.
या यात्रेच्या निमित्याने सत्तेतील हिंदुत्ववादी सरकार, त्यांच्या मागे उभ्या असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतिहासातील हिंदुत्ववादी नेत्यांवर बरेच तोंडसुख घेतले गेले. प्रसिद्धीच्या आशेने अनेक हौशे नवशे आणि गवशे या यात्रेत नाचून गेले. या यात्रेचे फलित काय? हे काळ सांगेलच !
बाकी राहुल गांधी यांनी श्रीनगर येथे मोठ्या अभिमानाने आणि हिमतीने, कोणालाही न घाबरता देशाचा तिरंगा फडकवत या यात्रेचा समारोप केला. या समारोपाच्या भाषणात त्यांनी, “मला कश्मीर मध्ये ग्रेनेड नाही, तर प्रेम मिळाले.” सारखे भाष्य केले. राहुल गांधी यांनी काश्मीर मध्ये राष्ट्रध्वज फडकवला याचे तोंडभरून कौतुक सुरू आहे. पण आज काश्मीर मध्ये जात बाह्या सरसावत, “मी निडर” असल्याची बतावणी करत कश्मीर मध्ये तिरंगा फडकवणाऱ्या राहुल गांधी यांना स्वतःच्या पक्षाचा इतिहास माहीत नाही असे दिसते. खूप जुना सोडा पण निदान २०११ चा इतिहास तरी माहीत करून घेणे आवश्यक होते.
२०११ साली भारतीय जनता युवा मोर्चा या भाजपच्या युवा शाखेने कोलकत्ता ते श्रीनगर अशी “एकता यात्रा” आयोजित केली होती. काश्मीर मधील वाढणारी फुटीरतावादी मानसिकता आणि त्यामुळे वेळोवेळी देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करत, पाकिस्थानी राष्ट्रध्वजाला वेळोवेळी फडकवण्याच्या मानसिकतेला शह देण्यासाठी हे आयोजन होते. मात्र तेव्हा केंद्रीय सत्तेत असलेली काँग्रेसला, श्रीनगर येथे “तिरंगा फडकवला जाणार” या विचारानेच कापरे भरली. मुस्लिम बहुल राज्यात, मुस्लिम विरोधात जात तेथे “तिरंगा फडकवल्यावर” धार्मिक विद्वेष वाढीला लागेल असे अजब तर्कट कॉंग्रेसने बनवले. या तर्कटाला काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्स सारख्या पक्षाने आणि पाकिस्थान प्रेमी हुरीयतने दुजोरा दिला. मग काय? भाजयुमो च्या कार्यकर्त्यांवर दडपशाहीचा वरवंटाच काँग्रेस सरकार आणि काश्मीर सरकारने फिरवला.
भाजयुमोच्या घोषणेनंतर, काँग्रेस प्रणित केंद्र सरकारने नियोजित मोर्चा थांबवण्यासाठी विविध उपाय आरंभ केले. भाजयुमो सदस्यांना श्रीनगरला घेऊन जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या आणि त्यांना त्यांच्या प्रस्थानाच्या ठिकाणी परत पाठवण्यात आले. मात्र भाजयुमोचे बहुसंख्य सदस्य काश्मीर खोर्यात पोहोचण्यात अयशस्वी झाले असताना, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी रावी नदीच्या पुलावरून जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय पंजाबमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना रोखले जाईपर्यंत मोर्चाचे नेतृत्व करणे सुरू ठेवले. २५ जानेवारी २०११ रोजी, या यात्रेतील सर्व भाजप सदस्यांना त्यानंतर अटक करण्यात आली आणि प्रजासत्ताक दिनाची औपचारिकता संपेपर्यंत जम्मू शहरात कोठडीत ठेवण्यात आले. भारतीय सुरक्षा दलांना प्रजासत्ताक दिनी लाल चौकात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, काही भाजप कार्यकर्त्यांनी श्रीनगर गाठले आणि त्यांनी शहराच्या चौकाजवळ भारतीय ध्वज फडकावला, जरी ते घड्याळाच्या टॉवरच्या शिखरावर त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचू शकले नाहीत. या सगळ्या गदारोळात अटक झालेल्या भाजपा नेत्या स्व. सुषमा स्वराज आणि स्व. अरुण जेटली यांची वक्तव्ये तत्कालीन सरकार आणि काश्मिरी परिस्थितीवर सूचक होती. सुरक्षा दलांनी तिला अटक केल्यावर सुषमा स्वराज म्हणाल्या, “आम्हाला अटक का केली जात आहे? आम्ही शांततेने मोर्चा काढत होतो. जे राष्ट्रध्वज जाळतात त्यांना सुरक्षा प्रदान केली जात आहे तर राष्ट्रध्वज धारण करणाऱ्यांना रोखले जात आहे.” तर अरुण जेटली म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्या देशात राष्ट्रीय तिरंगा फडकवणे बेकायदेशीर ठरले आहे.”
या सगळ्या पार्श्वभूमीवर कलम ३७० रद्द झाल्यावर, काश्मीर मधील स्थिती हातात आल्यावर, राहुल गांधी यांनी श्रीनगर मध्ये जात तिरंगा फडकवत “मी कोणाला घाबरत नाही” म्हणणे आणि त्या कृतीचे आणि वाक्याचे कौतुक करणे खरेच संयुक्तिक आहे?