भारताची लक्ष्मी
*भारताची लक्ष्मी..*
आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एकदा “मन की बात” या कार्यक्रमात, सणवारांचा खरा आनंद वंचित लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात, त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यात आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशवासियांनी ‘भारताची लक्ष्मी’ अभियान चालवावे, असं आवाहन केलं होत. भारत की लक्ष्मी या नावाने आपल्या अवतीभवती समाजाप्रती आस्था राखणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा, त्यांना भारत की लक्ष्मी म्हणून गौरवण्यात यावं असं ही ते म्हणालेत.
आपल्या संस्कृतीत महिलांना गृह लक्ष्मीचा दर्जा आहेच. तो वेगळ्यान अभिव्यक्त करण्याची गरज पण नाही तरी सुद्धा ध्येयवेड्या महिला आपलं कुटुंब सांभाळून “आपणही समाजच काही देण लागतो”, हा भाव मनी बाळगून एक वेगळी पाऊल वाट चालत असतात. त्याचं कार्य हे असच अव्याहत चालत असत. त्याचं ध्येय ठरलेलं असत. प्रसिद्धी परांगमुख असणाऱ्या अशा गृह लक्ष्मीची ओळख समाजाला व्हावी म्हणूनच, कदाचित पंतप्रधानानी “भारत कि लक्ष्मी”, ही संकल्पना पुढे आणली.
असा सन्मान द्यायचा कोणी? समजा घरातल्याच व्यक्तीने अशा अभूतपूर्व कार्य करणाऱ्या आपल्या गृहलक्ष्मीचा सन्मान करायचं ठरवलं…
“माधुरी” ने आपल्या अनोख्या कार्यशैलीने परिस्थिती बरहुकूम “समाज कार्य” करण्याच्या अंगीभूत गुणाला वाट मोकळी करून दिली. कधी “रोजगार देणारी उद्योजिका” बनून तर कधी “भरकटलेल्या मुलांची काकू”, कधी “अंध विद्यार्थ्यांना संगणक शिकविणारी “शिक्षिका” तर कधी “गतिमंद मुलांची आई”, आणि आता तर “कर्करोगा सारख्या आजारग्रस्त महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियां” साठी “माधुरी ताई”.
सौ. माधुरी श्रीकांत तिजारे, पूर्वाश्रमीची कुमारी मंगला पांडुरंग खिस्ती, ही स्नातकोत्तर शिक्षणासह नागपूर महाविद्यालयात असताना सहपाठींच्या भांडणात तडजोड घडवून आणणारी हसतमुख कॉलेज कन्यका. अगदी बालपणापासूनच समाजसेवेचं व्रत घेतलेल्या माधुरीन लग्नाआधी महिलांना, मुलींना एकत्र करून त्यांना शिलाई प्रशिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याचा परिपाठ घालून दिला. १९८९ ला लग्नानंतरही स्वस्त न बसता डॉक्टरांसाठी कुरियर सर्विस ही नवीन संकल्पना समोर आणली, आणि भंडारा शहरातील डॉक्टरांसाठी त्यांना लागणारी उपकरण, औषधी, त्यांच्या पर्यंत पोहोचते करण्याचा कार्य जवळजवळ वर्षभर आपल्या या संकल्पनेतून केलं. डॉक्टरांच खूप सहकार्य तिला मिळालं.
पुढे दोन मुली, सासू सासरे यांच्या सह कौटुंबिक जबाबदाऱ्या पडत असताना, आपल्या कुटुंबाला हातभार लागावा आणि अत्यंत गरजू महिलांना रोजगार मिळावा, या हेतूने प्रशिक्षित उद्योजक होऊन सुरवात केली ती “श्री प्रोडक्ट” या खाद्य पदार्थ गृह उद्योगाची. त्यातून पाच ते सहा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. नागपूर विभागातील “यशस्वी उद्योजक प्रमाणपत्र” मिळवून उन्नतीची पायाभरणी केली. हे करत असतानाच काही कारणामुळे तिला हा गृह उद्योग बंद करावा लागला. परंतु आजही “श्री प्रोडक्ट” च्या खाद्य पदार्थांची चव अनेकांच्या ओठावर घर करून आहे हे सांगायला नको.
स्वस्थ बसेल ती “माधुरी” कुठली?
सन 2000 साली स्वतः संगणक शिक्षक होऊन, आपल्या या अद्ययावत आधुनिक ज्ञानाचा उपयोग समाजातील बालकांना कसा करून घेता येईल या विचाराने “संगणक संस्कार केंद्र” सुरू झालं. “संगणक शिक्षण संगणकाद्वारे शिक्षण” ही संकल्पना, जेव्हा शाळांमधून सुधा संगणक वापरले जात नव्हते तेव्हा राबविली. “शासकीय बालसुधारगृहातील” वीस विद्यार्थ्यांना सतत तीन वर्ष, स्वत:च्या घरी, “माधुरीने” संगणकाचे शिक्षण देऊन त्यांना संस्कारित करायचा प्रयत्न केला. आज या बालसुधारगृहातील मुलांना विविध ठिकाणी रोजगार प्राप्त झालेला आहे. बरीच मुले आजही सम्पर्कात आहेत. सणासुदीला येणारे त्यांचे फोन, माधुरीला एक वेगळाच आनंद आणि अनुभव देऊन जातात. शासकीय अंध विद्यालयातील मुलांना संगणक शिकविण्यासाठी तीने केलेली धडपड कौतुकास्पद आहे. स्वत: “ब्रेल लिपी” ती शिकली. दोन गतिमंद मुलांवर संगणकाद्वारे केलेले संस्कारानी आज त्या मुलांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केल.
अतिउत्साही या गृहिणीला सन २००४ साली स्तन कर्करोगाची लागण झाली आणि संपूर्ण जीवनच बदलून गेल. अत्यंत धीरोदात्तपणे गृह्कार्य सांभाळून, प्रचंड आत्मविश्वास कुटुंबियांची सहानुभूती व नियमित औषधोपचाराने ती अल्पावधीत व्याधीमुक्त झाली. स्वस्थ बसने हा तिचा स्वभावधर्म नसल्यामुळे कुटूम्बियांच्या प्रेरणेने व भंडारा शहरातील नामांकित डॉक्टरांच्या सहकार्याने या दुर्धर आजार सम्बन्धी जनजागृती अभियान सुरु करून स्वानुभव कथन आणि दृक्श्राव्य साधनांद्वारे महिलांना जागृत करण्याचा चंग बांधला. नागपूरचे कर्करोग तज्ञ डॉ. आनंद पाठक, डॉ. काणे, डॉ. कांबळे, डॉक. श्री व सौ. जोशी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.
हे सार करीत असतांना वयोवृद्ध सासूसासर्यांच्या सेवेत यत्किंचीतही खंड पडू दिला नाही. आज तेरा वर्षान पासून न डगमगता “दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही” म्हणत प्रत्येक महिलेला सजग करण्याची तिची धडपड कौतुकास्पद आहे.
2006 मध्ये सुरू झालेला हा प्रयत्न आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. जवळजवळ पाच हजार महिलांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आहे तिने. अनेक महिलांना मानसिक आधार दिलेला आहे. अनेक कुटुंबांसोबत तिचे जवळचे संबंध निर्माण झाले आहेत. अनेक कुटुंबांना सावरण्यात माधुरीने मोलाचा वाटा उचललेला. भंडारा आणि आजूबाजूच्या खेड्यात, मोठ्या शहरातून नागपूर, अकोला, अमरावती या ठिकाणीसुद्धा ही जनजागृतीची शिबिर आणि व्याख्यान केलीत. 2008 मध्ये स्वतःच्या कुटुंबासोबत हे कार्य करणाऱ्या माधुरीने आपल्यासारख्याच या आजारातून बऱ्या झालेल्या महिलांचा एक छोटेखानी गट तयार केला आणि त्याला नाव दिलं आधार गट. या गटात पाच ते सहा महिला एकत्र येऊन समाजप्रबोधनाचं कार्य करतात. आम्ही या सगळ्या आजारातून गेलेले आहोत आपण सुद्धा या आजाराला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून सामोरे जायला काय हरकत आहे, असा संवाद त्या आजारी व्यक्ती सोबत करत असतात. त्यामुळे या आजाराची कुणकुण लागलेल्या महिलेला मोठा दिलासा मिळतो. आधार मिळतो. असं म्हणतात, “कोण्या अनोळखी व्यक्तीच्या नुसत्या सांगण्याने सकारात्मक विचार येत नाही त्यासाठी लागतो प्रत्यक्ष पुरावा” आणि तो अशा “आधारगटा” मुळे पेशंटला मिळतो. 2013 मध्ये जवळजवळ नऊ वर्षांनी पुन्हा तिला या आजाराची लागण झाली. पुनश्च सगळे उपचार पद्धती आटोपून, पुन्हा नव्या जोमाने नव्या हिरीरीने समाजप्रबोधनासाठी माधुरी बाहेर पडली. आज दर महिन्याला एक, दोन कार्यक्रम होतात. “महिला जिथे, माधुरी तिथे” असच जणूकाही झालेलं आहे. समाजामध्ये आजही कोणाला ब्रेस्ट कॅन्सर संबंधी लागण झाली असं कळलं, तर पहिला फोन येतो तो माधुरीला. कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता नि:संकोचपणे त्या महिलेपर्यंत पोचते त्या कुटुंबापर्यंत पोचते आणि त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करते.
“मला जगायचं आहे..” या नाट्य संकल्पने तून प्रबोधन केलं गेलं. अशावेळी पुरस्कार, सत्कार हे आलेच. २००८ मध्ये “भंडारा जिल्हा भुषण” पुरस्काराने गौरवान्वित माधुरीने, कौतूकान भारावून न जाता, अन्याय, अत्याचारा विरुद्ध आवाज उठविणाऱ्या स्त्रियांप्रमाणेच कॅन्सर नावाच्या शत्रूशी युद्ध पुकारलं. मनान जोहार करून, निर्भयी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची प्रतिज्ञा तिने केली आहे. चेतनेची चिंगारी पेटली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, धैर्याने आजाराचा सामना करीत स्वतः एक दीप बनून, पायवाटी उजळू लागल्या.
आणि म्हणूनच आज प्रीतीच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याला, माधुर्याचा गंध लागला, अन श्वेतपटलावर चित्र रेखाटलं गेलं ते कॅन्सरमुक्त समाजाचं. “कर्करोग हा जीवघेणा आजार नाही, तो दुरुस्त होऊ शकतो, त्यासाठी हवा सकारात्मक दृष्टीकोन, मनाची हिंमत आणि कुटुंबाचं सहकार्य” हा संदेश देणाऱ्या, घरा घरामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याची उर्मी असलेल्या “कर्करोगमर्दिनी – माधुरी” म्हणजे मोदींजिंच्या संकल्पनेतील “भारत की लक्ष्मी” चं. तिला खूप खूप शुभेच्छा.