भटके विमुक्त समाज बांधवांचा स्वातंत्र्य लढ्यातील योगदान.
भटके विमुक्त समाज बांधवांचा स्वातंत्र्य लढ्यातील योगदान..
भटके विमुक्त समाज बांधवांच्या सशस्त्र लढ्याविना भारताला मिळालेले स्वातंत्र्य अशक्यच …!
– ॲड संकेत राव
भारताला आज स्वातंत्र्य मिळुन ७८ वर्ष पूर्ण होत आहे. भारतमाते साठी आपल्या जिवाची बाजी लावणारे अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या डोळ्यासमोर आजही अंजना सारखे कायम असतात, परंतु या माती साठी, या देशातील निसर्गासाठी, या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी या भारत मातेच्या अश्या काही लेकरांनी सुद्धा आपल्या प्राणाची आहुतीच नव्हे तर संपुर्ण समाज भारतीच्या चरणी समर्पित केलेला होता. अश्या ह्या भारत मातेच्या सुपुत्रांच्या पदरी मात्र फक्त तिरस्कार आणि अपमानच आला, तरी सुद्धा “माझी माती माझी आई” या ब्रीदवाक्याच्या प्रेरणेने असंख्य भटके विमुक्त जातीतील आपले समाज बंधु इंग्रजांशी लढत राहिले, आपले प्राण, संपत्ती, परिवार आणि समाज सुद्धा या स्वातंत्र्याच्या यज्ञा मधे समिधा सम वाहून घेत राहिले. असे हे आपल्या भारत मातेचे सुपुत्र कायम एक एक इंच जमिनीच्या तुकड्यासाठी बलाढ्य इंग्रजांशी लढत राहिले.
आज देशातील अनेक राज्यांमध्ये भटके विमुक्त म्हणून जीवन जगणारे आपले बांधव १८५७ च्या उठावात सुध्दा अग्रेसर होते.
महाराष्ट्रातील मराठवाडा, प. महाराष्ट्र, विदर्भ या प्रांतांतील भटके विमुक्त जातीतील स्वातंत्र्य सेनानी यांची नावे सुद्धा आपल्याला माहिती नसणार परंतु त्यांचे कार्य आणि देशसेवा ही उगवित्या सूर्या सारखी आहे.
सूर्याचे पुत्र असणारे, निसर्गात परमेश्वर बघणारे , शैव, वैष्णव , शाक्त सोबतच देशभक्त सुद्धा तेवढेच प्रखर असणारे भटके विमुक्त बांधव स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळीत प्रत्यक्ष सहभाग होते. मग तो जंगल सत्याग्रह असो ,मिठाचचा सत्याग्रह असो वा १९४२ चे भारत छोडो आंदोलन असो.
१९०२ नंतर भारतात इंग्रज फार खोलवर आणि पार पाड्यापर्यंत पोहोचले असताना त्यांना प्रतिउत्तर देणारे आपले भटके विमुक्त बांधवच होते, इंग्रजांना त्याची कुटणीती आणि समाज घातक रणनिती समाजाच्या मुख्य प्रवाहात वाहता आली नाही, याचे यश फक्त आणि फक्त भटके विमुक्त समाजालाच जाते. जर त्या काळात हा लढा आपल्या भटके विमुक्त समाज बांधवांनी दिला नसता तर आजची परिस्थिती आपल्या विपरीत असती. ब्रिटिशांना संपूर्ण भारतावर कधीच एकछत्री सत्ता स्थापित करता आली नव्हती. भारतातील १७-२६% भूभाग हा सतत इंग्रजांविरुद्ध लढत होता. तो भूभाग कधीच इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला नव्हता, त्यात फक्त संघर्ष होत होता. आणि हा लढा लढवणारे भटके विमुक्त समाजाचे बांधव होते. संघर्ष एवढा तीव्रतेचा होता की इंग्रजांना या संपूर्ण भटक्या विमुक्त जमातीला सन १८७१ मध्ये खास गुन्हेगारी कायदा करून अटक करायला सुरुवात केली. तेव्हापासून पारधी, मांगगारुडी, रामोशी, वडार, कैकाडी, पामलोर,राजपूत भामटा या जमाती गुन्हेगारी जमाती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
म्हणजे आपण विचार करू शकतो की हा संघर्ष किती मोठा असेल.
आपल्या भटके विमुक्त समाजापैकी काही स्वातंत्र्य सेनानी संपूर्ण देशाला कायम प्रेरणा देणारे आहेत त्यापैकी –
१.यशवंतराव होळकर
जानेवारी १८०५ साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली. आणि ते पहिले महाराजा झाले. काशीराव, मल्हारराव व विठोजीराव हे त्यांचे थोरले बंधू. यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ घ्या खर्ड्याच्या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली ह्या युद्धात यशंवतराव आपले पिता तुकोजीरावासोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते. त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष, या युद्धात त्यांनी निजामाचा पराभव केला. यशंवत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला, इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती.
२.वसंत नारायण नाईक
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सायमन कमिशनला विरोध करीत म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला. ब्रिटिश सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र जनतेत विलक्षण लोकप्रिय असलेल्या वसंतरावांना या काळात अनेक कुटुंबांनी आश्रय देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. वसंतराव भूमिगत असतांना ब्रिटिश सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्त केली गेली. मात्र वसंतरावांचे देशप्रेम व समर्पण यामुळे लिलावात कुणीही भाग घेतला नाही. असे त्यागाचे प्रतीक असणाऱ्या वसंतराव नाईक यांचे कार्य सतत प्रेरणा देणारे आहे.
३.राजे उमाजी नाईक
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रथम सशत्र क्रांतीकारक मानले जातात. ‘मरावे परि क्रांतिरूपे उरावे’ अशी उक्ती उमाजी यांच्या साठी तंतोतंत जुळते.
एक तर इंग्रज अधिकारी मॅकिंटॉश एका संदर्भात लिहितो की , “उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.” जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.
परकीय राजवट आपल्या देशात स्थिरावू नये यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात व्यापक लढा उभा केला. उमाजी नाईक यांना 1832 साली फाशी दिली गेली. त्यामुळे ते इतर क्रांतीकारकांच्या आधी हुतात्मा झाले.
उमाजी नाईक यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळस्कर यांनाही फाशी देण्यात आली. इतकंच नाही तर इतरांना याची दहशत बसावी तसेच कोणीही पुन्हा उठाव करण्यासाठी धजावू नये यासाठी उमाजी नाईक यांचे प्रेत त्यात ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून देखील ठेवण्यात आले होते. अश्या ह्या पराक्रमी उमाजी नाईक यांच्या कर्तृत्वाला दंडवत प्रणाम
४.दख्खनचे भगतसिंह – सिंदुर लक्ष्मण
१८७८ मध्ये वीर लक्ष्मण यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. कर्नाटकातील प्रथेप्रमाणे माणसाच्या नावा आगोदर त्यांच्या गावचे नाव लिहिले जात असे, त्यामुळे त्यांना सिंदूर लक्ष्मण असे संबोधित केले गेले होते व आहे. त्याकाळात ब्रिटिशांचे राज्य होते, राजकीय व्यवहार इंग्रज त्यांच्या कायद्याप्रमाणे चालवत होते, ते फक्त जुलमी राजवटी विरुद्ध लढत होते असं नाही; तर त्यांचा लढा हा राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी व शोषण या दोन्ही विरुद्ध होता. वीर लक्ष्मण यांनी सशस्त्र बंड केले होते.
सिंदूर लक्ष्मणने त्यांना इंग्रजांनी तुरुंगात टाकले असता, त्यांचे सर्व कौशल्य पणाला लावून त्यांनी तुरुंग फोडला आणि ते आपल्या साथीदारासह बाहेर पडले. अशा प्रकारे तीन वेळा जेलफोडीचं रेकॉर्ड असणारा अन्य एकही स्वातंत्र्य सैनिक नाही. १५ जुलै १९२२ या दिवशी कर्नाटक प्रांतात त्यांना विश्वासघाताने पकडले आणि त्यांना गोळ्या घालून मारले गेले. एका क्रांतिकारक व लढवय्या स्वातंत्र्यवीराचा शेवट झाला.
वरील शूरवीर सेनानिंसारखे असंख्य क्रांतिकारक या संपूर्ण भारतभूमीला भटके विमुक्त समाजाने दिले. जेव्हा प्रश्न देश, देव आणि धर्मावर येतो तेव्हा हा समाज कायम हिमालयासारखा उभा राहिला आहे. आपल्या स्वतंत्रलढ्याच्या इतिहासाच्या सुवर्ण पानात काही सोन्यासारखे तेजस्वी ओजस्वी क्रांतिकारांचे संदर्भ आज शोधून सुध्दा मिळत नाही, आज ही खुप मोठी शोकांतिका आहे…
देश आज स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहे, पण खरच ह्या महान विभुतींना स्मरण केल्याविना मिळालेल्या स्वातंत्र्याचे पारडे किती जड वाटणार हे आपण सर्वांनी कायम स्मरणात ठेवावे.
सतत प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भटके विमुक्त क्रांतिकारक बंधूना या स्वातंत्र्यदिनी … शत शत नमन !
संदर्भ – महाराष्ट्र समाज आणि संस्कृती
– दलित साहित्याचा इतिहास
– विमुक्तायन
– Indian express report 2013
– भटके विमुक्त विकास परिषद – महाराष्ट्र राज्य