चला कृष्ण समजून घेऊया.

0

चला श्रीकृष्ण समजून घेऊ या.

भगवान श्रीकृष्णाच्या नीतीमध्ये जी गूढता दडलेली आहे त्यासाठी “श्रीकृष्ण” चरित्राचा सखोल अभ्यास करून अनुकरणीय अशी ती नीती कृतीत आणून त्याप्रमाणे जगण्याची सद्यस्थितीत अत्यंत प्रत्येकाला आवश्यकता आहे. कारण प्रत्येकाचा येथे “अर्जुन” झाला आहे. आपल्याच ज्ञाती बांधवांसमोर उभे राहून कसे लढावे हा मोठ्ठा प्रश्न ज्याच्यात्याच्या मनोमनी उभा आहे.  प्रत्येकाचे जीवन हे एक लढाऊ “धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे” झालेले आहे.

संत म्हणतात “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग”, मग आम्ही तर बारोमास “वसंत”, नाही आम्हाला “उसंत”, मग कोणता चांगला मार्ग करायचा “पसंत”.

काय करायचे अशा वेळेस, मोठ्ठा गहन प्रश्न. नक्कीच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाची प्रकर्षाने उणीव भासत असणार प्रत्येकाला.

त्याच्या जीवन चरित्रात वेळोवेळी ज्या लिला भरलेल्या आहेत, त्यातूनच मानवाला क्षणोक्षणी काहीतरी नीतीचे धडे गिरवावयास मिळतात.

भक्ताने आपले कर्म करीत राहावे, ज्याची त्याची लढाई ज्याने त्यानेच लढावी लागणार आहे, फक्त भगवंत वचन दिल्याप्रमाणे “न मे भक्त्या: प्रणष्यती” भक्ताचा नाश होऊ देणार नाही, हे नक्की. भक्त व भक्ति साठी सुद्धा त्याने वचन दिलेले आहे, व ते तो पार पाडीत आहे.

“अनन्याश्चिंतयन्तोमाम ये जन: पर्युपासते, तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम ववाम्यहम”.

मग आणखी काय हवे? जे भक्त लोक हे वचन पाळतात त्यांचा नाश होत नाही हा अनुभव त्यांना येतोच. ते आपले ध्येय गाठण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी, अविरत कर्म करीतच असतात.

चारी बाजूंनी पातशाहयांनी वेढलेले असूनही शिवशाही व पेशवाई टिकवण्यासाठी छत्रपतींनी व नंतर पेशव्यांनी शर्थ केली व त्यातूनही सुखरूप निसटून पन्नास वर्षे स्वराज्य व सुराज्य स्थापन व रक्षण केलेच ना!! ब्रिटीशांच्या जुलुमी अत्याचारातून आपल्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य खेचून आणलेच ना!! त्याला कारण एकच, “श्रद्धा व सबुरी”. करम किये जा!!

श्रीकृष्णच का? कारण त्यांनी “बोले तैसा चाले” प्रमाणे गीतावचन निभावले. करून दाखविले.

“यदा यदा ही धर्मस्य ग्लांनिर्भवती भारत, अभ्युत्थानमर्धमस्य,  तदात्मानम सृजाम्यहम”.

धर्माला ग्लानि आली की मी अर्धमाचे उत्थापन करण्यासाठी अवतार घेतोच, परंतु साधुंचे रक्षण, दुष्टांचा विनाश करून धर्माची स्थापना करतो. “परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय”

मी येतच असतो. जो स्वतःला मदत करतो त्याला मी मदत करतो.

तो काळही तसाच होता, आजही आहे व उद्याही राहणार आहे. त्यावेळी सार्‍या पृथ्वीवर भयानक राक्षसी वृतींच्या व राजस व तामसी वृत्तींच्या दुष्ट व अहंकारी राजांचा अनन्वित अत्याचार सात्विक लोकांवर चालला होता,  जनशक्ती निर्बल, मलूल, प्रेतवत,  निस्तेज, हतबल, सुस्त झाली होती,  त्याहीवेळेस दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी भगवंतालाच यावेच लागले, कारण

“न मे भक्त्या प्रणष्यती”.

आणि म्हणूनच तो आजही भक्तांच्या हृदय सिंहासनावर अधिष्ठित आहे. उद्या भेटू.

– हिंदू धर्म सनातन संस्कृती व संस्कार संवर्धन केंद्र, अंबरनाथ.

फोटो स्रोत – गुगल.

फोटो पेंटिंग – Vishal Gurjar

लेखक हे स्तंभ लेखक, नारदीय कीर्तनकार, राजकीय व सामाजिक विषयाचे अभ्यासक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.