चीन – पाकिस्तान अभद्र सागरी युती.
चीन – पाकिस्तान अभद्र सागरी युती.
विशाल निळ्या सागरावर वर्चस्व गाजवणारी नौसेना (ब्ल्यू वॉटर नेव्ही) होण्याच्या भारतीय महत्त्वाकांक्षेला हादरा देणारी घटना म्हणजे; चीनी नौसेना आणि पाकिस्तानी नौसेनेच्या अभद्र युती आहे.या युतीमुळे, हिंद महासागरसंबंधी भारतीय धोरणाला थेट आव्हान मिळाल आहे अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.चीन पाक उदयोन्मुख नौदल आघाडीचा हा पॉवर प्ले,भारताच्या, आधुनिक नौसेनेला,सामरिक दृष्ट्या आपत्तीजनक (स्ट्रटेजिक हिंडरन्स) ठरणार आहे.
मागील काही वर्षांत लष्करीपेक्षा सागरी क्षेत्रात चीन व पाकिस्तानमधील सहयोग/ भागीदारी अधिकच मजबूत झाली आहे. दोन्ही देश,संयुक्त लष्करी सराव आणि नौ सेनासंबंधी समन्वयी प्रशिक्षण कारवाया (जॉइंट मिलिटरी ट्रेनिंग अँड एक्सरसाईझेस) करतअसतात.चीन;पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यात सुधारणा (अप ग्रेडेशन) करण्यासाठी सर्वकष मदत करतो आहे. या सागरी युतीच्या माध्यमातून, हिंद महासागर क्षेत्रातील (इंडियन ओशन रिजन) सागरी शक्ती संतुलन बदलण्यासाठी तो हे करतो आहे.सामारिक दृष्टीकोनातून पाहिल असता भारतासाठी ही एक गंभीर चिंतेची बाब आहे.अशा बदलत्या संतुलनाचा प्रत्यक्ष सामरिक परिणाम (डायरेक्ट इफेक्ट); भारताची सागरी सुरक्षा, ऊर्जा पूर्ती मार्ग आणि क्षेत्रीय प्रभावावर होतो/पडतो.
चीन पाकिस्तान संयुक्त नौसेना सराव,दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्याचा महत्त्वाचा टप्पा/भाग आहे.२०२०मधे सुरू झालेल्या “सी गार्डियन संयुक्त प्रशिक्षण सराव” मालिकेनी या नौसेना सरावाचा ओनामा झाला.या सरावाच्या माध्यमातून चीननी पाक नौसेनेला, प्रगत सागरी आणि हवाई कारवायांच प्रशिक्षण दिल.चीन, तायवानच्या आखातात जी नेव्हल ऑपरेशन्स करणार आहे त्याच धर्तीवर हे प्रशिक्षण देण्यात येत.या सराव/प्रशिक्षणाचा केंद्र बिंदू लक्षात घेतला तर, या दोघांमधली सामरि क भागीदारी किती खोलवर गेली आहे हे ध्यानात येत.दोन्ही देशांच्या नौसेनांचा पंधरा दिवसीय नवीनतम सराव “सी गार्डियन ३”, नोव्हेंबर डिसेंबर २०२३मधे अरबी समुद्रात झाला आणि त्यात, सागरी युद्धजन्य परिस्थितीत दोन्ही देशांच्या नौसेना, किती प्रभावी रित्या एकत्र काम करू शकतात हे/याची शक्यता,उजागर झाली.पाकिस्तानी नौसेना देखील दरवर्षी, बहुराष्ट्रीय मुस्लिम नौसेना सराव मालिका, ”अमन” आयोजित करते. या सराव मालिकेच्या माध्यमातून, या देशांच्या नौसेना, अरब सागरात एकत्रित कार्य करण्याची त्यांची क्षमता आणखी मजबूत करतात. आगामी “अमन २५”सराव, फेब्रुवारी मार्च २०२५मधे,पाकिस्तानी नौसेना प्रमुख ॲडमिरल नावेद अश्रफ यांच्या नेतृत्वाखाली, कराची लगतच्या समुद्री क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे.या सरावात,सागरी दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीसारख्या धोक्यांपासून मुस्लिम सागरी क्षेत्रीय सहकार्याला चालना मिळेल. सामरि क दृष्ट्या भारतासाठी हे सराव गंभीर चिंताजनक आहेत. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील सुधारित लष्करी व सागरी समन्वय भारताच्या,खास करून त्याच्या अरब सागर आणि हिंदमहासागरातील सागरी वर्चस्वाला देण्यात येणार थेट आव्हान आहे अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.अशा सरावांमुळे पाकिस्तानच्या लष्करी व सागरी तयारी आणि एकूणच सामरिक स्थितीला चालना मिळून भारताचे सागरी मार्ग धोक्यात येण्याची संभावना नाकारता येत नाही.
पाकिस्तान नौसेनेच्या सागरी ताफ्याच आधुनिकीकरण हा चीन पाकिस्तान नौदल सहकार्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. या अंतर्गत चीननी मे, २०२३मधे पाकिस्तानला, ०५४ए/पी प्रणालीच्या प्रकारच्या चार फ्रिगेडस् दिल्या आहेत.या सर्व फ्रिगेडस्; जहाजावरुन शत्रू जहाजांवर (शिप टू शिप) मारा करणारी,प्रगत सीएम ३०२ आणि जहाजावरुन हवेत (शिप टू एयर) मारा करणाऱ्या एलवाय ८० क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असल्यामुळे, पाक नौसेनेची लढाऊ क्षमता मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत/बलशाली झाली असून ही जहाज,नौसेनेचा कणा बनली आहेत.या व्यतिरिक्त; चीनी देखरेखी खाली चार हँगोर क्लास पाणबुड्या, कराचीच्या डॉक यार्डमधे आणि चार चीनमधे निर्माणाधीन आहेत. या पाणबुड्या;प्रगत वायु प्रणोदक प्रणालींनी (एयर ब्रिदिंग इंजिन्स) सुसज्ज असल्यामुळे पाक नौसेनेची जलमग्न सहनशक्ती आणि गुप्तता (अंडर वॉटर एन्ड्युरंस अँड स्टेल्थ) मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत झाली असून त्यामुळे भारतीय नौसेनेसमोर एक गंभीर आव्हान उभ ठाकल आहे.एप्रिल २०२४मधे पहिल्या हँगोर क्लास पाणबुडीच प्रक्षेपण होईल आणि २०२८ पर्यंत आठही पाणबुड्या पाक नौसेनेत दाखल होतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन,पाण्याखालील पाकी युद्ध पर्यायांचा विस्तार करवतो आहे.या पाणबुडी बांधणी प्रकल्पामुळे, पाकिस्तानची सागरांतर्गत क्षमताच वाढली नसून तेथील देशांतर्गत जहाज बांधणी कौशल्यदेखील झपाट्यानी विकसित होतांना दिसून येत.आजमितीला पाकिस्तान आर्थिक गर्तेत गेलेला दिसत असला तरी, या वृद्धिंगत झालेल्या सागरी प्रगतीमुळे त्याची नौसेना सामर्थ्यवान झाली आहे.चीनच्या वाढत्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानी नौसेनेची ताकद,आक्षेपार्ह भारत विरोधी दृष्टिकोन अंगिकारून,हिंद महासागरातील भारतीय सागरी वर्चस्वाला आव्हान देण्या इतपत सक्षम होईल.
चीनद्वारा; चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत, कराचीपासून केवळ साठ किलोमिटर अंतरावर असलेल्या ग्वादर बंदराचा सर्वकष विकास सुरू असून त्यामुळे भारताची सागरी सुरक्षा अधिक गुंतागुंतीची झाली आहे. इराणच्या जवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीचा जवळ वसलेले ग्वादर बंदर, सामरिक दृष्ट्या तेथील समुद्री मार्गावरील मोक्याचा चोक पॉइंट आहे.चीन आणि पाकिस्तान या दोघांसाठी हे बंदर म्हणजे एक सामजिक वरदान सिध्द होत आहे. या बंदरामुळे चीनचा महत्वपूर्ण ऊर्जा पुरवठा मार्ग सुरक्षित होईल/झाला असून हिंद महासागर क्षेत्रातील त्याचा प्रभाव वाढला आहे.ग्वादर बंदर पाकिस्तानसाठी, एक लॉजिस्टिक आणि धोरणात्मक वरदान आहे. यामुळे तो; भारत इराण दरम्यानच्या, भारतासाठी अत्यावश्यक असलेल्या सागरी ऊर्जा मार्गावर सामरिक वर्चस्व प्रस्थापित करू शकतो/करेल.चीन पाकिस्तानमधील सागरी युती/सहकार्य भारतासाठी धोकादायक आहे.ग्वादर बंदर;भारताची पश्चिम किनारपट्टी आणि प्रमुख सागरी वाहतूक मार्गावर असल्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार हितांचा धोका वृद्धिंगत झाला/होणार आहे.ग्वादर बंदर चीनी नौसेनेच “ऑपरेशनल बेस” झाल आहे.सूत्रांनुसार;आजमितीला तेथे, चीनची सहा लढाऊ जहाज आणि दोन पाणबुड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
चीननी पाकिस्तानमधे विकसित केलेल ग्वादर हे,खोल समुद्रावरील बंदर (डीप सी पोर्ट) आणि तेथून २६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरंदानीमधे, ४३० एकर जमिनीवरील आंतरराष्ट्रीय विमानतळ, चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि एकविसाव्या शतकातील रेशीम मार्गासाठी (सिल्क रूट),आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल,खास करून; मध्य आणि पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आखाती देश आणि उर्वरित जगाशी संबंध साधणार,संपर्क केंद्र आहे.ग्वादर बंदरात मोठी मालवाहू व लढाऊ जहाज आणि गुरंदानी विमानतळावर मोठी विमान सामावून घेणारी सक्षम धावपट्टी आहे.त्यामुळे ग्वादर/गुरंदानीमधून कार्यरत होणारी,चीनी/पाकिस्तानी लढाऊ जहाज आणि या सागरी ताफ्याच संरक्षण/ मदतीसाठी उड्डाण भरणारी लढाऊ विमान,अरब सागर आणि हिंद महासागर क्षेत्रात वावरणाऱ्या भारतीय नौसेनेसाठी धोक्याची गंभीर घंटा ठरतील हे निर्विवाद सत्य आहे.
चीनच्या जोडीनी तुर्कीस्तानही,पाकिस्तानी नौसेनेच्या आधुनिकीकरणात व तीच्या शस्त्रागारात विविधता आणण्यात महत्वाची भूमिका बजावतो आहे.२०१८ मधे झालेल्या पाक तुर्कीस्तान करारांतर्गत पाकिस्तान तुर्कीकडून तीची, “मिलगेम क्लास कॉर्वेट्स” (लढाऊ जहाज) घेणार आहे.सूत्रांनुसार; ही प्रगत जहाज,२०२५ पर्यंत पाकिस्तानी नौसेनेत दाखल होतील. यामुळे अजूनच सक्षम होऊ घातलेल्या पाक सागरी रणनीतीचा नवा अध्याय सुरू होईल. चीनकडून मिळणारी ही जहाज सोडून, पाकिस्तानी नौसेनेत ३६ कार्यरत,फ्रंटलाइन कमिशन झालेली लढाऊ जहाज आहेत.मात्र यात;लहान गस्ती नौका (पेट्रोल बोटस्), सहाय्यक/सर्वेक्षण जहाज (स्मॉल सर्व्हेलन्स शिपस्) आणि भरपाई जहाज (सप्लाय शिपस्) सामील नाहीत.पाक नौसेनेचा असा विस्तार भारतासाठी डोकेदुखी बनून सागरी परिस्थिती अधिक जटिल बनवेल. चीन बरोबर तुर्कीस्तानशी झालेला सामरिक सागरी सहभाग, पाकच बहुयुती धोरण (मल्टी स्टेट मल्टी डायमेंशनल पॅक्टस्) उजागर करतो.ही; चीन पाक तुर्कीमधील अभद्र युती आणि सागरी धोरण विकासाला प्रतिसाद देण्यासाठी भारतानी, सतर्क व लवचिक धोरण आखून. क्षेत्रीय सागरी वर्चस्व/श्रेष्ठत्व राखण्याची गरज आहे.
चीनच्या मदतीनी आपल्या नौसेनेच आधुनिकीकरण करू पाहणाऱ्या पाकिस्तानला; तुघरील क्लास फ्रिगेडस् मधील खराब (डिफेक्टिव्ह) रडार आणि सदोष इमेजिंग सिस्टीम,आर्थिक अस्थिरता आणि परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबत्व या मुळे त्याच्या नौसेनेच आधुनिकीकरण राखता/टिकवता येईल का याच उत्तर आगामी काळात मिळेल. भारतीय संरक्षण तज्ञांनुसार,जरी तुघरील क्लास फ्रिगेस् मुळे पाकिस्तानचा सागरी ताफा बळकट झाला आहे अस वाटत असल तरी तो, वरील/स्वाभाविक अपंगत्वामुळे सामरिक दृष्ट्या गंभीर धोका नाही.यामुळे पाक नौसेना, दूर सागरात (डिस्टंट सी) कार्यरत होऊ शकेल आणि त्याला,हिंद महासागर क्षेत्रातील भारतीय नौसेनेच्या वर्चस्वाला तोंड देण्यासाठी, आक्षेपार्ह समुद्र नकार रणनीती राबवता येईल.अरब सागर व हिंद महासागर क्षेत्रातील वाढत्या चीन पाकिस्तान सागरी भागीदारीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला त्या क्षेत्रातील चीनी व पाक सागरी क्रियाकलापांवर पाळत ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपली गुप्तचर क्षमता वेगानी वृद्धिंगत करावी लागेल.
२०२५च्या सुरवातीलाच;आयएनएस सूरत (गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर), निलगिरी (स्टेल्थ फ्रिगेड) आणि वाघशीर (स्कॉर्पियन पाणबुडी) या तीन नव्याकोऱ्या लढाऊ जहाजांच तिरंगी कमिशन होऊन त्यांना एकसाथ भारतीय नौसेनेत सामील करण्यात आल. महत्वाची बाब ही की,वाढत्या आत्मनिर्भरतेंतर्गत हे तीनही प्लॅटफॉर्मस् संपूर्णपणे भारतात बांधले गेलेत.मागील दशकात भारतीय नौसेनेत ३३ लढाऊ जहाज आणि सात पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला आणि हे कमिशनिंग भारतीय नौसेनेच्या आधुनिकीकरणाला उजागर करत.हिंद महासागर क्षेत्रातील चीन पाकिस्तान अभद्र युतीशी समतोल राखण्यासाठी भारतानी; अमेरिका,जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत चतुर्भुज सुरक्षा संवाद (क्वाड) करार केला आहे.त्याच बरोबर तो; इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका यांच्याशी केलेल्या ठोस सागरी करारांद्वारे,हिंद महासागर क्षेत्र आणि दक्षिणपूर्व आशियात सागरी मुत्सद्देगिरीचा विस्तारही करतो आहे.
चीन अभद्र सागरी युतीमुळे भारतासमोर मोठे भौगोलिक राजकीय आव्हान (जिओ पॉलिटिकल चॅलेंज) उभ राहील आहे. काही आर्थिक आणि तांत्रिक मुद्द्यांतर्गत, पाकिस्तानी नौसेनेच आधुनिकीकरण व प्रगती मर्यादित झाली असली तरी, चीनच्या थेट सहभागामुळे या क्षेत्रातील सागरी शक्तीत असमतोल निर्माण झाला आहे. प्रगत नौसेना प्लॅटफॉर्म, धोरणात्मक बंदर भागीदारी आणि सुधारित सहकार्य संबंधातील या बदलांकडे भारत दुर्लक्ष करू शकत नाही/करून चालणार नाही.
भारतानी; त्याला आफ्रिका व मध्यपूर्व क्षेत्राशी जोडणाऱ्या अरब सागरात आपली सामरिक नौसेना स्थिती मजबूत करून,ओमान आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या प्रादेशिक शक्तींसोबत भागीदारी वाढवत या चीन पाकिस्तान अभद्र सागरी युतीला प्रतिसाद देण्याचीही नितांत आवश्यकता/गरज आहे.