दागिने व स्त्री आरोग्य.

0
दागिने व स्त्री आरोग्य
     भारतीय समाजात पुरूष आणि स्त्रियांमध्ये दागिने घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे आणि या दागिन्यांना परिधान करण्याचे स्वतःचे महत्त्व आहे. जे शरीर आणि मनाशी निगडीत आहे. हे ज्यांनी समजून घेतलं त्यांना त्याचा फायदा नक्कीच होतो. पण जी लोकं याला विरोध करतात किंवा त्याला चुकीचं समजतात त्यांना आपली संस्कृती समजलीच नाही किंवा त्यांनी ती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. “काय त्या दागिन्यांची कच कच” ! “कंटाळा येतो मला इतके दागिने घालायचा” ! “कसे ते आउटडेटेड दागिने आहेत” ! “आताच्या आधुनिक काळात कोण ती टिकली, नथ, जोडवे, बांगड्या घालतात” ! अशी बरीच वाक्य कानावर पडतात.
     खरंच आपली संस्कृती आउटडेटेड झाली आहे का? ज्यांचे असे मत आहे त्या लोकांना बहुतेक हे माहिती असेलच. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे. या एकाच देशात विविध चालीरीती, भाषा, धर्म, आणि परंपरा असूनसुद्धा दिसणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. आधुनिक विज्ञानाची मुळे तिथूनच आली आहे. देशभरात विविध उपसंस्कृती व हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकरूपता म्हणजे भारतीय संस्कृती. त्याचा आपण  गर्व बाळगावा. पण आधुनिकतेच्या नावाखाली जे परिवर्तन केले जात आहे ते चुकीचे आहे. आणि त्यात भर म्हणजे काही लोकांवर पाश्चिमात्य संस्कृतीचा  होणारा प्रभाव.
      प्रत्येक देशाला दुसऱ्या देशातील राहणीमान, पोशाख, खाद्य पदार्थ इत्यादींची ओढ असते. आणि ती स्वाभाविक आहे. आपल्या देशाचे सुद्धा इतर देश अनुकरण करत असतात. अनुकरण करणे आणि आत्मसात करणे या दोन  वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या गोष्टीचं अनुकरण हे काही प्रमाणात तात्पुरतं असू शकत. किंवा ते आवडतं म्हणून केलं जातं. पण एखादी गोष्ट आत्मसात करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. ती लगेच होणारी गोष्ट नाही. एखादं उदाहरण द्याच झालंच तर आपल्या शेजारी असलेलं एखाद कुटुंब. त्या कुटुंबातील लोकांचे कपडे, दागिने किंवा त्यांच्या राहणीमानाचे आपण अनुकरण करू शकतो पण त्यांच्या कुटुंबाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आपण आत्मसात करू शकत नाही, कारण ती त्यांच्यावर लहानपणा पासून रुजत आलेली आहे. त्यांना त्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. तसे संस्कार त्यांच्यावर झालेले असतात. मात्र आपण आपली परंपरा, संस्कार, संस्कृती याची किती जोपासना करतो आणि त्याला किती महत्व देतो यावर सर्व अवलंबून असतं.
     आजच्या युगातील सुशिक्षित विवाहित स्त्रियां दागिने का घालू नये किंवा ते कसे चांगले नाहीत याची शंभर कारणे देतील पण दागिने परिधान करणे आपल्या दैनंदीन जिवनात किती लाभदायक आहे हे जाणीवपूर्वक विसरून जातात. दागिने हे अडचण नाही, कारण सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. स्त्रिया जे दागिने परिधान करतात ते शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात.
त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. पण आजच्या काही स्त्रीया हे नाकारत आहेत. परीणामी पूर्वीच्या स्त्रियांच्या तुलनेत आताच्या स्त्रियांमध्ये कमी वयात आरोग्यासंबंधी त्रास होताना दिसत आहे.आणि त्यात भर म्हणजे मासिक ऋतुचक्रातील होणारे बदल आणि त्यामुळे असह्य होणाऱ्या वेदना सहन कराव्या लागतात. त्या पासून बचाव करण्यासाठी बाजारातील विविध औषधीचे सेवन करतात. ज्यामुळे कधीकधी त्याचे शरिरावर दुष्परिणाम होताना दिसतात. आधुनिकता आणि फॅशनच्या मागे धावण्यात आपण आपले सुदृढ आरोग्य गमावत आहोत.
     ‘ओल्ड ईज गोल्ड’ असे उगाच नाही म्हणत..! प्राचीन ऋषींनी काही साधने निर्माण केली ज्याने मन आणि आरोग्याची निगा राखली जाते.  कालांतराने यांना सुंदर दागिन्याचं रूप मिळालं आणि हे नियमपूर्वक घातले जाऊ लागले. फार मागे जात नाही आपली आज्जी आणि आपण या दोन पीढीत जर तुलना केली तर हे लक्षात येतं. आज्जीला तीच्या साठीत होणारे त्रास आपल्याला आपल्या तीशीतच सुरू झालेले दिसत आहे. कमी ऐकायला येणे आजकाल ही समस्या जास्त त्रासदायक झाली आहे. कानात सतत हेडफोन लावून जोरजोरात गाणी ऐकणे, मोबाईल फोनचा अती वापर ही त्याची कारणे आहेत. गुडघे व सांधे दुखी, कंबर व मणक्याचे त्रास हे सुद्धा याच वयात सुरू झाले आहे. डोळ्यांनी कमी दिसणे, कमी वयातच चष्मा लागणे, अती लठ्ठपणा, हृदय विकाराच्या समस्या, गर्भाशयाच्या समस्या, केसांपासुन तर पायापर्यंत अशा अनेक समस्यांना स्त्रियांना तोंड द्यावे लागते. पण आता प्रश्न हा आहे की फक्त दागिन्यांमुळे इतकं सगळं कसं शक्य आहे.
     स्त्रियांच्या सौभाग्याचं प्रतिक म्हणजे कुंकू किंवा टिकली, हे आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल अ‍ॅक्साइडयुक्त असतो. दोन्ही भुवयांत लावलेलं कुंकू मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात. कानात एकूण शरीराशी संबंधित असे जवळपास ८० केंद्रबिंदू आहेत. म्हणून कानातले किंवा भिकबाळी घातली तर हे सर्व बिंदू प्रभावित होतात आणि विविध रोगांवर नियंत्रण ठेवले जाते. यामुळे फेपरे येणे, टॉन्सिल, हार्निया या व्याधींपासून सुटका मिळते, असे मानले जाते. आजकालचे आई वडील मुलींचे नाक टोचत नाही त्यामुळे  नथ घालण्याची प्रथा आजकाल कमी होत चालली आहे. घातलीच तर ती चीमट्याची नथ असते. पण नथ घालण्याने कफाच्या व नाकाच्या रोगांपासून बचाव होतो आणि स्त्रियांच्या डाव्या नासिकेतून जाणाऱ्या काही रक्तवाहिन्या गर्भाशयाशी सुद्धा जोडलेल्या असतात. त्यामुळे ह्या बिंदूवर टोचवून घेतल्याने स्त्रियांना प्रसुतीपीडा कमी होतात व बाळंतपणात फार त्रास सहन करावा लागत नाही व प्रजननाशी संबंधित सगळे अवयव सुदृढ राहतात असे म्हटले आहे.
     सुश्रुत संहितेचा “अध्याय १९ चिकित्सा स्थान” यात नाक टोचवून घेण्याचे महत्व सांगितलेले आहे. बाळंतपण सोपे होण्याव्यतिरिक्त स्त्रियांचे व ऋतुप्राप्ती झालेल्या मुलींचे नाक टोचल्याने त्यांना मासिक पाळीच्या वेळी अतिरिक्त रक्तस्राव होणे, पोट दुखणे, कंबर दुखणे, ऍनिमिया होणे हे त्रास कमी होतात. डॉक्टरांचे म्हणजेच मॉडर्न विज्ञानाचे असेही म्हणणे आहे की आपल्या शरीरातील नाकाचे आणि कानाचे बिंदू टोचून घेऊन धातू वापरल्याने अंगातील वात ताब्यात राहतो. त्यामुळे नाक टोचवल्याने ऍक्युप्रेशर होऊन हात पाय अकडणे, फीट येणे, अंगात कळा येणे, चमक निघणे, हाता पायांत गोळे येणे, हात पाय वाकडे होणे हे सगळे वाताचे प्रकार आपल्याला टाळता येतात. आपल्या या सर्व जुन्या आणि मागासलेल्या परंपरा चालीरीतींना वैदिकदृष्ट्या महत्व आहेच सोबतच शास्त्रीयदृष्ट्या देखील महत्व आहे.
     अलीकडच्या काळांत मंगळसूत्र घालणे स्टाइल किंवा फॅशन स्टेटमेंट नाही असा विचार रुजत असल्याने स्त्रिया मंगळसूत्र घालण्याचे टाळतात.  मंगळसुत्रातील धातु हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे सोने किंवा चांदी या धातूंपासून तयार केले जाते. या दोन्ही धातूंमुळे स्त्रियांचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते, सोबतच रक्तदाबाचा आजार होत नाही आणि असला तर तो नियंत्रणात राहतो. अर्थात यासाठी मंगळसुत्राचे स्थानही महत्वाचे असते. लांब मंगळसूत्र पोटवर ज्या ठिकाणी येते तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. अनाहत चक्र मनाशी संबंधित असते. मंगळसुत्रातील दोन वाट्यामधून येणारी एनर्जी अनाहत चक्राला मिळते त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढून मन शांत राहते आणि स्त्रियांची आत्मिक शक्ती वाढते. सोबतच गळ्याभोवती इतर दागिने परिधान केल्याने गळ्याच्या विशिष्ट भागांवर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यांतील तेज पुष्कळ वेळ टिकून राहते. गलगंड व मानेखालची हाडे यांच्यावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचा प्रभाव कमी होतो. गळ्याच्या सर्व संभाव्य रोगांवर ही आभूषणे घालणे फायदेशीर मानले जाते.
     बांगड्यांची जागा आता ब्रेसलेट नी घेतली आहे. पण स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडय़ांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यांवर या बांगडय़ांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असे मानले जाते. बांगडी मनगटावर घासली जाते ज्याने हाताचं रक्त संचार वाढतं. हे घर्षण ऊर्जा निर्माण करतं ज्याने लवकर थकवा जाणवत नाही. बांगडी घातल्याने श्वासासंबंधी आजार, हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते. बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत मिळते. तुटलेली बांगडी घालू नये. याने नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. बाजूबंद हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात. हा फक्त हृदयाचीच कार्यक्षमता वाढवत नाही तर खांदा व हात यांना ज्या वेदनांचा त्रास होतो, त्यापासून सुटका करते. बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते, असे मानतात. कंबरपट्टा कमरेला घालणाऱ्या महिलांची पचनशक्ती वाढते व मासिक पाळी योग्यप्रकारे होते. त्यांना कंबर दुखणे, पाठदुखी वगैरे तक्रारींना तोंड द्यावे लागत नाही, असे मानले जाते.
     आजकाल मुली पायांमध्ये हलके आणि ट्रेंडी पैंजण घालणं पसंत करतात.ज्याला अँकलेट म्हटलं जातं. तर काही महिला वेगवेगळ्या डिझाईन्सच्या  पैंजणांनाही पसंती देतात. चांदीच्या पैंजण पायाला वारंवार घासल्यामुळे पायाची हाडं मजबूत होतात असं म्हटलं जातं. तसंच चांदीच्या शीतलतेमुळे शरीरातील उष्णताही कमी होते. तसेच महिलांनी चांदीचे पैंजण घातल्याने मासिक पाळी मध्ये होणाऱ्या वेदनांपासूनही सुटका होते. पैंजण घातल्यामुळे इन्फर्टिलिटी व हार्मोंससंबंधी समस्यांपासून सुटका मिळवून देण्यात मदत होते. पायातील पैंजणामुळे महिलांच्या शरीराचं रक्त संचरण योग्य होतं. ज्यामुळे जास्त एनर्जेटीक वाटतं. विवाहित स्त्रिया पायाच्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही. दोन्ही पायात जोडवी घातल्याने हार्मोनल सिस्टम योग्य रित्या कार्य करतं. जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो. जोडवी ऍक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्याने शरीराचे खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात. जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारण क्षमता निरोगी ठेवते. याने मासिक पाळी नियमित होते.
     विना औषधी जर रोग आणि व्याधी दुर होत असेल तर हे दागिने घालण्यात काहीच अडचण नाही त्यामुळे स्त्रीचे सौंदर्य खुलूनचं दिसेल. आणि आपल्या संस्कृतीचे सुध्दा जतन करता येईल. मात्र केवळ परंपरा म्हणून नव्हे तर स्त्रिच्या आरोग्यासाठी हे अलंकार किती उपयुक्त आहे याची माहिती घेतली तर पंरपरेचे वैज्ञानिक महत्वही लक्षात येते.
     स्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूरक आहेत परंतू निर्सगाने दोघांचे वेगळे स्वरूप आखले आहे. मन आणि तन यात स्त्री ही पुरुषापेक्षा वेगळी आहे. म्हणून हा दागिन्यांचा घाट घातला आहे. अर्थात दागिने घालावे की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे. त्याबद्दल कुणीही सक्ती करणे योग्य नाही.
     सदर लेखातील माहिती, सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फोटो – गुगल साभार …
पल्लवी चिकारे-पळसकर.
(नागपूर)

पल्लवी प्रकाश चिकारे, नागपूर. पत्रकार, सामाजिक विषयाच्या अभ्यासक.

Leave A Reply

Your email address will not be published.