देवयानी.
देवयानी.
टिपूर चांदणं नि दुधाळ केशरी प्रकाश अंगावर पडताच ती हरखून गेली. टक लावून पूर्णचंद्राकडे बघू लागली. मधूनच तिची सलज्ज नजर ‘त्याच्याकडे’ जायची. त्यानेही तिच्याकडे तसेच मिस्कील प्रेमभरे पाहिले की ती बावरून वहायलाच लागे. पण वाहून वाहून जाईल कुठवर? जिथवर जाई तिथवर तोही उडत येई. विशाल, मजबूत, पुरुषी पंख जे लाभले होते त्याला. त्या काळ्याकथ्थ्या पंखांवर, त्याच्या बलशाली देहबोलीवर ती पाहता क्षणीच अनुरक्त झाली होती. नभांगणी कोजागिरीचा विशेष चंद्र होता. त्या पिठाळ प्रकाशात तीही चकाकता नवलखा हार घातल्यासारखी चमचमत होती. उत्तररात्रीचे तेजपुंज चंद्राळ किरण केतकीच्या बनातील तिच्या ‘त्या’ विशिष्ट प्रवाहाजवळ पोहोचलेत की ती तिचे जलमय अंग सोडून स्त्रीरुपात प्रकटणार होती. तिला वरच तसा होता. तिची नदीमाता नर्मदा नदीच्या कुळातील असल्याने त्या सर्व कुलीन नदयांना पौर्णिमेच्या राती स्रीरुप धारण करता येईल असा आशीर्वाद प्राप्त होता. देवयानी नाव तिचे! नुकतेच सोळावे वर्ष लागलेले. अल्लड कुमारिका. प्रेमपाशासाठी उत्सुक अभिसारीका. त्यातच तिला ‘तो’ दिसला, खगयोनीतला देखणा, रुबाबदार, शिकारी पक्षी. ‘व्हिक्टर’. हो, धिटाईने विचारलेच तिने त्याचे नाव, गाव, मूळ ठिकाण. कारण तो या प्रांतातील वाटत नव्हता. ‘विदेशी’ असावा. भारद्वाजापेक्षाही भला मोठा. तगडा, घाऱ्या डोळ्यांचा. गळ्याजवळ हिरवा वळेसर. तिच्यासारखे जर त्यालाही मनुष्यरूप घेता आले असते तर किती आकर्षक, दमदार पुरुष दिसला असता तो. गळ्यात पाचूचा सर घातलेला. ती कल्पना करायची त्या रूपाची. त्या प्रेमालापाची. नदीरूपात असताना तिला कुठे त्याला आपणहून स्पर्श करता यायचा? तो तिच्यावर झेपावला तरच तिला त्याचा उन्मुक्त आतुर स्पर्श लाभायचा. ती मोहरायची. लाटा उंचावत छणछण नाचायची. तो खुळ्यासारखा पहायचा. पुन्हा पुन्हा तिला खेटायचा कवटाळायचा. अगदीच निराळ्या योनीतल्या त्या दोघांच्या या प्रेमलिलेवर आजूबाजूच्या तरुवेली, वृक्षसंपदा, पशुपक्षी अतिशय नाराज होते. हा मिलाफ अशक्यकोटीतला असेच ते तिला कायम सांगत. प्रेमात आकंठ बुडालेली ती त्यांचे अजिबात ऐकत नसे. तिचा जीव दिवसेंदिवस व्हिक्टर पक्ष्यात गुंतत चालला होता. व्हिक्टरशी चिरमिलन घडावे म्हणून शिवशंभूची एक तप अखंड आराधना करण्याचाही तिचा मानस होता. महादेव प्रसन्न झालेच तर ती योनीबदल मागणार होती. स्वतःला विहंगरूप देण्याचा हट्ट करणार होती. तिच्या या मनसुब्याची कल्पना आल्याने आसपासची जीवसृष्टी थोडी भेदरली होती. त्यांच्या या लाडक्या देवयानी नदीने खरेच पक्षिणीचे रूप घेतले तर शेतशिवाराला, रानावनाला पाणी कोण पुरविणार? त्या भागातील ओहोळ, ओढे, विहिरींसाठी तर देवयानीच जीवनदायिनी होती. हळुवारपणे समजविल्यानंतरही देवयानी मानत नव्हती. व्हिक्टरला समजवायचा तर प्रश्नच येत नव्हता. त्याच्या अंगभूत शिकारी बाण्यामुळे इतर पक्षी त्याच्या खूप दूर रहात. अन् झाडांची भाषा त्याला कळत नसे.देवयानीची भाषा तरी त्याला कळते का हा सवाल तरुराईंच्या मनात उमटे पण सध्या मनातल्या शंकांना स्थान द्यायची वेळच नव्हती. देशभर सुरू असलेला स्वातंत्र्यलढा अंतिम टप्प्यावर आला होता. पारतंत्र्याची बेडी झुगारून द्यायला उभा देश पेटून उठला होता. त्याला त्यांचाही भाग अपवाद नव्हता. तिथल्या घनदाट वृक्षांच्या बऱ्यापैकी निर्जन परिसरात स्वातंत्र्यप्राप्तीची रणनीती आखायला अनेक स्वातंत्र्यसैनिक येऊन लपले होते. त्यात भूमिगत क्रांतीवीर जनार्दन पांडे याचा प्रामुख्याने समावेश होता. स्वातंत्र्यासाठी तो देत असलेल्या कडव्या झुंजीने जेरीस आलेले इंग्रज त्याला पकडायला जंग जंग पछाडत होते. तो हुलकावणी देण्यात यशस्वी ठरत होता. जनार्दन पांडे याच्या वास्तव्याने ग्रामस्थांचीच नव्हे तर अख्ख्या पंचक्रोशीची छाती मानाने फुगली होती. झाड, पान, पाचोळा, पक्ष्यांनाही जनार्दनचे वीररसयुक्त बोलणे ऐकून ब्रिटिशांविरुद्ध स्फुरण चढे. आपलेही स्वातंत्र्यलढ्यात योगदान असावे असे वाटे. पण बापुड्या झाडाझुडपांना, पशुपक्ष्यांना ते व्यक्त करता येत नसे. ते जनार्दनच्या सहवासावरच समाधान मानत. आपल्या पाण्याचा घोट जनार्दनने घेतल्यावर देवयानीलाही हर्ष होई. ती अंतरातला सारा गोडवा पाण्यात ओतून अधिकाधिक गोड पाण्याने जनार्दनची ओंजळ भरे. ” किती मधुर रे देवयानीचे पाणी. क्षणात तहान मिटते बघ ” जनार्दनचे हे तृप्त शब्द तिला धन्य करे. शालीनतेने पदर सावरावा तशी ती हळू वाहू लागे. जनार्दनच्या मुखातून स्वातंत्र्यासाठी जीवाची होळी करणाऱ्या जिगरबाजांची गाथा ऐकताना ती तिथे तासनतास रेंगाळत राही. तिच्याही कोवळ्या मनात व्हिक्टरसारख्या विदेशी पक्ष्यावर जडलेला जीव नि गुलामगिरी झटकण्यासाठीची तगमग सतत सुरू असे. आज मध्यरात्रीनंतर याविषयी व्हिक्टरशी बोलायचे तिने नक्की केले. ती स्रीरूपात येत असल्याची व व्हिक्टरची भाषा तिने त्याच्या नकळत आत्मसात केल्याची नवलभेटही तिला त्याला द्यायची होती. रात्र चढू लागताच तिने व्हिक्टर मुक्कामाला असणाऱ्या झाडाला आपल्या सलीलअंगाने हळुवार ढुशी दिली. झाड हलताच व्हिक्टरचा डोळा मोडून तो तिच्या मागे उडत येणार असे ठरलेच होते. प्रेमाचे विविध स्वप्न रंगवत ती पुढेपुढे वाहू लागली. केतकीचे बन जवळ आले तरी व्हिक्टरच्या पंखांची फडफड ऐकू येत नव्हती. व्हिक्टर गाढ झोपला की काय? मागे जाऊन बघावे की काय? तिने ‘ये’ म्हणावे नि त्याने ‘न’ यावे असे सहसा घडत नसे. तिला पुष्कळ काळजीही वाटली. आपले अद्भुत सर्वांगसुंदर स्रीरुप बघायला व्हिक्टर मुकणार का, या शंकेने ती खट्टूही झाली. केतकीच्या बनाआधी किर्र अंधाऱ्या झाडीत आडोशाला तिला शुभ्र अश्व बांधलेला दिसला. ती थबकली. इतक्या अपरात्री कोण मुसफिर वाट विसरला असावा? ती शोधक नजरेने काळोखात अदमास घेऊ लागली. इथे ना धड सूर्यकिरण पोहोचत ना चंद्राचा उजेड. तेव्हढ्यात तिच्या कानावर अति धीम्या स्वरात कुजबुज आलीच. तिने पाण्याचा स्रोत अलगद तिकडे वळवला. गडद अंधुकतेत नजर रोवली. थोड्यावेळाने दोन धूसर आकृत्या तिला दिसू लागल्यात. त्यापैकी पहिली तिच्या व्हिक्टरची होती. दुसरी कुणा इंग्रज ऑफिसरची. तिच्या हृदयात अनुरागाचा वसंत फुलवणारा व्हिक्टर त्या ऑफिसरच्या खांद्यावर विराजमान होता. ती खुशीत उचंबळलीच. घोडा या फिरंग्याचा वाटतं. खांद्यावर पदक असलेला तो इंग्लिश इसम व्हिक्टरला शाबासकी देत होता. व्हिक्टर हरकाम्या नोकरासारखा आशाळभूत हसत होता. आपण ज्याच्यावर प्रेम केले त्याला अशा दुय्यम भूमिकेत तिला बघवेना. त्या व्यक्तीपुढे असणारा व्हिक्टरचा शरणागत भाव तिला मुळीच रुचला नाही. ती जीवाचे कान करून त्यांचे संभाषण ऐकायचा प्रयत्न करू लागली.
“हे sss व्हिक्टर, थँक्स फॉर द ऍड्रेस. नाऊ जनार्दन इज इन माय हँड. आय विल शूट हिम इमेजीएटली. गुड जॉब माय पेट, गुड जॉब ” ‘पेट ?’ हे शंभूनाथा, मी हे काय ऐकतेय? ती थरथरलीच. म्हणजे व्हिक्टर हा इंग्रजांचा जासूस आहे ? गुप्तहेर ? ज्याला इथे जनार्दन सारख्या निर्भीड वीराच्या हेटाळणीवर पाठविले ? जेणेकरून बेसावध जनार्दनला पकडून ठार मारावे व स्वातंत्र्यसंग्रामातील लखलखता दुर्मिळ हिरा संपवावा ? शी, आपण ज्याच्यावर बलाढ्य राजस पक्षी म्हणून प्रेम केले तो प्रत्यक्षात इंग्रजांचा पाळलेला गुलाम पक्षी निघावा ? इतकी फितुरी ? आपल्यासोबतही ? देवयानी फार दुःखीकष्टी झाली. अगणित उलटसुलट विचारांच्या आंदोलनांनी तिची मनःशांती ढळली. डोळ्यातून घळाघळा अश्रू टपटपू लागले. नदीमातेची तीव्रतेने आठवण आली. कुशीत घेऊन आंजारायची गोंजारायची नदीमाय तिला. जराही कुठे दुखू नये म्हणून फार जपायची. सतत काहीतरी मोलाचे सांगत असायची. “आपल्या कुळातील नदीकन्यांना दगाबाज जोडीदाराचा शापच आहे गं देवयानी. नर्मदा पणजीला सोनभद्र नदाने फसविले. ब्रह्मांडातील थोरामोठ्यांच्या साक्षीने ठरलेल्या विवाहाच्या काही आठवडे आधी तिची दासी जुहीलाशी कपटाने लग्नगाठ बांधली. खरेतर नर्मदा पणजीने जुहीलाला कधीच दासी मानले नव्हते. ती जुहीलाशी सदैव मित्रत्वाने वागायची.” “न जाणे कसा काय पण सोनभद्र नद जुहीलाच्या कह्यात गेला. ठरलेला विवाह, नर्मदा पणजीच्या हळव्या आणाभाका, वडीलधाऱ्या नद-नद्यांचा आब सारे विसरला. पणजीचे लग्नघर थुईथुई आनंदात तल्लीन असताना त्यांना गाफील ठेवून रातोरात जुहीलाशी विवाह करून मोकळा झाला.” “अतिशय निकटच्या दोन व्यक्तींनी हृदयावर केलेला हा मरणप्राय खोल घाव नर्मदा पणजी सोसू शकली नाही. ती खचून तुटून गेली. आक्रंदत राहिली. स्वप्नपूर्तीच्या नाशाने बिथरली. कुठलेही शब्द तिला समजवायला अपुरे पडू लागले. तिची जीवनेच्छाच नष्ट झाली. आंतरिक प्रफुल्लित उर्मीने सतत उसळणारी ती, एके दिवशी कुणाचाही निरोप न घेता आकांताने उलटी वहायला लागली नि पाहता पाहता अरबी समुद्रात विलीन झाली.” नदीमातेकडून, सरितामावशीकडून असंख्य वेळा नर्मदापणजीची ही कथा ऐकून देवयानी हळहळायची. निर्दयी सोनभद्र नदाचा राग यायचा. ती खूप शोधायची नर्मदापणजीला. कधीमधी आडवळणात दिसायचीही एकाकी पणजी पण आता पणजीने पारलौकिक तत्वात मन रमविले होते.
ओंकारेश्वराच्या ध्यानात सतत मग्न असायची ती. इतकी की तिच्या जळातला, तिरावरचा प्रत्येक दगड न् खडा शिवलिंगासारखा पवित्र झाला होता. लोकं दुरून दुरून त्या शिवलिंगांची पूजाअर्चा करायला यायचे. पणजीची मनोभावे प्रदक्षिणा व दर्शन पृथ्वीवासीयांसाठी पावन धार्मिक कार्य झाले होते. तीही आपल्या मैत्रिणींसह पणजीची परिक्रमा करायची. नजरानजर होताच पणजी लाडक्या देवयानीकडे बघून अतीव मायेने हसायची परंतु कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायला थांबायची नाही. भरघोस आशीर्वादाचा हात उंचावून वेगाने पुढे लुप्त व्हायची. जणू पणजीला नकोच होत्या मागच्या निमिषभरही आठवणी. कटू अनुभवांचा मूक उल्लेखही. “तू प्रेमात पडताना शंभर वेळा विचार करशील बाळे. कुणाच्या मनातलं कधीच काही सांगता येत नाही”, तिच्या दहाव्या वाढदिवसाला तिचा वहायचा स्वतंत्र मार्ग दर्शवत नदीमायने तिला काही माहितीवजा कानपिचक्यांसह अशी कळकळीची सूचना केली होती, ती तिला नेमकी याक्षणी आठवली. आपल्याला कुठे दगा दिला व्हिक्टरने? तिच्या दुसऱ्या मनाने विचारलेच. प्रेम निसटू न द्यायचा दुसऱ्या मनाचा आटापिटा सुरू होता. त्या तडफडणाऱ्या मनाकडे सरळ दुर्लक्ष करीत तिने जनार्दनला कसे वाचविता येईल यावर विचार एकवटले. प्रीतीपेक्षाही स्वातंत्र्य मोलाचे ! जनार्दन वाचायलाच हवा. कसा ? कसा ? कसा ? कंबरेवरची पिस्तुल चाचपडत तो इंग्लिश इसम गुर्मीत वळला. त्याचा रोख गावाकडे जाण्याचाच होता. देवयानी भयाने दचकली. झटपट, विनाविलंब निर्णय घ्यायलाच हवा. काठावरचे बेडकं फुगवत तसा तिने सर्व शक्तीनिशी देह फुगवला. लयबद्ध शिस्तीत वाहणाऱ्या नदीअंगाचा भलामोठा लोंढा झाला. काही कळायच्या आतच त्या अक्राळविक्राळ प्रपाताने इंग्रज अधिकाऱ्याला कवेत घेतले. त्याच्या खांद्यावरचा व्हिक्टरही धप्पकन पाण्यात पडला. व्हिक्टरचे ओले पंख जड होऊन त्याला उडताही येईना. श्वास गुदमरून तो पाण्यात हेलकावू लागला. देवयानीचे अंतःकरण हेलावले. आपल्या प्राणप्रियाला आपणच जलसमाधी देतोय या जाणिवेने ती कळवळली. व्हिक्टरने आज देशाला धोका दिला, उद्या तिलाही देऊ शकतो. ती आता ठाम झाली. वहात वहात तिने त्यांना गावापासून कोसो दूर आणले. इंग्रज अधिकाऱ्याचे प्राण उडाले होते. तर अर्धमेला व्हिक्टर तिला काकुळतीने जीव वाचवायची याचना करत होता. प्रेमात घेतलेल्या शपथा आठवून देत होता. तिलाही स्मरत होते सारे. ती कुठे काय विसरली होती ? ते व्हिक्टरचे तिच्या कायेवरून उडणे, तिच्या रोमारोमात त्याचे प्रतिबिंब पडणे. तिचे डोळे काठोकाठ भरून आले. चारहीकडून झेपावणाऱ्या लाटांमध्ये तिने व्हिक्टरला अंतःकरणाशी घट्ट धरले. “तुझे प्रेम सच्चेही असेल व्हिक्टर, तू कदाचित तुझ्या कर्तव्याला प्राधान्य दिले असशील, पण मलाही माझा देश, देशवासी प्रिय आहे. मी तुमची गुलामगिरी स्वीकारायला माझ्या माणसांचा बळी देऊ शकत नाही. मला माफ कर प्रियतम. माफ कर” ती व्हिक्टरच्या कानात पुटपुटली. व्हिक्टरच्या केविलवाण्या नजरेने आपल्या मनात दयाभाव जागू नये म्हणून तिने पाणावले डोळे गच्च मिटून घेतले. व्हिक्टर जगण्याची भीक मागत होता. सुरेल सहजीवनाचे आश्वासन देत होता. ती बधली नाही. आपला शेवट जाणून व्हिक्टरने तिच्याभोवती पंख पसरायचा निष्फळ प्रयत्न केला. ती त्याच्या आवाक्यात येणारच नव्हती. तिचा निश्चय कठोर होता. त्याला प्रेमाने बिलगत ती कमालीच्या जलदगतीने गिरक्या घेऊ लागली. व्हिक्टरचा श्वास अडखळत मंद होऊ लागला. त्याची मान कलली. देवयानी मलूल झाली. डोह होताच तिथे. क्षणात व्हिक्टर डोहाच्या उदरात गडप झाला. तळाशी निश्चेष्ट पडला.अविरत पाझरणारे डोळे जराही न पुसता देवयानी त्वरित सागराकडे प्रवाहित झाली.
– जयश्री दाणी
मो. – 7620690117