धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज – भाग १.
धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज.
भाग १.
मै कैलास का रहनेवाला।
मेरा नाम है शंकर।
दुनिया को समझाने आया।
कर ले कुछ अपना घर।
श्रीशंकर महाराजांचे चरित्र सर्वार्थाने लोकविलक्षण आहे!परब्रह्माने पंचमहाभूतांची वस्त्रेच जणू काही काळ चढवली होती आणि देह धारण करून ते ब्रह्म धरतीवर अवतरले होते!श्रीशंकर महाराज जीवन्मुक्त होते.ते अवधूत स्वरूपात असत.अवधूत किंवा सामान्य भाषेत ज्याला अवलिया म्हटले जाते, असा सत्पुरुष हा सर्व विधिनिषेधांच्या पलिकडे असतो. त्यामुळे त्यांचे चरित्र अवधूताच्या लक्षणेनेच लिहावे लागते.त्यांना सामान्य मनुष्याच्या कसोट्या लावून भागत नाही.अशा सिद्धाने सिद्धीच्या योगाने सहजपणे केलेली एखादी घटना लोकांना चमत्कार वाटते,जेव्हा की ती गोष्ट चमत्कार नसून त्यांच्यातील योगबलाची प्रचितीमात्र असते!
‘अवधूत गीता’ या प्रासादिक ग्रंथात अवधुताची लक्षणे वर्णन केली आहेत.
यादव वंशाचे नाव ज्याच्यावरून पडले त्या ययाती पुत्र यदूला अवधूत स्वरूपातील दत्तगुरू दिसतात. अवधुताची लक्षणे सांगणारे ते वर्णन पुढीलप्रमाणे आहे.-अवधूताचे शरीर निजतेजाने प्रकाशमान झालेले होते. त्याने ब्रह्मसूत्र धारण केलेले होते.आंतरिक प्राणांची समता स्वाभाविकपणे झालेली दिसत होती.कोणत्याही धारणेशिवाय प्राणायाम सुरू आहे हे दिसत होते.त्याचे डोळे जरी बाह्यसृष्टी पहात असले तरीही तो कशाकडेही रोखून पहात नव्हता.त्याचे पहाणे जणू सर्वांगाने घडत होते.आपण एवढ्या भयाण वनात एकटेच आहोत याचे त्याला भान नव्हते.सर्वत्र समता पाहणारी त्याची ज्ञानदृष्टी काही वेगळीच दिसत होती. ही सारी अकर्तेपणाची अहंकार शून्य लक्षणे पाहून यदुच्या मनात त्याच्याविषयी पूज्यभाव निर्माण झाला.त्याने अवधुताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचे पूजन केले आणि नम्रपणे तो म्हणाला,” अद्भुत अशा ज्ञानाने संपन्न स्वामी चरणी मी ययातीपुत्र यदु प्रणाम करतो.तुमच्यापाशी असलेले समाधान सर्व प्रकारची कर्मकांडे करून व यम नियमांचे पालन करूनही प्राप्त होत नाही.तुम्ही बालकासारखे निर्मळ आणि तपोवृद्ध आत्मज्ञानी माणसासारखे संपन्न असे एकाचवेळी आहात.आजवर मी नरजन्माचे इतके सार्थक रूप पाहिलेले नाही.तुमच्याकडे पाहून चित्ताला शांती व प्रसन्नता प्राप्त होते.तुमच्याजवळ ‘मी-तू पणा’ नाही त्यामुळे तुम्ही जगाच्या दृष्टीला वेडे वाटू शकता,पण तुम्हांला खरे ओळखणारे जाणतात की निजबोधाने तृप्त झालेले तुम्ही कशानेही विचलित होत नाहीत.तुम्ही आत्मानंद मिळवला आहे.मी जगाच्या दुःखाग्नित पोळून निघत आहे.तुमच्या शांतीचे रहस्य मला सांगावे!”
यदु राजाने अवधूताला जे रहस्य सांगण्यासाठी विनवले ती गोष्टच श्रीशंकर महाराजांच्या चरित्र व उपदेशातून मिळवली पाहिजे,ती म्हणजे आत्मशांती!श्रीशंकर महाराज योगिक सिद्धी प्राप्त सत्पुरुष होते,आणि ईश्वराच्या कर्तुम,अकर्तुम व अन्यथाकर्तुम शक्ती त्यांच्या जीवनात पदोपदी दिसून येत असत.मात्र ते सदैव सांगत की, मोक्षमार्गातील साधकाने सिद्धिंना प्राधान्य देऊ नये.चमत्काराने भारावून जाऊ नये.साधनेत गुप्तता बाळगावी,श्रीज्ञानेश्वरीचे वाचन मनन करावे आणि नामस्मरण करायचे असेल तर स्वामी समर्थांचे करावे!
श्रीशंकर महाराज हे नाथपंथी सिद्ध अवधूत होते हे अनेक प्रसंगांवरून दिसून येते. नाथ संप्रदायाचे आध्यात्मिक क्षेत्रात सगळ्यात मोठे योगदान म्हणजे त्यांनी मतमतांतरे असलेल्या साधकांना त्या धारेतून बाहेर काढले व अद्वैताच्या प्रवाहात आणले.त्याच प्रमाणे नाथपंथाने चाकोरीबद्ध गृहस्थी साधकांना परमार्थाची रीत
समजावली.त्यांनी स्त्रियांना,तथाकथित शूद्र-अवर्णांना आध्यात्म साधनेचा अधिकार दिला.सर्व प्रकारचे भेदाभेद निपटून टाकले.श्रीशंकर महाराजांनी नाथपंथाप्रमाणे कुंडले, रुद्राक्ष, मेखला,विभूती इत्यादी धारण केले नव्हते,मात्र त्यांची आंतरिक घडण नाथपंथाचीच होती हे लक्षात येते
महाराजांच्या चरित्राभोवती एक गूढ वलय आहे! समाधीच्या वेळी त्यांचे १६२ वर्षांचे वय असणे,समाधीनंतरही जपानमध्ये त्यांचे अस्तित्व असणे व त्या संबंधातले पुरावे एका जपानी माणसाने पुण्यातील शिष्यांना सादर करणे, लॉर्ड माउंटबॅटन याच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधांविषयी त्यांना प्रत्यक्ष भेटलेल्या लोकांनी सांगणे,विविध नावांनी वेगवेगळ्या स्थानी त्यांचे प्रसिद्ध असणे या बाबी त्यांच्या चरित्रात विविध रंगछटा भरतात!सिगारेट आणि उदबत्तीच्या धुराच्या वलयातून मी विश्वसंचार करतो असे महाराज म्हणत असत.इंग्रज लोकांशी इंग्रजीतून तर रशियन लोकांशी रशियन भाषेतून संवाद साधताना प्रत्यक्षदर्शी लोकांनी अनुभवून तसे पुराव्यानिशी लिहून ठेवले आहे.पेशव्यांच्या पंगतीला मी बसलो होतो हे महाराजांनी आपल्या शिष्यांना सांगितले होते! अशा प्रकारच्या अनेकांनी बोलून,लिहून ठेवलेल्या गोष्टींनी महाराजांच्या भोवतीचे वलय आणखीच गडद होते.एकदा तर महाराजांनी त्यांचे चरित्र लिहिलेल्या भक्ताच्या हस्तलिखिताचे कागद फाडून त्यामध्ये प्रसाद वाटला होता. आपले चरित्र कोणालाही कळू न देण्याची ही दक्षता देखील त्यांच्या चरित्राच्या गुढपणात भरच टाकते!!त्यांचे वय १०० च्या वर आहे हे ऐकल्यावर डॉक्टर धनेश्वर यांनी वैद्यकीय तपासणी करून पाहिली .सर्व प्रकारच्या वैद्यकीय कसोट्यांवर घासून पाहिले. त्यावेळी महाराजांनी सांगितले होते ते खरे ठरले!!अशा अनेक गोष्टी समजत गेल्या की या गुरुच्या चरित्राला कसे जाणावे कसे आत्मसात करावे ते सर्वसामान्य माणसाला समजत नाही.श्रीशंकर महाराजांच्या जीवनात अनेक प्रसंगी चमत्कार आढळतात. हे चमत्कार आपण त्यांच्या चरित्रातून गाळू शकत नाही.पण त्याचबरोबर जी.के. प्रधान,प्र के अत्रे,डॉ धनेश्वर,न्यायरत्न विनोद,प्राध्यापक देव यांच्यासारखी उच्चशिक्षित,तर्कनिष्ठ आणि सर्व घटना योग्य कसोटीवर पारखून घेणारी व्यक्तिमत्वे महाराजांच्या आजूबाजूला होती हे ही विसरता येत नाही.या सर्व विद्वज्जनांनी काही घटना नमूद करून ठेवल्या आहेत.
त्यामुळे हे चरित्र कसे समजून घेतले पाहिजे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुळात सत्व रज तमाने युक्त असलेल्या आपल्या मन, बुद्धी आणि भावनेने हे काहीही आकलन होऊ शकत नाही.त्यासाठी शास्त्रपूत दृष्टी विकसित झालेली हवी किंवा अनुभूतीच्या योगाने आलेली अविचल निष्ठा आणि श्रद्धा हवी.
जी. के .प्रधानांनी लिहिलेल्या ‘साद देती हिमशिखरे’ मध्ये गुरुदेव(श्रीशंकर महाराज)यांनी या प्रश्नाचे उकल एका संवादात केली आहे. ते म्हणतात,” जेव्हा तुमच्या मनावर कसलेही दडपण नसेल किंवा कसल्याही जुनाट परंपरेचे, विशिष्ट जीवनसरणीचे ,कौटुंबिक रूढींचे किंवा चालीरीती राखण्याचे, काही गमावण्याचे काल्पनिक किंवा तत्वतः ओझे बुद्धीवर लादलेले नसेल, तेव्हा मन आणि बुद्धी आपले काम करायला स्वतंत्र असू शकतील. तशी ती मोकळी असतील, तरच कुठलाही अडथळावा निर्बंध न येता आत्मसंशोधन करण्याचे त्याचे सामर्थ्य वाढेल. विचारात प्रामाणिकपणा येईल. निरीक्षण अव्यभिचारी राहील आणि या सर्वांतूनच जी ‘कृती’ घडेल, ती खरी ‘मनःपूत’!अशा स्वतंत्र मनालाच जीवनात अत्यंत महत्त्वाचे ठरणारे अनुभव ऐकता येतात, पाहता येतात,अनुभवता येतात आणि हा जो साक्षात्कार,हे जे आत्मदर्शन त्यालाच म्हणतात देव…”
एकूणच महाराजांचे मूळ स्वरूप,त्यांचा वैचारिक गाभा समजून घेण्यासाठी खूप अविचल श्रध्दा निर्माण व्हायला हवी.’वेष असावा बावळा अंगी नाना कळा’ असे महाराज!त्यांनी त्यांची ख्याती कमीतकमी पसरेल असेच नेहमी पाहिले.ज्यांना आध्यात्मिक गती द्यायची होती त्यांना ते भेटत राहिले!!
(क्रमशः)
रमा दत्तात्रय गर्गे