धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज – भाग २.

0

धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज.

भाग २.

इसविसनाच्या १७८५ सालातील गोष्ट!नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर हे छोटेसे गाव.या गावी चिमणाजी म्हणून एक सद्गृहस्थ रहात होते. ते व त्यांची धर्मपत्नी दोघेही शिवभक्तपरायण होते.ते नित्य रुद्राक्ष पूजन करीत असत.मुखात सतत शिवनामावली असे.सोमवार, प्रदोष व्रत,लक्ष त्रिदलव्रत नित्य करीत असत.त्यांच्या संसारात सगळे काही असूनही संतती सौख्य नव्हते.त्यामुळे एक प्रकारचे अपुरेपण त्यांना जाणवत असे.अशीच एके दिवशी उपासना करून झोपले असतां चिमणाजीला एक अद्भुत स्वप्न पडले. त्यात एक साधू आला आणि तो म्हणाला की,”तुझी व तुझ्या पत्नीची महादेवावरील भक्ती पाहून देवाने तुम्हाला प्रसाद देण्याचे ठरवले आहे. तुमच्या गावच्या टेकडीवर असलेल्या दावल मलिक दर्ग्याच्या जवळ जा.तिथल्या दाट झाडीत व्याघ्रांनी रक्षण केलेले बालक पहुडलेले दिसेल.निर्भयपणे ते घ्या व घरी या.तुम्हाला कोणताही अपाय होणार नाही.”

पहाटे उठून चिमणाजीने हे स्वप्न पत्नीला सांगितले. ती म्हणाली अहो आपण रात्रंदिवस बाळाचा विचार करतो त्यामुळेच अशी स्वप्ने पडत असतील.
गावकऱ्यांनी पण असेच सांगितले. पण चिमणाजीला दुसऱ्या दिवशी रात्री पुनःश्च तेच स्वप्न पडले. तेव्हा त्याने पत्नीला म्हटले की,” एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे?दर्ग्याची वाट काही फार दूरची नाही.”
त्यानुसार दोघे पतीपत्नी निघाले.मुखाने नम:शिवाय नम:शिवाय जप सुरू होता.स्वप्नात सांगितल्याप्रमाणे दाट झाडीत दोघे शिरले,बघतात तो काय वाघांच्या गराड्यात एक गोंडस बाळ खेळत होते. सुरुवातीला त्यांना भय वाटले,पण सर्व परिस्थिती दृष्टान्ताप्रमाणे आहे तर आपण धाडस करून बाळापर्यंत पोहोचले पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले.त्याप्रमाणे चिमणाजीने बाळ उचलून घेतले व पत्नीच्या जवळ दिले.वाघांनी कोणताही त्रास दिला नाही. ते दाट जंगलात निघून गेले.

इकडे बाळाचा हात मातेच्या उराशी लागताच तिला पान्हा फुटला,बाळाला तिने दूध पाजले आणि ते त्याला घरी घेऊन आले. अंतापुर एवढेसे गाव! त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. चिमणाजी आणि त्याच्या बायकोला भगवान शंकराच्या कृपेने पुत्र प्राप्ती झाली, इतकेच नव्हे तर वाघांच्या गराड्यातून त्यांनी ते बालक उचलून आणले व आईने छातीशी धरताच तिला पान्हा फुटला या गोष्टिंमुळे जो तो आश्चर्य व्यक्त करू लागला. ज्या दिवशी बालक मिळाले तो दिवस भगवान श्रीशंकराचा आवडता दिवस सोमवार होता!तर तिथी होती कार्तिक शुद्ध अष्टमी.एखादा बाळ हा असा स्वप्नात दृष्टांत होऊन आपल्या गावातल्या घरी वाढत आहे हे गावकऱ्यांना फारच कौतुकाचे वाटू लागले. त्यामुळे सारे जण बाळाचे कौतुक करायला वारंवार चिमणाजीच्या घरी येऊ लागले बाळ श्रीशंकराच्या कृपेने प्राप्त झाल्यामुळे त्याचेही नाव शंकर असेच ठेवण्यात आले.

दिसामाजी शंकर मोठा होऊ लागला.आई आणि वडिलांचे डोळे त्याला बघून निवत! शेजारीपाजारी सुद्धा त्याच्यावर फार प्रेम करत. लहानग्या शंकरला मात्र झाडापेरांची आणि मातीत खेळण्याची जास्त आवड होती. जसा जसा तो मोठा झाला तसा घरापेक्षा तो जवळच्या जंगलात झाडीतच रमू लागला.मित्रांना घेऊन तिकडेच तो खेळायला जात असे. एका ठिकाणी एका मोठ्या वृक्षाच्या गर्द सावलीत शंकर तासंतास बसून राही. हे झाड बेलाचे झाड होते. या झाडावरची पाने शंकराच्या मस्तकावर पडायची तेव्हा त्याला फार आनंद होत असे.
येथेच स्वामी समर्थांनी बालयोगी शंकराला स्पर्शदीक्षा दिली असे म्हटले जाते.
शंकर असा बाहेर राहतो यामुळे आई-वडिलांना काळजी वाटायची आणि तो परतून आला की ते दोघे आनंदित व्हावयाचे.काळजीचे कारणही तसेच होते. शंकरची शरीराची ठेवण थोडी वेगळी होती. तो आठ ठिकाणी वाकडा होता. चालताना थोडे लंगडत चालत असे. त्याचा चेहरा देखील वेगळ्याच धाटणीचा होता, डोळे अंमळ मोठे होते आणि हात गुडघ्याच्या खाली येत असत ,ज्याला अजानुबाहू असे म्हटले जाते.असा आपला बालक जंगलात गेला आणि त्याला नीट येता आले नाही,चालताना पाय दुखले तर अशी अशी मातेला काळजी वाटत असे. परंतु शंकर तिला सांगत असे तू माझी काळजी करू नकोस.त्याच्या त्या शब्दांनी तिला पुष्कळच धीर येत असे.
होता होता बारा वर्षे लोटली. शंकर हा वेगळेच तेज असलेला अद्भुत बालक आहे,त्याचे पाणी वेगळेच आहे याची जाणीव चिमणाजीला आणि सोबतच सगळ्या गावकऱ्यांना झाली.सगळ्यांना त्याच्या दैवी शक्तीची प्रचिती येत असे.
असेच एक दिवस शंकर आपल्या आईवडिलांना म्हणाला,”मला थोड्याच दिवसात गाव सोडून जावे लागेल. तसा मला आदेश आला आहे. मी तुमचाच मुलगा आहे, पण माझे कार्य इथे राहून होणार नाही.पण तुम्ही कष्टी होऊ नका,तुम्हाला लवकरच जुळी मुले होतील”
शंकर दुरावणार हे ऐकून आईवडील दुःखी झाले.पण आपल्या मुलाच्या या इच्छेचा त्यांनी मान राखला.
लवकरच त्यांना शंकर बोलल्याप्रमाणे जुळी मुले झाली. त्यानंतर आईवडिलांच्या चरणी मस्तक ठेवून शंकर मार्गस्थ झाला.
अंतापरातून निघालेले बालयोगी शंकर उत्तरेकडे अर्थात हिमालयाकडे निघाले. केदारेश्वर या ठिकाणी त्यांनी काही काळ निवास केला. आपले शरीर आठ ठिकाणी वाकडे असूनही बालयोगी शंकर भरभर हिमालयाच्या पर्वतरांगामधून फिरत असत. या काळामध्ये अनेक साधु-सत्पुरुष तपस्वी सिद्ध त्यांना भेटले. त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून शंकर महाराजांनी उच्च कोटीची साधना केली. त्यानंतर परत एकदा केदारेश्वरला येऊन शंकर महाराज एक तप तेथेच राहिले. त्यानंतर तेथून ते प्रयागराजला आले. प्रयाग तीर्थक्षेत्री सव्वा वर्ष राहून नियमित त्रिवेणी संगमाचे स्नान करीत महाराजांनी आपली साधना पूर्ण केली.

असे म्हटले जाते की तेथून महाराज एका इंग्रज साधकाला योगविद्या शिकवण्यासाठी त्याच्यासोबत विदेशामध्ये गेले. सर जॉन या नावाने महाराजांनी ब्रिटिश लोकांना उपदेश केला. महाराजांचा पेहराव हा नेहमी वेगवेगळ्या प्रकारचा असायचा. ते शर्ट पॅन्ट पासून तर धोतरापर्यंत आणि झब्बा पायजम्या पासून कद, उपरणे,छाटीपर्यंत सर्व प्रकारचे कपडे घालून सहजपणे वावरत असत. आफ्रिका व अफगाणिस्तान येथेही महाराज जाऊन आलेले होते.सातपुड्याच्या परिसरामध्ये सुपड्या बाबा म्हणून ते प्रसिद्ध होते. तेथील दरोडेखोरांना त्यांनी माणसात आणले.गुजरात खांदेश मध्यप्रदेश अशा सर्व परिसरात वेगवेगळ्या नावांनी महाराज राहिले! भ्रमंती करत करत पुन्हा एकदा महाराज महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत आले!!हीच त्यांची मुख्य कर्मभूमी होती,येथेच शंकरमहाराज ज्यांना मालक म्हणतात त्या स्वामी समर्थानी त्यांना अनुग्रह दिला होता.

महाराष्ट्रात महाराज प्रथम सोलापूरला आले. सोलापूर मध्ये दत्त चौक नावाचा एक चौक आहे, तेथे शुभराय मठ हे पावन ठिकाण आहे. या मठात जनार्दन बुवा महंत हे अधिपती म्हणून मठ सांभाळत असत. या मठामध्ये महाराजांचे अचानक आगमन झाले. त्यावेळी बुवा भजन कीर्तनामध्ये रंगून गेलेले होते. महाराज मठाच्या दारात येऊन उभे ठाकले आणि त्यांनी नाथपंथीयांची ओळख असणारी ललकारी दिली… ‘अल्लख!’त्याबरोबर जनार्दन महंतांनी दरवाजाकडे पाहिले आणि त्यांना साक्षात त्रैमुर्ती दत्ताचे दर्शन झाले! त्यांनी महाराजांच्या पायांवर लोटांगण घातले आणि त्यांना ते मठात घेऊन आले. बाकीच्या लोकांना आश्चर्य वाटू लागले मात्र जनार्दन बुवांना आलेली प्रचिती ही त्यांच्या काही वेगळीच होती. या शुभराय मठात जनार्दन बुवांच्या सोबत महाराज राहू लागले! मठामध्ये प्रत्यक्ष जनार्दन बुवा ज्यांना मानसन्मान देतात त्यांना इतर सर्व लोकही आदराने पाहू लागले. हळूहळू सर्वांना शंकर महाराजांच्या आध्यात्मिक अधिकाराची ओळख पटू लागली. त्यांना लोक श्रद्धेने नमन करू लागले.काही काळ तेथे राहिल्यावर एकदा महाराजांच्या मनात आले की अक्कलकोटला जावे.त्यांनी जनार्दन बुवांना आणि इतर काही भक्तांना सोबत घेऊन सोलापूर वरून अक्कलकोटला प्रयाण केले.तिथे समाधीच्या जवळ पोहोचताच त्यांना स्वामींच्या आणि आपल्या अंतरीची खूण पटली.त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले,समाधीवर अभिषेकच झाला.हे माझे गुरू माझे मालक आहेत अशा शब्दांत शंकरमहाराज स्वामींच्या विषयी बोलत असत.

अक्कलकोट वरून त्र्यंबकेश्वर व अन्य काही क्षेत्रांमध्ये भ्रमंती करून महाराज परत एकदा शुभराय मठामध्ये परतले.त्यांनी काही काळ येथेच रहाण्याचे ठरवले.महाराजांचा वेश हा नेहमी वेगवेगळ्या तर्हेचा असे. तसेच ते मनात येईल तेव्हा हवा तसा प्रवास करीत असत.त्यांचे आठ जागी वाकडे शरीर,लंगडत चालणारा पाय याच्या मर्यादा जर सर्व लक्षात घेतल्या तर त्यांनी हा प्रवास कसा केला असेल असा प्रश्न पडतो. एकदा महाराज स्वतःच म्हणाले होते की मी धुराच्या वलयांमधून हवी तिथे भ्रमंती करून येतो!बाकी काही असो पण ज्याला ज्याला म्हणून सन्मार्गाला लावायचे होते, त्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महाराजांनी हवा तसा प्रवास केला आणि साधकांना गती प्राप्त करून दिली.
(क्रमशः)
रमा दत्तात्रय गर्गे.

लेखिका ह्या वैचारिक,साहित्य ,तत्वज्ञान, इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या विविध विशेषांकात लेखन केले आहे. कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प.महाराष्ट्रच्या समन्वयक आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या सदस्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.