धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज – भाग ५.

0 31

धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज.

भाग५.

१९३० साली डॉ.धनेश्वरांना महाराजांनी येत्या काही दिवसांत चांगले ग्रहयोग आहेत,तेव्हा मी समाधी घेतो असे म्हटले.परंतु अद्याप मला सर्व विद्या तुम्ही दिली नाही, तेव्हा ही गोष्ट पुढे कधीतरी पहावी अशी विनंती डॉक्टरांनी केली.असा सूंदर योग नंतर सतरा वर्षांनी आहे,असे म्हणून महाराजांनी धनेश्वरांच्या इच्छेचा मान ठेवला. १९३० साली धनेश्वरांनी विनंती केली होती त्याला १९४७ मध्ये बरोबर सतरा वर्षे लोटली! महाराज सूचकपणे आता हे कपडे जुने झालेत नवीन कपडे करायला हवे अशा पद्धतीने आपल्या समाधी विषयी सांगत असत. तसेच काही जणांना त्यांनी समाधीची जागा देखील दाखवून ठेवली होती.एक दिवस महाराज म्हणाले सर्वजण खिचडी खायला या आणि त्या दिवशी स्वतःच्या हाताने महाराजांनी आपली आवडती मटार घातलेली आणि भाज्या घातलेली खिचडी शिजवली व सर्वांना दिली. या प्रसादा बरोबरच ज्ञानेश्वरीने आपलं जीवन कसं आनंदमय करावं आपण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमय कसें व्हावे याचा पाठही दिला. सर्व शिष्य मंडळी निघून गेली. डॉक्टर धनेश्वर, श्री गोसावी, ज्ञाननाथ रानडे, ढेकणे मामा- मामी,रावसाहेब आणि ताईसाहेब मेहंदळे एवढीच मंडळी उरली.महाराजांनी सर्वांच्या पाठीवरुन ,अंगावरून मस्तकावरून आपला प्रेमळ हात फिरवला. येत्या वैशाख शुद्ध अष्टमीला उत्तम ग्रहयोग आहे, त्या दिवशी हा आकारदेह धरामाईच्या कुशीत ठेवण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. नंतरच्या बारा तेरा दिवसात महाराज एकांतात राहिले.फारसे कोणाला भेटले नाहीत, कोणाशी बोलले नाहीत. नित्याची भक्तमंडळी सुद्धा दुरून त्यांचे दर्शन घेऊन परतत होती.

सप्तमीच्या दिवशी मौन सोडून त्यांनी मामींना एक कप चहा मागितला आणि ढेकणे मामाच्या घराच्या फडताळात एका लहान गादीवर स्नान करून ते बसले. मामांना फडताळाचे दार बंद करायला सांगून ते म्हणाले मी सांगेपर्यंत कोणीही दार उघडू नका. मी सूचना करेन.रात्रभर मामा-मामी दारासमोरच एका घोंगडीवर बसून राहिले.पहाटे चार वाजता फडताळातून आवाज आला,’ पुढची सोय करा!’

ढेकणे मामा मामींनी महाराजांचा देह समोरच्या सोप्यात आणून निजवला,व ज्ञाननाथ रानडे,रावसाहेब मेहेंदळे आणि न्यायरत्न विनोद यांना बोलावणे पाठवले. तोपर्यंत महाराजांनी देह ठेवल्याची वार्ता वेगाने पसरत होती. लोक जमा होत होते. त्या गर्दीतून मार्ग काढत न्यायरत्न विनोद महाराजांच्या जवळ जाऊन बसले. त्यांनी एक तांब्याची तार बाहेर काढली. एक टोक आपल्या कानाला तर दुसरे टोक महाराजांच्या हृदयाला लावले. न्यायरत्न विनोदांच्या तोंडून शब्द उमटले ते रावसाहेबांनी लिहून घेतले.हा महाराजांचा विशेष संदेश म्हणून मानला जातो. तो संदेश असा होता-” आत्मकलेपैकी एक कला, जनकल्याणासाठी समाधिस्थानात सदैव राहिल. माउलीचा आशीर्वाद,
जो जे वांछील तो तें लाहो-प्राणीजात॥”

यावेळी ज्ञाननाथ रानडे तिथेच विमनस्क अवस्थेत बसलेले होते.त्यांच्या मनात महाराजांचे शब्द घुमू लागले.त्यांनी डोळे बंद केले आणि ते तो संदेश जाणून घेऊ लागले.महाराज म्हणाले,”आळंदीची माऊली, जंगलीमहाराज, माळीमहाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर आणि पद्मावती या सहा ठिकाणांहून निर्माल्य आण आणि तू स्वतः ते माझ्या समाधिस्थानात घाल.” त्यांनी कसेबसे स्वतःला सावरत तो संदेश रावसाहेबांना सांगितला.रावसाहेबांनी गाडी व चालक जोडून दिला आणि एका प्रहरात ज्ञाननाथ रानडे सगळीकडची निर्माल्ये घेऊन आले.

सोलापूरहून ओमकारनाथ भस्मे यांनी सोलापूरवरून रेशमी कद आणला होता.तो महाराजांना नेसवण्यात आला.शाल घातली गेली.भक्त पुष्पहार,बेल-फुले,तुळशीहार आणीत होती.ते महाराजांच्या पवित्र देहावर वाहण्यात आले.नंतर ही महायात्रा टाळ मृदंग वाजवीत निघाली.

डॉक्टर धनेश्वरांचे सुपुत्र डॉक्टर नारायणदत्त धनेश्वर यांनी महाराजांच्या निर्वाणा विषयी लिहून ठेवले आहे.ते लिहितात,”सोमवारच्या सूर्योदया बरोबरच महाराजांच्या निर्वाणाची वार्ता सर्वत्र पसरली.समाधीची जागा महाराजांनी आधीच ठरवली होती.इतकेच नव्हे तर अंतयात्रेचा मार्ग देखील लोकांना सांगून ठेवला होता. बाबू गेनू चौकातल्या मामा ढेकणे यांच्या घरापासून सुरू झालेली ही महायात्रा काका हलवाई, दत्त मंदिर, अक्कलकोट स्वामी मठ, मंडईतला टिळक पुतळा,शनिपार, भिकारदास मारोती, पर्वती,अरणेश्वर, पद्मावती आणि अखेर कात्रज घाटाच्या अलीकडे त्यांनी दाखवलेल्या जागेवर येऊन थांबली. टाळ मृदंगाच्या गजरात श्री माळी महाराजांच्या उपस्थितीत सोमवार वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ च्या सूर्यास्ताच्या घटकाभर आधी साधारण पाच वाजता महाराजांचा पार्थिव देह काळ्याआईच्या मांडीवर तिचा मृण्मयी पदर निवांतपणे विसावला.”

महाराजांची समाधी जिथे आहे त्याला पद्मावती परिसरातील धनकवडी मठ असे म्हटले जाते.त्याकाळी तेथे अगदी कमी घरे होती.महाराजांना ती जागा फार आवडायची. ती मालपाणी नावाच्या एका व्यापाऱ्याची जागा होती.महाराजांविषयी त्यांच्या मनात आदरभाव होता. महाराजांनी मठासाठी ही जागा मला देशील का असे आधीच विचारून ठेवले होते आणि मग ती जागा आपल्या समाधीची असेही शिष्यांना सांगून ठेवले होते.धनकवडीची ती समाधीची जागा म्हणजे त्या काळी किर्र जंगल होते! लोक वस्ती नाही,आजूबाजूला केवळ झाडे आणि थोडी मोकळी जमीन.महाराजांचा प्रिय शिष्य बाब्या म्हणजेच बाबुराव रुद्र हा सर्वजण गेल्यावरही तिथेच बसून राहिला.परिसरात कुत्र्यांचा वावर होता.त्यांनी समाधी उकरली तर?बाबुराव तिथून हलतच नव्हते.थोड्या अंतरावर असलेल्या चार पाच घरी दुपारी भिक्षा मागायची आणि तिथेच तीन दगडांच्या चुलीवर जमेल तसें रांधायचे असे त्यांनी सुरु केले. त्यांचा समाधी रक्षणाचा निश्चय पाहून नंतर त्यांची पत्नीही तेथे आली.पत्र्याचा आडोसा व छप्पर करून ते राहू लागले.सोलापूर येथील भस्मे काका,कोराड गुरुजी,पेंटरकाका,फुलारी यांनी वर्गणी गोळा केली. ती बाबुरावांना दिली.त्यातून पत्र्याची शेड,दिवाबत्ती, नैवेद्य होऊ लागले. इतर ठिकाणाहून देखील वर्गणी येऊ लागली. पंचवीस वर्षे या रुद्र शंकराने आपल्या गुरुची सेवा केली. आज मठाचे भव्य स्वरूप दिसते, त्यामागे रुद्रशंकर मठात विसवलेल्या भक्ताची निष्ठा आहे.

महाराजांच्या तीन पादुका होत्या.त्यांतील एक धनकवडीमठात,दुसरी सोलापूर येथील जक्कल यांच्या मळ्यातल्या दत्त मंदिरात तर तिसरी शुभराय मठात स्थापन केलेल्या आहेत.

आजही श्री महाराज शक्तीरूपाने धनकवडी मठामध्ये आहेत. अवतारकार्य समाप्तीनंतरही श्रीशंकर महाराज भक्तांची भावजागृती करून,चित्तशुद्धी करून त्यांना आपल्या अस्तित्वाची प्रचिती देतात.
(समाप्त).
रमा दत्तात्रय गर्गे.

लेखिका ह्या वैचारिक,साहित्य ,तत्वज्ञान, इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या विविध विशेषांकात लेखन केले आहे. कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प.महाराष्ट्रच्या समन्वयक आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या सदस्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.