ध्येयनिश्चिती…!!
ध्येयनिश्चिती…!!
“काही माणसं स्वप्नात रमतात, काही वास्तवाशी सामना करतात, पण यशस्वी तेच ठरतात जे प्रयत्न आणि हिमतीने, स्वप्नांना सत्यात उतरवतात…!!”
सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आयुष्यात कुठलीही गोष्ट मिळविण्यासाठी प्रतिकुल परिस्थितीतही केलेली धडपड तुम्हाला आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. मात्र त्यासाठी गरज आहे ती म्हणजे,”ध्येयनिश्चितीची…!!” आज मला त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे आहे जी फक्त आणि फक्त आपली पुस्तकी शिक्षण घेत आहेत.
औपचारिक-अनौपचारिक शिक्षणातून तो पुढे आपले मार्गक्रमण तर करतो आहे पण आपल्या भविष्यासाठी कुठला मार्ग योग्य हे कदाचित त्याने ठरवलेलंच नसतं किंवा ठरवतांना तो कायम गोंधळातच असतो. खऱ्या अर्थाने ही बाब लागू पडते ती 10 वी ,12वी च्या विद्यार्थ्यांकरीता. या विद्यार्थ्यांसोबत जेव्हा-जेव्हा माझा संवाद झाला तेव्हा-तेव्हा एक बाब मला प्रखरर्षाने जाणवली ती म्हणजे…ध्येयच निश्चित नाही…!! आपल्याला पुढे काय करायचंय, कुठली क्षेत्र आपल्यासाठी योग्य राहील हेच माहीत नाही. क्षेत्र निवडतांना सतत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांची स्थिती जणू, बस स्टँड, रेल्वे स्टेशन जावं अन कुठल्या गाडीत बसावं हेच माहीत नसावं अशीच असते.
हा काळ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असतो,कारण याच काळात यांना खूप संकटांना सामोरे जावे लागते.
संकट…! हो संकटच…!! म्हणतात…”सोळावं वरीस धोक्याचं…!” ते काही चुकीचं नाही. मानसशास्त्र सांगतं की हा काळ म्हणजे…
“वादळी अशांततेचा काळ..!” या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, भावनिक व शारीरिक खूप मोठे बदल होतात, परिणाम स्वरूप भिन्नलिंगी आकर्षण, गटाने राहणे, सुंदर दिसावंस वाटणे, प्रेमात पडणे,नाजूक, हळवा पण तितकाच महत्वाचा काळ.
या काळात तो घडूही शकतो अन बिघडूही…!!
यामध्येच भर पडली आहे ती म्हणजे मोबाईल ची …! हे वेसनच मुलांना जडलंय,आणि त्या मुळेच सर्वकाही नडलंय. हे About Phone काय? ते आत्मविश्वासानं सांगू शकतील मात्र तितक्याच आत्मविश्वासानं…”भविष्यात पुढे काय..?”हे मात्र ते सांगू शकत नाहीत.
यांना 3G, 4G,व PUB G या बद्दल तर सखोल माहिती आहे,मात्र “गांधीजी” बद्दल यांना आठवण करुन द्यावी लागते. गेल्या शैक्षणिक सत्रात पर्यवेक्षक म्हणून 10 वी च्या परीक्षा केंद्रावर असतांना मला एका विद्यार्थ्यावर शंका आली म्हणून मी त्याला सहज उभा करून तपासले, मात्र आक्षेपार्ह असे त्याच्या कडे काहीही नव्हते. परंतु पेपर करीता तो अजिबात गंभीर नव्हता. सतत काहीतरी माकड चाळे करीत तो बसला होता.असे तो का करतोय? याचे उत्तर मला आजही मिळालेलं नाही. पेपर संपल्यावर कोऱ्या पानांवर रेषा ओढतांना मी आवर्जुन या महाशयांचा पेपर बघितला, तेव्हा लक्षात आले की सुरवातीचे काही प्रश्न…. हो…प्रश्नच त्याने लिहून ठेवले होते आणि संपूर्ण पेपर भर त्याने जय…PUB G असे लिहून ठेवले होते. हे सर्व बघितल्यावर मन सुन्नच झालं.
10 वी चं वर्ष आपण ज्याला “टर्निंग पॉईन्ट” म्हणतो…खरं तर यावेळी आपलं भविष्य निश्चित करायचं असतं अन अशावेळी एवढं जाणीवपूर्वक गाफिल आणि बेजवाबदारीने वागणं कितपत योग्य…! असं वागत असतांना त्याच्या चेहऱ्यावर मला एका क्षणालाही दुःख,किंवा अपराधी पणाची भावना दिसली नाही. अपराधी भावना हा शब्द मी आवर्जून इथे वापरला कारण, प्रत्येक मुलांना त्यांचे आई-वडील अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात,त्यांचे लाड-हट्ट पुरवितात,अश्यावेळी जर त्यांनी मुलांना गृहीत धरून पुढील सुखी-समृद्ध भविष्याचे स्वप्न रंगवीले असतील तर यात वावगं असं काय?मुलांच्या शिक्षणाकरीता त्यांच्या भौतिक सुखाकरिता त्यांनी राब राब राबवं…आणि मुलांनी त्यांचा अपेक्षाभंग करावा,हा अपराधच आहे.
मुला-मुलींनी दिलखुलास जगावं,स्वच्छदपणे वागावं,निर्भीड राहावं आणि हिमतीने आपल्या निश्चित ध्येयाला गाठावं …!!आपले आई-वडील आणि गुरुजनांच्या विश्वासास पात्र ठरून आपले विद्यार्थीदशेतील कर्तेव्य मात्र निमूटपणे पार पाडावे.
विद्यार्थी दशेत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपल्या अभ्यासाशी प्रामाणिक राहावं आणि यादरम्यान कुठल्याही भावनिक गोष्टींच्या आहारी न जाता आपल्या कार्याला सकारात्मक कृतीची जोड देऊन अधिकाधीक टक्केवारी घेण्यासाठी प्रयत्न करावा.कारण सद्यस्थितीत शिक्षण प्रणालीत फार मोठे बदल झाले आहेत,तसेच विद्यार्थ्यातही…!स्पर्धा खूप वाढली आहे आणि या स्पर्धेत टिकायचे असेल तर तुम्हाला एक सर्वगुणसंपन्न विद्यार्थी बनुनच उभं रहावं लागेल.अन्यथा या स्पर्धेच्या प्रवाहातून तुम्ही बाहेर कधी फेकले जाल, हे कळणार देखील नाही.
म्हणून सर्वप्रथम तर आपलं ध्येयनिश्चित करा…! आणि ते मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहा,अडचणींशी दोन हात करायलाही मागे हटू नका.
“भावनेवर आयुष्य निभत नाही,तत्कालीन वेळ निभते, पण आयुष्य काढायचं असेल तर व्यवहारीक दृष्टीनं विचार करा आणि कामाला लागा…!!”
श्री.मनोज वाडेकर
अकोला महाराष्ट्र @२६/०९/२०१९