दोस्त दोस्त ना रहा..…!

0

दोस्त दोस्त ना रहा..…!

होय तोच तो भारतातील जगप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष. भारतातील कुप्रसिद्ध “भारत तेरे तुकडे हजार” घोषणे मुळे भारतात प्रसिद्धी मिळालेला. तेव्हा त्याच्या सोबत सावली सारखा सोबत करणारा त्याचा मित्र होता, उमर खालिद ! त्या काळात भारतातील अनेक कार्यक्रमात ही दोघे सोबत असायचे. मात्र नंतर या मैत्रीच्या मध्ये आले राजकारण !

या दोघांवर एकसाथ गुन्हे दाखल झाले होते, एकसाथ दोघे गायब झाले होते, एकसाथच दोघे पुन्हा JNU मध्ये अवतीर्ण झाले होते, एकसाथ दोघांना पोलिसांनी अटक केलेली, एकसाथ दोघांना जामीन मिळाला. इथपर्यंत एकत्र असलेले हे मित्र या नंतर मात्र वेगळे झाले. देशविरोधी घोषणांच्या प्रकरणात जामीन मिळल्यावर मात्र दोघे JNU मध्ये वापस आले, मात्र तेव्हा भारतीय वृत्तपत्रसृष्टी आणि राजकीय पक्षांनी आपला नायक म्हणून समोर आणले कन्हैय्या कुमारला ! खालिद मागेच राहिला. 

त्या नंतर भारतभर कन्हैय्या कुमार याला वेगवेगळ्या राजकीय पक्षांद्वारे भाषणाला बोलवण्यात आले, वेगवेगळ्या सरकारविरोधी आंदोलनाचा मुख्य चेहरा बनला तो कन्हैय्या कुमार ! खालिद या सगळ्या राजकारणात कुठे तरी हरविल्या गेला. 

महाराष्ट्रातील एल्गार परिषद सारख्या ज्वलंत आंदोलनात जरी उमर खालिद याचे नाव येत असले तरी त्याला म्हणावे तसे वलय प्राप्त झाले नाही, जे कन्हैय्या कुमार याला प्राप्त झाले. या राजकीय वैचारिक वलयाच्या मदतीने कन्हैय्या कुमार याचे राजकीय गणित पण सुटायला लागले. जसे जसे हे गणित सुटायला लागले, तसे तसे त्याची उमर खालिद बरोबर असलेली मैत्री कमी व्हायला लागली.

याचा प्रत्यय आला तो २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ! आपण पेटवलेल्या सरकार विरोधी वातावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी कन्हैया कुमार बेगूसराय या लोकसभेच्या मतदारसंघातून आपले नशीब आजमावयाला निवडणुकीकरता उभा राहिला. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहार मधील बेगूसराय येथून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कन्हैय्या कुमार याला उभे केले. खरे म्हणजे हा बेगूसराय लोकसभा क्षेत्र एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला, या जागेवरून देशाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या कन्हैय्या कुमारला उभे केले तर फायदा होईल अशी पक्षाची अपेक्षा ! आपल्या “देश के तुकडे होंगे हजार” सारख्या भूमिकेमुळे कन्हैय्या कुमारला अनेक नवीन अभिनेत्री, लेखक, कलाकार, पत्रकार म्हणवुन घेणारे समविचारी येऊन भेटले. उमर खालिद, स्वरा भास्कर पासून अनेक दफलीवाले कन्हैय्या कुमारला जिंकून आणायला त्याच्या प्रचारकरता जीवाचे रान करत होते. या निवडणुकीत कन्हैय्या कुमार समोर आव्हान होते, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कधी कधी हास्यास्पद विधाने करत वाद ओढवून घेणारे गिरीराज सिंह ! आता गिरीराज सिंह सारख्या कट्टर माणसाचा आपण सहज पराभव करू, कारण आपण देशाच्या सामान्य जनतेच्या मनात असलेले प्रश्न उभे करतो असा समज या लोकांचा झाला होता. मात्र बेगूसरायच्या जनतेने हा समज पार धुऊन काढला. ही निवडणूक गिरीराज सिंह जिंकले तेही तब्बल बावीस हजार मतांच्या प्रचंड फरकाने. 

या निवडणुकीनंतर मात्र एक मोठा फरक झाला कन्हैय्या कुमार जरी निवडणूक हरला तरी त्यांच्यातील राजकारणी मात्र सजग झाला. त्याच्या निवडणुकी नंतर झालेल्या काही मुलाखतींमधून याचा प्रत्यय नक्कीच येईल. सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे त्याने उमर खालिद पासून घेतलेली फारकत ही डोळ्यात भरेल अशी आहे. म्हणजे जरी आतून सगळे एकाच माळेचे मणी असले तरी त्याच्या सोबत व्यासपीठावर बसायचे कन्हैय्या कुमार टाळू लागला आहे. जसे कम्युनिस्ट पक्ष माओवादीला उघड पाठींबा देत नाही तसेच.

२०१९ नंतर भारत सरकारने CAA कायदा आणल्यावर, या कायद्यातील नवीन तरतुदी सोबतच आसाम मध्ये लागू झालेले NRC आणि देशात गेल्या १० वर्षांपासून प्रायोगिक तत्वावर लागू झालेले आणि आता संपूर्ण देशात अमलबजावणी करण्यास तयार असलेल्या NPR कायद्याच्या विरोधातील आंदोलनात उमर खालिद याचे नाव गाजायला लागले, वेगवेगळ्या शहरात या सगळ्यांचा विरोध करणाऱ्या आंदोलनाला भक्कम पाठींबा द्यायला उमर खालीद त्या त्या शहरात जाहीर सभा घ्यायला लागला. डाव्या विचारांच्या लोकांनी या आंदोलनाला सक्रिय पाठींबा दिला. पण एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या आंदोलनात असलेली कन्हैय्या कुमार याची अनुपस्थिती ! सरकार विरोधातील प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग असणारा, वेळप्रसंगी या सहभागापाई देशाच्या सरकार विरोधात, सैन्य दला विरोधात भूमिका घेणारा कन्हैय्या कुमार आता एकदम शांत राहिला. आता तुम्हाला वाटत असेल की दिल्ली येथील JNU येथे देशविरोधी घोषणाबाजी बद्दलचे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे हा बदल झाला असेल तर ते चूक आहे. 

खरे कारण आहे बेगूसराय मधील जनतेने दिलेला निवडणुकीतील झटका ! जनता वैचारिक वादात एखादे वेळेस सरकार विरोधी घेतलेल्या भूमिकेला पाठींबा देईल, पण देश विरोधी भूमिकेला देईल काय? नक्कीच नाही, म्हणून जनतेने कन्हैय्या कुमारला त्याची योग्य जागा दाखवली आणि राजकारणी झालेला कन्हैय्या कुमार सजग झाला. 

त्याने सगळ्यात पहिले उमर खालिद बरोबर फारकत घेतली. असे नाही की कम्युनिस्ट पक्षाची भूमिका CAA/NRC/NPR बाबत सरकारला पूरक होती ! नाही या पक्षाचा तितकाच विरोध होता जितका उमर खालिद सारख्या आंदोलकांचा होता. भारतात शहरा शहरात उभे झालेले शाहीनबाग धरणे यात पण कम्युनिस्ट पक्ष आणि माओवादी यांचा इस्लामी अतिरेक्यांना सोबत घेत सक्रिय सहभाग होताच, पण या पक्षाने स्वतःला या आंदोलनाचा मुखवटा अजिबात दिला नाही. दिल्ली येथील शाहीनबाग धरणे आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाने तितकाच सहभाग दाखवला जितका काँग्रेस सारख्या राजकीय पक्षाने..!  मात्र तिथे इतर वेळेस झालेल्या देश विरोधी भाषणे आणि घोषणाबाजीच्या वेळेस ना कधी कन्हैय्या कुमार उपस्थित होता, ना उमर खालिद..!

मात्र तुमच्या लक्षात अजून एक गोष्ट आली असेल ती म्हणजे दिल्ली दंगलीत सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपावरून उमर खालिद याला अटक झाल्यावर पण कन्हैय्या कुमार हा शांतच राहिला. इतकेच नाही तर उमर खालिद याच्या अटकेचा विरोध करायला घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत अगोदर घोषणा करून सुद्धा कन्हैय्या कुमार उपस्थित राहिला नव्हता. हे सगळे कशाला ? या सगळ्यातून तथाकथित आंदोलक/ क्रांतिकारक कन्हैय्या कुमार याने अंग का काढून घेतले होते? तर त्याला बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावयाचे होते म्हणून ! कन्हैय्या कुमार पक्का राजकारणी बनला आहेच, पण आपल्या पूर्व अनुभवातून अनेक गोष्टी पण शिकला आहे याची ही प्रचिती होती. 

पण दुर्दैव असे की भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मात्र या निवडणुकीत कन्हैय्या कुमार याला तिकीट दिलेच नाही. मात्र राजकारण करण्याची चटक लागलेल्या कन्हैय्या कुमारला आता पुन्हा एक हात वर करत, दुसऱ्या हातात डफली घेत “हमे चाहीये आझादी !” सारख्या घोषणा देतांना आपणाला नक्कीच बघता येणार नाही याचा मोठा विषाद वाटतो, त्याच बरोबर जीवाला जीव देणाऱ्या उमर खलिद सारख्या मित्राला पण या राजकारणापाई अंतर द्यावे लागले याचे दुःख प्रखर आहे. 

सोबतच बघा भूमिहार सारख्या उच्च जातीतून आलेल्या कन्हैय्या कुमारलाच भारतीय कम्युनिस्ट पक्ष उच्च स्थानी बसवायचा प्रयत्न करत आहे. मात्र मुस्लिम आणि दलित-वंचितांकरता आवाज उठवातो म्हणत त्यांच्या हृदयात कोपरा तयार करतांना या डाव्यांना पक्षात मात्र उच्च स्थान देता येत नाही. शेवटी उमर खालीद असो वा शेहला रशीद यांना मात्र क्रांतीच करत बसावे लागते, तेही कम्युनिस्ट पक्षाच्या उच्च स्थानी बसलेल्या या उच्च जातीच्या लोकांकडून. महत्वाचे म्हणजे रोहित वेमुला सारख्या दलित पोराचा या राजकारणात भ्रमनिरास होतो आणि आत्महत्या करावी लागते आणि या आत्महत्येवर राजकारणाची आपली पोळी शेकून घेणारा कम्युनिस्ट पक्ष मात्र रोहित वेमुलाच्या आईला मदत म्हणून दिलेला धनादेश पण बँकेतून पास करत नाही.

एकूण काय तर भारतातील या बुझवा राजकारण्यांनी एका प्रखर क्रांतिकारी नेत्याला पण आपल्यात जमा करून घेतले हे मोठे दुःख आहे.

लेखक हे सामाजिक, राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत. मोबा- 808724185 https://lavleledive.blogspot.com/?m=1

Leave A Reply

Your email address will not be published.