डॉ.आत्माराम भैरव जोशी.

मराठी शास्त्रज्ञ लेखमाला.

0

गात ज्यामुळे हरित क्रांती झाली त्या बुटक्या जातीच्या गव्हाची पाहणी करण्यासाठी आणि त्याचे संशोधक नॉर्मन बोरलाग यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले भारतीय कृषी संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ.आत्माराम भैरव जोशी, यांचा जन्म १७ नोव्हेंबर, १९१६ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. रायपूरच्या सरकारी शाळेतून शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीच्या सायन्स कॉलेजमधून एमएस्सी केले. त्यानंतर दिल्लीच्या इम्पिरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमधून शेतीशास्त्रातील डिप्लोमा व नंतर इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात पीएचडी केले. शिक्षण पुरे झाल्यावर ते दिल्लीतील इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या राष्ट्रीय संस्थेत अध्यापक व संशोधक म्हणून रुजू झाले. या आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या दोन संस्थांवर देशातील शेतीच्या कार्यक्रमाची जबाबदारी असते. या संस्थात काम केल्यावर देशातील शेतीचे एकत्रित चित्र पाहायला मिळते. प्रत्येक राज्यातील शेतीच्या समस्या समजतात.

          भारतात १९५७ सालापासून मक्यावर संशोधन चालू होते, १९६० साली डॉ.आ.भै.जोशी यांच्यावर देशपातळीवरील गव्हाच्या संशोधनाची जबाबदारी टाकली त्याच वेळी आ.भै.जोशी इम्पिरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाताही (डीन) होते. पिकांचे अनुवंशशास्त्र (जेनेटिक्स) हा विषय ते पदव्युत्तर वर्गाला शिकवीत असत. खरे म्हणजे त्यावेळी भारतातल्या काही राज्यात गव्हावर चांगल्या प्रकारचे संशोधन झालेले होते. गव्हावरच्या तांब्या रोगावर पूर्वी काम झाले होते. १९६० साली आ.भै.जोशी यांनी देशातील सर्व गहू शास्त्रज्ञांना दिल्लीत बोलावून देशात तोवर उपलब्ध असलेल्या गव्हाच्या जातींवर देशाच्या विविध राज्यात प्रयोग करायचे ठरवले. हा मोठा निर्णय होता, कारण तोवर शास्त्रज्ञ दुस-या राज्यातील जात आपल्या राज्यात लावत नसत. त्यातून पंजाबमधील सी-३०६ ही गव्हाची अशी जात सापडली की जी पंजाब, बंगाल, बिहार, मध्यप्रदेश अशी सगळीकडे उपयोगी पडली. शिवाय ही जात दुष्काळा तोंड देणारी होती. त्यांनतर विशिष्ट धान्य सगळ्या राज्यात लावून पाहायची पद्धतच पडून गेली. त्यातून कोणते पिक कुठे जोमदारपणे येते हे समजू लागले. मग १९६१ मध्ये अमेरिकेतून आणलेल्या ज्वारीच्या पिकावर प्रयोग झाले, १९६४ मध्ये बाजरीचे बियाणे अमेरिकेहून आणून त्यावर प्रयोग झाले. फिलिपाइन्सच्या तांदूळ संशोधन केंद्राबरोबर काम करून विकसित केलेल्या बुटक्या तांदळाच्या जातीतून जया आणि पद्मा या जाती मिळवल्या.

         १९६३ मध्ये आ.भै.जोशी मेक्सिकोमध्ये जाऊन गव्हाची बुटकी आणि अधिक उत्पन्न देणारी जात विकसित करणा-या डॉ.नॉर्मन बोरलाग यांना भेटले. त्यांनी विकसित केलेली जात पाहूनच आ.भै.जोशी यांना जाणवले की ही जात भारतात क्रांती घडवून आणेल. त्यावेळी त्यांनी काही बियाणे भारतात आणले. त्याची लागवडीची पद्धत वेगळी होती. त्यासाठी शेतक-यांचे प्रशिक्षण केले. पण त्या लाल गव्हाच्या जाती होत्या आणि भारतातील शेतक-यांना पिवळसर गव्हाची सवय असल्याने १९६६ पर्यंत थांबून कल्याणसोना आणि सोनालिका या जाती उपलब्ध झाल्या आणि त्यांची लागवड केली. त्यावेळी केंद्र सरकारात कृषीराज्य मंत्री म्हणून अण्णासाहेब शिंदे काम करीत असत. ते संस्थेत येऊन डॉ.आ. भै.जोशींना भेटले आणि आपण सोयाबीन लावून त्याचे प्रयोग करू या असा प्रस्ताव त्यांनी मांडला. महाराष्ट्रात आज जे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, त्याचे मूळ या चर्चेत होते. सोयाबीनबरोबर सूर्यफुलाची आणि बीटची लागवडही सुरु झाली. डॉ.आ.भै. जोशींनी तीळ,चणा,तंबाखू, मिरची आणि आणखी काही पिकांच्या जनुकाबाबत केलेले काम उल्लेखनीय आहे. भेंडीवर पडणा-या पिवळ्या विषाणूला तोंड देणारी जात त्यांनी विकसित केली. तिचे नाव पुसा सावनी. भारतात गव्हाची जी क्रांती झाली त्यामागे असलेल्या ऑल इंडिया व्हिट इंप्रूव्हमेंट प्रॉजेक्टचे ते पाहिले समन्वयक होते. डॉ. आ.भै.जोशींनी कपास, गहू, भेंडी यांच्याबाबतीत यशस्वी क्रांतीची सुरुवात तर केलीच, पण त्यासोबत, देशाच्या शेतीत संशोधन आणि उच्च शिक्षण करण्यासाठी लागणा-या तज्ञ व्यक्तीही तयार केल्या. त्यांचे असे मत होते की जे देश मानवी साधन संपत्तीपेक्षा (मनुष्यबळ) भौतिक साधन संपत्तीला जास्त महत्त्व देतात ते देश नेहमी गरीब राहतात. डॉ.जोशींचे विद्यार्थी जेव्हा जेव्हा शेतीत प्रयोग करीत असत तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर ते शेतावर उपस्थित राहून तासन्तास खर्च करीत. डॉ.जोशींनी दूरदृष्टीने ‘डिव्हिजन ऑफ प्लांट इंट्रोडक्शन’ ची स्थापना केली. त्यातूनच १९७६ साली ‘नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ या संस्थेची स्थापना झाली. १९७० पासून पुढे परदेशी बियाणे भारतात येऊन त्याचा संकर आपल्या पिकांबरोबर होऊ लागला. तेव्हा डॉ.जोशींना जाणवले की आपल्या मूळ पिकांचेही जतन केले पाहिजे. मग त्यांनी आपला विद्यार्थी डॉ.आर.एस.पारोडा यांना सांगून दिल्लीत ‘नॅशनल जीन बॅंक’ स्थापन झाली. डॉ.जोशींनी देशभरातील पिकांवर प्रयोग करण्यासाठी ‘ऑल इंडिया क्रॉप को-ऑर्डीनेटेड प्रॉजेक्ट’ या संघटनेची स्थापना केली.

        देशभरात विखुरलेल्या संशोधक आणि संशोधन संस्थांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे, आपण एकमेकाशी संबंधित आहोत व एकत्र काम केले पाहिजे असे वातावरण निर्माण करण्यासाठी, त्यांच्या विचारांची आपापसात देवाण-घेवाण होण्यासाठी डॉ.जोशींनी दिल्लीत कार्यशाळा सुरु केल्या. त्यातून नवीन तंत्राचे-संशोधनाचे मूल्यमापन परस्परांकडून होऊ लागले. देशभर प्रसार करण्यासाठी पिकाच्या कोणत्या नमुन्याची निवड करावी हे सर्वानुमते ठरू लागले. असे नमुने पुढे या लोकांमार्फत शेतक-यांपर्यंत पोहोचू लागले. जागतिक कृषिसंशोधन गटाच्या तांत्रिक सल्लागार समितीवर त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. इजिप्त सरकारने त्यांना शेतीविषयक सल्लागार म्हणून बोलवले होते. जागतिक बटाटा केंद्र आणि जागतिक तांदूळ संशोधन संस्थांवर त्यांनी विश्वस्त म्हणून काम केले होते. भारतातील कृषिविषयक संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्यक्रमांची फेरआखणी करण्यासाठी नेमलेल्या  समितीचे ते संस्थापक सदस्य होते. हैदराबादजवळील पतनचेरू येथे असलेल्या कोरडवाहू पिकांवर संशोधन करणा-या इक्रिसॅट संस्थेच्या सल्लागारपदी होते. इंडोनेशिया, लिमा, पेरू, अमेरिका, नेदरलँड, मेक्सिको येथे ते सल्लागार होते.  नाबार्ड, खादी आणि व्हिलेज इंडस्ट्री, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथेही ते सल्लागार होते.

         डॉ.आ. भै.जोशींना नवीन नवीन ज्ञान मिळवण्याची ईर्ष्या होती. १९६२ साली डॉ.एम.एस.स्वामिनाथन नुकतेच केम्ब्रिजहून अनुवंशशास्त्र (जेनेटिक्स) हा विषय शिकून आले होते आणि डॉ.जोशी हा विषय शिकून आले त्याला १५ वर्षे उलटली असल्याने डॉ.स्वामिनाथन नवीन काय शिकून आले याची उत्सुकता त्यांना होती. त्यामुळे सकाळी आठ वाजता स्वामिनाथन यांचा तास असे त्याला ते वर्गातल्या शेवटच्या बाकावर बसून टिपणे घेत असत. गंमत म्हणजे तो तास नऊ वाजता संपल्यावर डॉ.जोशी वर्गाच्या मागच्या दरवाजाने बाहेर पडून पुढच्या दरवाजाने आत शिरत आणि त्याच विषयाचा दुसरा भाग शिकवायला घेत. स्वामिनाथनांसारख्या नव्याने आलेल्या प्राध्यापकांच्या तासाला अधिष्ठाता असलेल्या डॉ.जोशींना बसून टिपणे घ्यायला कधी कमीपणा वाटला नाही. ही त्यांची ज्ञान लालसा होती. तसेच ते निवृत्तीनंतर जेव्हा राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गेले, तेव्हा ते राउंडवर जाताना आपल्या हातात टिपण वही घेऊन जात असत आणि विविध विभागाच्या प्राध्यापकांशी चर्चा करताना जर काही नवीन ऐकले तर ते त्याची टिपणे घेत. कुलगुरू आपल्या बोलण्याची टिपणे घेतात याचे प्राध्यापकांना नवल वाटत असे. डॉ.आ. भै.जोशींचे सभा संयोजनाचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. सभेत कितीही वादावांदी झाली तरी तिचा समारोप करतना ते एखादा विनोदी किस्सा सांगून दोन्ही गटांच्या लोकात समेट घडवून आणत.  दिल्लीहून निवृत्त झाल्यावर डॉ.जोशी महाराष्ट्रातील राहुरी कृषिविद्यापीठाचे कुलगुरू झाले. राहुरीच्या कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यावर डॉ.जोशी पुण्यात स्थायिक झाले. त्यावेळी ते पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेचे अध्यक्ष झाले.

       डॉ.आ. भै.जोशींना शास्त्रीय संगीताची चांगली आवड होती आणि आपल्या ४० वर्षाच्या दिल्लीच्या वास्तव्यात त्यांनी दिल्लीतील एकही मैफिल चुकवली नव्हती. भारतातील सर्व विज्ञान अकादामींचे ते फेलो होते. मराठी विज्ञान परिषदेने त्यांचा सन्मान केला होता. त्यांना पद्मश्री, नॉर्मन बोरलाग पुरस्कार मिळाला. त्यांना मराठी, हिंदी, बंगाली, पंजाबी, इंग्रजी या भाषा अवगत होत्या. तीनशेच्या वर शोधनिबंध, आणि ३ पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांनी ४६ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. आणि पीएचडीसाठी मिळून मार्गदर्शन केले. ३ जुलै, २०१० ला त्यांचे पुण्यात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.

  • अ.पां.देशपांडे.
0

लेखक हे जेष्ठ साहित्यिक असून त्यांनी जवळपास २००० लेख लिहिले असून त्यांची ८५ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विज्ञान परिषद चे कार्यवाह आहेत. मराठी विज्ञान परिषद (मविप) ही संस्था समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे कार्य करते. मोबाइल नंबर - ९९६७८४१२९६.

Leave A Reply

Your email address will not be published.