डॉ.आनंद कर्वे.
वनस्पतीशास्त्राचे शिक्षण घेऊन शेतीत दीर्घ काल प्रयोग करीत राहिलेल्या आनंद दिनकर कर्वे यांचा जन्म ७ ऑगस्ट, १९३६ रोजी पुण्यात झाला. शालेय आणि एम.एस्सी.पर्यंतचे सर्व शिक्षण पुण्यात झाल्यावर आनंद कर्वे वनस्पतीशास्त्रात पीएचडी करण्यासाठी जर्मनीतील ट्यूबिंगेन विद्यापीठात गेले. आनंद कर्वे यांचे वडील दिनकर धोंडो कर्वे हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते तर आई इरावती कर्वे या पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे आजोबा म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे होत. १९६१ ते १९६६ अशी सहा वर्षे ते पंजाब, मराठवाडा आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वनस्पती शास्त्राचे अध्यापन करीत होते. मग १९६६ साली अध्यापन सोडून त्यांनी त्यांचे मेहुणे निंबकर यांच्या फलटण येथील निंबकर फार्ममध्ये संशोधक म्हणून १६ वर्षे काम केले. म्यानमार येथील युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन या संघटनेच्यावतीने भुईमूगतज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिले. करडई तेलबियांवरील आंतरराष्ट्रीय तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. मग ते एक वर्ष जर्मनीत गेले व तेथे त्यांनी संशोधन केले. १९८४ ते १९८८ अशी चार वर्षे ते मुंबईच्या हिंदुस्तान लिव्हर कंपनीत कृषी संशोधन विभाग प्रमुख होते. मग १९८६ ते १९९६ अशी दहा वर्षे ते भारत सरकारच्या कॅस्टफोर्ड उर्फ सेंटर फॉर ॲप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट येथे संचालक होते. तेथून वयाची साठ वर्षे झाल्यावर ते निवृत्त झाले आणि मग पुण्यात येऊन त्यांनी इंद्रायणी बायोटेक आणि आरती (ॲप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट), सह्याद्री तंत्रसेवा सहकारी संस्था यांची स्थापना केली. डॉ.आनंद कर्वे यांचा जीव आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीतच रमला.
आनंद कर्वे यांच्या तीन पिढ्या या समुचित तंत्रज्ञानात काम करणा-या होत्या आणि आता चौथीही पिढी त्यातच आहे. आजोबा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १९०० सालाच्या सुमारास विधवांचे पुनर्वसन करुन स्त्री शिक्षणाची सुरुवात करून दिली. ही गोष्ट त्यांनी पुण्याच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत राबवली तर काका रघुनाथ धोंडो कर्वे यांनी विल्सन कॉलेजातील गणिताची प्राध्यापकी आणि संतती नियमनाचे काम एकाच वेळी करणे कॅथोलिक असलेल्या विल्सन कॉलेजच्या व्यवस्थापनाला मानवले नाही, पण भारताची लोकसंख्या पुढील काळात अवाच्यासव्वा वाढणार हे ओळखून गणिताच्या प्राध्यापाकीवर लाथ मारून संतती नियमनाचा कार्यक्रम त्यांनी १९२५ सालापासून सुरु केला आणि आता आनंद कर्वे यांची तिसरी पिढी शेतीतील समुचित तंत्रज्ञानात काम करणारी निधाली, एवढेच नव्हे तर आनंद कर्वे यांची मुलगी प्रियदर्शिनी कर्वे म्हणजे चौथी पिढी. ही सुद्धा वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच काम करीत आहे. काळ वेगवेगळा पण त्या त्या काळाचे जे सामाजिक प्रश्न आहेत, ते सोडवण्याचे प्रयत्न या कर्वे घराण्याने केले आहेत. आनंद कर्वे यांनी शेतीसाठी अनेक छोटी छोटी संशोधने केली. बदलत्या हवामानामुळे हल्ली पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीला सुरु होण्याऐवजी लांबत चालला आहे. कधी कधी तो जुलै अखेरपर्यंतही ओढ देतो. त्यासाठी कर्वे असे सुचवतात की एप्रिल महिन्यातच पुढे जे पीक आपण शेतात लावणार आहोत त्याची रोपवाटिका बनवावी. म्हणजे एक लिटरच्या दुधाच्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन त्यात माती भरावी आणि ज्वारी-बाजरी-तांदूळ वगैरे जे पीक लावणार त्याचे दोन-दोन दाणे टाकावेत. जेथे ऊन मिळते अशा जागी १० फूट गुणिले १० फूट जागेत या पिशव्या एका शेजारी एक ठेवून त्याला माती भिजेल एवढे पाणी रोज घालावे. याप्रमाणे जून-जुलै वगैरे महिन्यात जेव्हा पाऊस येईल तोवर ही रोपे एकेक फूट तरी उंच झालेली असतात. मग पाऊस येऊन जमीन चांगली भिजली की शेतात जेथे लावणी करायची तेथे या पिशव्या नेऊन ब्लेडने त्या कापून मातीचा गोळा उचलून शेतात केलेल्या छोट्याशा खड्ड्यात बसवावा. यामुळे उशीरा पाऊस आल्याने शेतात पीकही मागास येणार नाही.
पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. उदा.शेतातील विहिर भरून घेणे अथवा शेताला जेथे उतार असेल तेथे शेताच्या एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के जमिनीत खोल खड्डा करून त्याला सिमेंटचे अस्तर देऊन त्यात संपूर्ण शेतावर पडणारे पाणी वाहून नेऊन या खड्ड्यात जमा करावे. याला शेततळे म्हणतात. अथवा कर्वे सुचवतात की खूप जाड प्लास्टिक घेऊन त्याची खोळ (पिशवी) बनवावी आणि ती बांबूच्या पिंज-यात ठेवून त्यात पावसाचे पाणी साठवावे. ही खोळ ५००-१००० लिटर असे पाणी जमा करू शकेल. पिशवी भरली की तिचे तोंड बंद करावे. अशा पिशव्या शेतात १०-२० ठिकाणी लावाव्यात. शेतातील पीक काढल्यावर उरणारा काडीकचरा अथवा शेंडेबुडखे शेतकरी जाळून टाकतात. त्याने धूर होऊन हवेचे प्रदूषण होते. शिवाय यातून शेतक-याला काही मिळत नाही. याऐवजी कर्व्यांनी तयार केलेल्या स्टेनलेस स्टील पिपाच्या बंद संयंत्रात हा काडीकचरा टाकून त्यातून कांडी कोळसा तयार करावा. भट्टीत मुक्त ऑक्सिजन नसल्याने कच-याचे विघटन होते. विघटन होताना ७० टक्के ज्वलनशील पदार्थ वायुरूपाने मुक्त होतात. जैववस्तुमानाचा वीस टक्के अवशेष कोळशाच्या स्वरूपात शिल्लक राहातो. कोळशाचा बारीक भुगा करून त्यात थोडे शेण किंवा खळ मिसळल्यास साच्याच्या साहाय्याने कांडी कोळसा किंवा इंधन विटा तयार करता येतात. तंदूर, बार्बेक्यू किंवा घरगुती कोळशाच्या शेगडीत आणि लोहारकामाच्या भट्टीत हा कोळसा वापरता येतो. हा कोळसा जाळताना धूर होत नसल्याने वायू प्रदूषण होत नाही. हा कांडी कोळसा विकता तर येतोच अथवा त्यासाठी बनवलेल्या शेगडीत तो वापरून शेतक-याला आपले दोन्ही वेळेचे जेवणही तेथल्या तेथेच बनवता येते. कर्वे यांनी विकसित केलेल्या संयंत्रामधून एक किलो जैवखाद्यापासून ५०० ग्रॅम इंधन वायू मिळवता येत होता. या उलट एवढा इंधन वायू मिळवण्यासाठी पारंपारिक बायोगॅसला ४० किलो शेण लागते. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी आनंद कर्वे यांना ब्रिटनच्या राजवाड्यात या संयंत्राची उभारणी करण्यासाठी आमंत्रित केले होते. महाराष्ट्रात अशा एक हजारापेक्षा अधिक संयंत्रांची उभारणी करण्यात आली आहे. या संयंत्रातून मिळणारा मिथेन वायू अन्न शिजवण्यासाठी आणि पेट्रोल व डिझेल इंजिने तसेच विद्युत जनित्रे चालवण्यासाठी उपयोगी पडतो. उसाच्या पाचटापासून इंधन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आनंद कर्वे यांनी शोधून काढले. या प्रकल्पात वर्षाला ४५० कोटी रुपये निर्माण करण्याची क्षमता आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांना नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि शहरी भागातील गरीबांना स्वस्त आणि प्रदूषण न करणारे इंधन मिळू शकते. उसाचे पाचट, आंब्याची पाने, गव्हाचे काड यासारखे बायोमास शेतकरी एरवी जाळून टाकतो. एका विशिष्ट भट्टीतहा कचरा बाह्य पद्धतीने भाजून त्यापासून स्वयंपाकाचे इंधन बनवण्याचा प्रयोग डॉ.कर्वे यांनी फलटणच्या आरती (ॲप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेत केला. उसाच्या पाचटापासून इंधन बनवण्याच्या या तंत्रज्ञानाला मार्च, २००२ मध्ये लंडनचा ३० हजार पौंडाचा ॲश्डेन पुरस्कार मिळाला. त्या संशोधनात आनंद कर्वे यांच्याइतकाच सहभाग त्यांची कन्या प्रियदर्शिनी हिचाही होता. ब्रिटनमधील सेन्सबेरी कुटुंबीयांनी सामाजिक कार्यासाठी १९७० मध्ये एक विश्वस्त संस्था स्थापन केली. वेगवेगळ्या क्षेत्रासाठी या संस्थेतर्फे पारितोषिके दिली जातात. पर्यावरणाची हानी न करता पुनर्निर्मित ऊर्जा विकसित करणा-या आणि ती गरीबांना सहजी परवडेल अशा किमतीत देऊ शकणा-या विकसनशील देशातील प्रकल्पांना २००१ सालापासून ॲश्डेन पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. हा पुरस्कार डॉ.आनंद कर्वे यांना दोनदा मिळाला. आजवर डॉ.आनंद कर्वे यांनी ५० संशोधन प्रकल्प, १२५ शोधनिबंध, २५० शास्त्रीय निबंध, नऊ व्हिडीओ फिती आणि १५ सीडी तयार केल्या. २००३ साली ठाणे येथे भरलेल्या अडतिसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. या शिवाय त्यांना जे.जी.काणे पुरस्कार, बी.डी.टिळक पुरस्कार आणि युनायटेड स्टेटस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरलचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
डॉ. आनंद कर्वे पुण्यात स्थायिक असतात.