डॉ. बाळ दत्तात्रेय टिळक.
रसायनशास्त्रात ज्याला फाईन केमिकल्स म्हणतात त्यातले तज्ञ असलेले प्रा.डॉ.बाळ दत्तात्रेय टिळक यांचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या कारंजा येथे २६ सप्टेंबर, १९१८ रोजी झाला. त्यांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ उर्फ स.प.महाविद्यालयातून रसायनशास्त्रातील पदवी घेतली त्यावेळी ते मुंबई विद्यापीठात पहिले आले होते. त्यानंतर त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून डायस्टफमध्ये बीएस्सी केले आणि नंतर मुंबई विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (युडीसीटी – आताचे आयसीटी उर्फ इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) विभागात प्रवेश घेऊन त्यावेळचे संस्थेचे संचालक प्रा.वेंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वस्त्रोद्योगाला उपयोगी पडणा-या रसायनशास्त्रात पीएचडी मिळवली. त्यावेळी ही संस्था सुरु होऊन जेमतेम ५ वर्षे झाली होती आणि मुंबईतील अनेक कापड गिरण्यांची गरज वस्त्रोद्योगात शिकलेले पदवीधर मिळवण्याची होती. त्यामुळे गिरण्यांच्या मागणीनुसार युडीसीटी आणि व्हिजेटीआय या दोन्ही ठिकाणी असे अभ्यासक्रम सुरु झाले. त्यामुळे साहजिकच पीएचडीसारख्या उच्च पदवीधारकांना कापड गिरण्या अथवा रंगाचे कारखाने या ठिकाणी मोठ्या पगाराच्या नोक-या मिळत. इथेच टिळकांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. टिळकांचे मार्गदर्शक प्रा.वेंकटरामन टिळकांना म्हणाले, ‘सध्या तुम्ही नोकरीच्या भानगडीत पडू नका. इंग्लंडमध्ये जगद्विख्यात शास्त्रज्ञ रॉबिन्सन म्हणून आहेत. त्यांच्याकडे जा आणि तेथे संशोधन करा. त्यामुळे भारताला बा.द.टिळकांच्या रूपाने कार्बनी रसायनशास्त्रज्ञ मिळाला. टिळकांनी ऑक्सफर्डमध्ये ‘डी.फिल‘ मिळवली आणि हार्वर्ड विद्यापीठात प्रा.वुडवर्ड यांच्याकडे संशोधन केले आणि मगच ते भारतात परत आले. त्यानंतर युडीसीटीत कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. याच पदावरून त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना कार्बनी रसायनशास्त्रात गंधकयुक्त कार्बनी रसायनशास्त्राचे मार्गदर्शन केले. ते संशोधन डॉ.टिळकांच्या नावाने ओळखले जाते. त्यांनी संशोधनपर २०० निबंध लिहिले आणि ते देशी-परदेशी जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले. पीएचडी साठी ९५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या विद्यार्थ्यातील काही जणांनी आपले उद्योगधंदे सुरु केले, काहीजणांनी उद्योगात मोठ्या पदांवर काम केले, तर काहीजणांनी विविध शिक्षणसंस्थांत अध्यापनाचे काम केले. प्रा.टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणजवळील शहड येथे मफतलाल गटाने इंडियन डायस्टफ इंडस्ट्री (आयडीआय) नावाचा फाईन केमिकल्सचा कारखाना सुरु केला होता. इथे बनणारी रसायने वस्त्रोद्योगात उपयोगी पडणारी होती. १९६६ साली प्रा.टिळक युडीसीटी सोडून पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक म्हणून गेले. तत्पूर्वी त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक आणि युडीसीटीचे संचालक असलेले प्रा.वेंकटरामन हे ही युडीसीटी सोडून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संचालक म्हणून गेले होते. एका अर्थाने प्रा.टिळक हे त्यांचे गुरु प्रा.वेंकटरामन यांच्या पावलावर पाऊल टाकून जात होते. प्रा.टिळक यांनी संचालक व्हावे म्हणून त्यांना भारत सरकारच्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च उर्फ सीएसआयआरच्या सहसंचालकांनी आमंत्रण दिले होते. प्रा.टिळक १९६६ ते १९७८ अशी १२ वर्षे येथे संचालकपदी होते. टिळक संचालक झाल्यावर अगोदर काही दिवस त्यांनी प्रयोगशाळेतील सर्व विभागांचे जवळून निरीक्षण केले आणि प्रयोगशाळेच्या दृष्टीने काही व्यवस्थापकीय हालाचालींना सुरुवात केली. त्यांच्या या काळातील सर्व प्रयत्नांचे थोडक्यात वर्णन करायचे म्हटले तर असे म्हणता येईल की रसायनशास्त्रांतर्गत विविध शास्त्रशाखांमध्ये काही प्रमाणात मुलभूत संशोधन तर चालू ठेवायचेच पण मुख्य भर द्यायचा औद्योगिक संशोधनावर. त्यामध्येही उद्योजकांना ताबडतोब उपयोगी पडतील अशी संशोधने हाती घेऊन रसायनशास्त्राच्या उद्योगधंद्यामध्ये तांत्रिक स्वयंपूर्णता मिळवायची. या बारा वर्षाच्या कालावधीत प्रयोगशाळेने अनेक संशोधने सिद्ध केली. बहुसंख्य तंत्रे यशस्वीरित्या व्यावहारिक पातळीवर उत्पादनाकरीता वापरली गेली. १९६६च्या सुमारास प्रयोगशाळेची जेमतेम ७-८ संशोधने प्रत्यक्ष उत्पादनाकरीता वापरली जात होती. आणि त्यांची दर्शनी किंमत पंधरा लाख रुपये होती. १९७८ साली प्रयोगशाळेची ७५ तंत्रे कारखान्यात वापरली जात होती आणि त्यांची दर्शनी किंमत एक्क्याऐंशी कोटी रुपये होती.
हे यश आपोआप अगर नशिबाने मिळाले नव्हते. प्रयोगशाळेतील संशोधकांचे आणि संबंधितांचे त्यात कष्ट होते. संचालकांचे मार्गदर्शन, योग्य वेळी निर्णय घेण्याचे कौशल्य आणि एकूण प्रकल्पाचा सर्व बाजूंनी पाठपुरावा करण्याचा ध्येयनिष्ठ दृष्टीकोनही कारणीभूत होता. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या संशोधन प्रकल्पांना आज जो मान आणि प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते, रसायन क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये प्रयोगशाळेने जो विश्वास संपादन केलेला दिसतो त्याचे त्याचे काही प्रमाणातील श्रेय प्रा.टिळकांनी दिलेल्या नेतृत्त्वात आहे. प्रयोगशाळेची एकेक संशोधने त्यांनी परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये आणि शासनाच्या परधार्जिण्या प्रवृत्तीवर मात करून, अनेकांना मान्य करायला लावली होती. अशा त-हेने उद्योगाने स्वीकारलेली संशोधने तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीनी पहिल्या दर्जाची होती, हेच नंतर सिद्ध झाले. एखादी गोष्ट पटली की, त्याकरिता परिश्रमांची तमा न बाळगता डॉ. टिळकांनी आटापिटा करत स्वत: कसून काम करून, इतरांकडून काम करवून घेतले. कोणत्याही विषयांवर त्यांची मते सुस्पष्ट असत. त्यामुळे नि:संदिग्ध निर्णय घ्यायला त्यांना वेळ लागत नसे. ध्येयनिष्ठा आणि साधनांबद्धलची सुस्पष्ट कल्पना असल्यामुळे अमुक एक विधान करू की नको, किंवा कसे करू असे त्यांना कधी वाटले नाही. प्रत्यक्ष बोलण्यात आणि वागण्यात थोडे परखड, घणाघाती, आक्रमक, आग्रही असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, पण त्याला माणुसकीची झालर होती. दुस-यांच्या कष्टांची आणि अडचणीची त्यांना जाण असे. एखादा विषय डोक्यात घोळत असला की सहका-यांजवळ त्या विषयाच्या अनेक पैलूंवर चर्चा करण्याची त्यांची पद्धत होती. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रौप्य महोत्सव प्रसंगी पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. प्रयोगशाळा बघून समारंभासाठी जाताजाता त्यांनी संचालक डॉ.टिळकांना विचारले की, ‘तुमच्या या प्रयोगशाळेचे नाव काय?’ टिळक चक्रावले. पोतदारांना आमंत्रण पत्रिका पाठवली होती. प्रयोगशाळा हिंडून त्यांनी पाहिली होती आणि आता ते प्रयोगशाळेचे नाव काय विचारत आहेत म्हणून टिळक चक्रावले होते. त्यांनी उत्तर दिले, ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ त्यावर पोतदारांनी टिळकांना विचारले, ‘व्हॉट इज नॅशनल अबाउट इट?’ टिळक त्यावेळी त्यांना उत्तर देऊ शकले नाहीत, पण पुढच्या वेळी जेव्हा सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळा संचालकांची बैठक दिल्लीत झाली त्यावेळी त्यांनी ही गोष्ट महासंचालकांच्या नजरेस आणून देऊन आपण देशातील सामान्य लोकांसाठी काय करीत आहोत’ असा प्रश्न विचारला गेल्याचे सांगितले. त्यावर चर्चा होऊन ४३ प्रयोगशाळांनी त्यांच्या जवळचा एकेक मागासलेला जिल्हा दत्तक घेऊन त्याचा विकास करावा असे ठरले. मग राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने चंद्रपूर जिल्हा दत्तक घेतला आणि तेथील पीकपाणी, मासेमारी आणि इतर अनेक गोष्टीत लक्ष घालून लोकांचे जीवनमान सुधारले. यासाठी स्थापन झालेल्या कॅस्टफोर्ड आणि फॉस्टर्ड या संस्थांचे काम डॉ. टिळक निवृत्त झाल्यावरही करीत होते.
अनेक प्रकारची कामे चालू असली तरी घरच्या मंडळींबरोबर थोडे संगीत, थोडे साहित्य, थोडे नाटक आणि थोडे राजकारण अशी खास मराठी वळणाची त्यांची आवडनिवड होती. पन्नाशी उलटल्यावरही काही वर्षे डॉ.टिळकांनी हौसेने गिरीभ्रमण केले आणि त्यामुळेच त्यांनी बहुतेक सारा सह्याद्री पायी फिरलेला होता. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक म्हणून, अनेक सरकारी समित्यांचे सभासद म्हणून आणि अनेक शैक्षणिक व संशोधनविषयक परिसंवाद, व्याख्याने इत्यादींच्या निमित्ताने त्यांचा जगात अनेक ठिकाणी संचार झाला होता. प्रवासाबरोबर पंडितमैत्री आणि सभेत संचारही त्यांचा चालू होता. अत्यंत गतिमान, अथक आणि निरंतर परिश्रम करणारे पण प्रखर बुद्धिनिष्ठ असे डॉ.टिळकांचे जीवन होते. १९७८ साली ठाणे जिल्ह्यातील चिंचणी-तारापूर येथे भरलेल्या तेराव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे डॉ.टिळक अध्यक्ष होतेआणि ‘सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी विज्ञान’ असाच विषय त्यांनी अध्यक्षीय भाषणासाठी निवडला होता. डॉ.टिळक यांना वैज्ञानिक कामगिरीबद्दल शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, पी.सी.रे पुरस्कार, के.जी. नायक सुवर्ण पुरस्कार आणि १९७२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरविले होते. डॉ. टिळक अनेक कारखान्यांचे सल्लागार होते, हिंदुस्तान ऑर्गनिक केमिकल इंडस्ट्रीचे ते नऊ वर्षे अध्यक्ष होते. २५ मे, १९९९ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.