विश्वरचनेचे गूढ प्रा.फ्रेड हॉयेल यांच्याबरोबर अवघ्या २६ व्या वर्षी उलगडणारे प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म १९ जुलै, १९३८ रोजी कोल्हापूरला झाला. वडील प्रा.विष्णू वासुदेव नारळीकर त्यावेळी बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक असल्याने जयंतरावांचे बालपण आणि माध्यमिक शिक्षण हिंदी माध्यमातून आणि नंतर बीएस्सीपर्यंतचे शिक्षणही बनारसला झाले. वडील केम्ब्रिज विद्यापीठातून गणिताची रॅन्ग्लर ही पदवी मिळवून आलेले असल्याने जयंतरावांचा कलही ते शिक्षण घेण्याचा होता आणि ते त्यांनी केम्ब्रिजला जाऊन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फ्रेड हॉयेल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली. विश्वामध्ये परिवलन करणा-या वस्तूंचे निरीक्षण करून विश्वाचे पुढे काय होईल हे त्यांनी गणिताच्या साहाय्याने शोधले. याला ‘हॉयेल-नारळीकर इफेक्ट’ असे म्हटले गेले. स्थिर स्थिती सिद्धांतावर त्यांनी काम केले. त्यांचा हा स्थिर स्थिती सिद्धांत हा बिग बॅंग सिद्धांताला दिलेले आव्हान होते. काही वर्षे केम्ब्रिजच्या किंग्ज कॉलेजातील इन्स्टिट्यूट ऑफ थिअरॉटिकल फिजिक्समध्ये संशोधन व अध्यापनाचा त्यांनी अनुभव घेतला. १९७२ मध्ये ते भारतात परत आले आणि मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये अध्यापन आणि सैद्धांतिक खगोलशास्त्रात संशोधन करू लागले. जयंतराव १९७२ ते १९८८ अशी १६ वर्षे टीआयएफआरमध्ये होते.
१९८८ साली विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा.यशपाल यांचा जयंतरावांना फोन आला की पुण्यात खगोलशास्त्रावर एक आंतरविद्यापीठीय केंद्र सुरु करायचे आहे आणि ते तुम्ही सुरु करावे, मात्र टीआयएफआरमध्ये राहून ते न करता तुम्ही तेथून राजीनामा द्या आणि पूर्ण वेळ हे काम पाहा. मग जयंतरावांनी या केंद्राचे काम सुरु केले. त्या केंद्राचे नामकरण ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका)’ असे केले आणि १९८८ ते २००३ या १५ वर्षाच्या कारकीर्दीत या केंद्राचे संचालक म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून दिले. या केंद्रात फक्त पीएचडीचे विद्यार्थी घेतले जातात. त्यासाठी विज्ञानात एमएस्सी केलेले अथवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी पीएचडीसाठी घेतले जातात. या केंद्रात जयंतरावांनी जगातले अनेक खगोलशास्त्रज्ञ भाषणे देण्यासाठी अथवा २-३ महिने राहून अध्यापन करण्यासाठी बोलावले तर काही २-२ वर्षासाठी येऊन राहिले. हे केंद्र नुसते पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी राहू नये म्हणून त्यांनी पुण्यातील शाळांना दर शनिवारी केंद्राला भेट देण्यासाठी केंद्र उपलब्ध करून दिले व त्यांच्यासाठी खगोलशास्त्रातील व्याख्यानेही आयोजित करायला सुरुवात केली. ती प्रथा आजही सुरु आहे. दरवर्षी २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी केंद्र सर्वांसाठी उपलब्ध असते. विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम केले जातात, ज्यात स्वत: जयंतरावही भाषणे देत असत. पुढे टाकाऊ वस्तूतून विज्ञान खेळणी बनवणारे अरविद गुप्ता यांच्यासाठी पु.ल.देशपांडे यांच्या पत्नींकडून मिळालेल्या देणगीतून, ‘पुलत्स्य’ नावाचे एक केंद्र सुरु केले. या केंद्रालाही पुण्यातील शाळा भेट देतात आणि अशी खेळणी बनवायला शिकतात. पुण्याजवळील नारायणगाव येथे उभारलेल्या दुर्बिणीतून निरीक्षण करून आयुकातील शास्त्रज्ञ संशोधन करीत असतात. आयुकातील अनेक शास्त्रज्ञांनी जागतिक दर्जाचे संशोधन केले आहे. उदा. प्रा.संजीव धुरंधर यांनी केलेले ग्रॅव्हिटेशनल वेव्हचे संशोधन.
टीआयएआर, आयुका आणि हेदराबादची बलून फॅसिलिटी यांच्या संयुक्त सौजन्याने आकाशात बलून सोडले जातात आणि ४१ किलोमीटर उंचीवरचे हवेचे नमुने गोळा करून त्यांचे विश्लेषण केले जाते. १९९९ सालच्या त्या प्रयोगातून जयंतरावांनी २००५ साली धूमकेतू परग्रहावरून जे जीवजंतू पृथ्वीवर आणून सोडतात त्यातून पृथ्वीवरील मानव जन्माला आल्याचा निष्कर्ष काढला होता. जयंतरावांनी क्वासारवर काम केले. २००३ मध्ये लान्सेट या ब्रिटीश जर्नलमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या लेखात तेव्हा चालू असलेल्या सार्स रोगाचे जीवजंतू इतर ग्रहावरून आल्याचे प्रसिद्ध केले होते. जयंतरावांनी ४० वर्षाच्या काळात विश्वशास्त्र, गुरुत्त्वाकर्षण, गुरुत्त्वीय अभिरक्त विस्थापन, कृष्णविवरे, श्वेतविवरे, विद्युत गतिशास्त्र अशा विविध विषयांवर संशोधन केले. टेकिऑन्स या प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकणा-या पण अजून तरी सैद्धांतिक स्वरूपात अस्तित्त्वात असलेल्या कणांवर होणा-या तीव्र गुरुत्त्वाकर्षणाच्या प्रभावावरही त्यांनी संशोधन केले आहे. २००३ साली वयाची पासष्टी झाल्यावर आयुकासारख्या स्वायत्त संस्थेचे संचालक निवृत्त होतात. तसे जयंतराव निवृत्त झाले. त्यानंतर अजूनही ते आयुकात एमेरीटस प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
जयंतराव केंद्र चालवत असताना केंद्राचे व्यवस्थापन पाहात, स्वत: काही विद्यार्थी पीएचडीसाठी घेत. परदेशी विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून जात. भारतभर फिरून मुलांना खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी म्हणून सातत्याने व्याख्याने देत आणि विज्ञान कथा अथवा विज्ञानावर वर्तमानपत्रे-मासिके यातून लेख लिहीत. हे एवढे तुम्हाला कसे जमते असा प्रश्न मी एकदा जयंतरावांना विचारला असता ते म्हणाले, ‘मी आयुकाच्या व्यवस्थापनासाठी १० टक्के वेळ देतो. हाताखालच्या सर्व लोकांना मी कामाचे नुसतेच स्वातंत्र्य दिले नाही तर त्यांचे त्यांनी निर्णय घ्यायचे असे सांगितले. अडले तरच मला विचारा आणि तुमचा निर्णय चुकला तर जबाबदार मी असेन असे सांगितल्यावर खालचे लोक जबाबदारीने तर काम करू लागलेच, शिवाय त्यांचा विकासही चांगला झाला. ते केवळ माझ्यावर अवलंबून राहिले नाहीत.’
जयंतरावांचे गुरु फेड हॉयेलहे स्वत: जसे जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते तसेच ते विज्ञान कथा लेखक होते. जयंतरावांनी विज्ञान कथा लिहिण्याची स्फूर्ती त्यांच्यापासून घेतली. मराठी विज्ञान परिषदेच्या १९७३ साली जालना येथे भरलेल्या आठव्या वार्षिक अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. दरवर्षी भरणा-या अशा अधिवेशनाच्या निमित्ताने मराठी विज्ञान परिषद विज्ञान कथा लेखनाची स्पर्धा घेत असते. १९७४ सालच्या स्पर्धेत जयंतरावांनी भाग घेतला. पण त्यांचे हस्ताक्षर आणि नाव १९७३ सालच्या हस्तलिखित भाषणामुळे माहीत झाल्याने स्पर्धेच्या परीक्षकांवर दडपण येऊन त्यांना बक्षीस मिळाले असे होऊ नये म्हणून त्यांची कथा त्यांच्या पत्नी मंगलाबाई यांच्या हस्ताक्षरात त्यांनी पाठवली आणि ती स्वत:च्या नावे न पाठवता नारायण विनायक जगताप (नाविज ही जयंत विष्णू नारळीकर उर्फ जविना याउलट आद्याक्षरांच्या नावे पाठवली). त्या कथेला पहिले बक्षीस मिळाल्यावर जयंतरावांनी परिषदेला पत्र लिहून ती कथा त्यांचीच आहे हे कळवले. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे कथा छापायला सुरुवात केली. आयुष्यभरात त्यांचे यक्षांची देणगी, अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, जाऊ अवकाश सफारीला, टाईम मशीनची किमया, प्रेषित, वामन परत न आला, याला जीवन ऐसे नाव, अंतराळ व विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमती जमती, नभात हसरे तारे (सहलेखक अजित केंभावी), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, पोस्टाद्वारे विज्ञान, सायन्स थ्रू पोस्टकार्डस, फॅक्टस अँड स्पेक्यूलेशन्स इन कॉस्मॉ लॉजी (सहलेखक जिओफ्री बरबीज), युगायुगाची जुगलबंदी गणित आणि विज्ञानाची, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञान रचयिते, सेव्हन वंडर्स ऑफ कॉसमॉस, सूर्याचा प्रकोप, चार महानगरातले माझे जीवन, पाहिलेले देश, भारतातली माणसे. याशिवाय त्यांची खगोलशास्त्रावरील अनेक पुस्तके इंग्रजीत झाली. त्यांच्या अनेक पुस्तकांची जगभरातल्या अनेक भाषात भाषांतरे झाली. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.
केम्ब्रिजमध्ये शिकत असताना त्यांना स्मिथस प्राईज, टायसन आणि ॲडम्स अशी पारितोषिके मिळाली. जे टायसन प्राईज जयंतरावांना मिळाले ते ३० वर्षापूर्वी त्यांच्या वडलांनाही मिळाले होते. त्याशिवाय त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, विज्ञान प्रसारासाठी मिळणारा कलिंग हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, एम.पी.बिर्ला पुरस्कार, फ्रांस आणि लंडनच्या खगोलशात्र संस्थाची फेलोशिप, भारतातील सर्व विज्ञान संस्थांची फेलोशिप, थर्ड वर्ल्ड ॲकेडेमीची फेलोशिप इत्यादी असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.
- अ.पां.देशपांडे