डॉ. रघुनाथराव माशेलकर.
हळद, बासमती तांदूळ आणि कडुलिंब यांची एकस्वे (पेटंट्स) जागतिक पातळीवर भारताला मिळवून देणारे आणि भारतात एकस्व साक्षरता निर्माण करणारे डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म गोव्यातील माशेल गावी १ जानेवारी, १९४३ रोजी झाला. वडील वारले आणि ते आईसह मुंबईत आले. प्राथमिक शिक्षण म्युनिसिपालिटीच्या शाळेत झाल्यावर माध्यमिक शिक्षण युनियन हायस्कूल, गिरगाव येथे झाले. घरची अत्यंत गरीबी, अभ्यास म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली, आईने मोलमजुरी करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले, त्याचे चीज त्यांनी एस.एस.सी.च्या परीक्षेत बोर्डात ३५ वा क्रमांक मिळवून केले. मग हितचिंतक आणि सर दोराब टाटा ट्रस्टने दिलेल्या शिष्यवृत्तीतून जयहिंद महाविद्यालयातील शिक्षण झाले. एस.एस.सी., इंटर या पाय-या झाल्यावर दरवेळी त्यांना शिक्षण थांबवून नोकरी करावी आणि आईला कष्टातून वाचवावे असे वाटे. पण आईही तेवढीच जिद्दी आणि हट्टी होती. ‘मी मोलमजुरी करेन पण तू पुढे शीक’ हा तिचा धोशा असे. त्यातून ते युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनिअर तर झालेच पण त्यातील पीएचडीही त्यांनी पुरी केली. मग इंग्लंडमधील सालफोर्ड विद्यापीठात जाऊन त्यांनी संशोधन केले व १९७६ साली भारतात परत येऊन राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत साहाय्यक संचालक म्हणून कामाला सुरुवात केली.
साधारण फुगणा-या, जास्त फुगणा-या आणि आक्रसणा-या बहुवारीकांच्या (पॉलिमर) उष्मागतिकीबद्दल आणि बहुवारीकांच्या वहन पद्धतीबाबत माशेलकरांनी केलेले संशोधन पथदर्शक ठरले. काही पॉलिमरवर्गीय पदार्थ पाण्यात विरघळू शकतात. काही मात्र विशिष्ट सेंद्रीय विद्रावकात विरघळतात. जेव्हा एखादा पदार्थ विद्रावकात विरघळतो तेव्हा तयार होणा-या द्रव पदार्थाला द्रावण असे म्हणतात. अशा द्रावणाचे गुणधर्म वेगवेगळ्या परिस्थितीत बदलू शकतात. उदा.द्रावणाचे तापमान, दाब, त्यातील क्षाराचे प्रमाण इत्यादी. यामध्ये नॉन न्यूटोनियन द्रावणाचे गुणधर्म औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचे मानले जातात. त्यांचे संशोधन रसायन अभियांत्रिकीत केले जाते. या द्रावणावरील दाब जसजसा वाढवला जातो तसतशी त्याची वाहकता किंवा प्रवाहीपणा कमी होतो. याचा अर्थ प्रवाहीपणा हा दाबानुसार कमीजास्त होऊ शकतो. रंगारी जेव्हा रंगामध्ये ब्रश बुडवतो तेव्हा डब्यातील रंग घट्ट असतो. पण जेव्हा भिंतीवर रंगारी ब्रश दाबून रंग देतो तेव्हा तो रंग तेवढ्या क्षणी काहीसा पातळ होतो. तेथे ब्रशने दाब दिल्यावर दाब असेपर्यंत रंगाचा प्रवाहीपणा वाढतो. चॉकलेट तोंडात टाकल्यावर आपण ते जिभेने टाळूवर दाबतो तेव्हा ते काहीसे विरघळते पण, जिभेवर चॉकलेट नुसते ठेवले तर ते हळूहळू विरघळेल. तसेच जर त्यावरील दाब कमी केला तर त्याचा प्रवाहीपणा कमी होतो. ही किमया नॉन न्यूटोनियन वर्गीय द्रावणाची असते. आपले नेहमीचे पाणी अशा प्रकारचे कोणतेच गुणधर्म दाखवीत नाही. याचा अर्थ पाणी हे विद्रावक न्यूटोनियन वर्गीय आहे. डॉ.माशेलकरांनी अशा औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण असलेल्या बहुवारिक वर्गीय रसायनांचे संशोधन केले आहे. एखाद्या रसायनाच्या द्रावणात सूक्ष्म बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे क्षणभंगुर असले तरी त्यांचा अभ्यास हा रसायन अभियांत्रिकीच्या दृष्टीने उपयुक्त असतो. त्यामागे वैज्ञानिक गूढ गणिते असतात. यामागील संशोधन एखाद्या रसायनाच्या निर्मितीच्या वेळी महत्त्वपूर्ण ठरते. काही बहुवारिक रसायने पाणी ( किंवा अन्य द्रवरूप रसायने) शोषून घेतात. त्यामुळे ती फुगतात. काही रासायनिक द्रावणे तर आक्रसतात. हे गुणधर्म रसायनांच्या आण्विक किंवा रेण्वीय पातळीवरील संरचनेशी संबंधित असतात. डॉ.माशेलकर अशा संरचनेचे संशोधन करून त्यामागील गूढ शोधण्यात गुंतलेले असतात.
१९८९ साली माशेलकर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक झाले. संचालकपद हाती घेतल्यावर केवळ दोन तासातच माशेलाकारांनी प्रयोगशाळेतील सर्वांना एकत्र बोलावले आणि त्यांच्याशी हितगुज केले. ते लोकांना उद्देशून म्हणाले, ‘ ही आपली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे ती आपण आंतरराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा बनवू या. या प्रयोगशाळेतर्फे आपण युरोप आणि अमेरिकेलाही ज्ञान निर्यात करू या. हे मी डॉलर कमविण्यासाठी बोलत नसून वेगळ्याच कारणासाठी बोलत आहे.’ १९९१ साली भारताने आर्थिक धोरणाचे उदारीकरण केले. पण त्यापूर्वीही त्यांच्या प्रयोगशाळेने काही नवीन पदार्थ बनवले होते. ते भारतीय उद्योगधंदे विकत घेण्यापूर्वी विचारत की, ‘ परदेशात असे कुणी बनवले आहे का आणि त्याची यशस्वीतता काय आहे?’ परदेशात ते यशस्वी झाले असले तर ते भारतीय उद्योगांना घेणे सुरक्षित वाटत असे. त्यामुळे परदेशांची नक्कल करण्यापेक्षा आपण आपले काहीतरी स्वतंत्र बनवू आणि परदेशी बाजारात विकू असे त्यांनी त्या दिवशी लोकांना सांगितले. १९८९ साली प्रयोगशाळेला ३९ वर्षे होऊनही त्यांच्याकडे एकही अमेरिकन एकस्व नव्हते. प्रयोगशाळेला एखादा पदार्थ परदेशी विकायचा असेल तर त्यांच्याकडे अमेरिकन एकस्व असल्याशिवाय तो पदार्थ विकला जाणार नव्हता. आणि तेच खरे आव्हान होते. हळूहळू प्रयोगशाळेने ते केले. प्रयोगशाळेच्या ग्राहकांमध्ये आता जगातील काही नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. प्रयोगशाळा हल्ली दरवर्षी शंभरेक एकस्वांसाठी अर्ज करते. बौद्धिक संपदा हक्काखाली प्रयोगशाळेला आपले संशोधन परदेशी विकता येते. माशेलकर संचालक होण्यापूर्वी निर्यात शून्य होती. ती हळूहळू ७० ते ८० टक्के झाली.
१९९५ साली माशेलकर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेसारख्या देशातील ४० प्रयोगशाळांचे म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटीफिक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च उर्फ सीएसआयआरचे महासंचालक झाले. महासंचालक झाल्यावर हिमालयापासून त्रिवेंद्रम पर्यंतच्या आणि आसामातल्या जोरहाटपासून राजस्तानातल्या पिलानीपर्यंत पसरलेल्या या चाळीसही प्रयोगाशाळांना भेट देऊन तेथील सर्व संशोधकांना उत्तेजित केले. ‘विकाऊ संशोधन करा, नाहीतर तुम्ही लयाला जाल. जगाच्या स्पर्धेत नुसतेच टिकू नका तर पुढारी व्हा.’ या पदावरून त्यांनी प्रत्येक प्रयोगशाळेत नावीन्यता आणली. उदा. मैसूरच्या सेन्ट्रल लेदर इन्स्टिट्यूटला सांगून कोल्हापूरी चपलेच्या रचनेत नावीन्यता आणली, त्या कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना साचे दिले आणि त्यांचे उत्पादन वाढवून दिले. केरळमधील आदिवासी लोकांना माहित असलेल्या वनस्पतींचे ज्ञान वापरण्यासाठी कनी जमातीच्या १२००० आदिवासींची एक विश्वस्त संस्था बनवून त्यांच्याकडून मिळवलेले ज्ञान वापरून औषधे बनवली आणि त्यांना त्यातील नफ्याचा काही भाग मिळवून दिला. अशी अनेक उदाहरणे आहेत. हळद, बासमती, कडुलिंब ही अस्सल भारतीय असून याची एकस्वे अमेरिकेला जात असल्याने डॉ.माशेलकरांनी त्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर बाजू मांडून अमेरिकेला मंजूर झालेली ही एकस्वे भारताला मिळवून दिली. ही एकस्वे भारताला मिळत असताना आंतरराष्ट्रीय कोर्ट माशेलकरांना म्हणाले की हे तुमचे आहे याचे पुरावे सापडत नाहीत. ते तुम्ही आंतरजालावर टाका, म्हणजे अशी चुकीची एकस्वे इतर देशांना जायला नकोत. मग माशेलकारांनी पारंपारिक ज्ञानाचे एक केंद्र २००० सालाच्या सुमारास पुण्यात सुरु केले. आयुर्वेदात ज्याचा उपयोग होतो अशा ५० वनस्पती निवडून त्यावरील २०,००० पानांची माहिती जमा केली. नंतर ही माहिती सीडी रॉमवर ठेवली.
एखाद्या स्वदेशी संशोधनाचा फायदा हा फक्त ज्याने आपल्या प्रयोगशाळेत संशोधनावर काम केले आहे तेवढ्या पुरता मर्यादित राहू नये. प्रयोगशाळेतील संशोधकाएवढेच श्रेय एखाद्या शेतक-याने किंवा कारागिराने काही नावीन्यपूर्ण काम केले तर त्याला दिले पाहिजे. या विचारातून माशेलकरांनी केलेल्या शिफाराशीमधून १९९९-२००० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रीय सर्जनशीलता निधी संस्थेची स्थापना आणि त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद मंजूर करून घेतली. ही संस्था अहमदाबाद येथे असून माशेलकर त्याचे अध्यक्ष झाले. या अन्वये सुतार, लोहार, गवंडी, सोनार, शिंपी, इत्यादी अनेक व्यवसायातील लोकांनी काम करता करता आलेल्या अडचणींवर केलेली मात इतरांना पोहोचवण्याची सोय झाली आता देशभरातील अशा लाखो लोकांची नोंद यात झाली असून त्याच्या फायदा समव्यावसायिकांना होऊ लागला.
माशेलकर १९९५ ते २००६ असे दिल्लीत असताना केंद्र सरकारच्या ११ समित्यांवर अध्यक्ष म्हणून नेमले गेले. हा एक विक्रमच होता. माशेलकर २००६ साली निवृत्त झाल्यापासून पुण्यात स्थायिक झाले असून ते सध्याही अनेक भारतीय आणि जागतिक संघटनांमध्ये काम करीत आहेत. त्यांना भटनागर पुरस्कार, इंग्लंडचा एफआरएस पुरस्कार, भारत सरकारचे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार, ५० विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट्स, विज्ञानातील देशी-परदेशी संस्थांच्या फेलोशिप्स असे अनेक पुरस्कार लाभले आहेत.
- अ.पां.देशपांडे