डॉ.वसंतराव गोवारीकर.

मराठी शास्त्रज्ञ लेखमाला - 2

0

डॉ.वसंतराव गोवारीकर.

उपग्रहाच्या रॉकेटसाठी लागणारे इंधन बनवणारे, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि खतांचा कोश बनवणारे डॉ.वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च, १९३३ रोजी पुण्यात झाला. नंतरचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झाल्यावर एकेक-दोन वर्षे त्यांनी कोल्हापूरजवळील कागल येथील एका शाळेत, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. मग आपण इंग्लंडमध्ये जाऊन पीएचडी करावी असे त्यांच्या मनात आले व बर्मिंगहॅम विद्यापीठात गेले. तेथील रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख फ्रिट्झ  गार्नर वसंतरावांना म्हणाले, ‘माझ्या हाताखाली पीएचडी करायला चार वर्षे लागतात आणि आता मी इथून दोन वर्षाने निवृत्त होणार असल्याने मी तुला माझ्या हाताखाली पीएचडी करायला प्रवेश देणार नाही.’ वसंतरावांनी त्यांना विचारले, ‘तुमच्या हाताखाली पीएचडी करणारे विद्यार्थी रोज किती तास काम करतात?’ तर प्रा.गार्नर म्हणाले, ‘ आठ तास.’ मग वसंतराव म्हणाले, ‘मी रोज सोळा तास काम करेन व आपल्या हाताखाली काम करून पीएचडी मिळवेन.’ गार्नर यांनी होकार दिल्यावर त्यांनी रोज सोळा तास काम करून गार्नर यांच्याकडूनच पीएचडी मिळवली. पीएचडीनंतर त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटनच्या अॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंट आणि नंतर समरफिल्ड  रिसर्च स्टेशन येथे नोकरी केली. ती करत असताना आपण भारतात परत जावे व अणुशक्ती केंद्रात काम करावे असे वाटल्याने त्यांनी होमी भाभांना पत्र पाठवले. ही गोष्ट ऑक्टोबर, १९६६ मधील आणि त्याच महिन्याच्या ३० तारखेला भाभांचा  विमान अपघातात मृत्यू झाला. पण भाभांच्या टेबलावर जाऊन पडलेले पत्र अणुशक्ती केंद्राचे नव्याने अध्यक्ष झालेल्या विक्रम साराभाई यांच्या हाती पडले. मग त्यांच्या पुढच्या इंग्लंडमधील दौ-यात त्यांनी वसंतरावांना बोलावून घेतले व तुम्हाला अणुशक्ती केंद्रात काम करायला आवडेल का नव्याने सुरु होत असलेल्या अवकाश संशोधन केंद्रात यायला आवडेल. त्यावर वसंतरावांनी अवकाश संशोधन केंद्र निवडून तेथे ते रुजू झाले. विक्रम साराभाईंनी  त्यांना उपग्रहाच्या रॉकेटला लागणारे घन इंधन बनवायला सांगितले. त्या क्षेत्रातील ओ की ठो  माहित नसताना वसंतरावांनी ते आव्हान स्वीकारले आणि घन इंधन बनवले. ते इंधन आज ५० वर्षानंतरही  इस्रो वापरत असून त्यापेक्षा सुधारीत इंधन अजून जगात कुठेही बनले नाही, ही वसंतरावांची दूरदृष्टी होती. 

१९८३ साली इस्रोच्या विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्राचे संचालक असताना त्यांच्या व्यवस्थापनाखाली एसएलव्ही-३ चे उड्डाण झाले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान इदिरा गांधींना विचारले होते की ’हे उड्डाण दूरदर्शनवर दाखवावे का?’त्यावर इंदिरा गांधींनी विचारले की, ‘हे उड्डाण यशस्वी होईल याची तुम्हाला खात्री वाटते  का?’ तर वसंतराव म्हणाले, ‘खात्री देता येत नाही, पण जनतेचा पैसा कुठे जातो आणि एखाद्या वेळी शास्त्रज्ञही अयशस्वी होऊ शकतात हे जनतेला समजू देत  की.’ हे उत्तर इंदिरा गांधींना आवडले व त्यांनी ते दूरदर्शनवर दाखवायला परवानगी तर दिलीच, पण त्या स्वत: उड्डाणाच्या वेळी उपस्थित राहिल्या आणि उड्डाणाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यावर वसंतरावांच्या पाठीवर त्यांनी शाबासकीची थाप दिली.  १९६७  ते  १९८६ अशी २० वर्षे इस्रोत काम केल्यावर दोन वर्षाची अभ्याससुट्टी घेऊन ते अमेरिकेस गेले व तेथील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकवावे आणि पॉलिमर सायन्सवर पुस्तक लिहावे असे त्यांच्या मनाने घेतले. पण अमेरिकेस जाऊन सहा-सात महिने होतात न होतात तोच एका मध्यरात्री दिल्लीहून वसंतरावांना प्रा.यशपाल यांचा फोन आला की पंतप्रधान राजीव गांधी यांना तुम्ही येथे येऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव बनावे असे वाटते. वसंतरावांच्या मनाची चलबिचल चालू असताना सुधाताई गोवारीकर म्हणाल्या, ‘आपल्या देशाने बोलावले आहे तर आपण तेथे जाऊ या.’ आणि वसंतराव दिल्लीला आले. ते सचिव झाल्यावर त्यांनी त्यांच्या अखत्यारीत येणा-या एकेका विभागाला भेट द्यायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी हवामान खात्याला भेट दिली तेव्हा त्यांच्या ध्यानात आले की पाऊसमान वर्तवण्याचे काम ७०   टक्के होऊन या नाही त्या कारणाने थांबले आहे. मग त्यास त्यांनी चालना दिली आणि १६ परिमाणांचा वापर करून पाऊसमान वर्तवायला सुरुवात केली. तो अंदाज बरोबर ठरू लागल्यावर त्याचे नाव ‘गोवारीकर फॉर्म्यूला’ असे पडले. वसंतरावांच्या १९८६ ते १९९१ या सचिवपदाच्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून जाहीर करून देशात एक वैज्ञानिक वातावरण निर्माण केले, देशातील उत्तम विज्ञान प्रसारकांना एकेक लाख रुपयांचे पुरस्कार द्यायला सुरुवात केली, शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर विज्ञान संमेलन सुरु केले. देशाला पुढील २० वर्षात भेडसावणा-या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी एक मंडळ नेमून अब्दुल कलाम यांना पहिले अध्यक्ष केले. देशात वैज्ञानिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून देशभर विज्ञान जाथा काढला. १९९१ साली सचिवपदावरून निवृत्त झाल्यावर दन वर्षे त्यांना पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमले. त्यानंतर ते पुण्यास आल्यावर १९९५ ते १९९८ या काळासाठी राज्यपाल डॉ.पी.सी.अलेक्झांडर यांनी त्यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमले. या काळात त्यांनी प्रवेश व्यवस्थापनात सुधारणा केली आणि विविध खात्यांची-भौतिकी, रसायन जीवशास्त्र इ.इ.यांची बाहेरच्या तज्ञांमार्फत मूल्यमापन करून घ्याला सुरुवात केली. १९९७ साली ते कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्याबरोबर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने शेतीवरचा  कोश निर्माण करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. ते काम त्यांच्या चार जणांच्या गटाने १९९८ ते २००५ अशा सात वर्षात पुरे केले. हा अशा प्रकारचा जगातील पहिलाच कोश आहे. कोशाच्या कामातून वसंतरावांचे डोके वर होताच महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे त्यांना २००५ साली अध्यक्ष केले, ते त्यांच्या २०१५ सालच्या निधनापर्यंत त्या पदावर होते. शेवटी शेवटी जेव्हा त्यांना इस्रोची सतीश धवन प्रोफेसरशीप मिळाली तेव्हा इस्रोसाठी काहीतरी करावे म्हणून मोगली एरंडाचे तेल रॉकेटला इंधन म्हणून वापरता येईल का यावर त्यांचे पुणे विद्यापीठात प्रयोग चालू होते. 

१९९० सालच्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे वसंतराव जनरल प्रेसिडेंट होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या अध्यक्षीय भाषणाचा विषय होता, ‘लोकसंख्या वाढ.’ ही कॉंग्रेस त्यांच्या सचिव पदाच्या कारकीर्दीत झाली होती. हे भाषण तयार करताना त्यांनी संपूर्ण भारतातील १०० लोकांची यादी तयार केली होती. त्यात राजकारणी, विचारवंत, शिक्षणतज्ञ, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षक, गृहिणी, सैन्यातील अधिकारी, व्यापारी, अर्थतज्ञ, चार्टर्ड अकौंटंटस, उद्योगपती  अशा सर्व व्यवसायातील लोकांच्या मुलाखती घेऊन  त्या आधारे ते भाषण लिहिले होते. त्यात त्यांनी २०५० साली भारताच्या लोकसंख्येत स्थिरता येईल असे वर्तवले होते. स्थिरता म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर सारखा होईल आणि त्यावेळी असलेली लोकसंख्या तेवढीच राहील. त्यावेळी त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. इंडियन सायन्स कॉंग्रेसला परदेशाहून अनेक शास्त्रज्ञ आणि वार्ताहर येतात. परंतु कॉंग्रेस झाल्यावर काही महिन्यात हे वार्ताहर वसंतरावांना येऊन भेटले व म्हणाले, ‘तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. २०५० साली भारताच्या लोकसंख्येत स्थिरता येईल’ मग त्यावर वसंतरावांची, ‘द इनएव्हिटेबल बिलियन प्लस’ आणि ‘आय प्रेडिक्ट’ अशी दोन पुस्तके आली. 

वसंतरावांना आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. ते केंद्र सरकारच्या साखर समितीचे अध्यक्ष होते. खत समितीचे अध्यक्ष होते. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष होते. पीएचडीचे परीक्षक होते, केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांचे परीक्षक होते. इंग्लंडच्या पर्गमान या प्रकाशन संस्थेला विज्ञान विषयक पुस्तकांचे संपादन करायला मदत करीत असत. मणिपाल विद्यापीठाच्या समितीवर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी होते. मराठी विज्ञान परिषदेच्या इस्लामपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषदेचे सहा वर्षे अध्यक्ष होते. त्यांना फाय फाउंडेशन पुरस्कार मिळाला होता. १९८४ साली पद्मश्री आणि २००८ साली पद्मभूषण किताबत मिळाले. अनेक विज्ञान संस्थांचे ते मानद फेलो होते. वसंतरावांचे निधन २ जानेवारी, २०१५ रोजी झाले. 

 

  • अ.पा.देशपांडे.

लेखक हे जेष्ठ साहित्यिक असून त्यांनी जवळपास २००० लेख लिहिले असून त्यांची ८५ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विज्ञान परिषद चे कार्यवाह आहेत. मराठी विज्ञान परिषद (मविप) ही संस्था समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे कार्य करते. मोबाइल नंबर - ९९६७८४१२९६.

Leave A Reply

Your email address will not be published.