डॉ. यशवंतराव नेने.
हैदराबादजवळील पतनचेरू येथे असलेल्या इक्रीसॅट या कोरडवाहू शेतीवर संशोधन करणा-या संस्थेचे उपसंचालक आणि डाळीवर संशोधन करणारे डॉ.यशवंत लक्ष्मण नेने यांचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे २४ नोव्हेंबर, १९३६ रोजी झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण ग्वाल्हेर येथे झाल्यावर त्यांनी ग्वाल्हेरच्या शेतकी महाविद्यालयातून १९५५ साली बीएस्सी पदवी घेतली. नंतर आग्रा विद्यापीठाच्या कानपूर येथील सरकारी शेतकी महाविद्यालयातून त्यांनी एमएस्सी केली. मग ते अमेरिकेच्या इलिनॉय विद्यापीठात गेले व तेथून त्यांनी १९६० साली पीएचडी केली. ‘वानसविकृती विज्ञान आणि विषाणू विज्ञान’ हा त्यांचा पीएचडीसाठी विषय होता. वानसविकृती म्हणजे पिकावरील रोगानियंत्रणाचे विज्ञान.
१९६० साली डॉ. नेने भारतात परत आले आणि उत्तर प्रदेशातील पंतनगर विद्यापीठात ते रुजू झाले. या विद्यापीठात ते चौदा वर्षे होते. सुरुवातीला उपप्राध्यापक म्हणून सहा वर्षे ते होते, नंतर सहयोगी प्राध्यापक म्हणून तीन वर्षे आणि शेवटी प्राध्यापक म्हणून पाच वर्षे त्यांनी अध्यापन केले. याच वेळी ते वानसविकृती विज्ञान विभाग प्रमुख म्हणूनही होते. १९७४ साली त्यांची आंध्र प्रदेशातील पतनचेरू येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाहू पीक संशोधन संस्थेत वानसविकृती विज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. १९८० साली डाळींमध्ये सुधारणा घडवण्याच्या प्रकल्प विभागाची सूत्रेही त्यांच्या हाती आली. १९८६ ते ९० या काळात त्यांनी द्विदल धान्य विभागाचे संचालक म्हणूनही काम पाहिले. १९८९ साली ते या संस्थेचे उपमहासंचालक झाले. पिकांवर पडणा-या विल्ट या अनेक रोगाच्या समुच्चयामुळे त्यांनी वापरलेल्या जाळ्यांमुळे त्यांचे संरक्षण झाले. या तंत्राचा वापर केवळ भारतातच झाला असे नसून त्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला. त्यांनी विकसित केलेल्या डाळी, भुईमूगाच्या शेंगा आणि इतर पिके यांचे रोगनियंत्रक जातीमुळे उत्पादन वाढले. त्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले.
त्यांनी केलेल्या संशोधनाला तोपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनने १९६६ साली तांदळावरील खैरा रोगाची कारणे आणि फैलाव यासंबंधी घेतलेल्या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना १९६७ साली आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने आंतरराष्ट्रीय तांदूळ वर्षानिमित्त पारितोषिक दिले होते. तांदळात जस्ताचे प्रमाण कमी झाल्याने खीरा रोग निर्माण झाला. हे त्यांचे निरीक्षण जगातील पहिले निरीक्षण होय. ‘गव्हावरील रोगाचे निदान’ या विषयावरील कामाचे डॉ. नेने यांना १९७१ साली डॉ.नॉर्मन बोरालाग आणि अँडरसन पुरस्कार मिळाले होते. १९८५ साली त्यांना भारतीय वनस्पतींच्या रोग -निदानातील त्यांच्या संशोधनासाठी ‘जीरासनिधी’ पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रीय स्तरावरील हा फार मोठा सन्मान समजला जातो. त्यानंतर त्यांना ओम भसीन पुरस्कार मिळाला. १९९१ साली पंतनगर विद्यापीठाने त्यांना अध्यापन, संशोधन आणि विकास या कामाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित केले होते. खरीपातील डाळींच्या पिकांवर पडणा-या रोगांच्या कामाबद्द्लच्या त्यांच्या संशोधनाचे विशेष कौतुक झाले. १९८८ मध्ये ‘द्विदल धान्यावरील विविध रोगांवरील वार्षिक आढावा’ अमेरिकेत लिहिला गेला. त्यामध्ये एक प्रकरण लिहिण्याचा मान त्यांना मिळाला. १९८६ मध्ये आंतरराष्ट्रीय अन्नोत्पादक शेंगाधारी वनस्पतीवरील संशोधन परिषद अमेरिकेत आयोजित केली होती. या परिषदेसाठी डॉ.नेने यांनी सल्लागार म्हणून काम केले. वानसविकृती विज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सभासद होते. शेंगाधारी वनस्पतींवरील विषाणूंसंबंधी काम करणा-या आंतरराष्ट्रीय गटाचे सचिव म्हणून त्यांनी १९८१ ते ८४ या काळात काम पाहिले. १९८२-८३ साली त्यांनी अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम पाहिले. १९७३ साली अमेरिकेत ‘विषाणू नियंत्रण’ परिसंवाद झाला होता. त्या परिसंवादाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. अनेक आंतरराष्टीय वैज्ञानिक परिषदांमध्ये त्यांनी आपले शोध निबंध सादर केले होते.
भारतीय वैज्ञानिक संघटनांमध्येही त्यांचे योगदान लक्षणीय होते. १९६८ मध्ये भारतीय वानसविकृती विज्ञान संस्थेच्या कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली होती. १९७९ साली भारतीय केंद्रीय कीटकनाशक संशोधन समितीचे सभासद म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७३ ते ७८ या काळात भारतीय शेती संशोधन मंडळाच्या ‘बुरशीचे नियंत्रण’ या विषयावरील उन्हाळी शिबिराचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७४ ते ७६ या कालावधीमध्ये त्यांनी भारतीय वानसविकृती विज्ञान संस्थेच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून काम केले. तर याच संस्थेचे १९८० साली त्यांना सन्माननीय सभासदत्त्व मिळाले. १९८५ व ८६ साली त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. १९९० साली जुन्नर येथे भरलेल्या चोविसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. १९९९ साली हैदराबाद येथे झालेल्या पाचव्या जागतिक मराठी संमेलनाच्या, ‘नवीन सहस्राकाचे आव्हान’ या परिसंवादात त्यांनी भाग घेतला होता.
इतक्या विविध संस्थांचे काम सांभाळत असताना संशोधनाधारीत लेखनावरचे त्यांचे लक्ष यत्किंचितही कमी झाले नव्हते. त्यांनी एक स्वत: लिहिलेले आणि दोन संपादित अशी एकूण तीन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यांचे ८४ शोध निबंध विविध देशी-परदेशी जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. दहा संशोधन पत्रिका आणि १०८ संशोधनपर टीकाही त्यांच्या नावावर आहेत. डॉ. नेने १९९६ साली इक्रीसॅट या कोरडवाहू शेतीवर संशोधन करणा-या संस्थेच्या उपसंचालकपदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी, ‘एशियन ॲग्रो हिस्ट्री फाउंडेशन’ ही संस्था सुरु केली. ते त्याचे अध्यक्ष होते. दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील शेतीवरच्या इतिहास संकलनाचे काम या संस्थेने सुरु केले. १९९६ साली या संस्थेने, ‘वृक्षायुर्वेद’ या मूळ संस्कृत संहितेचे इंग्रजी भाषांतर छापले. त्याशिवाय ११ पुस्तके तर छापलीच, पण या संस्थेचे एक त्रैमासिकही त्यांनी सुरु केले. हरितक्रांतीमुळे जमीन बिघडली, पिकांची सकसता कमी झाली, पिकांची उत्पादकता कमी झाली, जैवविविधता कमी झाली व त्यामुळे मानवाच्या तब्येतीस हानी पोहोचली असे त्यांचे मत होते.
त्यांचे निधन १५ जानेवारी, २०१८ रोजी वयाच्या ८१व्या वर्षी तेलंगणातील सिकंदराबाद येथे झाले.