दु:ख ..

ललित

0 794

“दुःख”

पल्या आयुष्यात कधीतरी सुख येईल या आशेवरच मनुष्य जगत असतो. रात्रीच्या काळ्याकुट्ट,गडद अंधारानंतर आशावादी सकाळ येते म्हणून ती मनाला आल्हाददायक वाटते. माणसाचा मृत्यू होतो त्याच्या असह्य वेदनेमुळेच की काय, आपल्याला नव्या जन्माचा आनंद मिळतो तसेंच आयुष्यात “दुःख”आहे म्हणून सुखाची अवीट गोडी अनुभवायला मिळते.
स्वतःला असं भासवा की तुम्ही अथांग अश्या सागर किनारी बसलेले आहात. त्या निळ्या अफाट सागराकडे बघतांना, त्याच्या लाटा अनुभवतांना तुमच्या असं लक्षात येईल की,आपल्या इच्छा, अपेक्षा देखील या लाटेप्रमाणेच आहेत. जशी एक लाट किनाऱ्यावरील वाळूत मिसळली की लगेच दुसरी लाट येते. ती त्या किनाऱ्याशी असलेलं आपलं नातं कधीच तोडत नाही.दरवेळी जणू ती त्याला आलिंगणच देत असते.तसंच इच्छाही आपल्या मनाशी असलेलं नातं कधीच तोडत नाहीत. माणसाचं आयुष्य देखील हे सागरा प्रमाणे असतं. सागराला ज्याप्रमाणे भरती-ओहटी येते ना…तसेच माणसाच्या जीवनात सुख-दुःख येत असतात.
सुखाचा काळ अनुभवतांना तो अल्प तर दुःखाचा काळ डोंगराएवढा मोठा असह्य असा वाटतो,कदाचित या दुःखामुळेच आयुष्यातील गोडवा जाऊन आयुष्य खारट झालेलं असतं.
आपल्या सर्वांचे आयुष्य वरून शांत व मोहक दिसतं पण त्याच्या अंतरंगात अनेक उलथा-पालथ होत असतात, हे त्याचं त्यालाच कळतं पण जो इतरांचे दुःख जाणून घेऊ शकतो त्याच्या भावनांची कदर करतो, जो “सांत्वन” करू शकतो त्याला स्वतःच्या अंतरंगातील दुःख सहज दिसतं .जसं सूर्यप्रकाश तळ्यात पडला की तळ सहज दिसतं ना…तस्स..!!
व्यक्तीपरत्वे स्वभावगुणधर्म वेगळे असु शकतात,काहींना आपलं दुःख कुणाकडे बोलून बरं वाटतं तर काहींना त्या दुःखाचे पापुद्रे काढण्यात, तर काही सहानुभूती मिळविण्याच्या हव्यासापायी….
तर काहींना…,मनात साठवलेलं दुःख कुणाजवळ तरी बोलायचं ठरलेलं असतं पण शब्दच सापडत नाहीत,ते सापडतात एखादया झाडाखाली ,एखाद्या ढगावर, सांजवेळी एखाद्या तळ्यात, कोसळणाऱ्या पावसाच्या सरीत,त्या मंद वाऱ्यात, नयनातून ओघळणाऱ्या अश्रूत ते सतत घरंगळत असतं आणि मन अगदी स्तब्ध होऊन बसतं.
चोहीकडे स्तब्धता, शांतता हदयात मात्र विचारांच काहूर माजलेलं असतं. कारण या विचारांना हृदयाच्या बाहेर पडण्यास वाटच नसते. विजांचा कळकडात,ढगांचा गळगडाटांसह नभ दाटून यावे…धो-धो पाऊस बरसूनही नभांनी मात्र स्वच्छ, निरभ्र न व्हावं…! अशींच काहीशी स्थिती दुःख मनात कोंबून ठेवलेल्यांची असते.
मनातलं मनातच दाटलेलं राहतं आणि मग हे सर्व असह्य झालं की हृदयात कोंडलेल्या दुःखांना, भावनांना कागदावर वाट मोकळी करावी लागते.
आपल्यापैकी बरेच वाचक प्रसिद्ध होणाऱ्या अनेक लेखनांमधून समाधान शोधत असतात. स्व-आयुष्याशी मिळतं-जुळतं काही मिळतं का? “स्व” शोधतांना अनेक महानुभवांनी आपलं आयुष्य वेचलं मात्र “स्व”मिळवायचा असेल तर प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा, आनंद वाटा…!!
दिलखुलास जगा…!!आयुष्याची सकारात्मकतेणे आनंद-उत्साहात लयलूट करा. मग बघा “दुःख”कसं… मुंगी सारखं अन “सुख” कसं डोंगराएव्हढं भासेल..!!
तेव्हा….
आपल्या हृदयावर हात ठेवून….
हे म्हणायला विसरू नका……
“All is well…!!!”
“दुःखाची दौलत आहे,
हुंदक्याच पीक आहे..,
अश्रू मात्र संपले…,
बाकी सर्व ठीक आहे.”

 

श्री.मनोज वाडेकर (कलाशिक्षक)

Leave A Reply

Your email address will not be published.