एक धागा सुखाचा
एक धागा सुखाचा…
गीतकार शैलेंद्र आणि माडगूळकरांमधील साम्य
अनेक प्रतिभावानांचा जीवनाचा संदर्भ वेगळा असला तरी त्यांचे विचार जुळतात. भलेही ते एकमेकांना भेटले नसतील. किंवा दोघेही वेगळ्या काळातील असतील. तरीही ते जे अनुभवतात त्यात साम्य असतं. असे साम्य ग. दि. माडगूळकर आणि शैलेंद्रच्या एका गाण्यात दिसते.
तशी दोघांची पार्श्वभूमी अगदी निराळी. भाषाही वेगळी. पण माडगूळकरांनी लिहिलेल्या ” एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे… ” (चित्रपट: जगाच्या पाठीवर) गाण्यात आणि शैलेंद्रच्या ” सजन रे झूट मत बोलो, खुदा के पास जाना है” (चित्रपट” तिसरी कसम ) गाण्यात थोडे साम्य आहे.
दोघांनी गीत लिहिताना जीवनाचा सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
माडगूळकरांचा नायक कैदखान्यात आहे तर शैलेंद्रचा नायक बैलगाडीवरून चालला असून त्याच्या सामानावर लक्ष ठेवून पोलीस त्याच्या पाळतीवर आहेत. दोन्ही नायक सरळ साधे, भोळे आहेत. शैलेंद्र, राज कपूर आणि शंकर-जयकिशन हे त्रिकुट हिंदी चित्रपटश्रुष्टीवर राज्य करत होते तर इकडे मराठी सिनेमांमध्ये माडगूळकर, सुधीर फडके आणि अभिनेता राजा परांजपे हे तिघे रसिकांना दर्जेदार चित्रपट देत होते. ” एक धागा सुखाचा” मध्ये राजा परांजपे नायक आहेत तर “सजन रे झूट मत बोलो” मध्ये राज कपूर आहे.
माडगूळकर आणि सुधीर फडके ह्यांनी “गीत रामायण” नंतर अनेक मराठी गाणी दिली. मग अभिनेता राजा परांजपे सोबत दोघांनी उत्तम गाणी रचली. तिकडे शैलेंद्र रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये नोकरी करत होता. एका मुशायरामध्ये राज कपूरची आणि त्याची ओळख झाली. राजने त्याला शंकर-जयकिशनकडे आणले आणि पुढे तिघांनी मिळून अनेक सुरेल गाण्यांची निर्मिती केली. म्हणजे इकडे तिघे होते आणि तिकडेही तिघे.
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे” गाणारा नायक कैदेत असून त्याला कापड विणण्याचे काम दिले आहे. ह्या सिनसाठी माडगूळकरांनी कापडाची उपमा देऊन जीवनाचे सार लिहिले आहे.
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे
सुख दुःखाचे धागे विणून आपण जीवनाचे जरतारी वस्त्र तयार करत जातो. पण शेवटी हाती काय उरतं? उघडे येतो आणि उघडे जातो. माडगूळकरांनी लिहिले आहे:
पांघरसी जरी असला कपडा
येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे
नाटकात जसे तीन प्रवेश असतात तसे आपले तीन प्रवेश म्हणजे- बालपण, तारुण्य आणि शेवटी वार्धक्य. हे तीन प्रवेश असले तरी शेवटी जीर्ण शाल उरते.
मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे.
ही दोन्ही कडवी जो अर्थ सांगतात तो शैलेंद्रच्या गाण्यातही थोडा वेगळ्याप्रकारे सांगितला आहे. शैलेंद्र लिहितो,
तुम्हारे महल चौबारे
यही रह जायेंगे सारे
अकड किस बात की प्यारे
ये सर फिर भी झुकाना है
माडगूळकरांनी हाच संदेश दिला आहे. त्यांनी लिहिलं आहे,
” पांघरसी जरी असला कपडा. येसी उघडा, जासी उघडा”.
वस्त्र नेसून माणूस फुशारकी मिरवतो तरी शेवटी त्याच्या हाती वस्त्रही उरत नाही. तेच शैलेंद्र सांगतो. महल, चौबारे आपण उभारतो, त्याची अकड मिरवतो. पण शेवटी मान झुकवावीच लागते.
पुढे शैलेंद्रने लिहिले आहे
लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया
बुढ़ापा देख कर रोया, वही किस्सा पुराना है
हेच माडगूळकरांनी वेगळ्या शब्दात सांगितलं आहे.
मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे
दोघांनी बालपण, तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन काळांचा संदर्भ दिला आहे. एकाने शेवटी जीर्ण शाल उरते म्हटलंय तर एकाने वार्धक्य पाहून रडू येते, हीच सगळ्यांची कथा असल्याचं सांगितलं आहे. शैलेंद्रचं गाणं हे सत्य सांगून थांबत तर माडगूळकर त्यापुढे जाऊन हे सगळं कोण घडवतं हा प्रश्न विचारतात.
या वस्त्राते विणतो कोण? एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे
जो आपल्या जीवनाचे वस्त्र विणतो, तो एकसारखं वस्त्र विणत नाही. प्रत्येकाचं जीवन एक वेगळी कथा आहे. “विठ्ठला तू वेडा कुंभार” ह्या गाण्यात माडगूळकरांनी हाच अर्थ वेगळ्या शब्दात लिहिला आहे.
“घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार
विठ्ठला तू वेडा कुंभार ”
शैलेंद्र आणि माडगूळकरांनी लिहिलेली ही गाणी खूप गाजली. आजही ऐकली जातात. कारण त्याने जीवनाचं जे सार सांगितलं ते कालातीत आहे. गीत-संगीतात अनेक प्रवाह येतात-जातात. पण काही गाण्यांचा अर्थ काळावर मत करतो. प्रत्येक पिढीला त्याचा अर्थ भावतो. आपला वाटतो.
माडगूळकर आणि शैलेंद्रच्या गाण्यामध्ये हा ‘एक धागा ” आहे. जो सुखाचा आहे.
-निरेन आपटे