हप्त्यांना दिलेली ३ महिन्याची मुभा म्हणजे नक्की काय?
काल भारताच्या रिझर्व्ह बँकेनं मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर दिली. कर्जाचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे दास यांनी सांगितले. केंद्र सरकारने काल 1.70 लाख कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर आज आरबीआयने घोषणा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकांता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. गृह, वाहन, उद्योग, या साठीच्या कर्जदारांना याचा उपयोग होईल.
तुमचा एखादा जरी EMI चुकला तरी ज्या बँकेतून EMI वजा होतो ती बँक आणि ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे ती बँक दोघेही दंड आकारतात. तसेच सिबिल स्कोअरही झटकन खाली येतो. हप्ता एकदा जरी चुकला तरीही याचा मोठा फटका बसतो. मात्र, तीन महिने बँकांनी EMI कापू नये, असं रिझर्व्ह बँकेनं सुचवलं आहे. त्यावर निर्णयाचा सर्वाधिकार बँकांना दिला आहे. मग याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न पडतो.
सदर निर्णय दि. ३१ मार्च पासून लागू होतो त्यामुळे खरंतर एप्रिल महिन्यापासून याचा लाभ मिळेल. एप्रिल महिन्यापासून पुढचे तीन महिने EMI द्यावा लागणार नाही. अर्थात यासाठी तुमच्या बँकेने तुमच्या कर्जाचे मूल्यांकन करून तुम्हाला हि सवलत दिली पाहिजे.
सवलत कशी घ्याल?
जर तुम्हाला तुमच्या बॅंकेने हि सवलत दिली तर त्या साठी आपल्याला वेगळा अर्ज जमा करावा लागणार आहे आणि त्या अर्जानुसार आपल्याला सवलत मिळेल. आगामी तीन महिन्याच्या कालावधीत आपल्याला जर पूर्ण पगार मिळत असेल तर बँक हि सवलत नाकारू सुद्धा शकते. काही आस्थापने आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिने अधिक पगार देण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला सदर सवलत बँक नाकारू शकते.
सिबिल स्कोअरवर काय फरक पडेल ?
या तीन महिन्यांत एकही हप्ता न गेल्याने याचा परिणाम सिबिल स्कोअरवर होणार नाही. तसे आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे आपण सिबिल स्कोर ची चिंता या तीन म हिन्याकरता सोडून द्या. जर आपल्याला बँकेने सवलत नाकारली आणि आपण जर आपण हप्ते भरले नाहीत तर मात्र आपल्या सिबिल स्कोरवर नक्की परिणाम जाणवेल
हप्ता कधी द्यावा लागणार?
एक लक्षात घ्या, आपले तीन हप्ते सरकारने माफ केलेले नाहीत तर ते हप्ते तीन महिने न भरण्याची मुभा दिलेली आहे. तीन महिन्यानंतर आपले राहिलेले सर्व हप्ते आपल्याला भरावेत लागणार आहेत. त्यामुळे जर आपण घेतलेल्या कर्जाची मुदत जर अजून १५ महिन्याने संपत असेल (जून २०२१) तर आता आपले कर्ज १८ महिन्याने (सप्टें. २०२१) संपेल. आपण जर कर्जमुक्त रहावे असे आपणास पटत असेल तर हि माफी आपण न घेतलेलीच बरी हा पण जर तुमच्या कडे हप्त्याची रक्कम भरायची सोय नसेल तरंच!
कर्जाच्या व्याजाचे काय?
कर्जाचे हप्ते भरणे तीन महिन्याने लांबले आहे तसेच कर्जाची मुदत पण तीन महिने पुढे गेलेली आहे तर मग व्याजाचे काय? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
आपण कर्ज परतफेडीची मुदत वाढवल्याने त्या वाढलेल्या तीन महिन्यासाठीचे व्याज आपल्याला भरावे लागणारच आहे. त्याबाबत सरकारने कुठलीही माफी दिलेली नाहीये. त्यामुळे अजून तीन महिन्याचे व्याज आपल्याला भरावे लागणार आहे. जर आपल्याकडे १० लाखाचे कर्ज असेल ज्याची मुदत १५ वर्षाने संपत आहेत आणि ते कर्ज आपण ८% ने घेतले असेल तर १५ वर्षाकरीता आपण ७,२०,००० व्याज आधी भरत असू तर आता १५ वर्षे तीन महिन्याकरता आपल्याला ७,३४,००० व्याज भरावे लागणार आहे म्हणजे आपल्याला एकूण १४,००० व्याजापोटी अधिक द्यावे लागतील.
नक्की काय करावे?
जर आपल्याला पूर्ण पगार मिळत असेल अथवा आपल्याला हप्ता भरणे शक्य असेल तर आपण हि सवलत घेऊन आपलाच १४,००० चा तोटा करून घेऊ नये तसेच कर्जफेडीची मुदत वाढवण्यात सुद्धा काहीच अर्थ नाही. जर काही कारणाने आपणांस पूर्ण पगार मिळत नसेल तर आणि इतर ठिकाणाहूनही हप्त्याची काहीच सोय होत नसेल तरच आपण शेवटचा पर्याय म्हणून हि सवलत घ्यावी. आगामी काळात आर्थिक मंदी येणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. कालच IMF कडून त्यासंदर्भात तसे व्यक्तव्य पण आले आहे त्यामुळे आपण आपले कर्ज अधिक लवकर संपवलेले अधिक फायद्याचेच राहील.