हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिंकले ,पुत्र हारला !

0

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिंकले ,पुत्र हारला !

नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या .या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला.महाराष्ट्रातील धुळे जळगाव ,वर्धा , गोंदिया नांदेड ,हिंगोली ,जालना छ.संभाजीनगर ,कोल्हापूर अशा एकूण अकरा जिल्ह्यातून मवीआच्या पार्श्वभागावर लत्ताप्रहार करीत जनतेने हकालपट्टी केली.त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने जनाब उध्दवभाई ठाकरे यांचे तर पार पानिपत केले .
या निवडणूकीत हिंदुत्व विरुध्द तथाकथित सेक्युलर पुरोगामी असा सामना दिसला. साधुसंत महंत विरुध्द मुल्लामौलवी असा सामना रंगला.भगवा की हिरवा हा प्रचाराचा प्रमुख  मार्ग दिसला .या प्रचारात मतदारांनी महायुतीला प्रचंड प्रतिसाद दिला. यात खरी गोची आणि पच्ची झाली ती उबाठाची.
महायुतीने हिंदूहृदयसम्राट वं.बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार जनतेत प्रक्षेपित केले.ते जनतेच्या हृदयात शिरले.लोकांनी महायुतीला मतदान केले. उबाठा मात्र मुस्लिम मतदारांना सांभाळण्याच्या नादात हिंदुत्वाला तिळांजली देत राहिला.हिंदू विचारापेक्षा लांगूलचालण केले तर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मुस्लिम मते आपल्याला मिळतील हा त्यांचा फाजिल विश्वास.त्यामुळे त्यांनी भगव्या ऐवजी हिरवी वस्त्रे परिधान केली.त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र उध्दवजी यांच्यावर चिडून होता. उद्धवजीसह उबाठा नेत्यांच्या उपस्थितीत मवीआच्या प्रचारसभात “ नारे तकबिर “ चे नारे, हिरवे झेंडे यामुळे हिंदू समाजात प्रचंड रोष उत्पन्न झाला.ज्यांच्या भाषणाची सुरुवात “ जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो “ ने व्हायची ,” जय भवानी जय शिवराय “ ने आसमंत निनादायचा हे सारं बंद होऊन मिळमिळीतपणा आला. हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पहात होता. पुत्र म्हणून उध्दवजी वं.बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस जरूर आहेत पण हिंदुत्वाचे खरे वारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत हे मतदारांनी ठरविले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरावर उलटसुलट वक्तव्ये, ३७० वर अद्वातद्वा बोलणे,जय श्रीराम या घोषणेला हरामखोर म्हणणे,टिपू सुलतानचे गोडवे,औरंगजेबाला दिलेले मोठेपण ,योगी आदित्यनाथांना अपमानित करणे हे सर्व वंदनीय बाळासाहेबांच्या तत्वांच्या विपरीत असूनही त्यावर उबाठा ठाम राहणे.हिंदू जनमानसात याबद्दल प्रचंड रोष उत्पन्न झाला. 
उबाठाचा हिंदुत्वाला गाडून पुरुन त्यावर हिरवळ उगवण्याचा प्रयत्न म्हणजे वं.बाळासाहेबांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल हे उबाठाला कळलेच नाही.याउलट श्री.एकनाथजी शिंदे यांच्या हिंदुत्वाला प्रचंड बहुमत म्हणजे पूजनिय बाळासाहेबांच्या “ पिंडाला काकस्पर्श “ होय.महाराष्ट्राने हे हिंदुत्वाला प्राधान्य देण्याचे पुण्यकर्म या निवडणूकीत करुन हिंदूहृदय सम्राट वं.बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली दिली आहे.
मवीआतील इतर घटक आधीपासूनच हिंदू विरोधी आणि लांगूलचालण भूमिकेत असायचे.पण उध्दवजी ठाकरे तर आयुष्यभर हिंदुत्वाचे सुर्य असणाऱ्या वं.बाळासाहेबांचे पुत्र .पण त्यांनी पुत्रधर्म न पाळता सत्तेसाठी   असंगाशी संग केला.महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस सांगत होता की “संजय राऊत “ पासून सावध रहा पण यांना “ विनाशकाले विपरीत बुद्धी “ .उबाठाचे चालक राउतांना बनवले. चांगल्या बाबींना विरोध,स्थगिती यातच त्यांना मर्दुमकी वाटायची.लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून न्यायालयात जाणे,गोमातेला राज्यमाता दर्जा दिला तेंव्हा उलटसुलट प्रतिक्रिया,आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यावरची वक्तव्ये म्हणजे उंचीपेक्षा आगाऊ बोलणे, संजय राऊत यांचे नित्याचे बरळणे याला महाराष्ट्र विटला होता. खरं म्हणजे “हिंदुत्व आणि विकास” या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.हिंदू अर्थशास्त्र भारताला परम्वैभवाला नेणारे आहे.हे लोकसभेत भारताने मान्य केले तसेच आता विधानसभेत महाराष्ट्राने मान्य केले.सर्वसामान्य मतदारांना महाराष्ट्राचे हित हिंदुत्वातच आहे हे समजले.जे सर्वसामान्यांना कळले ते वं.बाळासाहेबांच्या सुपुत्राला कळू नये ही बाब तशी गंभीरच आहे. म्हणूनच त्यांचा सुफडा साफ झाला. महाराष्ट्रात श्री.एकनाथजी शिंदे साहेबांना प्रचंड जागा देवून खरी शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयात स्पष्ट झाले.महायुतीतही निवडून येण्याची सर्वाधिक टक्केवारी शिंदे सेनेचीच आहे.हा हिंदूह्रदयसम्राट वं.बाळसाहेबांच्या विचारांचा विजय आहे. महाराष्ट्रातील मतदार कायम सुज्ञ आहे.केवळ वं.बाळासाहेबांचा पुत्र असणे एव्हढीच पात्रता जनतेला मान्य नाही.म्हणूनच या निवडणूकीत मतदारांनी हिंदूहृदयसम्राट वं.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला हद्दपार केले आणि वं.बाळासाहेबांच्या विचारांना जिंकवले. हे उद्धवजींना आतातरी कळायला हवे.पाच वर्ष आराम न करता प्रायश्चित्त करा.वं.बाळासाहेबांचे विचार अंगीकारा.वाट चुकलो म्हणून हिंदूहृदयसम्राटांची माफी मागा.वं.बाळासाहेब उदार आहेत ते माफ करतील तुम्हाला !

विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
९८२२२६२७३५

लेखक सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक विषयांचे अभ्यासक आहेत. मोबा. नं. - ९८२२२६२७३५

Leave A Reply

Your email address will not be published.