इतिहासाचा विसर की हेतुपुरस्सर दुर्लक्ष ? – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यलढा.
इतिहासाचा विसर की हेतुपुरस्सर दुर्लक्ष ? – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यलढा.
“सत्य कितीही झाकण्याचा प्रयत्न झाला तरी ते सूर्यप्रकाशासारखे प्रखर असते! पण काही जणांचे डोळेच मिटले असतील, तर त्यांना सूर्यप्रकाशाचे तेज कसे दिसणार?” नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे खुलेपणाने कौतुक केले. संघाच्या राष्ट्रसेवेच्या अपार कार्याचा गौरव करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ सामाजिक संघटना नसून, तो भारतीय राष्ट्रवादाचा मूळ गाभा आहे. आणि बस्स! एवढे ऐकताच काहींना घशात अडकलेला कडू घोट गिळावा लागल्यासारखी अवस्था झाली. संघाचे नाव जरी कुणी गौरवाने घेतले तरी यांना असह्य होते. स्वातंत्र्यलढ्यात संघ कुठे होता, अशी जुनीच टेप हे पुन्हा वाजवू लागले. पण त्यांचे दुर्दैव असे की, इतिहास त्यांच्या थापांना पुन्हा पुन्हा खोटे ठरवतो आहे ! सत्य इतके स्पष्ट आहे की, संघाच्या विरोधकांनी कितीही कलाबाज्या खाल्ल्या, तरी त्यांचे खोटे दावे टिकू शकत नाहीत. संघाच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेबाबत जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जाते. काही राजकीय ‘ठेकेदार’ संघाने स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान दिले नाही, असा अपप्रचार करत असतात. पण वास्तव काय आहे? ऐतिहासिक दस्तऐवज आणि तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केला तर हे स्पष्ट होते की, संघाचे योगदान केवळ महत्त्वाचेच नव्हे, तर निर्णायक होते. स्वातंत्र्यलढा म्हणजे केवळ तुरुंगात जाणे किंवा ठराविक आंदोलनांना पाठिंबा देणे नव्हते. राष्ट्रनिर्माणाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून समाज जागृती, युवकांचे संघटन, शिस्तबद्ध संघटन निर्माण करणे, आणि राष्ट्रीय विचार बिंबवणे हे सुद्धा स्वातंत्र्यलढ्याचाच एक भाग होते. याच भूमिकेतून संघाचे कार्य उभे राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. हे विसरता येणार नाही की, डॉ. हेडगेवार हे स्वतः काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी 1921 च्या असहकार आंदोलनात भाग घेतला होता. त्यांचा पिंडच क्रांतिकारी होता. पण केवळ ब्रिटिशांविरुद्ध लढणे पुरेसे नाही, तर हिंदू समाजाच्या संघटनाशक्तीला जागृत करणे हेच दीर्घकालीन स्वातंत्र्याची ग्वाही देऊ शकते, हे त्यांनी ओळखले आणि संघ स्थापनेच्या मार्गावर ते वळले.
1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात संघाने थेट सहभाग घेतला नाही, हे विरोधक सतत ओरडून सांगतात. पण वास्तविक पाहता, काँग्रेसमध्येच या आंदोलनावर एकमत नव्हते. खुद्द महात्मा गांधींनी ‘करा किंवा मरा’ असे आवाहन केले, पण तत्कालीन काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद दिला होता. अशा परिस्थितीत संघाने आपले स्वतंत्र मार्ग आखले आणि भारतासाठी दीर्घकालीन राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित केले. राष्ट्रासाठी समर्पित नेतृत्व, संस्कारक्षम आणि राष्ट्रीय विचाराने प्रेरित युवकांची फौज तयार करणे हे संघाने त्या काळात केले, जे आजही देशासाठी अमूल्य ठरते आहे. ब्रिटिश गुप्तचर अहवालांमध्येही RSS च्या राष्ट्रवादी कार्याकडे संशयित नजरेने पाहिले गेले होते. उदाहरणार्थ, 1933 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अहवालात लिहिले होते की, “RSS हे एक कठोर शिस्तबद्ध संघटन असून, भारतीय युवकांमध्ये राष्ट्रवाद जागृत करण्याचे कार्य करत आहे.” (संदर्भ: ब्रिटिश इंटेलिजन्स रिपोर्ट, 1933). जर संघ हा निष्क्रिय असता, तर ब्रिटिश सरकारने त्याच्या हालचालींवर एवढी बारीक नजर ठेवली असती का? संघाला ब्रिटिशांनी वेळोवेळी संशयित ठरवले होते, याचा अर्थ स्पष्ट आहे – संघ हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक मोठा धोका असल्याचे त्यांना वाटत होते ! स्वातंत्र्यानंतर 1947 च्या विभाजनाच्या काळात पाकिस्तानातून स्थलांतरित होणाऱ्या लाखो निर्वासितांसाठी संघाच्या स्वयंसेवकांनी जिवाची बाजी लावली. दिल्लीतील किंग्सवे कॅम्पमध्ये RSS स्वयंसेवकांनी हजारो निर्वासितांना अन्न, वस्त्र आणि सुरक्षितता पुरवली होती. हे त्या लोकांनी का विसरावे, जे आज संघावर खोटे आरोप करत सुटले आहेत ? स्वातंत्र्यानंतरही RSS हे भारताच्या सुरक्षेसाठी आणि एकात्मतेसाठी अहोरात्र कार्यरत राहिले आहे. 1962 च्या चीन युद्धात, 1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात आणि 1999 च्या कारगिल युद्धात संघाच्या स्वयंसेवकांनी थेट आणि अप्रत्यक्षपणे देशसेवा केली आहे. विशेषतः 1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी, पं. नेहरूंनी स्वतः RSS स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. यावरूनच स्पष्ट होते की, स्वातंत्र्यानंतरही संघाची देशहिताची भूमिका मान्य केली गेली होती. आजही देशावर आपत्ती आली की, सरकार यंत्रणा हलण्याआधीच संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी उभे ठाकतात. मग तो नैसर्गिक आपत्ती असो किंवा राष्ट्रीय सुरक्षा संकट असो. पण काही राजकीय शक्तींना हे मान्य नाही. कारण त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा पाया संघद्वेषावर उभा आहे. RSS च्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेवर शंका उपस्थित करणाऱ्यांनी ‘स्वातंत्र्यलढा म्हणजे केवळ आंदोलन’ हा संकुचित दृष्टिकोन सोडून, व्यापक इतिहासाचा अभ्यास करावा. देश स्वतंत्र होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी कार्य करणाऱ्या प्रत्येक संघटनेचे योगदान महत्त्वाचे होते. संघाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय बांधणीतील भूमिकेला कमी लेखणे म्हणजे इतिहासाशी प्रतारणा करण्यासारखे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ एक संस्था नाही, तर राष्ट्रप्रेम, समर्पण आणि सशक्त भारताच्या उभारणीसाठी प्रेरित असलेली एक चळवळ आहे. विरोधक कितीही नकारत असले, तरी सत्याचा प्रकाशाला कोणीही कधीही झाकाळू शकणार नाही ! (फोटो गुगल साभार.)
प्रा. भागवत भांगे
सामाजिक कार्यकर्ता
7276469800