कंचनीचा महाल.
कंचनीचा महाल.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरच्या ऐतिहासिक वारशात भर घालणारी वास्तू म्हणजे कंचनीचा महाल. विविध मनोरंजक कथा, अफवांचे पेव या महालाबद्दल फुटले आहे. त्यामुळे या वास्तूबद्दल सुरूवातीपासूनच कुतूहल राहिले आहे. कंचनी नावाची एक नर्तकी येथे वास्तव्यास होती, असे सांगण्यात येत असले तरी त्याला ऐतिहासिक संदर्भ नाहीत. मेहकरच्या उत्तरेकडे उंच टेकडीवर एक पडका महाल आहे. दोन मजली असलेल्या या महालाची सध्या भग्नावस्था झाली आहे. दुसºया मजल्यावर जाणाºया पायºया तुटल्या असून, भिंतींमधील विटा बाहेर निघत आहेत. मात्र, या महालाकडे पाहल्यावर कधीकाळी येथे ऐश्वर्य नांदत होते, याची प्रचिती येते. लाल नारंगी विटांनी रचलेला कंचनीचा महाल कधीकाळी रात्रीच्या एकांतात संगीतमय स्वरांनी भारावून जात होता. कंचनी नावाची एक नर्तकी येथे राहत होती, असे सांगण्यात येते.
कंचनीबददल एक कथा अनेक पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. कंचनी ही एक लावण्यसुंदरी व उत्कृष्ट नर्तकी होती. तिचा नाच बघायला दूर दूरवरून राजे महाराजे येत होते. दररोज सायंकाळी येथे मैफील भरीत होती. या मैफीतील तिच्यावर सोन्याचे दाग- दागिणे उधळण्यात येत होते. तिच्या नृत्याची व सुंदरतेची वार्ता पंचक्रोशित पसरली होती. कंचनीचे सर्वत्र भरभराटीचे दिवस असताना तिला एकदा कुबुद्धी सूचली. या महालाच्या सहाव्या मजल्यावरून मेहरकचे सौदर्य पाहत असताना सातव्या मजल्यावरून लोणार येथील कमळजा देवीच्या मंदिरातील दिवा पाहण्याची तिची इच्छा झाली. लोणार येथील सरोवरात कमळजा देवीचे प्राचिन मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी दररोज दीप लावल्या जात होते. हा दीप पाहण्याची कंचनीची इच्छा झाली. तिने त्याकरिता सातवा मजला चढविण्याचा प्रण केला व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. मात्र, अंगात इर्षा भरल्याने मैफलीची रौनक ओसरली. तिच्याकडे येणाºयांची संख्या ओसरली. कमळजा देवीचा दिवा बघण्याच्या नादात ती शीळा (दगड) होवून पायथ्याशी कोसळली. तेव्हापासून या वास्तूला भग्नावस्था प्राप्त झाली आहे. सध्या खुल्या टेकडीवर हा महाल एकांतात उभा आहे. त्याच्या भिंती कोसळल्या. आजूबाजुला खुले मैदान आहे. कंचनीजवळ बरेच सोने – दाग दागिणे होते. ते येथील मातीत गाळल्या गेले आहेत, असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे या महालात अनेक ठिकाणी गुप्तधन शोधण्यासाठी केलेले खडडे दिसतात.
कंचनीची कथा या महालाबाबत सर्वत्र सांगण्यात येत असली तरी ऐतिहासिक काळात या वास्तूचा कोणता उपयोग होता हे निश्चित सांगणे कठीण आहे.