कठिण समय येता कोण कामास येतो।

0 1,812

कठिण समय येता कोण कामास येतो।

संकटकाळी अनेक लोक अनेक प्रकारे वागत असतात. काही कंबर कसून कामाला लागतात तर काही लोक ‘तोंडपाटीलकी’ करण्यात धन्यता मानत असतात. अनेक महाभाग तर असे असतात कि ज्यांना असे वाटत असते कि त्यांच्यापेक्षा हुशार कोणीही नाही. वर्तमान काळातील करोना संकटामुळे अनेक अशा महाभागांची ओळख समाजाला होऊ लागली आहे. सध्या कॉंग्रेस पक्षाची स्थिती कुत्र्याच्या शेपटासारखी झाली आहे. असे का तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याच्या नादात कॉंग्रेस आंधळी होते आहे हे  कदाचित त्यांच्या नेत्या – कार्यकर्त्यांना देखील कळले नाही. कालच कॉंग्रेसचे प्रवक्ते श्री रणदीप सुरजेवाला व माजी पंतप्रधान व ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्रीय कर्मचार्यांचे DA (DEARNESS ALLOWANCE) म्हणजे महागाई भत्ता यातील वाढ व त्या वाढीमुळे द्यावे लागणारे arrears हे जून २०२१ पर्यंत स्थगित करण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. त्या ऐवजी श्री सुरजेवाला यांनी शासनाला सल्ला दिला आहे कि केंद्र शासनाने स्वतःचे खर्च कमी करावेत.
इथे काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे. प्रथमतः केंद्र सरकारने पूर्ण DA बंद केलेला नसून नुकतीच जाहीर केलेली ४% ची वाढ स्थगित केली आहे. सर्व केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना सध्या प्रचलित असलेल्या दरा प्रमाणे DA मिळत राहणार आहे. म्हणजे केंद्र शासनाच्या या निर्णयाने केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना कुठलाही मोठा आर्थिक फटका बसणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस एका प्रकारे केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना दिग्भ्रमित करत आहे व ते या संकट समयी अत्यंत निंदनीय आहे. दुसरी गोष्ट श्री सुरजेवाला यांचे म्हणणे आहे कि सरकारने स्वतःचे खर्च कमी करावेत. हे निश्चितच हास्यास्पद आहे. काँग्रेसच्या काळात मंत्र्या-संत्र्यांना साधी सर्दी जरी झाली तरी ते विदेशात पळत. याउलट स्व. सुषमा स्वराज यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण सारखी क्लिष्ट शस्त्रक्रिया देखील एम्स मध्ये करविली. आपल्याला आठवत असेल कि मोदी सत्तेत आल्याबरोबर त्यांनी शासनाचे वायफळ खर्च बंद केले. पंचतारांकित हॉटेलांमध्ये होणार्या बैठका त्यांनी कार्यालयात व सर्किट हाउस मध्ये घेण्याचा परिपाठ सुरु केला, मंत्र्यांचे व अधिकाऱ्यांचे अनावश्यक विदेश दौरे कमी केले. जे मंत्री व अधिकारी आधी सुट्टीला, आपल्या मुलांना भेटायला व इतर खाजगी कामांसाठी सरकारी खर्चावर विदेशवारी करायचे ते आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. इतकेच काय तर पत्रकारांचे फाजील लाड देखील केंद्र शासनाने पूर्णतः बंद केलेले आपल्याला आढळतील. त्यामुळे ज्यांचे स्वतःचे नाक शेंबडाने भरले आहे त्यांनी इतरांना नाक पुसणे शिकवू नये.
राहिली गोष्ट बुलेट ट्रेनची. तर सुरजेवाला यांनी आधी थोडा अभ्यास करावा कि बुलेट ट्रेन प्रकल्पाला पैसा कुठून प्राप्त होतो आहे. ८१% रक्कम ही जापान कडून मिळणार असून उर्वरित खर्च गुजरात व महाराष्ट्र शासन वहन करणार आहे. त्यामुळे सुरजेवाला यांचे दोन्ही सल्ले निरर्थक व निरुपयोगी आहेत. ते केवळ सामान्य केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांचा बुद्धिभेद करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत.
या बाबींवरून लक्षात येते कि कॉंग्रेसचा मोदी द्वेष किती शिगेला पोहोचलेला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे “नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे”. असेच काहीसे कॉंग्रेसचे झालेले दिसते. देश बुडाला तरी चालेल पण मोदी बदनाम झाला पाहिजे असे जणू काही कॉंग्रेसने व्रतच घेतले आहे. ज्या पक्षाने आयुष्भर सरकारी पैशावर ऐश केली ते आता सांगताहेत कि सरकारने साधेपणा वाढवून पैश्याची बचत करावी. हे ऐकून मिर्झा गालिबचा एक शेर आठवला
“उम्र भर हम यही गलती करते रहे.. धूल चेहरे पे थी और हम आईना साफ करते रहे..!”
अशा परिस्थितीत कीव येते ती श्री मिलिंद देवरा व श्री सचिन पायलट यांच्या सारख्या तरुण नेत्यांची व त्यांच्या सारख्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांची. या तरुण तडफदार व देशप्रेमी नेत्यांना कॉंग्रेसमध्ये काय स्थान आहे? त्यांचे काय भवितव्य आहे? या पक्षात हि मंडळी खरच आपले कर्तुत्व सिद्ध करू शकतील का? कि एका परिवारच्या दुराग्रहा मुळे यांचे उज्ज्वल राजकीय जीवन नाहक बळी जाईल? अजून एक महत्वाची गोष्ट. काँग्रेसी मंडळी नेहमी रटत असतात कि काँग्रेसनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. किंवा काँग्रेसमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. आता प्रश्न हा पडतो कि आजची कॉंग्रेस आणि स्वातंत्र्य समयीची कॉंग्रेस एकच का? हा विचार करताच एक गमतीदार किस्सा आठवतो. तो असा. दिल्लीत एकदा एक माणूस नाव्ह्याच्या दुकानात गेला. गिराहिक बघून नाव्ही खुशीत आला व बढाई मारू लागला. तो म्हणाला कि ज्या वस्तऱ्याने मी तुझी दाढी करतो आहे तो माझ्या पूर्वजांचा असून, ते हा वस्तरा अकबराची दाढी करायला वापरत होते. नाव्ह्याला वाटले गिऱ्हाईक खुश होईल. पण त्या माणसाने विचारले अरे असे कसे शक्य आहे. इतके शेकडो वर्ष या वस्त्र्याचे पाते खराब कसे नाही झाले? त्यावर तो नाव्ही म्हणाला साहेब वस्तरा तोच आहे पण जेव्हा जेव्हा पाते खराब झाले तेव्हा तेव्हा ते बदलून घेतले. यावर तो माणूस म्हणतो अरे पण ती वस्तऱ्याची मुठ तर नवीन लाकडाची दिसते. त्यावर तो नाव्ही म्हणाला साहेब वस्तरा तोच आहे पण जेव्हा मुठ खराब झाली तेव्हा ती पण बदलवून घेतली. कधी पाते बदलले तर कधी मुठ पण वस्तरा मात्र तोच आहे. अगदी अशीच स्थिती कॉंग्रेसची झालेली दिसते. नेहरूंच्या काळात कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह होते बैल जोडी, इंदिराजींच्या काळात ते झाले गाय वासरू आणि आता ते झाले आहे पंजा. स्वातंत्र्य पूर्व काळात तर कॉंग्रेस ला काही चिन्ह हि नव्हते. बर हा बदल काय फक्त निवडणूक चिन्हातच झाला का? निश्चित नाही. नेतृत्व, विचार, वैचारिकता, देशाबद्दलची अस्मिता या सर्व बाबतीत कॉंग्रेसमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे आणि म्हणून आजची कॉंग्रेस हि स्वातंत्र्य पूर्व काळातील कॉंग्रेस नक्कीच नाही. कधी पाते तर कधी मुठ बदलत-बदलत त्या कॉंग्रेसला आजचे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. त्यामुळे श्री मिलिंद देवरा व श्री सचिन पायलट यांच्या सारख्या तरुण नेत्यांना व त्यांच्या सारख्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांना सांगावेसे वाटते ते केशवसुतांच्या शब्दात :
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर

आता तरी देशहिता साठी एक होऊन स्वदेश, स्वधर्म आणि स्वजन यांच्यासाठी काही पराक्रम करून मोदीजींचे हात बळकटकरून या संकटकाळी खऱ्या अर्थाने देशवासीयांच्या व तात्पर्याने देशाच्या सेवेत सहभागी होऊन आपले समाज ऋण आपण फेडुया.

डॉ.कपिल चांद्रायण
नागपूर.

Leave A Reply

Your email address will not be published.