कविता आणि तिचा संघर्षमय जीवन प्रवास…!
कविता आणि तिचा संघर्षमय जीवन प्रवास …!
मानवी जीवन हे सुख, दु:खाचे संगम आहे. जन्म सुद्धा संघर्षातून होत असतो आणि संपूर्ण जीवनाचा प्रवास संघर्षातून करावा लागतो.तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा अर्थ कळत असतो.पण,ज्यांचे संपूर्ण जीवनच संघर्षमय असेल तर त्याने सुखाचे दिवस कधी बघावे..? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आजपर्यंत या पृथ्वीतलावर होऊन गेलेल्या महाविभूतींनी संघर्षातून प्रवास केले आहेत आणि त्या प्रवासातून मानवी जीवनाचे सार्थक केले आहेत आज त्यांना सारा जग वंदन करत आहे. अशीच एक महान नारीशक्ती या भूमीवर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ होऊन गेल्या आहेत त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास वाचून डोळ्यातील अश्रू थांबत नाही. अशीच एक नारीशक्ती याच भूमीवर आहे. ती, वयाच्या तेराव्या वर्षात पाटच्या दोन्ही लहान बहीण, भावाची मायबाप बनून जगली आणि आजही जगत आहे. अतिशय खडतर प्रवास करणारी नारीशक्ती समाजाला आजपर्यंत कळली नाही आणि कोणी तिला जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही ही आजची फार मोठी शोकांतिका आहे. अशाच एका महान नारीशक्तीच्या संघर्षमय जीवनाविषयी आज आपण जाणून घेऊया आणि हा आजचा लेख त्याच नारीशक्तीची परवानगी घेऊनच मी लिहीत आहे आणि त्यांची संघर्षमय यशोगाथा समाजापर्यंत पोहचविण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. एखाद्या चित्रपट तयार होईल अशी एक अतिशय संघर्षातून प्रवास केलेला एका हसत्या, खेळत्या कुटुंबाची कहाणी आहे. आणि या कुटूंबाचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेऊन चालणाऱ्या तेराव्या वर्षात प्रवेश करणाऱ्या एका मुलीची संघर्षगाथा आहे.
कविता हे तिचे बहीण, भाऊ आणि दोघे आईवडील होते त्यांचा छोटासा हसता, खेळता कुटूंब होता.गडचिरोली जिल्ह्यात एका खेडेगावात म्हणजेच भटेगाव येथे ते आनंदाने राहत होते.तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामगड या गावी त्यांचे छोटेशे कटलरी सामानाचे दुकान होते. कविताचे बाबा आपले दुकान सांभाळत असत आणि तिची आई मोलमजुरी करून घर सांभाळत असे.सर्व काही चांगले चालताना अचानक नियतीने खेळ मांडला आणि अचानक तिच्या बाबांची प्रकृती खराब व्हायला लागली ते वेड्यासारखे वागू लागले गावात फिरू लागले आश्चर्य असे की, निरवेषणी व सुशिक्षित असणारे तिचे बाबा या अवस्थेत दिसायला लागले.तरीही तिची आई परिस्थिती समजून सर्वांचा सांभाळ करू लागली अन् अचानक सहा महिन्यातच म्हणजेच दिवाळी सणाच्या दिवशी तिच्या बाबाचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तरीही तिच्या आईने हार न मानता तिनही लहान मुलांचा मोलमजुरी करून सांभाळ करत होती. काळ तरी असं येईल कोणाला विश्वास बसणार नाही. अवघ्या सहा महिन्यातच कविताच्या आईला घरीच सर्पदंश झाले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी कविता फक्त तेरा वर्षाची होती, तिची लहान बहीण ममता नऊ वर्षाची होती आणि लहान भाऊ विक्की दोन वर्षाचा होता. हे तिघेही बहीण भाऊ अनाथ झाले त्यांच्यामागे पुढे कोणीही नाही. निसर्ग सुद्धा एवढा कसा काय कठोर होऊ शकतो…? म्हणतात ना की “एवढाही गाव मामाचा अन् एकही नाही कामाचा” या प्रचलित म्हणीप्रमाणे त्यांना आधार देणारे कोणीच उरले नव्हते. त्यावेळी कविता हिने ते जुने घर सोडून त्याच गावात काही अंतरावर शेणामातीचे छोटेशे घर बांधले आणि तिला आधार देण्यासाठी तिचे आईचे वडील ऐंशी वर्षाचे असलेले आजोबा सोबत राहिले. बिकट परिस्थिती बघून तिच्या मोठी आईचा मुलगा नरेश हा सुद्धा लहानपणी आई गेल्याने पोरका झाला होता.तो सुद्धा तिच्या घरी राहु लागला त्यावेळी त्याचे वय सोळा असेल. तिचे दुकान बंद पडले, तिच्या हातात पैसे नव्हते, मोलमजुरी करणे तिला जमत नव्हते आणि तिच्या पाठीमागे दोन गोजिरवाणे लहान बहीण, भाऊ आणि आजोबा होते. खरंच त्या माऊलीने जगावे कसे आणि जगवावे कसे..? तिचे दु:ख तिलाच माहीत. तरीही ती आपले अश्रू पुसून स्वतः दहावी वर्गापर्यंत शिक्षण घेतली आणि दोन्ही बहीण,भावाला शिकवलं, ती स्वतः पहाटे उठायची घरचे कामं करायची, बहीण, भावाचा सांभाळ करायची आणि पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पुराडा येतील वि.भा.हायस्कूल या शाळेत जायची, पाच वाजता सुट्टी झाली की, पायी, पायी घरी यायची आणि घरचे कामं करायची.सणाच्या दिवशी नाही तिला आईच्या हातचा गोड खाऊ, नाही बापाचे दोन शब्द, नाही वाढदिवस साजरा करणारे,नाही तिला नवीन कपडे घेणारे तिने कशाप्रकारे जीवन जगले असेल त्या निसर्गाला माहीत. काही दिवसांनी ती लग्नाची झाली. तिने विचार केला की जो मुलगा माझ्या बहीण,भावांचा स्वीकार करेल त्याच मुलाशी मी लग्न करेन म्हणून तिने तो निर्णय ठामपणे घेतला आणि योगायोग म्हणावे लागेल तसाच एक सुशिक्षित असलेला शेतकरी मुलगा मुस्का ता.धानोरा जि.गडचिरोली येतील रहिवासी असलेला भाऊराव बोरकर तिला बघायला आला आणि ती अट त्याने मान्य केली. कविताने स्वतः चे लग्न स्व:च ठरवले. ती वेळ कशी असेल आणि तो प्रसंग कसा असेल याची कल्पना करणे सुद्धा होत नाही. एखाद्या मुलीचे लग्न होते आणि ती जोडीने लग्न मंडपातून सार होते पण,कविता मात्र आपल्या दोनही बहीण, भावाला धरून सासरी जायला निघाली त्यावेळी तिला आशीर्वाद देण्यासाठी आई अन् बाबा नव्हते, मायेने ओठी भरणारे कोणीच नव्हते तिचे पाय धुणारे कोणीच नव्हते एवढेच काय तर गोड पाणी पाजण्यासाठी कोणीही नव्हते.जेव्हा ती सासरी बहीण, भावाला सोबत घेऊन निघाली त्यावेळी जमलेले सर्वच पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी ढसाढसा रडू लागले.निसर्गही कदाचित रडला असेल अशी अनाथ लेक, अनाथांची मायबाप बनली. ज्या लेकीचं सासरी बरोबर निभत नाही तर तिच्या भावंडांना खरंच ती माया मिळाली असेल…? पण,ती कविता मात्र दोन्ही बहीण, भावांना लहान्याचे मोठे केली. शिकवली काही दिवसांनी लहान बहीण ममता लग्नाची झाली आणि नशीब तरी एवढे खराब काय. ..? त्या ममताला मोठा आजार झाला आणि त्या आजाराने तिला ग्रासले तिच्या डोक्यावर एक केस सुद्धा नव्हते तरी एक समजदार मुलगा त्याही परिस्थितीत तिच्याशी लग्न केलं आणि सांभाळून नेलं. काही दिवसांनी सर्वच चांगले चालू असताना कविता थोडी आनंदीत होती पण,तेही नियतीला बघावले नाही ऐन तिच्या पतीचा म्हणजेच भाऊराव बोरकर यांचा कर्करोगाने निधन झाले. पुन्हा दुसऱ्यांदा कविताच्या जीवनात संघर्ष सुरु झाला.
चारही मुलांचे संगोपन, शिक्षण ही मोठी जबाबदारी तिच्यावर आली ती पुन्हा एकदा मुलांची आईबाबा बनली तिच्या संघर्षमय जीवनावर मी कितीही लिहिली तरी कमीच आहे. त्या दिवसात जर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असत्या तर त्या कविताला व तिच्या भावडांना माय मिळाली असती. ती माया मिळाली असती.कदाचित आज जर माई असती तर कविताचा संघर्षमय जीवन प्रवास बघून हळहळली असती आणि कविताची आणि माईची भेट घडून आली असती.पण, तो योग कधीच आला नाही. आजकाल एखाद्या व्यक्तीची दखल घेऊन त्याची जगाला ओळख करून देतात पण,खऱ्या अर्थाने जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे जे जगुन दाखवतात त्यांची कोणीही दखल घेत नाही. कविता ही नारीशक्ती त्यातील एक महान आहे ती स्वतः अनाथ असून अनाथांची माय वयाच्या तेराव्या वर्षात बनली किती काट्यातुन तिने प्रवास केला असेल याविषयी शब्द कमी पडतात. आमच्या महाराष्ट्र राज्यात मराठी चित्रपट सृष्टी आहे. त्या चित्रपट सृष्टीत राहणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना तसेच दिग्दर्शकांना मी हात जोडुन विनंती करते की, हा माझा लेख आवर्जून वाचावं आणि या माऊलीची दखल घ्यावी. ती माऊली जीवनात कधीच हसली नाही मात्र जगली, ती डगमगली नाही मात्र चालत राहीली.तिने स्वतः चे अश्रू लपवले व आजही लपवून जगत आहे अशा महान नारीशक्तीच्या पावन चरणांना चरणस्पर्श करण्याचे मला भाग्य लाभले.अन् एक क्षणासाठी तिच्याकडे बघुन अश्रू अनावर झाले.
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
७८२१८१६४८५