केशवराज मंदिर, आसूद. (दापोली)

नितांत रमणीय केशवराज !

1

वररुणराजाचा वरदहस्त लाभलेले कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुदंर स्वप्नच! कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येत ते डोंगरकपारीतून जाणाऱ्या नागमोडी वाटा, नद्या-खाड्या,जलदुर्ग,जेट्टीचा प्रवास , रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या नारळी- पोफळीच्या बागा, जांभा दगडात बांधलेली टुमदार घरे, लाल माती, कौलारू प्राचीन देवालये, डोईवर नितळं निळं अवकाश आणि खाली पसरलेला अथांग निळा समुद्र !
डोंगर उतारावर पसरलेली भातशेती कोकणच्या या सौंदर्यात अधिकच भर घालत असते. रोजच्या रहाटगाडग्यातून फुरसत काढायची म्हटलं कि मनाला खुणावतात त्या कोकणातल्या आडवाटा!
सहा ऋतूंचे, सहा सोहळे
येथे भान हरावे….
या कवितेतल्या ओळीप्रमाणे कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती हि नेहमीच निजसुखकारक असते. पण फळांचा राजा आंबा, तसेच फणस, काजू,कोकम,करवंद इत्यादी रानमेव्याचा आस्वाद हा फक्त उन्हाळ्यातच घेता येतो, म्हणूनच उन्हाळी सुट्टी आणि कोकणाचं नातं अगदी घट्ट आहे. रत्नागिरी जिल्हयातिल दापोली हे महाराष्ट्रातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाते.त्यामुळे थंड हवेचे दापोली हे पर्यटकांच्या खास पसंतीचे.कोकणातल्या दापोली या गावात आवर्जून जावं अस एक ठिकाण म्हणजे ‘डोंगरराजीत वसलेले केशवराज मंदिर’.
दापोलीपासून ‘दापोली-हर्णे रस्त्यावर’ सुमारे ६ ते ७ कि.मी. अंतरावर आसूदबाग आहे. तेथून उजवीकडे एक बोळवजा रस्ता खाली दाबकेवाडी कडे जातो. कोणत्याही वाहनाने वाडीपर्यंतच पोहोचता येते त्यनंतर मात्र आपल्या स्वत:च्या पायगाडीनेच डोंगर चढावा लागतो.
डाव्या बाजुला दाबके यांचे उपहारगृह आहे तेथून सरळ थोडे चालत गेल्यावर जुन्या दगडी पायऱ्या लागतात, या पायऱ्यांच्या दोन्ही बाजू नारळी-पोफळी, फणसाच्या झाडांनी वेढलेल्या आहेत. पायऱ्या उतरताच समोरचा अद्भूत नजारा पाहताच आपली पावले आपसूक थबकतात.

 

 

कुठल्याश्या कथा-कादंबरीच्या कल्पनाविश्वात आपण असे काही बुडून जातो की त्या तंद्रीच्या क्षणी आपण खरे कुठे आहोत ते कळूच नये,तसे काहीसे स्वप्न म्हणावे की सत्य असा भासच जणु मनाला होतो. बारमाही खळखळ वाहणारी कोटजाई नदी, त्यावर एक लहानसा पूल बांधलेला आहे.फोटोग्राफर्स, पक्षी निरीक्षक,चित्रकार अशा भटक्यांचे हे आवडते ठिकाण. श्री .ना.पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’या पुस्तकात ज्या पुलाचे शब्दचित्र त्यांनी रेखाटले आहे, तोच हा पूल ओलांडून वरच्या बाजूला मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.उतरण्या व चढण्यासाठी एकूण शे-दिडशे पायऱ्या असतील.ह्या वरच्या कड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. घनदाट वृक्षवल्लीतून जाणारी अरुंद वाट, अधूनमधून अंगाशी सलगी करू पाहणारी कोळ्यांची जाळी, गर्द सावली, पक्ष्यांचा किलबिलाट, खालून स्वछंद वाहणारी नदी या सर्वांमुळे मनाला मिळणारी प्रसन्नता इतर जगाची जणू भूलच पाडते. चढ असला तरीही अजिबात थकवा जाणवत नाही. ह्या परिसरातील गुढरम्य निसर्ग आपल्याला अंतर्मुख करतो. येथे निर्गुण,निराकार अशा विश्वंभराच्या सान्निध्याची अनुभूतीच जणू येते.

गर्द झाडीत वसलेले हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे.

मंदिराच्या आवारात दगडी गोमुख आहे त्यातून बारा महिने पाणी वाहत असते. हे एक आश्चर्यच आहे. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे तेथून दगडी पन्हIळीतून पाणी खाली आणलेले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ गणपतीची मूर्ती आहे. दाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूस गरुड आहे. गाभाऱ्यातील विष्णुमूर्ती फारच सुंदर आहे. मूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी आयुधे आहेत. 
समईच्या मंद प्रकाशात उजळणारी काळ्या पाषाणातली नारायणाची मूर्ती आपल्या ‘शांताकारं’ या स्वरूपाची प्रचिती देत हजारो वर्षापासून येथे उभी आहे. या ठिकाणी कार्तिक मासातल्या पहिल्या एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत उत्सव सुरु असतो. देवधर,दिक्षीत, दातार, दांडेकर, गांगल अश्या अनेक कुळांचे केशवराज हे कुलदैवत आहे. डोंगर उतरून आल्यावर सपाटून भूक लागलेली नसली तर नवलचं.. माघारी येताना दाबकेंकडे उदरभरण केल्याशिवाय हि केशवराज भेटीची सांगता होणे केवळ अशक्यच! दाबकेकाका म्हणजे हसतमुख आणि अगत्यशील माणूस. त्यांनी बाहेरच्या टेबलावर केलेली सोनचाफ्याच्या फुलांची मांडणी लक्ष वेधून घेते. काचेच्या बाटलीत पाणी घालून भरून ठेवलेली चाफा, सोनसाफ्याची फुले तेथे मिळणाऱ्या अत्तराची वर्दी देत असतात.
तेथे मिळणारे घावणे-चटणी, कांदे-पोहे, उपीट, आंबोळी, कोकम सरबत, कैरी पन्हे, फणसपोळी, आंबावडी, कोकम आगळ, खस सिरफ, छुंदा, काजूवडी, मिरगुंड, नाना प्रकारची लोणची, मसाले हेअस्सल कोकणी चविचे असतात. विविध सुवासाची अत्तरे रोझ, केवडा, चाफा, चंदन उत्तम प्रतीची असतात. तरी सोनचाफ्याचा सुगंधच मला जास्त वेडावतोच!येथली खरेदी म्हणजे खवय्ये आणि अत्तर दर्दींसाठी खासच असते. जेंव्हा जेंव्हा सणा- समारंभाला हे अत्तर मी लावते तेव्हा दरवळणाऱ्या सुगंधाबरोबर मनातही केशवराजाच्या आठवणींचा अलगद शिडकावा होतो आणि पुन्हा ‘भेटिलागीं जीवा लागलीसे आस’असे काहीसे मनाचे होते.

©️ अश्विनी तेरेदेसाई-पाटील. पुणे.
८४४६०३३३४३

1 Comment
  1. Vishwas Deshpande says

    खूप सुंदर लेख आणि आणि सचित्र माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.