क्रातिवीर उधम सिंह

0

क्रातिवीर उधम सिंह

क्रांतिवीर शहीद उधम सिंह भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जाज्वल्य देशभक्तीने आणि इंग्रजांच्या अत्याचारा विरूद्ध पेटून उठलेला असा एक क्रांतिकारक ज्याने 21 वर्षानंतर लंडनला भर सभेत मायकल ओ डॉयरची हत्या करून इंग्रजानी केलेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला. 31 जुलै त्यांच्या शहीद दिवस. जर आपण त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण केले तर त्यांच्या असिम त्याग, अद्म्मय साहस, अभूतपूर्व बलिदाना बद्दल एकून सर्वसामान्य भारतीयांना अभिमान वाटेल. उधम सिंहानी आपल्या जीवनातील दारिद्रय, दुख: आणि दुदैवाचा सामना करत आपला संकल्प पूर्ण केला. उधम सिंहाचा जन्म 26 डिसेंबर 1899 रोजी पंजाबच्या संगरूर जिल्हात सुनाम गावातील एका गरीब घरात झाला. त्या़चे वडील सरदार तेहाल सिंह जम्मू उपल्ली गावाच्या रेल्वेत चौकीदार होते. त्यांचे जन्म नाव शेर सिंग असे होते. त्यांना एक मोठा भाऊ देखील होता त्याचे नाव होते मुख्ता सिंह. उधम सिंह 2 वर्षांचे असतांना 1901 मध्ये आईचे आणि 9 वर्षांचे असताना 1907 मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यांच्या डोक्यावरून आई बापाचे छत्र हरवल्यामुळे अनाथ झालेल्या दोन्ही भावांची रवानगी केंद्रीय खालसा अनाथालयामध्ये झाली. येथेच त्यांचे नवीन नाव ठेवण्यात आले. मुख्ता सिंहाचे नाव साधु सिंह आणि शेर सिंहाचे नाव ‘उधम सिंह’ असे ठेवण्यात आले. त्यांच्या दुर्दैवाने 1917 मध्ये त्यांच्या वडील भावाचे देखील निधन झाले आणि उधम सिंह पूर्णपणे एकाकी पडले. 1918 में मैट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर 1919 मध्ये त्यांनी अनाथालय सोडले. पण उधम सिंहा बद्दल नियतीने काही वेगळेच ठरविले होते.

उधम सिंहाच्या एकाकी जीवनात सर्वात दुखत, विदारक आणि प्रक्षोभक घडलेली घटना म्हणजे जालियानवाला बाग हत्याकांड. 13 एप्रिल 1919 या दिवशी अमृतसर येथील जालियनवाला बागेत रॉलेट एक्ट विरोधात एका सभेचे आयोजन केले होते. योगायोग असा की त्याच दिवसी पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. त्या निमित्ताने हिंदू आणि शीखांचा मोठा जनसमुदाय जालियानवाला बागेत जमला होता. सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. जनरल रेजिनाल्ड डायर यांनी बागेचा एकमेव बाहेर जाण्याचा रस्ता बंद केला आणि पोलिसांना निःशस्त्र लोकांच्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश देऊन अनेक असाहाय्य निरपराध लोकांची हत्या केली. काही जण चेगराचेगंरीत, काही जण विहिरीत पडून तर काही भिंत चढून जाण्याचा प्रयत्नात मरण पावले. याच नरसंहारामध्ये उधम सिंह नावाचा एक 20 वर्षीय अनाथ तरुण देखील होता. जो कसाबसा स्वत:चा बचाव करत या हत्याकांडातून जिवंत बाहेर पडला. त्याच दिवशी त्याने ठरवले, “या कृत्याचा बदला घ्यायचा, मग त्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर”. जालियानवाला बागेतील नरसंहारचा बदला घेणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरले आणि येथूनच एक क्रांतिकारी म्हणून त्यांची वाटचाल सुरु झाली. इंग्रजांनी जनरल डायरला फक्त त्या पदारून कमी केले. 1920 साली सेवानिवृत्त झाल्यावर ते लंदनला स्थाईक झाले. त्यामुळे उधम सिंहा समोर फार मोठे आव्हान उभे राहिले.

उधम सिंहांनी आपला संकल्प पूर्ण करणयासाठी सहन केलेले कष्ट, त्रास आणि हालअपेष्टांना काही परिसीमाच नव्हती. त्यांनी लंदनला जायचे ठरविले. उधम सिंह 1920 च्या सुरवातीला अफ्रीकेला गेले तिथून पुढे अमेरिकेला गेले. तिथे काही काळासाठी त्यांनी डेट्रायट मध्ये फोर्डच्या कारखान्यात टूलमेकर म्हणून काम केले. उधम सिंहानी 1924 साली गदर पार्टीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी क्रांतीकार्यासाठी पैसे जमविण्याच्या उद्देशाने दक्षिण अफ्रीका, जिम्बाब्वे, ब्राजील आणि अमेरिकेची यात्रा केली. पण 1927 साली भगत सिंहानी त्यांना भारतात बोलावून घेतले. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत पिस्तुल घेऊन त्यांनी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी अनधिकृतपणे शस्त्रे भारतात आणल्याप्रकरणी त्यांना ५ वर्षाची शिक्षा झाली. त्यांना 23 अक्टूबर 1931 ला सोडण्यात आले होते. तुरूगांतुन बाहेर आल्यावर त्यांना कळले की 1927 साली जनरल डायर, ब्रिटेन मध्ये मरण पावला तेव्हा त्यांनी जालियानवाला हत्याकांडाचा प्रमुख दोषी तत्कालीन पंजाब प्रांताचा गव्हर्नर मायकल ओ डॉयरची हत्या करण्याचे ठरविले. तुरुंगातून सुटल्यावर ते सुनाम या आपल्या मूळगावी परत आले. पण तेथे ब्रिटीश पोलीस त्यांना त्रास देऊ लागले. शेवटी कंटाळून ते अमृतसर येथे आले आणि तेथे ‘राम मोहम्मद सिंग आझाद’ असे सर्व धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नाव धारण करून राहू लागले. ते पोलिसांना चुकवून पहले कश्मीरला गेले नंतर तिथून ते जर्मनीला गेले. उधम सिंह शेवटी 1934 साली जर्मनीतून लंडनला पहुचले. उधम सिंहांनी आपला संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करायला सुरवात केली.

उधम सिंहांनी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य, आशा आणि आकांक्षाना तिलांजली दिली होती. उधम सिंह लंदनमध्ये एका भाड्याच्या घरात राहु लागले. त्यांना आपले चरितार्थ चालविण्यासाठी आणि आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी कारपेंटरचे काम केले, हॉटेलमध्ये वेटरचे काम केले आणि इतकेच नव्हेतर एलिफेंट बॉय आणि द फोर फेदर्स नावाच्या दोन ब्रिटिश सिनेमात देखील काम केले. उधम सिंहांनी जमवलेल्या पैश्यानी पिस्तूल विकत घेतले. आपला संकल्प पूर्ण करण्याची संधी ते शोधत होते. अखेर 13 मार्च 1940 रोजी ती संधी चालून आली. त्या दिवशी लंडनमधील कॅस्टॉन हॉल येथे इस्ट इंडिया कंपनीची एक सभा होती. त्यावेळी मायकल ओ डॉयर उपस्थित राहणार होता. उधम सिंहांनी एका पुस्तकात पिस्तूलच्या आकाराचे पाने कापून त्यात पिस्तूल लपवून कोटमध्ये ठेवले. जेव्हा कॅस्टन हॉलमध्ये मायकल ओ डॉयर सभेला संबोधित करण्यासाठी उभा राहिला आणि सभेमध्ये बसलेल्या उधम सिंहानी आपल्या कोटमधून शिताफीने पिस्तुल काढीत, गोळ्या मायकल ओ डॉयरवर झाडल्या. मायकल ओ डॉयर जागीच मरण पावला. उधम सिंह मायकल ओ डॉयरची हत्या करून पळाले नाहीत. उलट हसत हसत त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले, कारण त्यांचा संकल्प आता पूर्ण झाला होता. जेव्हा त्यांच्यावर केस चालत होती तेव्हा त्यांनी कोर्टात सांगितले की
“I did it because I had a grudge against him. He deserved it. He was the real culprit. He wanted to crush the spirit of my people, so I have crushed him. For full 21 years, I have been trying to seek vengeance . I am Happy that I have done the job. I am not scared of death. I am dying for my country. I have seen my people starving in India under British rule. I have protested against this, it was my duty. What greater honour could be bestowed on me than death for the sake if my motherland?”
त्यांचे उद्बोधन क्रांतिकारकांना प्रेरणादायी ठरले.
उधम सिंहांना मायकल ओ डॉयरच्या हत्येला दोषी ठरवून 31 जुलै 1940 ला ‘पेंटनविले जेल’ मध्ये फॉसी देण्यात आली. उधम सिंहाची पराकोटीची जिद्द, चिकाटी आणि सर्मपणामुळे 21 वर्षानंतर त्यांनी आपले संकल्प पूर्ण केले. उघम सिंहाच्या बलिदानामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. इतकेच नव्हे तर उधम सिंहाच्या बलिदानामुळेच शेवटी 100 वर्षांनंतर ब्रिटिश सरकारला जालियानवाला बाग हत्याकांडा बद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात उधम सिंहाचे नाव अजरामर झाले.

लेखक हे धर्म, संस्कृती, इतिहास आणि सामाजिक विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. मो.- ९९२३२९२०५१.

Leave A Reply

Your email address will not be published.