महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे.

0
  • महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे.

 

  • महालक्ष्मी मंदिर , कोल्हापूर.
    कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर अर्थात अंबाबाईचे मंदिर हे पुराणात उल्लेख असलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या बांधकामावरील मांडणीवरून हे मंदिर इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असावे असे वाटते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले आहे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने आपल्या महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी आहे असे म्हटल्या जाते. या मंदिराचा सुद्धा मुसलमानांनी विध्वंस केला होता त्यावेळी त्या मंदिरात असलेल्या पुजार्‍याने अनेक वर्षे देवीची मूर्ती लपवून ठेवली होती अशी आख्यायिका आहे. त्यानंतर संभाजी महाराज यांनी इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचा जीर्णोद्धार केला. ह्या मंदिराचे उत्तम कोरीव काम केले आहे तसेच मंदिराच्या भिंती व मंदिरातील सर्वात वरचे शिखर यामध्ये मंदिराच्या बांधकामाचे साम्य दिसते. महालक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.
  • श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर.
  •  भारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तुळजापूर हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीचे महत्व हे हिंदू पुराणातून खूप मोठ्या सविस्तर रुपात सांगितली आहे. त्यानुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केलेले आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची भोसले घराण्याची ही तुळजा भवानी माता ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी ही हेमाडपंती स्वरूपाची आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवसापर्यंत साजरा करण्यात येतो.
  • श्री रेणुकादेवी , माहूर.
  • माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी बरोबरच भगवान श्री दत्तात्रेय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत.
    येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. भगवान श्री परशुरामाची आई म्हणूनही रेणुकामातेची ओळख आहे. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर हे अंदाजे तेराव्या शतकात देवगिरीच्या राजाने यादवकालीन काळात बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी सुद्धा भक्तांची श्रद्धा आहे. एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला होता तेव्हा तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. भगवान शंकराचा अवतार असलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले होते. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय ही जमदग्नीकडे होती.
    राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला होता तेव्हा त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली होती. जेव्हा ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम हा आश्रमात नाही हे बघून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला होता. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तेथे आला. त्यावेळी जो प्रकार झाला होता तो प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली होती. पित्याला अग्नी देण्यासाठी एकदम साफ व कोरी भूमी आवश्यक होती त्यामुळे त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. तेव्हा तो रानावनात भटकत भटकत मग अखेर माहूरगडावर आला होता त्यावेळी तेथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली तेव्हा मग येथेच आपल्या पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर जेव्हा अंत्यसंस्कार केले होते त्यावेळी माता रेणुका ही सती गेली होती. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता तेव्हा अशी आकाशवाणी झाली की ” तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस.” परंतु परशुरामाची उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यामुळे मग त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते तेवढेच ते परशुरामाला दिसले. या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव असा आशय होतो म्हणून मग ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ असे झाले.
  • सप्तशृंगीदेवी – नाशिक
  • महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ म्हणून सप्तशृंगीदेवीची ओळख आहे. सप्तशृंगी देवी ही नाशिकपासून ६५ किलोमीटरवर ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर स्थित आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणून म्हणजेच सप्तशृंगगड हा आहे. तिकडे एकीकडे खोल दरी आहे तर दुसरीकडे छाती लपविणारे कडे आणि त्यात फुललेली नाजूक हिरवळ असा हा रम्य निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू काही या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारीच आहे असे क्षणभर वाटते.
    आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली त्यामुळे ती तेथे होम हवन द्वारे प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप म्हणजेच देवी सप्तशृंगीचे होते असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य फार मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी ही होय. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी आहे असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात भगवान राम, देवी सीता व श्री लक्ष्मण जेव्हा वनवासासाठी आले होते तेव्हा ते येथे येऊन गेल्याची आख्यायिका आहे.
    देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी जेव्हा त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा त्या काठीला शेंदूर लागला होता. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे फार मोठे रम्य असे रूप आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.
  • संकलित-
Leave A Reply

Your email address will not be published.