महायुतीत समन्वय आणि ठाम निर्णय घ्या मुख्यमंत्री महोदय !

0

महायुतीत समन्वय आणि ठाम निर्णय घ्या मुख्यमंत्री महोदय !
महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत महायूतीला पाशवी बहुमत दिले.महाविकास आघाडीच्या बुडालाच आग लागल्यामुळे त्यांचे उगाच अरण्यरूदन सुरु आहे पण वास्तविकता ही आहे की मतदारांना हा विश्वास आहे की लोकांचे खरे प्रतिनिधी शिंदे फडणवीसच आहेत.त्यांना अजितदादांची साथ मिळाली म्हणजे दुधात साखर पडली. महाराष्ट्रातील लोकांनी मोठ्या विश्वासाने महायुतीच्या खांद्यावर मान टाकली.खांद्यावर मान टाकणारी जनता निश्चितच मूर्ख नाही.गत अडीच वर्षात महाराष्ट्राने अनुभव घेतला.महायुतीतील शिस्त,समन्वय,दूरदर्शिता,निरपेक्ष आणि सकारात्मक दृष्टी लोकांनी अनुभवली म्हणून यांना झोळीत मावणार नाही इतके भरभरुन दान दिले.महाविकास आघाडीची तर अशी अवस्था केली की त्यांना जर विरोधीपक्षनेतेपद मिळाले तर ते ही भिक्षा म्हणून मिळेल कदाचित.असो…. लोकांनी मोठ्या विश्वासाने यांना महाराष्ट्र दिला खरा ! पण झोळीत मिळालेले अफाट दान यांच्या झोळीत सुरक्षित आहे ? की यांची झोळी फाटण्याची वेळ येईल ? असा प्रश्न यांचे वागणे बघता महाराष्ट्राला पडणे सहाजिक वाटते. सरकार भक्कम बहुमतात असतांना महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळण्याचा मुहूर्त सापडेना.कुणी गावाकडे जाऊन बसले तर कुणाच्या दिल्लीवाऱ्या. कुणी डोळे लावून दूध पितांना महाराष्ट्र पहात होता. झालं ! एकदाचा मुहूर्त निघाला मुख्यमंत्री पदाचा. तर किळवंड लागली मंत्री पदावरुन .मंत्रीपद मिळाले नाही म्हणून विधीमंडळ अधिवेशनात विधानभवनाच्या ऐवजी काही आमदारांनी बिनधोक नागपूर सोडून आपल्या गावाचा रस्ता धरला.उच्चभोग पाहिल्यावर कनिष्ठ भोग गौण वाटतो त्या प्रमाणे मंत्रीपद मिळूनही काहीजण संतुष्ठ नव्हते कारण त्यांना मनासारखे भोगाचे मंत्रिपद मिळाले नाही.पंधराच्या वर मंत्री मिळालेल्या खात्याचा कार्यभार स्विकारायला तयार नाहीत.कित्येक दिवसानंतर बसले कसेबसे खुर्चीत. पालकमंत्री पदावरून महायुती हास्यास आणि रोशास पात्र ठरतेय. उघड उघड नाराज्या व्यक्त करतात.कुणी म्हणते मी गरीब म्हणून मला गरीब जिल्हयाचा पालकमंत्री केले, तर कुणी म्हणतात मी नाराजीने झेंडा फडकत आहे.घोषित झालेल्या पालकमंत्र्यांना स्थगित्या देण्यात आल्या आणि त्यावर भिजत घोंगडे ठेवल्या जाते.
साऱ्या महाराष्ट्राचा रोष एका मंत्र्यावर दिसतो .ते मंत्री गुन्हेगार आहेत की नाहीत हे सध्या सांगणे कठीण आहे.पण महायुती म्हणून बोटचेपी भूमिका का घ्यायची ? एक तर सांगा सिध्द होईपर्यंत आम्ही त्यांना खाते देणार . नाहीतर त्या मंत्र्याचा राजीनामा घ्या . महाराष्ट्राला मूर्ख समजत आहात का ? राजीनामा देणार नाही आणि खातेही देणार नाही ? अशाने कसे चालेल महोदय ?बिनखात्याचा मंत्री म्हणजे भर सभेत मंचावर बसवायचे पण दिगंबर अवस्थेत.निर्णय घ्यावाच लागेल कोणतातरी.
महायुतीचे आमदार खासदार मंत्री खुशाल विरोधी वक्तव्ये करतात.कुणी शासकिय निर्णयासंबंधात,कुणी घटक पक्षातील नेत्यांविरोधात. एक तर एस.टी.भाडेवाढ चर्चेतून व्हायला हवी होती.पण समजा नाही झाली चर्चा तरी निर्णयावर एकजुटीने ठाम रहा.किंवा एकजुटीने निर्णय मागे घ्या.त्यावर उगाच नकारात्मक बोलणे म्हणजे विरोधकांना कामच ठेवले नाही. मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी ,शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्यावर खरंच विश्वास आहे लोकांचा . पण तुम्ही कितीही नाही म्हणत असाल पण तुमच्यात समन्वय नाही याची जाणीव महाराष्ट्राला होतेय.काही ठिकाणी पाठीचा कणा नसल्यागत आपण भूमिका घेत आहात हे ही महाराष्ट्राचे ठाम मत आहे. तुम्ही नाकाराल नेहमीप्रमाणे की आमच्यात मतभेद नाहीत,सारं आलबेल आहे.पण काय काय चाललंय भल्या माणसा ,लोकांना सारं कळतय रे ! महाराष्ट्र सोबत आहे तुमच्या फडणवीस साहेब !विरोधकांना ओरडू द्या काहीही ! ठाम निर्णय घ्या. पालकमंत्री तुमचा अधिकार आहे घ्या ठाम निर्णय.जो मंत्री घेत नसेल तर त्याला नारळ द्या वाटल्यास. तुम्हाला भाडेवाढ मागे घ्यायची तरीही आणि ठेवायची तरीही महाराष्ट्र तुमच्या सोबत. श्री.धनंजय मुंडेंना मंत्री ठेवायच असेल तरीही आणि काढून टाकायचे असेल तरीही महाराष्ट्र तुमच्या सोबत. लाडक्या बहिणीसाठी काही नियम, अटी लावायच्या असतील तरीही घ्या निर्णय महाराष्ट्र सोबत आहे तुमच्या. आमदार खासदार मंत्री यांचे अभ्यासवर्ग घ्या,वेळ पडल्यास तंबी द्या.
तुमच्या तिघांवरही विश्वास अजूनही कायम आहे.पण तुम्ही जर निर्णयच घेत नसाल आणि तेही  कुणाच्या दबावात तर ते चूक ठरेल. महायुतीचे तीनचाकी सरकार चालवणे कठीण आहे हे जनतेला समजते.तुमच्या अडचणीही समजतात मतदारांना.तुमचं खरंही आहे. पण यद्यपि सत्यम् ,लोकविरुद्धम,नाकरणीयम,ना चरणीयम् ! 
लोकविरुध्द सत्य टाळले पाहिजे. सरकार वाचले पाहिजे म्हणून आमदार, खासदार मंत्री स्वैर वागले तरी चालेल .ये ना चॉलवे ! सध्या चांगले वाटत असले तरी ही खाजवून खरुज ठरेल.खाजवतांना गोड वाटते पण नंतर ती जखम गंभीर रुप घेते.लक्षात ठेवा ! तुमच्यावर फक्त मतदारांचा दबाव हवा,लोकमताला प्राधान्य द्या.
तुमचा आपसातील समन्वय महत्वाचा आहे. “ तस्मात उत्तीष्ठ कौन्तेय ! युद्धाय कृतनिश्चय !

(photo – google.)

विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
९८२२२६२७३५

0

लेखक सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक विषयांचे अभ्यासक आहेत. मोबा. नं. - ९८२२२६२७३५

Leave A Reply

Your email address will not be published.