मन आणि अध्यात्म

1

मन आणि अध्यात्म

प्रत्येक मनुष्याला ईश्वराने किंवा निसर्गाने एकदंर चौदा इंद्रिये बहाल केली आहेत. नाक – कान – डोळे आदी पाच ज्ञानेंद्रिये  , हात – पाय -त्वचा आदी पाच कर्मेंद्रिये व मन चित्त बुद्धी,  अहंकार हि चार अंतरेंद्रिये  होत. या सर्व इंद्रियात ‘मन’ हे अंतरिंद्रिय अतीव महत्वाचे आहे . सर्व इंद्रियात मन ‘ मी ‘ आहे असे स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत सांगतात.

”  इंद्रियाणां  मनः श्चस्मि “

उपनिषदांनी सुद्धा मनाचे महत्व फारच सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

मनोजातं जगत सर्व मन एव जगत्पती: I

मन  एव पर ब्रह्म  मन एव रामापती:   II

तुकाराम महाराजसुद्धा मनाचे वर्णन फारच बहारीने करतात

मन करा रे प्रसन्न I  सर्व सिद्धीचे कारण  II

मोक्ष अथवा भवबंधन  I  सुख समाधान उच्च ते  II

मने प्रतिमा स्थापिली  I  मने  मना पूजा केली  II

मने इच्छा पुरविली  I मन माउली सकळांची  II

मन गुरु आणि शिष्य  I  करी आपुलीच दास्य  II

प्रसन्न  आपआपणास  I  गती अथवा अधोगती  II 

साधक  वाचक  पंडित  I  श्रोते  वक्ते  एका मात II

नाही नाही आन  दैवत I  तुका  म्हणे दुसरे  II

इतके   प्रचंड    सामर्थ्य मनात आहे. असे हे मन मोठे विलक्षण आहे. म्हंटले तर मन आहे शंकर नाहीतर भयंकर. म्हंटले तर मन आहे हनुमान नाहीतर चंचलमर्कट. मन हेच देव आहे तर ते दैत्यहि आहे. मन परम मित्र तसे ते मोठे शत्रूही आहे, असे गीतेत सांगितलं आहे मोक्ष प्राप्त करून देणारे मनच आणि भावबंध जखडून टाकणारे मनच . असे हे अत्यंत विक्षिप्त मन प्रत्येकाचा वाट्याला आलेले आहे .

अशा या बलवान मनाला वश करून घेतल्याशिवाय  मानवाला तरणोपाय नाही. मन हे लहान मुलांसारखे आहे मुलांचे लाड केले तर ते लाडावून हाताबाहेर जातात, आणि मार दिला तर ते कोडगे होतात,  अपेक्षा केल्या तर कुठल्या क्षणी तो काय प्रसंग आपल्यावर ओढवून आणेल ते सांगता नाही येत मनाला मोकळे सोडले तर ते डोक्यावर बसते. जर मनाला मारण्याचा प्रयत्न केला तर ते उरावर बसते. अशा विचित्र मनाचा प्रश्न कसा सोडवायचा हाच मनापुढे भला मोठा यक्षप्रश्न आहे. म्हणून अशा मनापुढे भल्याभल्यांनी हात टेकले तर आपल्यासारख्या सामान्याची काय कथा ?

समर्थ रामदास स्वामी सांगतात :

अचपळ  मन माझे नावरे आवरिता  I

तुजविण क्षीण होतो  धावरे  धाव आता  II

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात

बहू चंचल चपळ I  जाता  येता न लगे वेळ I

तुका म्हणे येणे I  बहू   नाडिले  शहाणे II

अर्जुनासारखा  वीर कृष्णापुढे  अक्षरशः  रडगाणेच गातो.

चंचलही मनः कृष्ण प्रमाचि बलवद दृढ  I

तस्यांह  निग्रहं मन्ये वायोरिव सुदृष्करम II

मग प्रश्न निर्माण होतो तो असा की, या मनाचा प्रश्न सोडवायचा कसा ?  वास्तविक हा प्रश्न सोडविण्यासाठी निरनिराळ्या माणसांनी निरनिराळे प्रयत्न करून पाहिले आहेत. मग त्यांना त्याची जाणीव असो की  नसो. प्रत्यक्षात मात्र बहुतेकांना याची जाणीव नसते.

जे लोक नास्तिक असतात त्यांच्यापैकी बहुतेक लोक त्यांच्या हा प्रश्न त्यांच्या मार्गाने  सोडवायचा प्रयत्न करतात. ” खाना पिना मजा करना, उद्याचा कोणी पहिले आहे , देव धर्म सबकुछ  झूठ ” या वृत्तीने चैन करून मन शांत करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात.

यांच्या उलट जे लोक आस्तिक असतात तेही आपल्या मार्गाने जाऊन मनाला जिंकण्याचा प्रयत्न करतात. निरनिराळे  उपासतापास, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, पूजाअर्चा, ग्रंथ, पोथ्याची, पारायणे केली. परंतु प्रत्यक्षात मात्र हे सर्व करणाऱ्या लोकांच्या पदरात केवळ कष्ट पडतात. साध्य राहते बाजूला.

मग मनाला वश करून कसे घेता येईल ?   याला उत्तर असे की मनाला पाहिजे ते दिले की मन वश होते. तुम्ही म्हणाल आम्ही सध्या तेच करतोय.  मनाला सिनेमा पाहिजे सिनेमा बघतो. दारू, गुटका पाहिजे तर तात्काळ गुत्यात जातो. मनाने मागण्याचा अवकाश की  ते आम्ही सर्व मनाला ताबडतोब देण्याचा प्रयत्न करतो.

Beg ,Buy , Borrow , Steal  करून मनाचे मनोरथ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मग एवढे करूनही मन वश होत नाही हा प्रश्न उरतोच .

हा प्रश्न सोडविण्यासाठी याकडे सूक्ष्म दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. ” मनाला पाहिजे ते दिले की मनाचे समाधान होते ” ही गोष्ट खोटी आहे. पण मुळात अडचण अशी आहे की मनाला काय पाहिजे हेच मनाला कळत नाही.

किरकिर व  पिरपिर करणाऱ्या मुलाला तुम्ही काहीही दिले तरी ते फेकते.” मला हे नको ” म्हणते. बाळा तुला काय पाहिजे म्हंटलं तर सांगू शकत नाही आणि आणखी भोकाड पसरून रडायला लागते. तशी ह्या मनाची अवस्था आहे. मनाला काय पाहिजे तेच मनाला कळत नाही .

मनाला काय पाहिजे याचे उत्तर फार सोपे आहे. मनाला पाहिजे स्थैर्य. प्रचंड शक्तीच्या मनात दुष्काळ आहे तो फक्त स्थैर्याचा. केवळ स्थैर्य मिळवण्यासाठी माणूस नाना प्रकारे धडपड करतो. कनक, कांता, सत्ता, संपत्ती, यांच्या प्राप्तीसाठी मन सदैव प्रयत्नशील असते. कारण हे मिळाल्यास मनाला स्थैर्य मिळेल ही भोळी आशा असते. याचा परिणाम असा होतो की मनाची हाव न धाव कधीच संपत नाही . परमार्थात जी रड आहे ती हीच.

आज मनाची अवस्था अत्यंत केविलवाणी आहे . मोठ्या घड्याळ्याचा लंबक ज्याप्रमाणे एका टोकवरून दुसऱ्या टोककडे व परत पहिल्या टोकाकडे सतत फिरत असते त्याप्रमाणे आपल्या मनाचा लंबक भूतकाळातून भविष्यकाळाकडे  व  भविष्यकाळाकडून  भूतकाळाकडे  सतत  फिरत  असतो. वर्तमानकाळात तो एक क्षणही राहू शकत नाही.ज्या क्षणी मनाला स्थैर्य प्राप्त होईल त्याक्षणी ते वर्तमानकाळात स्थिर राहू शकेल.

सिनेमा, नाटक, गायन, वगैरे किंवा उपासतापास, व्रतवैकल्ये, अंगारे धुपारे हे प्रकार स्वतः अस्थिर असल्यामुळे मनाला स्थैर्य देऊ शकत नाहीत . मग मनाला स्थैर्य मिळवून देण्याकरिता ती वीट पाहिजे जी मनापेक्षा सूक्ष्म, शाश्वत अक्षय, अखंड उपलब्ध  असणारी हवी,  ती कोणती हे पुढच्या लेखात पाहू. 

सद्गुरू चरणरज

सौ. माणिक पळसकर

लेखिका ह्या आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासक आहेत. मोबाइल - ९८२२५६६८१२.

1 Comment
  1. मनिषा उपासनी says

    खूप सुंदर लेख. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.

Leave A Reply

Your email address will not be published.