मराठी भाषा- शिवशाही- राजवाडे- सावरकर ते बॉटम मध्ये केक घालण्यापर्यंतचा प्रवास…

0

मराठी भाषा- शिवशाही- राजवाडे- सावरकर ते बॉटम मध्ये केक घालण्यापर्यंतचा प्रवास…

 

मराठी भाषेच्या आणि एकंदरच सर्व प्रादेशिक भाषांच्या अस्तित्व आणि भवितव्याबद्दल चर्चा होत असतात. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जागतिक भाषा सध्या इंग्लिश आहे आणि इंटरनेट मुळे तिचा प्रसार आणि वापर अफाट आहे. इंग्लिशच्या दबावाखाली अनेक लहान भाषा समूह अंताच्या किनाऱ्यावर पोचले आहेत आणि अनेक प्रादेशिक भाषा भीषण भेसळीच्या शिकार झाल्या आहेत.

 

शिवशाहीतील मराठी….

 

शिवशाहीचं मराठी भाषेला सगळ्यात मोठं योगदान काय असेल तर त्याकाळात जवळपास सगळ्या भारतात राज्यकारभाराची भाषा पर्शियन होती आणि शिवछत्रपतींनी ती बदलून मराठा साम्राज्याची सरकारी भाषा मराठी आणि सरकारी लिपी मोडी केली. त्याकाळातली मराठी सुद्धा अनेक पर्शियन- अरबी शब्दांची रेलचेल वाली होती. कोकणस्थ ब्राह्मणांचा अभिमान बिंदू आणि औरंगझेबाच्या पश्चात मराठा साम्राज्याचा विस्तार वाढवणाऱ्या बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बाळाजी, बाळाजी बाजीराव यांची पदवी पेशवा ( پیشوا ) हि सुद्धा पर्शियन भाषेतून मराठीत आलेली आहे.

 

ब्रिटिश काळातील मराठीचं सुवर्णयुग…

 

ब्रिटिश काळात मराठीला एकापेक्षा एक अव्वल दर्जाचे मराठे लेखक मिळाले आणि त्यामुळे मराठी फक्त टिकली नव्हे तर प्रचंड विकसित आणि पुष्ट झाली. लोकहितवादी, कादंबरीकार आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य वि का राजवाडे, लोकमान्य टिळक, न चि केळकर अशी एक दोन नव्हे तर शेकडो नावं समोर येतील ज्यांनी ब्रिटिश काळात इंग्लिशचं गरुड समाजावर बसलेलं असताना नेटाने मराठीत अप्रतिम, पल्लेदार, सुंदर मराठी साहित्याची निर्मिती केली.

 

इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठी भाषेतल्या ३०,००० धातूंचं संकलन करून ते पुढे त्यांच्या पश्चात प्रकाशित झालं. त्याशिवाय राजवाड्यांनी मराठी व्याकरणावर ब्रिटिश दृष्टिकोनातून होत असलेला अभ्यास आणि रचना झुगारून मराठीला ब्रिटिश कचाट्यातून सोडवलं…

 

महाकवी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी जोमाने राबवून शेकडो इंग्लिश शब्दांना मराठी भाषेत उत्तम पर्यायी शब्द आणले किंवा जुने आणि लुप्त होऊ पाहणारे शब्द पुनरुज्जीवित केले आणि आपण आजही ते दैनंदिन व्यवहारात वापरतो. आजची मराठी जरी १०० वर्षांपूर्वीच्या मराठीपेक्षा बऱ्यापैकी वेगळी असली तरी तिची शुद्धता टिकवण्यात या सर्व साहित्यिकांचं योगदान खूप मोठं आहे.

 

मराठीच्या विद्रुपीकरणात टीव्ही आणि मराठी मालिकांचं योगदान..

 

मराठी टीव्ही मालिका सध्या कोणत्याही अंगाने मराठी दिसत नाहीत. “मला तुला हॅपी झालेलं बघायचंय” प्रकारची “इंग्राठी” भाषेतली वाक्य या मालिकांत काम करणारे कलाकार सहज सहज वापरतात. बरीचशी वाक्य ३० ते ७० टक्के इंग्लिश असतात. ओढून ताणून मराठी अनुवादित शब्द वापरू नये हे बरोबर ज्या मराठी शब्दांना बदलून उगाच इंग्लिश शब्द घुसवायची आवश्यकता नाही ते घुसवून यांना काय मिळतं हा प्रश्न आहे!

 

बॉटम मध्ये केक!

 

सात आठ वर्षांपूर्वी झी मराठी वर एका कार्यक्रमात एक मराठी नावाचा मनुष्य “तिरामिसु” नावाच्या इटालियन गोड पदार्थाची तयारी आणि प्रक्रिया समजावत होता. त्याने आधी त्यासाठी आवश्यक वस्तूंची यादी सांगितली, मग पहिली पायरी- हा आपण ग्लास घेतलेला आहे, आता हा केक पीस घेऊया- मग ग्लासच्या बॉटम मध्ये केक घालूया (याचा अर्थ ग्लासच्या तळाशी केक ठेवूया!) त्यावर हे आणि मग ते आणि मग ते कि “झालं आपलं तिरामिसु रेडी”!

 

जर लोकांवर प्रचंड प्रभाव टाकणारी टीव्ही सारखी माध्यमे मराठी भाषेची इतकी उच्च दर्जाची सेवा करणार असतील, मराठी कलाकार, अभिनेते, अभिनेत्र्या “आय मिन, यु नो, आय मिन टू से” अशी बलात्कारित भाषा नित्यनियमाने वापरणार असतील तर अशांना मराठी कलाकार म्हणणं हे निरर्थक आहे.

 

आपण मराठीत उगाचच भेसळ करून ती दैनंदिन व्यवहारात वापरणार असू तर वर्षातून एकदा मराठी गौरव गीत किंवा मराठी भाषा गौरव दिन वगैरे साजरे करणं हा शुद्ध ढोंगीपणा आहे त्यापेक्षा निर्धाराने आणि नियमाने शुद्ध मराठी बोलण्याचा निग्रह बाळगणे हाच मराठी टिकवण्याचा एकमेव राजमार्ग आहे.

 

ब्रिटिश न्यूनगंड…

 

ब्रिटिश राजे काही शतके सलगपणे फ्रेंच भाषेत राज्यकारभार करत होते आणि त्यातून बाहेर येत इंग्लिश हि आज जगाची दैनंदिन व्यवहाराची भाषा झाली आहे! त्यामुळे मराठी किती काळ आणि काय स्वरूपात टिकवायची हे फक्त आणि फक्त मराठी मातृभाषा असणाऱ्या आपल्या सारख्या लोकांच्या हाती आहे!

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

फोटो गुगल साभार..

 

—विनय जोशी

लेखक हे कवी, गझलकार, समिक्षक आहेत. शिक्षण : बी.कॉम, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर,  एम.बी.ए. (मार्केटिंग मॅनेजमेंट).झाले असून, हायमिडीया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई येथे निर्यात व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. तसेच काव्यप्रेमी गझल मंच राज्यस्तरीय अध्यक्ष आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, डोंबिवली (कोषाध्यक्ष - वर्ष २०१९ ते २०२१). # महाराष्ट साहित्य परिषद, पुणे (डोंबिवली शाखा) # ओंजळीतील शब्दफुले साहित्यिक समुह - महाराष्ट्र # नक्षत्राचं देणं काव्यमंच - महाराष्ट्र # मराठी कविता समुह – महाराष्ट्र आशा विविध संस्था समूहावर कार्यरत आहेत. पुरस्कार : प्रितगंध फौंडेशन - मुंबई कडून साहित्यिक पुरस्कार (२०१५) कै.सौ.कुमूदिनी गडकरी पुरस्कार (२०१६) कै.वैजयंती काळे पुरस्कार (२०१६) हृदयांतर ब्लॉग आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा पुरस्कार (२०१६) कवयित्री शेवंताबाई सरकाटे स्मृती राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार (कविता संग्रह - ओंजळ) (२०१७) अस्मिता ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा लक्षवेधी पुरस्कार (२०१७) काव्यांगण प्रतिष्ठान, यवतमाळ राज्यस्तरीय कवी सम्मेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मानीत (२०१७) अमृतादित्य साहित्य पुरस्कार (कविता संग्रह - मनतरंग) (२०१८) राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार - २०१८ (पारस काव्य, कला, जनजागृती संस्था - नवी मुंबई) कै.म.पां.भावे स्मृती उल्लेखनीय पुरस्कार - २०१८ "अक्षय-रजनी" राज्यस्तरीय काव्य पुरस्कार - २०१९ दापोली येथील शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०२०). आशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. कवितासंग्रह प्रकाशित - ओंजळ (२०१६) मनतरंग (प्रातिनिधीक (२०१८) (निर्मिती-संकल्पना, संपादन आणि प्रकाशन) अंत:स्थ मनात (२०२०).तसेच अनेक कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. भ्रमणध्वनी : ९८९२७५२२४२ / ७५८८४१४२३९, इ.मेल :  vijayjoshi20@hotmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.